श्रीलंकेचा बांगलादेशवर मालिका विजय
जयसूर्याचे पाच बळी, पथुम निशांकाला दुहेरी मुकूट
वृत्तसंस्था / कोलंबो
यजमान श्रीलंकेने शनिवारी येथे बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी लंकेने बांगलादेशचा एक डाव आणि 78 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रभात जयसूर्याने 56 धावांत 5 गडी बाद केले तर लंकेच्या पहिल्या डावात दीड शतकी खेळी करणाऱ्या पथुम निशांकाला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी मुकूट देण्यात आला. या मालिकेतील दोन्ही सामन्यात निशांकाने दीड शतकी खेळी केली आहे.
या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 247 धावांवर आटोपल्यानंतर लंकेने पहिल्या डावात 458 धावांचा डोंगर उभा केला. लंकेने बांगलादेशवर 211 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव प्रभात जयसूर्याच्या फिरकीसमोर कोलमडला. बांगलादेशने 6 बाद 115 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे चार गडी 40 चेंडूत 18 धावांची भर घालत तंबूत परतले. प्रभात जयसूर्याने 56 धावांत 5 गडी बाद केले. धनंजय डिसिल्वा आणि टी. रत्ननायके यांनी प्रत्येकी 2 तसेच असिता फर्नांडोने एक गडी बाद केला. बांगलादेशने दुसऱ्या डावात आपले 6 गडी 33 धावांत गमविले. बांगलादेशतर्फे मुश्फिकुर रहीमने 2 चौकारांसह 26, कर्णधार शांतोने 1 षटकार 1 चौकारासह 19, अनामुल हकने 1 षटकार 2 चौकारांसह 19, शदमान इस्लामने 2 चौकारांसह 12, मोमिनुल हकने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 19, लिटॉन दासने 14 तर मेहदी हसन मिराजने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. आता कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात पुढील महिन्यात तीन सामन्यांची टी-20 तसेच तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. उभय संघातील पहिला वनडे सामना येत्या बुधवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश प. डाव 247, श्रीलंका प. डाव 458, बांगलादेश दु. डाव 44.2 षटकात सर्वबाद 133 (मुश्फिकुर रहीम 26, अनामुल हक 19, शांतो 19, मोमिनुल हक 15, शदमान इस्लाम 12, दास 14, मेहमी हसन मिराज 11, प्रभात जयसूर्या 5-56, डिसिल्वा 2-13, टी. रत्ननायके 2-19, असिता फर्नांडो 1-22)