लंकेचा हाँगकाँगवर 4 गड्यांनी विजय
वृत्तसंस्था / दुबई
2025 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने हाँगकाँगचा 4 गड्यांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय नोंदविला.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून हाँगकाँगला प्रथम फलंदाजी दिली. हाँगकाँगने 20 षटकात 4 बाद 149 धावा जमविल्या. त्यानंतर श्रीलंकेने 18.5 षटकात 6 बाद 153 धावा जमवित विजय नोंदविला. हाँगकाँगच्या डावात निझाकत खानने 38 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 52 तर अनशेय रथने 46 चेंडूत 4 चौकारांसह 48, झिशान अलीने 17 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. हाँगकाँगच्या डावात 13 अवांतर धावा मिळाल्या. हाँगकाँगच्या डावामध्ये 2 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे चमीराने 2 तर हसरंगा आणि शनाका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात सलामीच्या निशांकाने 44 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 68 धावा झळकविल्या. कुशल मेंडीसने 2 चौकारांसह 11, कमिल मिश्राने 1 षटकार आणि 1 चौकारासह 19, कुशल परेराने 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, हसरंगाने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 20 धावा जमविल्या. शनाकाने 1 चौकारासह नाबाद 6 धावा केल्या. कर्णधार असालेंका 2 तर कमिंदु मेंडीस 5 धावांवर बाद झाले. 18.5 षटकात लंकेने 6 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. लंकेच्या डावात 4 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. हाँगकाँगतर्फे मुर्तझाने 37 धावांत 2 तर शुक्ला, एहसान खान आणि अजिज खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: हाँगकाँग 20 षटकात 4 बाद 149 (अनशय रथ 48, झिशानअली 23, निझकत खान नाबाद 52, अवांतर 13, चमिरा 2-29, हसरंगा आणि शनाका प्रत्येकी 1 बळी), श्रीलंका 18.5 षटकात 6 बाद 153 (निशांका 68, कुशल परेरा 20, कुशल मेंडीस 11, कमिल मिश्रा 19, हसरंगा नाबाद 20, मुर्तझा 2-37, शुक्ला, एहसान खान, अजिज खान प्रत्येकी 1 बळी)