कच्चाथीवू बेटावर श्रीलंकेचा दावा
कायदेशीर लढाई लढण्याचाही इशारा
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये असलेल्या कच्चाथीवू बेटावर दावा करण्याचा प्रयत्न श्रीलंकेने केला आहे. आपला देश कोणत्याही किंमतीला कच्चाथीवू बेट सोडणार नाही, असे श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिता हेराथ यांनी म्हटले आहे. भारतात या मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेचे वर्णन त्यांनी येथील राजकीय पक्षांमधील रस्सीखेच असल्याचेही नमूद केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे राजनैतिक मार्ग खुले आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, कच्चाथीवू बेट श्रीलंकेचा एक भाग असून आम्ही ते कधीही सोडणार नाही, असेही स्पष्ट केले.
हेराथ यांनी भारतीय मच्छीमारांवर कच्चाथीवू बेटाजवळील श्रीलंकेच्या सागरी सीमेत प्रवेश करून मासेमारी केल्याचा आरोप केला आहे. भारतीय मच्छीमार केवळ येथील संसाधनांची लूट करत नाहीत तर समुद्रातील वनस्पतींचे नुकसानही करत आहेत, असे ते म्हणाले. मच्छीमारांच्या अटकेवरून भारत आणि श्रीलंकेतील वादाच्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे. भारत आणि श्रीलंकेतील मच्छीमार अनेकदा चुकून एकमेकांच्या समुद्री हद्दीत प्रवेश करत असल्यामुळे त्यांना अटक होते. हा मुद्दा दोन्ही देशांमधील बराच काळ वादाचे कारण ठरत आहे.