पहिल्या वनडेत लंकेचा ऑस्ट्रेलियाला धक्का
49 धावांनी विजय, सामनावीर असालंकाचे शतक, असिता फर्नांडोचे 4 बळी
वृत्तसंस्था/ कोलंबो
यजमान लंकेने जोरदार पुनरागमन करताना वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाला 49 धावांनी पराभवाचा धक्का देत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार चरिथ असालंकाने शानदार शतक नोंदवले.
लंकेने 46 षटकांत सर्व बाद 214 अशी माफक धावसंख्या उभारली. त्यानंतर या धावांचे यशस्वी संरक्षण करीत लंकेने ऑस्ट्रेलियाचा डाव 33.5 षटकांत 165 धावांत गुंडाळून विजय साकार केला. कर्णधार असालंकाचे शानदार शतक (127) व गोलंदाजीत महीश थीक्षाना (40 धावांत 4 बळी) यांचे योगदान लंकेच्या विजयात मोलाचे ठरले. असालंकाने नंतर एक बळीही मिळविला.
लंकेने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर 33 व्या षटकांपर्यंत त्यांची स्थिती 8 बाद 133 अशी झाली होती. असालंकाने आपल्या खेळीत 14 चौकार, 5 षटकार ठोकताना नवव्या गड्यासाठी इशान मलिंगासमवेत 79 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. मलिंगाने 26 चेंडू खेळले, पण त्याने केवळ एक धाव केली. या गड्यासाठी या मैदानावर झालेली ही विक्रमी भागीदारी आहे.
ऑस्ट्रेलियाला हे माफक आव्हान पेलवता आले नाही. असिता फर्नांडोने दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केल्यानंतर त्यांचा डाव अखेरपर्यंत सावरलाच नाही. अॅलेक्स कॅरेने सर्वाधिक 41 तर हार्डीने 32, अॅबॉट व झाम्पा यांनी प्रत्येकी 20 धावा जमविल्या. 34 व्या षटकांत त्यांचा डाव 165 धावांत आटोपला. थीक्षानाने 4 तर वेलालगे व फर्नांडो यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : लंका 46 षटकांत सर्व बाद 215 : असालंका 126 चेंडूत 127, वेलालगे 34 चेंडूत 30, सीन अॅबॉट 3-61, अॅरॉन हार्डी 2-13, स्पेन्सर जॉन्सन, नाथन एलिस प्रत्येकी 2 बळी. ऑस्ट्रेलिया 33.5 षटकांत सर्व बाद 165 : कॅरे 41, हार्डी 32, सीन अॅबॉट व अॅडम झाम्पा प्रत्येकी 20, महीश थीक्षाना 4-40, फर्नांडो 2-23, वेलालगे 2-33.