पाकला पराभूत करत लंका फायनलमध्ये
तिरंगी टी 20 मालिका : 6 धावांनी विजय : दुष्मंता चमीरा सामनावीर : उभय संघातच आज होणार फायनल
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
श्रीलंकेने तिरंगी टी 20 मालिकेतील साखळी फेरीतील सहाव्या आणि अंतिम सामन्यात यजमान पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. श्रीलंकेने पाकिस्तानवर 6 धावांनी मात केली. लंकेने पाकिस्तानसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रत्युत्तरात पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी 29 नोव्हेंबरला फायनलमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने येतील.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 184 धावा केल्या. प्रारंभी, लंकन संघाची सुरुवात संथ झाली आणि 16 धावांवर पहिली विकेट पडली. सलामीवीर पथुम निसांका 8 धावा काढून बाद झाला. यानंतर कुसल मेंडिस आणि कामिल मिशारा यांनी धावगती वाढवली. पॉवर प्लेमध्ये श्रीलंकेने एक विकेट गमावून 58 धावा केल्या. मेंडिसने 40 धावा केल्या, तर मिशाराने 48 चेंडूंमध्ये 76 धावांची शानदार खेळी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. याशिवाय, जनिथ लियानागेने 24 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. शनाकाने 17 धावा केल्या. यामुळे लंकन फलंदाजांनी दिलेल्या छोट्या-छोट्या योगदानामुळे संघ 184 पर्यंत पोहोचला. पाककडून अब्रार अहमदने 2 गडी बाद केले.
पाकला पराभवाचा धक्का
लंकन संघाने विजयासाठी दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची काही खास सुरुवात राहिली नाही. साहिबजादा फरहान 9 धावांवर आऊट झाला. सॅम अयुबने 27 धावांचे योगदान दिले. बाबर आझम आला तसाच झिरोवर आऊट होऊन गेला. तर सलमान आगाने मात्र 44 चेंडूत सर्वाधिक 63 धावांची खेळी साकारली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. उस्मान खान याने 23 बॉलमध्ये 33 तर मोहम्मद नवाजने 27 धावा फटकावल्या. इतर पाक फलंदाजांनी निराशा केल्यामुळे संघाला 6 धावांनी हार पत्कारावी लागली. पाकला 20 षटकांत 7 बाद 178 धावा करता आल्या. दरम्यान, लंकेकडून दुषमंता चमीराने 4 तर इशान मलिंगाने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका 20 षटकांत 5 बाद 184 (कमिल मिशारा 76, कुशल मेंडिस 40, लियानागे नाबाद 24, दसुन शनाका 17, अहमद 2 बळी, सॅम आयुब आणि सलमान मिर्झा प्रत्येकी 1 बळी)
पाकिस्तान 20 षटकांत 7 बाद 178 (सॅम आयुब 27, सलमान आगा 63, उस्मान खान 33, मोहम्मद नवाज 27, चमीरा 4 बळी, इशान मलिंगा 2 बळी).