श्रीगणेशगीता अध्याय तीन-सारांश 2
बाप्पा वरेण्य राजाला मोक्षमार्गाची वाटचाल कशी करावी ते गणेशगीतेत सांगत आहेत. ह्या अध्यायामध्ये बाप्पा कर्मयोगाची तत्वे व्यवहारात अंमलात आणून कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. ही तत्वे साधी सोपी आणि सरळ असून बहुतेकांना ती माहितही असतात. परंतु व्यवहार करताना माणसाचा स्वार्थ आडवा येत असल्याने माणूस त्यापासून मागे सरकतो आणि संसारबंधनात अडकतो.
बाप्पा म्हणाले, ज्याला फळाची ओढ नसते, त्याला स्वत:च्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो. त्यामुळे तो सदैव आत्मानंदात डुंबत असतो. त्याचे सुखदु:ख कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते. तो कर्तव्य म्हणून त्याच्या वाट्याला आलेले कर्म करत असतो परंतु तो स्वत:ला कर्ता समजत नसल्याने आपण काही करतोय हे त्याच्या मनातसुद्धा येत नाही. अशा माणसाला कोणतीही इच्छा नसते, तो मनावर ताबा ठेऊन असतो, त्याला कोणत्याही गोष्टीचा साठा करावासा वाटत नाही. त्यामुळे तो त्याच्या शरीराचे पोषण होईल इतपत कर्म करतो. ह्यात कोणत्याही वावग्या कर्माचा समावेश नसल्याने त्याला कोणतेही पाप लागत नाही. त्याने केलेली कर्मे कोणतेही पापपुण्य निर्माण न करता लय पावतात.
त्याला सर्वत्र ब्रह्माचे दर्शन झालेले असते. तो स्वत:लाही ब्रह्माच्या रुपात पहात असतो. त्यामुळे यज्ञ करताना तोच अग्नी असतो, तोच हवि असतो, तोच यज्ञ करणारा असतो असा सर्वप्रकारे तो ब्रह्मातच रममाण झालेला असतो. असे योगी यज्ञाचे निरनिराळे प्रकार करत असतात. त्यामागे त्यांचा उद्देश असा असतो की शरीरावर, मनावर आणि ज्ञानेंद्रियांवर संयम प्राप्त करून घेणे.
सर्वसामान्य मनुष्य शरीर, मन आणि ज्ञानेंद्रिये ह्यांच्या आहारी गेलेला असल्याने पापकर्मे करत असतो. यज्ञ करणारा निरपेक्ष साधक मात्र त्याच्या इच्छा, इंद्रिये त्याच्या मर्जीनुसार काम करतील त्यामुळे तो त्यांनी दाखवलेल्या आकर्षणाच्या तावडीत सापडत नाही. ही गोष्ट आयुष्यभर घडत राहावी म्हणून संयमाच्या माध्यमातून त्यांच्यावर काबू मिळवण्यासाठी तो यज्ञ करत असतो. प्राण आणि अपानावर संयम करून प्राणायामपरायण होतो. त्यायोगे तो इंद्रियांवर ताबा मिळवतो. कायिक, वाचीक आणि मानसिक असे तीन प्रकारचे यज्ञ दैनंदिन कर्मे करत असताना योगी करत असतो. यज्ञाचा प्रसाद म्हणून मिळालेले अमृतरूपी अन्न भक्षण करणारे योगी शेवटी ब्रह्मपदी पोहोचतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न जरूर करावा. जे असे करत नाहीत त्यांना ह्यालोकी तर सुख मिळत नाहीच आणि त्यांनी कितीही पुण्यकर्मे केली तरी त्यांना परलोकातही सुखाची प्राप्ती होत नाही.
सर्व यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हा यज्ञ हे मोक्षाचे साधन असून ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त होते. ज्ञानाग्नी माणसाची सर्व कर्मे जाळून टाकतो. त्यासाठी अत्यंत नम्रतेने प्रश्न विचारून सद्गुरूंची सेवा करावी लागते. भक्तिमान, जितेंद्रिय, पुरुषास आत्मज्ञानाची प्राप्ती होते. संशयी मनुष्य मात्र ह्यालोकी व परलोकी कशाचीच प्राप्ती होत नाही. म्हणून ज्ञानखड्गाने मनातील संशय नष्ट करून श्रद्धेने कर्मयोगाचे आचरण करावे.
संतसंगती फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सद्गुण प्राप्त होतात, आपत्ती दूर होतात, ह्यालोकी व परलोकी स्वहित साधते पण मायेच्या प्रभावात गुरफटलेले लोक संतसंगती करायची सोडून अनेकांची संगत धरतात. त्यामुळे संसारबंधनात अडकतात. म्हणून म्हणतात की, संतसंगती फार दुर्लभ आहे. संतसंगतीतून स्वत: परब्रह्म झाल्याची अनुभूती येऊन स्वत:च्या ठिकाणी सर्वभुते आहेत हे जाणवू लागते. अशा व्यक्तीला कर्मबंधने बाधत नाहीत.
अध्याय तिसरा सारांश समाप्त.