For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताविरुद्ध टी 20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर

06:29 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताविरुद्ध टी 20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर
Advertisement

चरिथ असलंकाकडे नेतृत्वाची धुरा : अनुभवी दिनेश चंडीमल, कुशल परेराचे संघात पुनरागमन

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

भारताविरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी श्रीलंकेने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी 20 संघाच्या नेतृत्वाची धुरा चरिथ असलंकाकडे सोपवण्यात आली असून अनुभवी दिनेश चंडिमलचे दोन वर्षांनंतर टी 20 संघात पुनरागमन झाले आहे. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला मात्र संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 27 जुलैपासून दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाणार आहे.

Advertisement

भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झाली असून आता श्रीलंकेनंही आपला 16 सदस्यीय संघ जाहीर केला. अलीकडेच पार पडलेल्या लंकन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे. डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज चारिथ असलंकाची टी 20 मालिकेसाटी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. असलंकाने वानिंदू हसरंगाची जागा घेतली आहे. 2024 टी 20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर हसरंगाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. माजी कर्णधार दसून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांचीही संघात वर्णी लागली आहे.

अँजेलो मॅथ्यूजला डच्चू

संघाचा माजी कर्णधार आणि अफाट अनुभव असलेला खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, यामागचे कारण काय, हे स्पष्ट झालेले नाही. याशिवाय, धनजंय डी सिल्वाला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर दिनेश चंडिमल आणि कुसल परेरा सारखे वरिष्ठ खेळाडू संघात परतले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये या दोघांनी चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय, मथिशा पाथिराना, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा आणि बिनुरा फर्नांडो सारखे वेगवान गोलंदाजही या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. मालिकेतील पहिला सामना दि. 27 जुलै रोजी पल्लीकल येथे होणार आहे.

दरम्यान, तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका देखील खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असली तर श्रीलंकेचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही.

श्रीलंकन टी 20 संघ - चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दसून शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, महिश तिक्षणा, चामिंडू विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा आणि बिनुरा फर्नांडो.

भारत-श्रीलंका टी 20 मालिकेचे वेळापत्रक

  1.  27 जुलै -  पहिला टी 20 सामना, पल्लीकल
  2. 28 जुलै - दुसरा टी 20 सामना, पल्लीकल
  3. 30 जुलै - तिसरा टी 20 सामना, पल्लीकल.

Advertisement
Tags :

.