स्पोर्ट्स Mania-इंडिया का त्योहार
‘आयपीएल’चं महत्त्व हे भारतीयच नव्हे, तर जागतिक क्रिकेटच्या दृष्टीनं सुद्धा अनन्यसाधारण. त्यामुळं किताब उचलण्यासाठी दरेक संघ व त्यातील प्रत्येक खेळाडू सारं काही पणास लावतो...या स्पर्धेचा नवा हंगाम सुरू होत असताना विविध संघांवर टाकलेला दृष्टिक्षेप अन् त्यांची ताकद नि उणीवा यांचा घेतलेला वेध...
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच ‘आयपीएल’...गेल्या 17 वर्षांपासून दर मोसमात कोट्यावधी रुपये तिजोरीत ओतणारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची खाण...भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मालामाल करणारी अन् त्यामुळं जगभरात विलक्षण उत्सुकता लागून राहणारी स्पर्धा...भारतीय रसिकांना दरवर्षी न थकता स्टेडियमच्या दिशेनं खेचणारा नि टीव्ही, स्मार्टफोन्सना खिळवून ठेवणारा उपक्रम...आपल्याकडच्या वातावरणाचा विचार करता तब्बल दोन महिने चालणारा हा ‘इंडिया का त्योहार’च...त्याच्या 18 व्या हंगामाचा बार आता फुटतोय...पुन्हा एकदा दहा संघांमध्ये विलक्षण झुंज रंगेल, धावांची अक्षरश: आतषबाजी होईल, प्रत्येक मिळविल्या जाणाऱ्या बळीनिशी स्टेडियममध्ये एकच जल्लोष उसळेल, चेंडू अडविण्यासाठी क्षेत्ररक्षक झोकून देतील अन् मैदानाबाहेरच्या सट्टेबाजीलाही कधी नव्हे इतका ऊत येईल...यंदा सर्वच संघ तुल्यबळ वाटत असल्यानं कोण किताब उचलेल हे सांगणं कठीण !
गतवर्षीच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनं संघ जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय...नेहमीप्रमाणं वेस्ट इंडिजचे ‘मॅचविनर’ सुनील नरेन आणि आंद्रे रसेल फलंदाजी अन् गोलंदाजीचा भार बऱ्यापैकी वाहतील. विशेष म्हणजे त्यांनी एखादा विदेशी खेळाडू जखमी झाल्यास त्याचा परिणाम चमूवर होणार नाही, ‘बॅकअप लाईन’ चांगली राहील याची काळजी घेतलीय. नरेनसाठी इंग्लंडचा मोईन अली, रसेलसाठी विंडीजचा रोवमन पॉवेल, दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्त्झेसाठी स्पॅन्सर जॉन्सन नि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकसाठी अफगाणिस्तानचा रहमानउल्लाह गुरबाझ अशी व्यूहरचना करण्यात आलीय...गतवर्षीचा कर्णधार श्रेयस अय्यर यंदा पंजाब किंग्सच्या तंबूत दाखल झाल्यानं मुंबईचा कर्णधार 36 वर्षीय अजिंक्य रहाणे याच्याकडे नेतृत्व सोपविण्याचा वैशिष्ट्यापूर्ण निर्णय ‘केकेआर’च्या व्यवस्थापनानं घेतलाय...फलंदाजीत रिंकू सिंगसारखा ‘फिनिशर’ त्यांना लाभलाय, तर गोलंदाजीत नरेनला साथ मिळेल ती ‘मिस्ट्री स्पिनर’ वऊण चक्रवर्तीची. मात्र नॉर्त्झे व हर्षित राणा वगळता वेगवान माऱ्यात अनुभवाचा अभाव...
सनरायझर्स हैदराबादच्या भात्यात आहे ती ‘आयपीएल’मधील एक अतिशय स्फोटक अशी सलामीवीरांची जोडी...ऑस्ट्रेलियाचा भारताला नेहमी छळणारा ट्रेव्हिस हेड व अभिषेक शर्मा...या तुफानाला रोखणं गोलंदाजांना सोपं जाणार नाहीये. त्याशिवाय ईशान किशन, दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन, श्रीलंकेचा कामिंदू मेंडीस नि नितीशकुमार रे•ाr हे ‘टी-20’साठी योग्य फलंदाज. त्यांची दुबळी बाजू म्हणजे अजिबात अनुभव नसलेल्या अभिनव मनोहर अन् विआन मुल्डर यांच्या खांद्यांवर पडू शकणारी फिनिशर्सची जबाबदारी. गोलंदाजीचा विचार केल्यास मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, हर्षल पटेल नि जयदेव उनाडकट यांच्यात कुठल्याही संघाला रोखण्याची क्षमता दडलीय. शिवाय त्यांच्याकडे आहेत ती अॅडम झॅम्पा व राहुल चाहरसारखी दोन प्रभावी फिरकी अस्त्रं...
2008 साली पहिली ‘इंडियन प्रीमियर लीग’ जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सनं बहुतेक खेळाडूंना राखण्यात यश मिळविलंय...माजी इंग्लिश कर्णधार बटलरनं सोडचिठ्ठी दिलेली असली, तरी कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि संदीप शर्मा तसंच वेस्ट इंडिजचा हेटमायर यांच्यात ताकद आहे ती ‘रॉयल्स’चा ध्वज फकडवत ठेवण्याची. तथापि, त्या संघाला उणीव जाणवेल ती जलदगती गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची. शिवाय भारताचं प्रतिनिधीत्व केलेला एखादा यशस्वी फिरकी गोलंदाज सुद्धा संघात नाहीये. सर्वांचं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते मात्र 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर. शुभम दुबे व कुणाल राठोड हे कुठलाही अनुभव नसलेले अन्य दोन चेहरे...लिलावादरम्यान राजस्थाननं बटलरसह ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चाहल व रविचंद्रन अश्विनसारख्या मोठ्या नावांना गमावलं. जरी त्यांनी श्रीलंकेच्या महेश थीक्षाना आणि हसरंगा या फिरकी गोलंदाजांना भरती केलेलं असलं, तरी चाहल नि अश्विनची अनुपस्थिती त्यांना निश्चित जाणवेल...
बेंगळूरच्या ‘रॉयल चॅलेंजर्स’ला अजूनपर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकणं शक्य झालेलं नसलं, तरी ऑस्ट्रेलियाचा हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाळ, दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एनगिडी आणि श्रीलंकेचा नुवान तुषारा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर हा संघ मोठी मजल मारू शकेल...दक्षिण आफ्रिकेचा व या संघाचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसनं ‘गूड बाय’ म्हटलेलं असलं, तरी गेली 17 वर्षं अविभाज्य हिस्सा राहिलेला अफलातून विराट कोहली व इंग्लंडचा धडाकेबाज फिल सॉल्ट हे डावाची सुरुवात करणार असल्यानं रॉयल चॅलेंजर्सचं आव्हान मोडीत काढणं इतर संघांना सोपं जाणार नाहीये. शिवाय नेतृत्व सोपविलेला रजत पाटीदार हा तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असलेला आणखी एक आक्रमक फलंदाज. संघात कृणाल पंड्या, इंग्लंडचा लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड यांचा समावेश असला, तरी चौथ्या क्रमांकावर सक्षम फलंदाजाची उणीव भासू शकेल...यंदाच्या ‘आयपीएल’मधील सर्वांत कमकुवत फिरकी मारा आहे तो ‘आरसीबा’चा. संघात सुयश शर्मा हा एकमेव ‘स्पेशलिस्ट’ फिरकी गोलंदाज...
चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानावर हरविणं ही अत्यंत कठीण बाब. शिवाय रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन अन् नूर अहमदसारख्या अस्त्रांना साथ मिळेल ती श्रेयस गोपाल, दीपक हुडा अन् नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत सर्वांत जास्त धावांची नोंद केलेल्या न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रचे...महेंद्रसिंह धोनीच्या संघातील श्रीलंकेचा मनीषा पथिराना व इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन तसंच जॅमी ओव्हरटन यांच्यात क्षमता आहे ती जदलगती गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका प्रभावीपणे बजावण्याची...नॅथन एलिस, अंशूल कंबोज, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, गुरजापनीत सिंग नि खलिल अहमद यांच्यात देखील ताकद आहे ती प्रतिस्पर्ध्यांना तडाखे देण्याची...ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवेच्या रुपानं त्यांना एक भक्कम सलामीची जोडी मिळालेली असून तीन ते पाच या क्रमांकासाठी राहुल त्रिपाठी, विजयशंकर, दीपक हुडा व शिवम दुबे यांच्यात स्पर्धा असेल...2024 मध्ये नेतृत्वाची भूमिका सोपवण्यात आलेला गायकवाडच यंदा ती जबाबदारी पेलेल...
दिल्ली कॅपिटल्सचा विचार केल्यास संघात अनुभव व दर्जेदार गोलंदाजी यांचा तुटवडा नाहीये...ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला साथ मिळेल ती मुकेश कुमार, टी. नटराजन तसंच मोहित शर्मा या जलदगती गोलंदाजांची, तर कर्णधार अक्षर पटेल व घातक कुलदीप यादव हे भारतीय गोलंदाज फिरकी मारा सांभाळतील...वरच्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांची रांगच त्यांच्याकडे असून त्यात समावेश उपकर्णधार फाफ डु प्लेसिस, चॅम्पियन्स चषक स्पर्धेत चमकलेला के. एल. राहुल, ऑस्ट्रेलियाचा जॅक प्रेझर-मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांचा. शिवाय सर्वांचं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते भारतातर्फे त्रिशतक झळकावलेल्या आणि पुन्हा एकदा रंगमंचावर अवतरलेल्या करुण नायरवर. मधल्या फळीत अक्षर पटेलसह दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स जबाबदारी सांभाळेल...
लखनौ सुपर जायंट्सला यंदा रिषभ पंतच्या रुपानं नवीन कर्णधार मिळालाय तो के. एल. राहुलनं ‘दिल्ली कॅपिटल्स’कडे मोर्चा वळविल्यानं...रिषभसह मिचेल मार्श, दक्षिण आफ्रिकेचा एडम मार्करम, वेस्ट इंडिजचा निकोलस पूरण व दक्षिण आफ्रिकेचाच डेव्हिड मिलर अशा जबरदस्त फलंदाजांची पलटण असल्यानं त्यांचं वर्णन स्पर्धेतील एक सर्वांत धोकादायक संघ असं केल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये...मात्र त्यांना समस्या आहे ती गोलंदाजीत. ‘सुपरफास्ट’ गोलंदाज मयंक यादव, डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खान, आवेश खान व आकाश दीप यांना ग्रहण लागलंय ते दुखापतीचं. त्यामुळं लखनौ सुपर जायंट्सच्या डावपेचांना धक्का बसू शकेल...लेगस्पिनर रवी बिश्नोई नि डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमद यांचा समावेश असलेला फिरकी मारा मात्र संतुलित वाटतो...
जन्म झाल्यानंतर पहिल्याच वर्षी जेतेपद व त्यानंतर उपविजेतेपद मिळविणाऱ्या गुजरात टायटन्सकडे असलेले दक्षिण आफ्रिकेचे कागिसो रबाडा व जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज नि अफगाणिस्तानचा कसबी फिरकीपटू रशिद खान यांच्यात कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला उद्धवस्त करण्याची क्षमता दडलीय. शिवाय जलदगती (ईशांत शर्मा, प्रसिद्ध कृष्णा) नि फिरकी या दोन्ही विभागांत समावेश आहे तो भारताचं प्रतिनिधीत्व केलेल्या गोलंदाजांचा...तुफानी गतीनं फलंदाजी करण्याची जबाबदारी असेल ती शुभमन गिल, बटलर अन् साई सुदर्शनवर. त्याशिवाय शाहरूख खान व वॉशिंग्टन सुंदर यांना त्यांची क्षमता सिद्ध करावी लागेल. मात्र गुजरातच्या संघाचा विचार करताना विसरून चालणार नाही ते न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्स व रूदरफोर्डसारख्या खेळाडूंच्या धोक्याला...
पंजाब किंग्सची मदार असेल ती अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह ओमरझाई, ऑस्ट्रेलियाचा जोश इंग्लिस, अलीकडच्या काळात भारतीय संघाच्या मदतीला सातत्याने धावून आलेला श्रेयस अय्यर या फलंदाजांवर...यावेळी संघाचं नेतृत्व सांभाळेल तो श्रेयसच...खेरीज ऑस्ट्रेलियाचे मार्कस स्टॉइनिस, स्फोटक ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेनसेन अन् सूर्यांश शेडगे, हरप्रीत ब्रार, मुंबईचा मुशिर खानसारख्या अष्टपैलू खेळाडूंना प्रभावी भूमिका बजवावी लागेल. पंजाब संघातील तब्बल आठ जण फलंदाजी व गोलंदाजी हे दोन्ही विभाग अतिशय कुशलतेनं सांभाळू शकतात. धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंग व अष्टपैलू शशांक सिंग यांना संघात राखण्यात आलंय...गोलंदाजीमध्ये न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन आणि जेनसेन यांच्यासह वेगवान माऱ्याचं नेतृत्व करेल तो अर्शदीप सिंग. तर ‘आयपीएल’मधील सर्वांत यशस्वी गोलंदाज लेगस्पिनर युजवेंद्र चाहलकडे नियंत्रण ठेवण्याची तसंच बळी मिळविण्याचीही क्षमता असल्यामुळं फिरकी विभाग सुद्धा तितकाच मजबूत दिसतो...
भेदक जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्टला फार मोठी जबाबदारी सांभाळावी लागेल. त्याला साथ मिळेल ती दीपक चाहर, इंग्लंडचा रीस टोपले व (पहिला सामना वगळता) कर्णधार तसंच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची. मात्र या साऱ्यांना दुखापतींनी सतत त्रास दिलाय हे विसरता येणार नाहीये...मुंबई इंडियन्सकडे फलंदाजांची जबरदस्त फळी असून तिथं वरची नि मधली फळी जवळजवळ पूर्णपणे आंतरराष्ट्रीय ‘स्टार’ खेळाडूंनी भरलीय. त्यात समावेश होतो तो ‘टी-20’चा तज्ञ सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा अन् तिलक वर्मासारख्या आक्रमक खेळाडूंचा. त्यांना आता जोड मिळालीय ती रायन रिकेल्टन व इंग्लंडचा विल जॅक्स यांची...फिरकी मारा हा मात्र मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. संघात न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर असला, तरी त्याला साथ द्यायला त्या ताकदीचा दुसरा खात्रीशीर फिरकी गोलंदाज नाही. कर्ण शर्मा फारसा फॉर्ममध्ये नसून अफगाणिस्तानचा ‘मिस्ट्री बॉलर’ मुजीब उर रेहमानबद्दलही असेच म्हणता येईल. परंतु त्यांना शेवटच्या षटकांत खरी उणीव भासेल ती भेदक बुमराहची!
आयपीएलचे अजोड विक्रमवीर
इंडियन प्रीमियर लीग म्हणजे क्रिकेटमधील उत्कृष्ट कौशल्याची कस पाहणारी स्पर्धा...तिथं आल्या हंगामानिशी दिग्गज खेळाडू घडतात आणि विक्रम पायदळी तुडविले जातात...पण 2008 मध्ये सुरुवात झाल्यापासून ‘आयपीएल’नं काही अविश्वसनीय पराक्रम पाहिलेले असून या विक्रमवीरांची छाप कधीही मिटणार नाहीये...
विराट कोहली
‘किंग कोहली’साठी 2016 चा आयपीएल हंगाम एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हता. चार शतकांसह त्यानं 973 धावा करून एक विलक्षण टप्पा गाठला अन् तो ओलांडणं जवळजवळ अशक्यप्रायच वाटणारं...हा विक्रम कोहलीचं पूर्ण वर्चस्व दाखवून देतो...
कोलकाता नाईट रायडर्स
केकेआर’नं 2014 आणि 2015 च्या आयपीएल हंगामांत मिळून सलग 10 विजय नोंदवत इतिहास रचला. या पराक्रमानं त्यांच्या जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली...स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी विजयी घोडदौड...
ख्रिस गेल
‘टी-20’तला ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलनं 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरतर्फे (आरसीबी) खेळताना पुणे वॉरियर्सविऊद्ध 30 चेंडूंत शतक झळकावून विक्रमांची नोंद केली. त्याची ती 175 धावांची विध्वंसक खेळी ही ‘आयपीएल’मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या...गेलंन चक्क 17 षटकारांची बरसात केली. ते एका ‘आयपीएल’ सामन्याचा विचार करता सर्वाधिक...वेस्ट इंडिजच्या या तुफानी फलंदाजाच्या ‘पॉवर-हिटिंग’नं त्याला आयपीएलच्या इतिहासात अतुलनीय स्थान मिळवून दिलंय...
अल्झारी जोसेफ
मुंबई इंडियन्सतर्फे खेळताना वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफनं ‘आयपीएल 2019’मध्ये स्वप्नवत पदार्पण केलं. सनरायझर्स हैदराबादविऊद्ध त्यानं 12 धावांत चक्क 6 बळी टिपले. त्याची ही कामगिरी विक्रम मोडीत काढून गेली. ‘आयपीएल’मधील पदार्पणातील ती सर्वोत्तम गोलंदाजी...
यशस्वी जैस्वाल
या तरुण प्रतिभावान खेळाडूनं 2023 मध्ये फक्त 13 चेंडूंत 50 धावा काढून क्रिकेट जगताला चकीत करताना मागील विक्रम मोडला. त्याची निर्भय फटकेबाजी ही नव्या पिढीतील टी-20 क्रिकेट ‘सुपरस्टार’च्या उदयाची नांदी होती...
अमित मिश्रा
‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वाधिक हॅट्ट्रिकचा विक्रम आहे तो याच फिरकी गोलंदाजाच्या नावावर. त्यानं वेगवेगळ्या संघांमधून तीन वेळा हा पराक्रम केला. आपल्या लेगस्पिननं सामन्याचं रूप बदलून टाकण्याची क्षमता मिश्राला स्पर्धेतील एक दिग्गज खेळाडू ठरवते...
ए. बी. डीव्हिलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू त्याच्या ‘सुपरह्युमन रिफ्लेक्सेस’साठी आणि खास करून ‘360 डिग्री फटकेबाजी’साठी ओळखला जातो, पण ‘आयपीएल’मध्ये त्याच्या खात्यात एक विक्रम आहे तो फलंदाजीतील नव्हे, तर क्षेत्ररक्षणातील. एका हंगामात 19 झेल घेण्याचा उच्चांक त्यानं नोंदविलाय. डीव्हिलियर्सच्या फलंदाजीबरोबर त्याच्या चपळ क्षेत्ररक्षणाचंही रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या मोहिमांमध्ये मोठं योगदान राहिलं...
ख्रिस गेल व रवींद्र जडेजा
गेल (2011) व जडेजा (2021) यांच्या नावावर आहे तो एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम (37 धावा) या स्फोटक फलंदाजीनं टी-20 क्रिकेटचं अत्यंत आक्रमक स्वरूप दाखवून दिलं...
विराट कोहली नि ए. बी. डीव्हिलियर्स
कोहली व डीव्हिलियर्स यांनी 2016 मध्ये गुजरात लायन्सविऊद्ध 229 धावांची अविस्मरणीय भागीदारी केली. यावेळी त्यांच्या सहज पॉवर हिटिंगनं चाहत्यांना थक्क करून सोडलं...‘आयपीएल’च्या इतिहासातील ही सर्वोच्च भागीदारी...