चिनी हेरनौकेवर श्रीलंकेकडून बंदी
पंतप्रधान मोदींनी दिला होता ‘कठोर’ सल्ला : जिनपिंग यांच्या योजनेला झटका
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेच्या सरकारने चीनच्या हेरनौकांना स्वत:च्या बंदरांवर नांगर टाकण्यास एक वर्षाची बंदी घातली आहे. श्रीलंकेची ही बंदी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे. या निर्णयामुळे हिंदी महासागरात हेरगिरी करणाऱ्या चीनच्या नौका आता श्ऱीलंकेच्या बंदरावर थांबू शकणार नाहीत. श्रीलंकेच्या या पावलाला भारतासाठी मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. चीनची नौका वैज्ञानिक संशोधनाच्या नावावर विशाल हिंदी महासागरात हेरगिरी करत असल्याचे पंतप्रधान मोदी समवेत भारत सरकारने अनेक माध्यमांद्वारे श्रीलंकेसमोर स्पष्ट केले होते. भारताच्या या इशाऱ्यानंतर श्रीलंकेच्या सरकारने बंदीचे हे पाऊल उचलले आहे. श्रीलंका सध्या चीनच्या कर्जाखाली भरडला गेला असून ड्रॅगन याचाच लाभ घेत स्वत:च्या हेरनौका श्रीलंकेच्या बंदरांवर पाठवत होता.
श्रीलंकेकडून बंदी घालण्यात आल्याने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भूराजकीय महत्त्वाकांक्षेला मोठा झटका बसला आहे. शेजारी देशांमध्ये स्वत:चे बस्तान बसवून जिनपिंग हे भारताची केंडी करू पाहत होते. हिंदी महासागरा आणि मलाक्काची सामुद्रधुनीदरम्यान स्वत:च्या किलर पाणबुडीसाठी मार्ग शोधत असल्याचे मानले जाते. या माध्यमातून चीन भारताला हिंदी महासागरात आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय.
चीनने कर्जाच्या सापळ्यात अडकवून श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर स्वत:च्या ताब्यात घेतले होते. चीनने चालू महिन्यात आणखी एक हेरनौका कोलंबो येथे पाठविण्याची योजना आखली होती. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने बंदी घालण्याचा हा निर्णय घेतला आहे. चिनी हेरनौकेचे नाव शियांग यांग होंग 3 आहे.
यापूर्वी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी चीनच्या हेरनौकेसंबंधी भारतीय सुरक्षा चिंतांना समजून घ्या अशी विनंती घेतली होती. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने हे पाऊल उचलले आहे. विदेशमंत्री अली साबरी यानी यासंबंधी माहिती दिली आहे. आम्ही आमच्या क्षमतेचा विस्तार करणार आहोत. यामुळे आम्ही अशाप्रकारच्या संशोधन कृत्यांमध्ये समान भागीदाराच्या स्वरुपात भाग घेऊ असे साबरी यांनी सांगितले आहे.
चालू वर्षात निवडणूक
श्रीलंकेत चालू वर्षात निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत विक्रमसिंघे हे स्वत:च्या सर्वात नजीकच्या देशासोबत भूराजनयिक तणाव वाढू नये याकरता खबरदारी घेत आहेत. यापूर्वी मागील वर्षी चीनच्या अनेक हेरनौका हिंदी महासागरात आल्या होत्या आणि त्यांनी श्रीलंकेच्या बंदरांवर आसरा घेतला होता.
भारतीय नौदलाची हेरगिरी
तज्ञांनुसार अशाप्रकारच्या चिनी नौका या नागरी आणि सैन्य दोन्ही प्रकारच्या उद्देशांसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत. सागरी क्षेत्रातील कच्चे तेल, गॅस आणि इतर खनिजांचा शोध घेण्याचा प्रयत्न चीन करत आहे. तसेच या नौकेद्वारे प्राप्त डाटा पाणबुडीच्या संचालनातही अत्यंत उपयुक्त ठरतो. याचबरोबर ही महाशक्तिशाली चिनी नौका भारताच्या नौदलाची हेरगिरी करू शकते. भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी चिनी हेरनौकांच्या श्रीलंकेतील वावरासंबंधी चिंता व्यक्त केली होती. चीनचे नौदल भारताला घेण्यासाठी पाकिस्तानचे ग्वादार, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंकेतील स्वत:ची उपस्थिती सातत्याने वाढवत आहे.