क्रिकेट दक्षिण आफ्रिकाकडून लंका, पाक दौरा कार्यक्रम जाहीर
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
2024-25 च्या क्रिकेट हंगामात क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने लंका आणि पाकिस्तान संघांच्या दौऱ्यांचे आयोजन केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्याचे यजमानपद भुषवित आहे. दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन संघ दक्षिण आफ्रिके बरोबर या मालिका खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि लंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित केली आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि पाक यांच्यात तीन सामन्यांची टी-20, तीन सामन्यांची वनडे व दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे.
त्याचप्रमाणे 2002 नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ घरच्या मैदानावर पहिली कसोटी इंग्लंड बरोबर खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि लंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी दरबानमध्ये 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान, दुसरी कसोटी 5 ते 9 डिसेंबर दरम्यान क्विबेरा येथे आयोजित केली आहे. लंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर पाकच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. उभय संघात पहिला टी-20 सामना 10 डिसेंबरला दरबानमध्ये, दुसरा टी-20 सामना 13 डिसेंबरला प्रेटोरिया येथे, तिसरा टी-20 सामना 14 डिसेंबरला जोहान्सबर्गमध्ये होईल. या मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होईल. या वनडे मालिकेतील पहिला सामना पार्ल येथे 17 डिसेंबरला, दुसरा वनडे सामना 19 डिसेंबरला केप्टाऊनमध्ये तर तिसरा वनडे सामना 22 डिसेंबरला जोहानसबर्ग येथे खेळविला जाईल. ही वनडे मालिका संपल्यानंतर उभय संघात पहिली कसोटी 26 ते 30 डिसेंबर प्रेटोरियामध्ये तर दुसरी कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान केप्टाऊन येथे होणार आहे. इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात विविध तीन मालिका खेळणार आहे. उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान, तीन सामन्यांची वनडे मालिका 4 ते 11 डिसेंबर दरम्यान आणि एकमेव कसोटी 15 ते 18 डिसेंबर दरम्यान ब्लोमफाऊंटन येथे होणार आहे.