श्रीलंकेचा मलेशियावर 144 धावांनी विजय
मलेशियाचा 40 धावांत खुर्दा, कर्णधार चमारी अटापटू सामनावीर
वृत्तसंस्था/डंबुला
येथे सुरू असलेल्या 2024 सालातील आयसीसीच्या टी-20 महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सोमवारच्या ब गटातील सामन्यात कर्णधार चमारी अटापटूच्या नाबाद शतकाच्या जोरावर (119) लंकेने मलेशियाचा 144 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे लंकेला दोन गुण मिळाले.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 184 धावा जमविल्या. त्यानंतर मलेशियाचा डाव 19.5 षटकात 40 धावांत आटोपला. मलेशियाच्या केवळ एका फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली. तर त्यांच्या 4 फलंदाजांना खाते उघडता आले नाही.
लंकेच्या डावामध्ये चमारी अटापटूने 69 चेंडूत 7 षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 119 धावा झोडपल्या. समरविक्रमाने 23 चेंडूत 5 चौकारांसह 26 तर संजीवनीने 24 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. सलामीची गुणरत्ने एका धावेवर बाद झाल्यानंतर चमारी अटापटू आणि समरविक्रमा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी 8.2 षटकात केली. समरविक्रमा बाद झाल्यानंतर संजीवनीने अटापटूला चांगली साथ देताना तिसऱ्या गड्यासाठी 10.2 षटकात 115 धावांची शतकी भागिदारी केली. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 1 गडी गमविताना 41 धावा जमविल्या. लंकेचे अर्धशतक 43 चेंडूत, शतक 76 चेंडूत, दीड शतक 107 चेंडूत फलकावर लागले. चमारी अटापटूने अर्धशतक 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 35 चेंडूत तर शतक 14 चौकार आणि 5 षटकारांसह 63 चेंडूत झळकविले. अटापटू आणि संजीवनी यांनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 56 चेंडूत नोंदविली. लंकेच्या डावात 7 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. मलेशियातर्फे दुराईसिंगमने 34 धावांत 2 तर मानीवनन व इस्माईल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या अचुक गोलंदाजीसमोर मलेशियाचा डाव 19.5 षटकात 40 धावांत आटोपला. मलेशिया संघातील हंटरने 11 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. मलेशियाच्या डावात केवळ 2 चौकार नेंदविले गेले. त्यांनी पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 21 धावा जमविताना 3 गडी गमविले. लंकेतर्फे गिमहानीने 9 धावांत 3 तर कविंदी आणि दिलहारी यांनी प्रत्येकी 2 तसेच प्रियदर्शनी व कांचन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक लंका 20 षटकात 4 बाद 184 ( अटापटू नाबाद 119, समरविक्रमा 26, संजीवनी 31, गुणरत्ने 1, दिलहारी 0, अवांतर 7, दुराईसिंगम 2-34, मनीवनन व इस्माईल प्रत्येकी 1 बळी), मलेशिया 19.5 षटकात सर्वबाद 40 (हंटर 10, नेजवा नाबाद 9, अवांतर 6, गिमहानी 3-9, दिलहारी 2-4, कविंदी 2-7, निसानसेला आणि कांचन प्रत्येकी 1 बळी)