For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा 63 धावांनी विजय

06:50 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा 63 धावांनी विजय
Advertisement

रचिन रवींद्रची खेळी व्यर्थ : प्रभात जयसूर्या ठरला लंकेसाठी तारणहार

Advertisement

वृत्तसंस्था/गॅले (श्रीलंका)

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने 207 धावा केल्या होत्या आणि त्यांच्या हाती 2 विकेट्स शिल्लक होत्या. दोन्ही संघासाठी करो या मरो अशी परिस्थिती होती. सर्वांच्या नजरा होत्या न्यूझीलंडचा स्टार फलंदाज रचिन रवींद्रच्या फलंदाजीवर. 91 धावांची खेळी करत मैदानात ठाण मांडून उभे राहणाऱ्या रचिनला बाद करण्याचे ध्येय श्रीलंकेचे होते. पाचव्या दिवशी कर्णधार धनंजय डी सिल्वाने मास्टरप्लॅन अमलात आणला अन् विजयाचा पाया रचला. न्यूझीलंडसाठी एकमेव आशा असलेल्या रचिनला अखेरच्या दिवशी केवळ 1 धाव करता आली अन् तो बाद झाला. अखेरच्या दिवशी लंकेने फक्त 4 ओव्हरमध्ये खेळ खल्लास केला.

Advertisement

गॅले कसोटीत श्रीलंकेच्या विजयात प्रभात जयसूर्या हिरो ठरला, त्याने दोन्ही डावात एकूण 9 बळी घेतले. त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. रचिन रवींद्रच्या शानदार खेळीनंतरही किवी संघाला 63 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. रवींद्रने 168 चेंडूत 92 धावांची खेळी केली, पण अखेरच्या दिवशी प्रभात जयसूर्याने त्याला पायचीत करत लंकेचा विजय सोपा केला. अवघ्या 20 मिनिटात लंकन संघाने विजयाला गवसणी घातली व दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. उभय संघातील दुसरी व शेवटची कसोटी दि. 26 ते 30 सप्टेंबर या कालावधीत गॅले येथे खेळवण्यात येईल. विशेष म्हणजे, 18 सप्टेंबरला सुरु झालेला कसोटी सामना 23 सप्टेंबरला म्हणजेच पाचव्या दिवशी नाही तर सहाव्या दिवशी संपला कारण एक दिवस श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकांसाठी राखीव ठेवण्यात आला होता.

रचिन रवींद्र एकटा लढला पण जयसूर्यासमोर हरला

प्रारंभी, यजमान लकंन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 305 धावा केल्या, प्रत्युत्तरात, किवी संघाने पहिल्या डावात 340 धावा करत 35 धावांची आघाडी घेतली. यानंतर लंकन संघाने दुसऱ्या डावात 309 धावा जमवल्या व किवी संघासमोर विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडने आज पाचव्या दिवशी (23 सप्टेंबर) 8 बाद 207 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडला 68 धावा करायच्या होत्या आणि त्यांचे दोन फलंदाज शिल्लक होते. किवीज संघाच्या आशा नाबाद 91 धावा करणाऱ्या रवींद्रवर होत्या मात्र अखेरच्या दिवशी रवींद्र फार काळ टिकू शकला नाही. त्याला आज केवळ 1 धाव जोडता आली. प्रभात जयसूर्याने एका अप्रतिम चेंडूवर पायचीत करत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रविंद्र बाद झाल्यानंतर शेवटचा फलंदाज विल्यम ओरूरके 6 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. ओरुरकेलाही प्रभात जयसूर्याने बाद केले. चौथ्या दिवशीच्या धावसंख्येत अवघ्या 4 धावांची भर घालत किवी संघ 71.4 षटकांत 211 धावांवर सर्वबाद झाला.

गॅलेमध्ये लंकेचा 25 वा विजय

गॅले येथे न्यूझीलंडचा पराभव करुन, श्रीलंकेने 2000 पासून कोणत्याही एका ठिकाणी सर्वाधिक 25 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. श्रीलंकेने येथे खेळल्या गेलेल्या 43 कसोटी सामन्यांमध्ये आपल्या 25 व्या विजयाची क्रिप्ट लिहिली. हा देखील लंकन संघाचा अनोखा विक्रम झाला आहे. या कालावधीत इंग्लंडने लॉर्ड्सवर 25 विजयांची नोंद केली आहे, परंतु त्यांनी 48 कसोटी सामने खेळले आहेत.

गुणतालिकेत उलटफेर, लंकन संघ तिसऱ्या स्थानी

पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, श्रीलंकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. श्रीलंकेने आता न्यूझीलंडला मागे टाकले आहे. 8 सामन्यात 4 विजय आणि 4 पराभवानंतर श्रीलंकेचे 48 गुण झाले आहेत. दुसरीकडे, श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. किवी संघाचे 7 सामन्यात 3 विजय आणि 4 पराभवानंतर 36 गुण आहेत. दरम्यान, गुणतालिकेत टीम इंडिया अव्वलस्थानी असून ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानी आहे. याशिवाय, इंग्लंड पाचव्या, बांगलादेश सहाव्या तर आफ्रिका सातव्या स्थानी आहे.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका प.डाव 305 व दुसरा डाव 309,न्यूझीलंड 340 व दुसरा डाव 71.4 षटकांत सर्वबाद 211 (टॉम लॅथम 28, केन विल्यम्सन 30, रचिन रवींद्र 92, टॉम ब्लंडेल 30, प्रभात जयसूर्या 5 बळी तर रमेश मेंडिस 3 बळी)

Advertisement
Tags :

.