श्रीलंकेचा पलटवार!
दुसऱ्या टी-20 सामन्यात विंडीजचा उडवला धुव्वा : मालिकेत 1-1 बरोबरी
वृत्तसंस्था/ डम्बुला
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा टी-20 सामना मंगळवारी (15 ऑक्टोबर) डाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकून श्रीलंकेने पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. या विजयासह लंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता, उभय संघातील तिसरा व निर्णायक सामना दि. 18 रोजी होईल.
प्रारंभी, खेळपट्टीचा अंदाज घेत लंकेने प्रथम फलंदाजी करताना पथुम निसंकाच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 162 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना मात्र विंडीजचा संघ 16.1 षटकांत 89 धावांवर ऑलआऊट झाला. लंकन संघाने हा सामना 73 धावांनी खिशात घालत मालिकेत बरोबरी साधली. दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यामध्ये शानदार विजयाची नोंद करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
निसंकाचे अर्धशतक
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेने 20 षटकात 5 बाद 162 धावा केल्या. पथुम निसांकाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 49 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. कुशल मेंडिसने 26 तर कुशल परेराने 24 धावांचे योगदान दिले. कमिंदू मेंडिसने 19 धावा केल्या. गोलंदाजीत वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक 2 बळी घेतले. अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ व स्पिगेरने एकेक गडी बाद केले.
विंडीजचा दारुण पराभव
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 16.1 षटकांत 89 धावांत सर्वबाद झाला. कर्णधार रोव्हमन पॉवेलने संघाकडून 20 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. रुदरफोर्डने 14 तर अल्झारी जोसेफने 16 धावांचे योगदान दिले. हे दोघे वगळता इतर विंडीज फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करता आली नाही. संघाने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट्स गमावण्यास सुरुवात केली. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना दुनिथ वेलालगेने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय कर्णधार चरिथ असालंका, महिष थीक्षणा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. एक विकेट मथिशा पथिरानाने घेतली.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका 20 षटकांत 5 बाद 162 (निसांका 54, कुशल मेंडिस 26, कुशल परेरा 24, रोमारियो शेफर्ड 2 बळी)
विंडीज 16.1 षटकांत सर्वबाद 89 (रुदरफोर्ड 14, रोव्हमन पॉवेल 20, अल्झारी जोसेफ 16, वेलालगे 3 बळी, असलंका, तिक्षणा व हसरंगा प्रत्येकी दोन बळी).