श्रीलंकन पंतप्रधान भारत दौऱ्यावर दाखल
दोन दिवसांच्या भेटीत अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमरसूर्या गुरुवारी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर भारतात दाखल झाल्या आहेत. श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्या शनिवार, 18 ऑक्टोबरपर्यंत भारतात राहणार असून दोन दिवसात प्रमुख द्विपक्षीय मुद्यांवर आणि विविध क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याच्या संधींवर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ राजकीय नेत्यांशी चर्चा करतील.
श्रीलंकेच्या पंतप्रधान अमरसूर्या ह्या दोन्ही देशांमधील व्यापार आणि व्यावसायिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या व्यावसायिक कार्यक्रमातही सहभागी होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. अमरसूर्या यांची ही भेट भारत आणि श्रीलंकेतील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाणीची परंपरा पुढे नेत आहे. त्या खोल आणि बहुआयामी द्विपक्षीय भागीदारीला चालना देतील. त्यांच्या या दौऱ्यातून भारताच्या ‘महासागर व्हिजन’ आणि ‘शेजारी प्रथम’ धोरणाने प्रेरित होऊन मैत्रीचे बंध आणखी मजबूत होतील, असेही सांगण्यात आले.
श्रीलंकेच्या पंतप्रधान नवी दिल्लीत एनडीटीव्ही आणि चिंतन रिसर्च फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एनडीटीव्ही वर्ल्ड समिटलाही उपस्थित राहतील. या कार्यक्रमात त्या मुख्य भाषण देणार आहेत. पंतप्रधान अमरसूर्या श्रीलंकेतील शिक्षण विभागाची जबाबदारी देखील सांभाळतात. त्यामुळे, त्या शिक्षण, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा करण्यासाठी दिल्ली आयआयटी आणि नीती आयोगाला भेट देतील.
अमरसूर्या ह्या दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे त्या दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजलाही भेट देतील. त्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता 16 एनसीसी कॅडेट्सच्या हस्ते समारंभपूर्वक गार्ड ऑफ ऑनरने कार्यक्रम सुरू होतील. त्यानंतर कॉलेजच्या लॉनवर प्रतिकात्मक वृक्षारोपण समारंभ होणार आहे.