श्रीलंकेची बांगलादेशवर 43 धावांची आघाडी
निशांकाचे नाबाद शतक तर चंडीमलचे अर्धशतक
वृत्तसंस्था/कोलंबो
पी. निशांका आणि दिनेश चंडीमल यांनी दुसऱ्या गड्यासाठी झळकविलेल्या 194 धावांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर यजमान लंकेने येथे सुरू झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशवर 43 धावांची आघाडी मिळविली. निशांका 146 धावांवर खेळत असून चंडीमलचे शतक 7 धावांनी हुकले. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्याने या दुसऱ्या कसोटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या दुसऱ्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर बांगलादेशने 8 बाद 220 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे दोन गडी 27 धावांची भर घालत तंबूत परतले. 79.3 षटकात बांगलादेशचा पहिला डाव 247 धावांवर आटोपला.
बांगलादेशच्या डावात सलामीच्या शदमान इस्लामने 7 चौकारांसह 46, मोमिनुल हकने 3 चौकारांसह 21, मुश्फिकुर रहीमने 5 चौकारांसह 35,लिटॉन दासने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 34, मेहदी हसन मिराजने 3 चौकारांसह 31, नईम हसनने 2 चौकारांसह 25 आणि तैजुल इस्लामने 5 चौकारांसह 33 धावा जमविल्या. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकविता आले नाही. त्यांच्या पहिल्या डावात 1 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे असिता फर्नांडो आणि सोनल दिनुशा यांनी प्रत्येकी 3 तर विश्वा फर्नांडोने 2, टी. रत्ननायके व धनंजय डिसिल्वा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेच्या पहिल्या डावाला निशांका आणि उदारा यांनी दमदार सुरूवात करुन दिली. या जोडीने 23.3 षटकात 88 धावांची भागिदारी केली. उपाहारावेळी लंकेने 21 षटकात बिनबाद 83 धावांपर्यंत मजल मारली होती. उपाहारानंतर लंकेची ही सलामीची जोडी तैजुल इस्लामने फोडली. तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर उदारा पायचित झाला. त्याने 65 चेंडूत 4 चौकारांसह 40 धावा जमविल्या.
शतकी भागिदारी
पी.निशांका आणि दिनेश चंडीमल यांनी बांगलादेशच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. या जोडीने चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रात 102 धावा जमविल्या. निशांकाने 79 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. चंडीमलने 70 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 154 चेंडूत नोंदविली. चहापानावेळी निशांका 93 तर चंडीमल 54 धावांवर खेळत होते. चहापानानंतर लंकेचे द्विशतक 323 चेंडूत फलकावर लागले. निशांका आणि चंडीमल या जोडीने दीडशतकी भागिदारी 260 चेंडूत नोंदविली. दरम्यान, निशांकाने 167 चेंडूत 12 चौकारांसह शतक पूर्ण केले.
या मालिकेतील पी. निशांकाचे हे सलग दुसरे शतक आहे. निशांकाने निर्दोष खेळी करत दिवसअखेर 238 चेंडूत 146 धावांवर तो खेळत आहे. चंडीमलने 153 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 93 धावा जमविल्या. नईम हसनच्या गोलंदाजीवर तो दासकरवी झेलबाद झाला. चंडीमल पहिल्यांदाच 90 च्या घरामध्ये बाद झाला आहे. निशांकाचे कसोटीतील हे चौथे शतक असून त्याने चहापानानंतर राणाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. बांगलादेशच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीसमोर चंडीमल आणि निशांका यांनी रिव्हर्स स्विपचे फटके मारण्यावर अधिक भर दिला होता. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकरच थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लंकेने 78 षटकात 2 बाद 290 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लाम आणि नईम हसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव 79.3 षटकात सर्वबाद 247 (शदमान इस्लाम 46, मोमिनुल हक 21, मुश्फिकुर रहीम 35, लिटन दास 34, मेहदी हसन मिराज 31, नईम हसन 25, तैजुल इस्लाम 33, असिता फर्नांडो व सोनल दिनुशा प्रत्येकी 3 बळी, विश्वा फर्नांडो 2-45, टी. रत्नायके आणि धनंजय डिसिल्वा प्रत्येकी 1 बळी), लंका प. डाव 78 षटकात 2 बाद 290 ( पी. निशांका खेळत आहे 146, उदारा 40, चंडीमल 93, जयसूर्या खेळत आहे 5, तैजुल इस्लाम व नईम हसन प्रत्येकी 1 बळी)