श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आले
अध्याय दुसरा
माउली म्हणाले, आम्ही काय करणे उचित आहे हे तुम्हीच आम्हाला सांगा इत्यादि अर्जुन जोपर्यंत बोलत होता तोपर्यंत अर्जुनाची भ्रांती दूर झाली होती पण लगेच त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून तो श्रीकृष्णांना म्हणतो, युद्ध करून निष्कंटक राज्य किंवा स्वर्गातले इंद्रासन जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना सुकवणारा शोक कमी होणार नाही. संजय हे सर्व पहात होता. तो धृतराष्ट्राला म्हणाला, वर सांगितलेले सर्व बोलून झाल्यावर मी हे युद्ध करणार नाही असे निर्वाणीचे सांगून अर्जुन पुढे काहीही न बोलता गप्प उभा राहिला. ह्या अर्थाचा
‘असे अर्जुन तो वीर हृषीकेशास बोलुनी । शेवटी मी न झुंजे चि ह्या शब्दे स्तब्ध राहिला ।। 9 ।।
हा श्लोक आपण पहात आहोत. अर्जुनाच्या ह्या बोलण्याने भगवंतांना मोठा विस्मय वाटला. ते मनात म्हणाले, ह्या प्रसंगी ह्याने हे काय आरंभले आहे? ह्याची समजूत कशी घालावी? याला तर महामोहरूपी काळसर्पाने ग्रासले आहे पण श्रीकृष्णापुढे त्याचे काय चालणार? विष कितीही जालिम असले तरी केवळ श्रीकृष्णाच्या एका कृपाकटाक्षाने त्याचा प्रभाव नाहीसा होतो. आपल्या शिष्याला मोहरूपी साप चावलेला असल्याने तो भ्रमल्यासारखा झालेला आहे हे लक्षात घेऊन, गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आले. ज्यांची सद्गुरूंवर अपार श्रद्धा असते त्यांना असा अनुभव नेहमीच येत असतो.
माउली पुढे म्हणतात, श्रीकृष्ण आपल्या कृपेच्या बळाने अर्जुनाचे सहज रक्षण करेल. ज्याप्रमाणे ढगांनी सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे अर्जुन भ्रांतीने घेरला गेला होता. उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन दु:खाने जर्जर झाला होता. आकाशातील पाणी असलेला ढगही सावळा असतो. त्या सावळ्या मेघाच्या कृपामृतरूप जलाने युक्त अशा श्रीकृष्णरूपी महामेघाने अर्जुनाकडे बघितले. श्रीकृष्णाला माउलींनी महामेघाची उपमा दिली असल्याने त्याला धरूनच रूपक करून ते पुढे म्हणतात, श्रीकृष्णाचे सुंदर दात विजेसारखे चमकत होते आणि त्याचे बोलणे ढगांच्या गडगडाटासारखे गंभीर होते. विजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाट एकाचवेळी होत असताना वातावरण किती चैतन्यपूर्ण असते ह्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. अशा चैतन्यपूर्ण वातावरणात तो श्रीकृष्णरूपी उदार मेघ उपदेशाचा वर्षाव करेल आणि त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत शांत होईल. त्याच्या ठिकाणी ज्ञानरूपी नवीन अंकुर फुटेल परंतु हे काम सहजी होणार नसल्याने श्रीकृष्णाने रागावल्याचे नाटक केले. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते किंवा औषधाच्या कडूपणाला अमृताची असलेली जोड वरवर पाहता दिसत नाही पण गुणाच्या रूपाने स्पष्ट होते. त्याप्रमाणे वर वर पाहता उदास, कठोर पण आत अति सुरस, परिणामी, अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द भगवंत सांगू लागले.
श्रीज्ञानदेव श्रोत्यांना त्यांनी गीता त्यांनी कशी ऐकावी हे सांगत आहेत. ते म्हणतात, हा मोठा आल्हाद देणारा विषय आहे, तो ऐकण्यात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे, सौंदर्याचं आगळंवेगळं दर्शन तुम्हाला घडणार आहे. सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मन हळुवार असायला हवं, कसं हळुवार हवं? तर शरद ऋतूतील रात्र आहे. स्वच्छ अशा आकाशात पूर्ण चंद्र प्रकाशमान झाला आहे. त्या चंद्राचे शीतल किरण पृथ्वीवर बरसत आहेत. सगळीकडं टिपूर चांदणे पडले आहे. अशावेळी चकोराची छोटीछोटी पिलं चंद्रकिरणांचे कोवळे कण जमिनीवरून अलगदपणे टिपून घेतात. तसं आपलं मन श्रोत्यांनी अगदी हळुवार करावं आणि श्रीकृष्ण जे काही सांगत आहेत त्याचा अनुभव घ्यावा.
क्रमश: