For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्णवचन अतिअगाध आहे

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्णवचन अतिअगाध आहे
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

शुकमुनी परीक्षित राजाला श्रीकृष्ण महिमा सांगत आहेत. नाथमहाराज त्याचे वर्णन करून सांगताना म्हणतात, श्रीकृष्णनाथांनी देही राहून विदेहीपणे कर्मे कशी करता येतात ते दाखवून दिले. स्वत:च्या करंगळीवर त्यांनी सात दिवस गोवर्धन पर्वतासारखा महाकाय पर्वत तोलून धरला. दावाग्निचे प्राशन करून हुताशनाला लाजवले. रासक्रीडा करून मदनाचा अभिमान घालवला. समुद्राला मागे सारून द्वारका हे स्वत:चे नगर वसवले. द्रौपदीच्या थाळीची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. द्रौपदीच्या हाकेला ओ देऊन तेथे प्रकट झाले आणि त्या थाळीला चिकटलेले भाजीचे पान खाल्ले. त्याबरोबर चमत्कार झाल्याप्रमाणे ऋषिवर तृप्त होऊन ढेकर देऊ लागले. आपण सर्वांच्या अंतर्यामी आहोत हे त्यातून त्यांनी दाखवून दिले. ह्याच देहात श्रीकृष्णनाथांनी गायवासरे होऊन ब्रह्मदेवाला लाजवले आणि त्याचे गर्वहरण केले. यमलोकी जाऊन यमदेवाला सरळ करून गुरुपुत्राला काळाच्या कराल दाढेतून परत आणले.

उत्तरेच्या गर्भात असताना तुझे त्यांनी रक्षण केले. त्यांना जे शरण येतात त्या भक्तांचे संकट हरण करणे हे तर त्यांचे ब्रीद आहे. भक्तांच्या आर्त विनवणीला प्रतिसाद देऊन, त्यांच्याविषयी कळवळा येऊन ते त्याच्या सहाय्याला धावले नाहीत असे कधीच होत नाही. भक्तावर ओढवलेल्या संकटाचे निवारण ते स्वत: त्या संकटात उडी घालून करतात. त्यांच्या त्या प्रतापाचे महिमान हे राजा आता मी तुला सांगतो. बाणासुर नावाच्या राक्षसाने तप करून शंकराला प्रसन्न करून घेऊन त्याच्याकडून कठीण प्रसंगी मी तुझे संरक्षण करीन असा वर मिळवला होता. बाणासुर अत्यंत कपटी आणि निर्दयी होता. त्यात शंकराकडून वरदान मिळवल्याने उन्मत झाला होता. दुष्कृत्ये करणाऱ्यांचा नाश करण्याचे आणि सज्जनांना संरक्षण देण्याचे ब्रीद निभावण्यासाठी सगुण अवतार घेतलेल्या श्रीकृष्णांनी बाणासुराचा वध करण्यासाठी त्याच्याबरोबर युद्ध आरंभले. श्रीकृष्णापुढे बाणासुराचा निभाव लागणार नाही हे लक्षात घेऊन दिलेल्या वरदानाप्रमाणे स्वत: महादेव त्याचा कैवार घेऊन त्याच्या मदतीला धावले. येताना एकट्याने न येता सोबतीला ते नंदी, भृंगी, वीरभद्र ह्यांना तर घेऊन आलेच आणि त्याशिवाय देवांचे सेनापती असलेल्या कार्तिकस्वामींना देखील घेऊन आले.

Advertisement

बाणासुराच्या मागे स्वत: शंकर उभे राहिलेले पाहून श्रीकृष्णनाथ मुळीच डगमगले नाहीत. उलट त्यांनी शंकराशी निकराचा लढा दिला आणि त्यांना युद्धात पराभूत केले. जशास तसे ह्या न्यायाने श्रीकृष्ण जो उग्र असेल त्याच्याशी अतिउग्र होते तर भयंकर असेल त्याच्याशी ते अतिभयंकरपणे वागत. त्यांनी काळाग्निरुद्र महादेवाला जिंकले आणि बाणाचे हात छेडून टाकले. श्रीकृष्णवचन अतिअगाध आहे. आता जराव्याधाचेच उदाहरण घे. त्याने अपराध केला होता तरी त्याला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याला त्यांनी स्वर्गात धाडून दिले. अशा सामर्थ्यवान असलेल्या श्रीकृष्णाला स्वत:चा देह राखणे अशक्य होते काय? परंतु त्यांना देहबुद्धीच नसल्याने त्यांनी देहाचा सहजी त्याग केला आणि ते निजधामाला निघून गेले. खरं म्हणजे अत्यंत सामर्थ्यशाली असल्याने त्यांना ह्या लोकातील कुणी हात लावायची हिम्मतही करू शकत नसल्याने त्यांना कुणाचे भय होते असेही नाही. थोडक्यात सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार ते करू शकत होते. मग निजधामाला जाण्याची काहीच आवश्यकता नव्हती. तरी ते निजधामाला का गेले असावेत अशी शंका मनात आल्याशिवाय रहात नाही. मायेचे तिन्ही गुण त्यांच्या अधीन होते. अनंतकोटी ब्रह्मांडे निर्मित करून, त्यांचे पालन व संहार करण्याची त्यांच्यात क्षमता होती. त्यांचे सामर्थ्यही अद्भुत होते. देही असून विदेह स्थिती ते अनुभवत होते हे सगळे लक्षात घेतले तर ह्या अवतारातले कार्य संपल्यामुळे ते स्वेच्छेने निजधामाला गेले असेच म्हणता येईल.

क्रमश:

Advertisement
Tags :

.