श्रीलंकन राष्ट्रपतींचे ‘गार्ड ऑफ ऑनर’ने स्वागत
तीन दिवसांचा भारत दौरा : पंतप्रधान मोदींसह विविध केंद्रीय मंत्र्यांशी द्विपक्षीय संवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. दिसानायके यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील बहुआयामी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. रविवारी रात्री ते दिल्लीत दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी त्यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गार्ड ऑफ ऑनरने औपचारिक स्वागत करण्यात आले.
श्रीलंकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर दिसानायके यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. ते 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात राष्ट्रपती दिसानायके भारताच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हिताच्या द्विपक्षीय मुद्यांवर प्राथमिक चर्चा केली. दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा द्विपक्षीय संवाद झाला. तसेच अन्य केंद्रीय मंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली.
द्विपक्षीय भेटीनंतर नरेंद्र मोदी आणि दिसानायके यांनी संयुक्त निवेदन केले. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे भारतात स्वागत करतो. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली याचा मला आनंद आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होत आहे. आम्ही आमच्या भागिदारीसाठी दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर, आमची चर्चा भारत-श्रीलंका आर्थिक सहकार्य मजबूत करणे, गुंतवणुकीच्या संधी वाढवणे, प्रादेशिक सुरक्षा, पर्यटन आणि ऊर्जा यासारख्या मुद्यांवर केंद्रित असल्याचे दिसानायके यांनी सांगितले.
आम्ही आमच्या आर्थिक भागिदारीमध्ये गुंतवणूक नेतृत्व वाढ आणि कनेक्टिव्हिटीवर भर दिला आहे. डिजिटल, भौतिक आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटी आमच्या भागिदारीचे महत्त्वाचे स्तंभ असतील. दोन्ही देशांदरम्यान वीज ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि बहु-उत्पादन पेट्रोल पाईपलाइन स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. दोन्ही देशांमधील सौरऊर्जा प्रकल्पांवरही भर दिला जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्र्यांचीही भेट
श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा झाली. भारत-श्रीलंका आर्थिक सहकार्य बळकट करणे, गुंतवणुकीच्या संधींचा विस्तार करणे आणि प्रादेशिक सुरक्षेला चालना देण्यावर त्यांनी चर्चा केल्याचे दिसानायके यांनी सांगितले.
राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली
राष्ट्रपती दिसानायके यांनी सोमवारी सकाळी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगनही उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही यासंबंधी माहिती दिली. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी सोमवारी सकाळी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. बापूंची सत्य आणि अहिंसेची शाश्वत मूल्ये जगभरातील मानवतेला प्रेरणा देत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.