लंकन संघाची मालिका विजयाच्या दिशेने वाटचाल
बांगलादेश दु.डाव 6 बाद 115, लंकेची 96 धावांची आघाडी
वृत्तसंस्था / कोलंबो
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता यजमान लंकेचा संघ मालिका विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर लंकन संघाला डावाचा विजय मिळविण्यासाठी आणखीन चार गडी बाद करावे लागतील. लंकेने बांगलादेशवर 96 धावांची आघाडी मिळविली असून बांगलादेशने दुसऱ्या डावात 6 बाद 115 धावा जमविल्या होत्या.
या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा प. डाव 247 धावांवर आटोपल्यानंतर लंकेने प. डावात 458 धावा जमवित बांगलादेशवर 211 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर लंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशची दुसऱ्या डावात स्थिती 6 बाद 115 अशी केविलवाणी झाली आहे. या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी असून शनिवारी सामन्याचा निकाल पहावयास मिळेल. लंकेला डावाचा विजय मिळविण्यासाठी बांगलादेशचे चार गडी बाद करावे लागतील.
लंकेने 2 बाद 290 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. लंकेचा सलामीचा फलंदाज निशांकाने 19 चौकारासह 158 धावांची दीड शतकी खेळी केली. चंडीमलने 1 षटकार आणि 10 चौकारांसह 93 धावा जमविल्या. निशांका आणि चंडीमल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 194 धावांची भागिदारी केली. कमिंदु मेंडीसने 5 चौकारांसह 41 धावा केल्या. कुशल मेंडीसने उपयुक्त 84 धावांची खेळी केल्याने लंकेला 458 धावांपर्यंत मजल मारता आली. कुशल मेंडीसने 87 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 84 धावा झोडपल्या. तो धावचीत झाला. बांगलादेशतर्फे ताजुल इस्लामने 131 धावांत 5 तर नईम हसनने 87 धावांत 3 आणि नाहीद राणाने 94 धावांत 1 गडी बाद केला. ताजुल इस्लामने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची ही सतरावी खेप आहे. तसेच लंकेच्या पी. निशांकाने सलग दोन कसोटीमध्ये दीड शतकी खेळी केली आहे.
211 धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेशच्या दुसऱ्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. जयसूर्या, डिसिल्वा तसेच असिता फर्नांडोच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचे 6 गडी 115 धावांत तंबूत परतले. सलामीच्या शदमान इस्लामने 2 चौकारांसह 12, अनामुल हकने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 19, मुश्फिकुर रहीमने 2 चौकारांसह 26, मेहदी हसन मिराजने 1 चौकारांसह 11 धावा केल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 26 धावांचे योगदान दिले. लिटॉन दास 13 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे धनंजय डिसिल्वा आणि प्रभारत जयसूर्या यांनी प्रत्येकी 2 तर असिता फर्नांडो आणि टी. रत्ननायके यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश प. डाव सर्वबाद 247, लंका प. डाव 116.5 षटकात सर्वबाद 458, (पी.निशांका 158, चंडीमल 93, कुशल मेंडीस 84, लाहीरु उदारा 40, कमिंदु मेंडीस 31, ताजुल इस्लाम 5-131, नईम हसन 3-87, नाहीद राणा 1-94), बांगलादेश दु. डाव 38.4 षटकात 6 बाद 115 (नजमुल हुसेन शांतो 26, अनामुल हक 19, शदमान इस्लाम 12, मोमिनुल हक 15, मुश्फिकुर रहीम 26, मेहदी हसन मिराज 11, दास खेळत आहे 13, प्रभात जयसूर्या व धनंजय डिसिल्वा प्रत्येकी 2 बळी, असिता फर्नांडो व टी. रत्ननायके प्रत्येकी 1 बळी)