लंकन महिलांना आज पाकिस्तानवर मोठा विजय आवश्यक
वृत्तसंस्था/कोलंबो
गणितीयदृष्ट्या अजूनही शर्यतीत असले, तरी श्रीलंकेला आज शुक्रवारी येथे होणाऱ्या महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील लढतीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत जिवंत राहण्याच्या दृष्टीने आधीच बाहेर पडलेल्या पाकिस्तानवर व्यापक विजय मिळवावा लागेल. इतक्यावरच भागणार नसून त्यांना उर्वरित साखळी सामन्यांचे निकाल अनुकूल राहण्याची आशा बाळगावी लागेल. श्रीलंका सध्या चार गुणांसह आणि नेट रन रेट उणे 1.035 सह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. स्पर्धेत जिवंत राहण्यासाठी चामारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील संघाला पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल आणि अनुकूल निकालांच्या मालिकेची आशा बाळगावी लागेल. ज्यामध्ये न्यूझीलंड आणि बांगलादेशविऊद्धच्या उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागणे आवश्यक आहे. याशिवाय रविवारी होणाऱ्या सामन्यात इंग्लंडने पाचव्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडला (4 गुणांसह) हरवावे लागेल.
श्रीलंकेसाठी ही स्पर्धा मिश्र राहिली आहे. त्यांनी एक विजय मिळविला, तीन पराभव पत्करावे लागेल आणि दोन सामन्यांचे निकाल लागले नाहीत, कारण त्या सामन्यांवर पावसाने पाणी टाकले. शुक्रवारी हवामान चांगले राहील अशी अपेक्षा ते बाळगून असतील. श्रीलंकेने मागील सामन्यात बांगलादेशविऊद्ध सात धावांनी विजय मिळविला. हा त्यांचा एकमेव विजय आहे. श्रीलंकेसाठी आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये खेळलेली हसिनी पेरेरा ही सर्वोत्तम फलंदाज आहे. तिच्या खात्यात 182 धावा असून ती श्रीलंकेच्या फलंदाजीचा मुख्य आधार आहे. बांगलादेशविऊद्धच्या मागील सामन्यात या 30 वर्षीय खेळाडूने उत्कृष्ट अर्धशतक झळकावून तिच्या संघाला विजयाकडे नेले. श्रीलंकेला आशा असेल की, ती या सामन्यातही तिचा फलंदाजीचा फॉर्म कायम ठेवेल आणि त्यांना पुढे नेईल. जरी फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करत नसली, तरी कर्णधार चामारीने शेवटच्या षटकात स्वप्नवत वाटावी अशी कामगिरी करताना तीन बळी घेतले आणि श्रीलंकेला कमी धावसंख्येच्या थरारक सामन्यात बांगलादेशला हरवण्यास मदत केली.
परंतु शुक्रवारच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेला मुख्य चिंता हवामानाची असेल, कारण येथे सततच्या पावसाने वेळापत्रकात अडथळा आणलेला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानकडे खेळण्यासाठी पत शक्य तितकी राखण्याचे तेवढे उद्दिष्ट आहे. कारण ते आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आठ संघांच्या स्पर्धेत ते फक्त दोन गुणांसह तळाशी आहेत, जे दोन पावसामुळे सोडून द्याव्या लागलेल्या सामन्यांमधून मिळाले आहेत. सहा सामन्यांनंतरही त्यांच्या हाती विजय लागलेला नसून चार पराभव आणि दोन निकाल न लागलेले सामने त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा नेट रन रेट उणे 2.651 आहे. परंतु आज शुक्रवारी फातिमा सनाच्या नेतृत्वाखालील संघ विजयाने मोहिमेचा शेवट करण्याचा आणि श्रीलंकेच्या संधी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.