नेपाळला नमवून लंकेची विजयी सलामी
सेथमिका, सेनेविरत्ने सामनावीर, नेपाळचा 82 धावांत खुर्दा
वृत्तसंस्था / दुबई
19 वर्षांखालील वयोगटातील येथे सुरू असलेल्या आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील सामन्यात लंकेने नेपाळचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात 25 धावांत 5 गडी बाद करणाऱ्या लंकेच्या सेथमिका सेनेविरत्नेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजी दिली. लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर नेपाळचा डाव केवळ 28.5 षटकांत 82 धावांत आटोपला. त्यानंतर लंकेने 14.5 षटकांत 2 बाद 84 धावा जमवित हा सामना 211 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी जिंकला.
नेपाळच्या डावामध्ये केवळ 3 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. साहील पटेल आणि निरजकुमार यादव या सलामीच्या जोडीने 7.2 षटकांत 30 धावांची भागिदारी केल्यानंतर त्यांचे शेवटचे 9 गडी केवळ 52 धावांत तंबूत परतले. श्रेष्ठाने 43 चेंडूत 1 चौकारासह 18, साहील पटेलने 28 चेंडूत 1 चौकारांसह 12, निरजकुमार यादवने 1 चौकारांसह 10 धावा केल्या. नेपाळला मात्र 19 अवांतर धावा मिळाल्या. लंकेतर्फे सेनेविरत्ने हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 25 धावांत 5 गडी बाद केले. निमसारा, व्ही. आकाश, सिगेरा आणि हेनातीगेला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेपाळच्या डावामध्ये केवळ चार चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना महाविथना आणि चमुदिता या सलामीच्या जोडीने 17 चेंडूत 22 धावांची भागिदारी केली. नेपाळच्या मंडलने चमुदिताला 10 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर विथनापतीरना केवळ 2 धावांवर धावचीत झाला. महावितना आणि गामागे या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 59 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 8 गड्यांनी विजय मिळवून दिला. महाविथनाने 49 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 39 तर कामागेने 29 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 24 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. नेपाळच्या मंडलने 16 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: नेपाळ 28.5 षटकांत सर्वबाद 82 (साहील पटेल 12, निरजकुमार यादव 10, श्रेष्ठा 18, अवांतर 19, सेनेविरत्ने 5-25, निमसारा, व्ही. आकाश, सिगेरा व हेनातीगेला प्रत्येकी 1 बळी), लंका 14.5 षटकांत 2 बाद 84 (डी. महाविथना नाबाद 39, के. गामागे नाबाद 24, चमुदिता 10, विथनापतीरना 2, अवांतर 9, मंडल 1-16).