श्रीगणेशगीता अध्याय चौथा सारांश 1
गणेशगीतेच्या माध्यमातून बाप्पा राजाला मोक्षमार्गाचा परिचय करून देत आहेत. दुसऱ्या अध्यायात बाप्पांनी कर्मयोगाचे महत्त्व विशद केले तर तिसऱ्या अध्यायात त्यांनी ज्ञानयोगाचे विवेचन केले. ह्यातील निश्चित मार्ग कोणता निवडावा असा वरेण्य राजाला प्रश्न पडला. म्हणून त्याने बाप्पांना विचारले की, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग ह्यातील माझ्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे हे मला समजावून सांगा.
उत्तरादाखल बाप्पा म्हणाले, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग किंवा कर्मसंन्यास ही दोन्ही मोक्षाची साधने आहेत परंतु त्यात कर्मयोग हा अधिक चांगला आहे. निरपेक्षता हा अध्यात्माचा पाया आहे. त्यामुळे ज्याला मोक्षप्राप्ती करून घ्यायची आहे त्याने वाट्याला आलेले कर्म निरपेक्षतेने करायला सुरवात करावी. हळूहळू त्याच्या लक्षात येईल की, कोणतेही कर्म केले की त्याचे काही ना काही फळ हे मिळतेच पण हे मिळालेले फळ कायम टिकणारे नसते. हे समजल्यावर त्याला आपोआप मिळालेल्या कर्मफळाची अपूर्वाई वाटेनाशी होते आणि ते फळ मिळाले काय आणि नाही काय सारखेच अशी त्याची मनोभूमिका तयार होते. हा एकप्रकारचा फलत्यागच असतो. जो फलत्याग हसत हसत करायला तयार होतो, त्याला संन्यासी म्हणतात.
ज्या मनुष्याला कर्मफळाची अपेक्षा असते तो परिस्थितीनुसार इच्छा, द्वेष, सुख, दु:ख ह्या विकारांचा सामना करत असतो पण ज्याला कर्मफळाची इच्छा नसते तसेच मिळालेल्या फळाची अपूर्वाई वाटत नाही त्याला वर सांगितलेले विकार त्रास देत नाहीत. तो कोणत्याही परिस्थितीत समाधानी असतो. त्यामुळे त्याला केलेल्या कर्माचे बंधन लागू होत नाही. कर्मयोग कौशल्याने आचरणारा साधक ईश्वरी प्रेरणेनुसार कार्य करत असल्याने तो स्वत:च्या मनाने कोणतेच कार्य करत नसल्याने त्याने कर्मत्याग केल्यातच जमा असतो. परंतु मूढ लोक कर्मयोगाच्या मार्गातून पुढे गेलेल्या साधकाने कर्माच्या फळाचा त्याग केल्याने कर्मत्याग आपोआपच घडतो हे लक्षात घेत नाहीत. शहाण्या माणसाने कर्मयोगापासून सुरवात करून कर्मसंन्यास साधावा म्हणजे त्याचे कल्याण होते. त्याने इच्छा करणे सोडून दिले असल्याने त्याचे मन निर्विचार झालेले असते. त्यामुळे तो स्वत:चे अस्तित्व विसरलेला असतो.
असा साधक ब्रह्मरूप होतो. त्याच्या हातून घडणारे कल्याणकारी कार्य हे देवाने केल्यासारखेच असते. तो अंतरबाह्य पवित्र असल्याने त्याला सर्व प्राणीमात्रात ईश्वर दिसतो. कर्म कोणते आणि अकर्म कोणते ह्यातील भेद तो उत्तम जाणत असतो. त्याच्या हातून जे कार्य घडते ते ईश्वरी प्रेरणेने त्याची इंद्रिये करत आहेत आणि ती करण्यामध्ये त्याचा काहीच सहभाग नाही ह्याची जाणीव त्याला असते. तो स्वत:ला आत्मस्वरूप मानत असल्याने त्याचा देह करत असलेल्या कर्माकडे तो त्रयस्थपणे पाहू शकतो. त्याने सर्व कर्म ब्रह्मार्पण केलेले असल्याने त्याला त्याचा दोष लागत नाही. तो जे जे कर्म करतो ते निरपेक्षतेने करत असल्याने त्याची चित्तशुद्धी होत राहते.
ह्याउलट फळाची आशा ठेऊन कर्मे करणारे कर्मफलानी बद्ध होऊन दु:खी होतात. निरपेक्षतेने कर्म करणाऱ्या योग्याने हातून घडणारे कार्य स्वत: करत नसून ईश्वर करून घेत आहे ही खुणगाठ मनाशी पक्की बांधावी आणि इतरांच्या बाबतीत तोच न्याय लागू होतो हे लक्षात घेऊन दुसऱ्याकडून कर्म करून घेण्याच्या फंदात पडू नये. असे केल्याने तो कोठेही सुखात राहू शकतो. तो स्वत:ला कर्ता समजत नसल्याने आपल्या हातून काही निर्माण होत नाही हे तो जाणून असतो. जे जे घडत आहे ते प्रकृती घडवत असून लोकांचे कर्तेपण, ते करत असलेले कर्म आणि त्याचे फळ ह्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही ह्याची जाणीव त्याला असते.
क्रमश: