लंकेचा ऑस्ट्रेलियावर वर 174 धावांनी दणदणीत विजय
दोन सामन्यांच्या मालिकेत एकतर्फी विजय, मेंडिस सामनावीर, असालंका मालिकावीर
वृत्तसंस्था/ कोलंबो
सामनावीर कुसल मेंडिसचे पाचवे वनडे शतक, कर्णधार चरिथ असालंका व निशान मदुश्का यांची अर्धशतके आणि दुनिथ वेलालगेचे चार बळी यांच्या आधारावर लंकेने दुसऱ्या व शेवटच्या वनडे सामन्यात विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी धुव्वा उडवित मालिका एकतर्फी जिंकली. मालिकेत 205 धावा व एक बळी मिळविणारा असालंका मालिकावीराचा मानकरी ठरला.
लंकेने प्रथम फलंदाजी निवडल्यावर 50 षटकांत 4 बाद 281 अशी बऱ्यापैकी भक्कम धावसंख्या रचली. कुसल मेंडिसने सर्वाधिक 101 धावा जमविल्या. त्याला असालंकाकडून चांगली साथ मिळाली. असालंकाने नाबाद 78 धावांचे योगदान दिले. लंकेचा सलामीवीर निशान मदुश्काने दुसरे वनडे अर्धशतक नोंदवताना 51 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाने 3 बाद 79 अशा स्थितीनंतर शेवटचे सात फलंदाज केवळ 28 धावांत गारद झाले आणि 24.2 षटकांत त्यांचा डाव 107 धावांत आटोपला. वेलालगेने 35 धावांत 4 तर वनिंदू हसरंगाने 23 धावांत 3 व असिता फर्नांडोनेही 23 धावांत 3 बळी मिळविले.
ऑस्ट्रेलियाची ही लंकेविरुद्धची दुसरी निचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये त्यांनी सर्व बाद 74 धावा जमवित निचांकी धावसंख्या नोंदवली होती. लंकेने धावांच्या बाबतीत मिळविलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अॅरॉन हार्डीने पथुम निसांकाला 6 धावांवर बाद करून लवकर यश मिळवून दिले. पण कुसल मेंडिस व मदुश्का यांनी डाव सावरत 115 चेंडूत दुसऱ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी केली. मदुश्काला बेन ड्वारशुइसने 51 धावांवर बाद केले. यावेळी लंकेची स्थिती 2 बाद 113 अशी होती. आठ धावांची भर पडल्यानंतर अॅबॉटने कमिंदू मेंडिसला 4 धावांवर त्रिफळाचीत केले. कुसल मेंडिसने कर्णधारांसह आणखी एक अर्धशतकी भागीदारी करीत 94 धावांची भर घातली. असालंकाने 66 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 78 धावा केल्या. कुसल मेंडिसने 115 चेंडूंच्या खेळीत 101 धावा जमविताना 11 चौकार लगावले.
ऑस्ट्रेलियाच्या डावात लंकेचा वेगवान गोलंदाज असिता फर्नांडोने मॅथ्यू शॉर्टला 6 धावांवर पायचीत केले तर जेक प्रेजर मॅकगर्क 9 तर ट्रॅव्हिस हेड 18 धावा काढून बाद झाल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ व जोश इंग्लिस यांनी 46 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वेलालगेने इंग्लिसला 22 धावांवर बाद केल्याने त्यानेच मॅक्सवेलला एका धावेवर त्रिफळाचीत केले. हसरंगाने स्मिथला पायचीत केले तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक 29 धावा जमविल्या होत्या, त्यात 3 चौकार, 1 षटकाराचा समावेश होता.
या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात पाच बदल केले. हेड, मॅक्सवेल. इंग्लिस यांचे पुनरागमन झाले. वेगवान गोलंदाज ड्वारशुईस, लेगस्पिनर तन्वीर सांघा यांनाही संघात स्थान दिले तर अॅलेक्स कॅरे, लाबुशेन, कोनोली, स्पेन्सर जॉन्सन, नाथन एलिस यांना विश्रांती देण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी प्रयोग करून पाहण्यासाठी आम्ही उर्वरित खेळाडूंना संधी दिली, असे कर्णधार स्मिथ नंतर म्हणाला. लंकेनेही सलामीवीर अविश्का फर्नांडोला वगळून निशान मदुश्काला स्थान दिले होते.
संक्षिप्त धावफलक : लंका 50 षटकांत 4 बाद 281 : कुसल मेंडिस 115 चेंडूत 101, असालंका 66 चेंडूत नाबाद 78, मदुश्का 70 चेंडूत 51, लियानगे 21 चेंडूत नाबाद 32, अवांतर 9, ड्वारशुईस 1-47, अॅबॉट 1-41, हार्डी 1-60, झाम्पा 1-47.
ऑस्ट्रेलिया 24.2 षटकांत सर्व बाद 107 : हेड 18, स्मिथ 29, इंग्लिस 22, वेलालगे 4-35, हसरंगा 3-23, असिता फर्नांडो 3-23.