श्रीगणेशगीता अध्याय तीन -सारांश 1
बाप्पा वरेण्य राजाला मोक्षमार्गाची वाटचाल कशी करावी ते गणेशगीतेत सांगत आहेत. ह्या अध्यायामध्ये बाप्पा कर्मयोगाबद्दल सांगत आहेत. बाप्पा म्हणाले, हा योग मी पूर्वी विष्णूला सांगितला. विष्णूने सूर्याला, सूर्याने मनुला सांगितला आणि नंतर तो महर्षीना समजला. कलियुगात अश्रद्धा आणि अविश्वास वाढल्याने हा नाहीसा होईल. बाप्पांचे बोल ऐकून राजाने त्याच्या मनातील शंका विचारली.
तो म्हणाला, तुम्ही तर आत्ताच्या काळात आहात मग पुरातन काळात तुम्ही विष्णूला हा योग सांगितलात हे कसे शक्य आहे? त्यावर बाप्पा म्हणाले, राजा ह्यापूर्वी माझे अनेक जन्म झाले असून त्या प्रत्येक जन्माचे मला स्मरण आहे. मीच ह्या जगाची निर्मिती केली असून, ब्रह्मा, विष्णू महेश व अन्य देव मीच निर्माण केले असून प्रत्येक युगाच्या शेवटी ते माझ्यातच लीन होतात. मी सर्वव्यापी असून सर्व सजीवनिर्जीवांच्या ठिकाणी राहणारा परमेश्वर आहे. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतो. अवतारकाळात आनंदाने अनेक लीला करून दुष्टांचा नाश करतो. ज्यांना माझ्या ह्या अवताराचे आणि अवतारकाळातील कार्याचे ज्ञान होते ते अहंता आणि ममता ह्यांचा त्याग करतात. त्यामुळे त्यांना पुन्हा जन्म मिळत नाही. जे निरिच्छ, निर्भय, सर्वांच्यावर प्रेम करणारे आणि मला मानणारे असतात. ते शेवटी मलाच येऊन मिळतात कारण मी केलेल्या उपदेशानुसार वागण्यात त्यांनी सारी हयात घालवलेली असते. असे पुरुष ज्या ज्या भावाने मला पूजतात, त्यांना मी त्याप्रमाणे फळ देत असतो. माझ्या निरिच्छ भक्तांना माझी पूजा निरनिराळ्या कारणांनी करावीशी वाटते. काही ज्ञानी असतील तर काही आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू असतील. त्यांना त्यांच्या वर्णाचे निराकरण व्हावे असे फळ मी त्यांना देतो. कर्मस्वातंत्र्य आणि इच्छा स्वातंत्र्य भक्तांनाही असते म्हणून भक्तांचे वर सांगितलेले प्रकार सोडून इतर भक्तांच्या भक्तीला भुलून मी त्यांनाही त्यांच्या इच्छेनुसार फळ देतो. काही लोक मी निर्मिलेल्या देवांची भक्ती करत असतात. मी त्यांनाही निराश न करता त्यांच्या भक्तीनुसार त्यांना हवे ते फळ देतो.
राजा, प्रत्येकाला, त्याच्या पूर्वकर्मानुसार जसा स्वभाव प्राप्त झालेला असेल त्याला अनुरूप कर्मे मी देत असतो. म्हणून मृत्युलोकात चार वर्ण मी निर्माण केलेले आहेत. हे सर्व विश्व, सजीवनिर्जीव मी तयार केलेले असले तरी ज्ञानी लोक मी कर्ता नाही हे जाणतात. कारण कर्मातून उत्पन्न होणाऱ्या बऱ्या-वाईट गोष्टीतून मी अलिप्त असतो. जे ही गोष्ट जाणतात ते माझे अनुकरण करून कर्मबंधनातून मुक्त होतात. ज्यांना मोक्ष हवा आहे असे मुमुक्षु ह्या पद्धतीने कर्मे करतात. कर्म कोणते, अकर्म कोणते हे जे जाणतात ते माणसाने इच्छा केल्यामुळे तो बंधनात कसा अडकतो हे लक्षात घेऊन ते बंधन त्यांना कसे लागू पडणार नाही ह्याची काळजी घेऊन मुक्त होतात. मी दिलेले काम निरपेक्षतेने करणे हे कर्म होय तर स्वत:च्या डोक्याने त्या कर्मात बदल करणे किंवा स्वार्थ साधण्यासाठी त्यात अनावश्यक वाढ करणे हे अकर्म होय.
माणसाने कर्म, अकर्म ह्यातील फरक ओळखून सावध राहून निरपेक्षतेने कर्म करावे अशी माझी अपेक्षा आहे. कर्माचे अकर्म कधी होईल हे भल्याभल्यांना कळत नाही. त्यामुळे अकर्म करून ते त्यांच्या भोवतीचे संसार बंधन दृढ करतात. जर बी भाजली तर तिला अंकुर फुटत नाही त्याप्रमाणे जो निरपेक्षतेने कर्म करतो त्यांची कर्मफळे तत्वज्ञानाच्या अग्नीत जळून भस्म होतात. अशा माणसाचा ज्ञानी मंडळी, पंडित म्हणून गौरव करतात.
क्रमश: