लंकन महिलांनी नोंदवला पहिला विजय
बांगलादेशचा 7 धावांनी पराभव, अटापटूचे अंतिम षटक ठरले निर्णायक, हसिनी परेरा सामनावीर
वृत्तसंस्था / नवी मुंबई
आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी कर्णधार चमारी अटापटूच्या शेवटच्या षटकाने बांगलादेशचा विजय लंकेने हिसकावून घेतला. या स्पर्धेतील लंकेचा हा पहिला विजय आहे. 85 धावा झळकविणाऱ्या लंकेच्या हसिनी परेराला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि त्यांचा डाव 48.4 षटकात 202 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 50 षटकात 9 बाद 195 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. बांगलादेशचा या सामन्यातील विजय 49 व्या षटकापर्यंत निश्चित होता. पण कर्णधार अटापटूचे शेवटचे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. या षटकात तिने बांगलादेशचे चार गडी बाद केले. अटापटूने या षटकातील आपल्या पहिल्या चेंडूवर राबिया खानला पायचित केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नाहीदा अख्तर धावचीत झाली. तिसऱ्या चेंडूवर तिने निगार सुलतानाला झेलबाद केले. आणि या षटकातील चौथ्या चेंडूवर तिने मारुफा अख्तरला खाते उघडण्यापूर्वी पायचीत करीत बांगलादेशचे या सामन्यातील आव्हान संपुष्टात आणले.
लंकेच्या डावात हसिनी परेराने 99 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 85, कर्णधार अटापटूने 43 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 46, सिल्वाने 2 षटकार आणि 1 चौकारासह 37 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे शोरना अख्तरने 27 धावांत 3 तर राबिया खानने 39 धावांत 2 तसेच नाहीदा अख्तर, मारुफा अख्तर व निशिता अख्तर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावामध्ये शर्मिन अख्तरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 103 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 64 धावा जमविल्या पण तिचे हे प्रयत्न अखेर वाया गेले. कर्णधार निगार सुलतानाने 98 चेंडूत 6 चौकारांसह 77 धावांचे योगदान दिले. शोरना अख्तरने 1 चौकारासह 19 धावा केल्या. लंकेतर्फे चमारी अटापटूने 42 धावांत 4 तर सुगंधिका कुमारीने 38 धावांत 2 तसेच प्रबोधिनीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : लंका 48.4 षटकात सर्वबाद 202 (हसिनी परेरा 85, अटापटू 46, निलाक्षिका सिल्वा 37, शोरना अख्तर 3-27, राबिया खान 2-39), बांगलादेश 50 षटकात 9 बाद 195 (शर्मिन अख्तर नाबाद 64, निगार सुलताना 77, शोरना अख्तर 19, अवांतर 11, अटापटू 4-42, सुगंधिका कुमारी 2-38, प्रबोधिनी 1-29).