राफेलकडून 55,000 फुटांच्या उंचीवर ‘हेर फुग्या’ची शिकार
भारतीय वायुदलाने वाढविले चीनचे टेन्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनसोबतच्या सीमा वादादरम्यान भारतीय वायुदलाने अलिकडेच पूर्वेकडील सीमेवर 55 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर चिनी हेर फुग्यासारखे लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. 2023 च्या प्रारंभी अमेरिकेच्या प्रशासनाने समुद्रावरील एका चिनी हेर फुग्याला नष्ट करण्यासाठी एफ-22 रॅप्टर लढाऊ विमानाचा वापर केला होता. अशाप्रकारचे हेर फुगे अत्यंत अधिक उंचीवरून उडत असतात, या फुग्यांचे आव्हान पाहता भारताने यासंबंधी अमेरिकेच्या वायुदलासोबत चर्चाही केली होती.
भारतीय वायुदलाने काही महिन्यांपूर्वी पूर्व कमांडच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात एका चिनी हेर फुग्यासारख्या लक्ष्याला नष्ट करण्यासाठी राफेल लढाऊ विमानाचा वापर केला होता. वायुदलाने चिनी हेर फुग्याच्या तुलनेत आकारात लहान असलेल्या फुग्याचा वापर परीक्षणासाठ केला. फुग्याला काही पेलोडसोबत आकाशात सोडण्यात आले होते. मग 55 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर एका इन्वेंट्री क्षेपणास्त्राचा वापर करत हा फुगा पाडविण्यात आला होता. वर्तमान वायुदलप्रमुख ए.पी. सिंह हे वायुदलाचे उपप्रमुख म्हणून समग्र संचालनाचे प्रभारी असताना वायुदलाने स्वत:ची ही क्षमता सिद्ध केली होती.
2023 च्या प्रारंभी अमेरिकेच्या वायुदलाच्या एफ-22 ने दक्षिण कॅरोलिनाच्या किनाऱ्यावर एका चिनी हेर फुग्याला पाडविले होते. हा चिनी हेर फुगा अनेक दिवसांपर्यंत अमेरिकेत फिरत होता. अशाप्रकारचा फुगा भारतातील अंदमान आणि निकोबार बेटसमूह क्षेत्रातही दिसून आला होता. या फुग्यांचा वापर मोठ्या क्षेत्रात देखरेख ठेवण्यासाठी केला जात असल्याचे मानले जाते.
चिनी हेर फुग्यांमध्ये एखाद्या प्रकारची स्टिअरिंग प्रणाली असते असे मानले जाते. याचा वापर स्वत:च्या हितसंबंध गुंतलेल्या क्षेत्रात स्थिर राहण्यासाठी केला जातो. तर दुसरीकडे भारतीय वायुदल भविष्यात अशाप्रकारच्या धोक्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी स्वत:ची मानक संचालन प्रक्रियाही तयार करत आहे.