स्पोर्ट्स mania
बॅडमिंटन कोर्टवरील अनमोल रत्न
यंदा भारतीय महिलांना ‘बॅडमिंटन एशिया’ सांघिक स्पर्धेचं जेतेपद मिळविता आलं ते अनमोल खर्ब या उभरत्या बॅडमिंटनपटूनं केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळं...ती सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्या पावलांवर पावलं टाकू शकेल का हे पुढं दिसून येईलच. पण सध्याच्या घडीला तरी तिनं तो वारसा चालविण्याची ताकद दाखवून दिलीय...
सध्या भारतातील बॅडमिंटन विश्वात बोलबाला चाललाय तो किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय, सात्विकसाईराज रान्कीरे•ाr-चिराग शेट्टी यासारख्या पुरुष खेळाडूंचा...मध्यंतरी महिला ‘शटलर्स’ कोर्ट विलक्षण दणाणून सोडू लागल्या होत्या. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये...कारण सायना नेहवालचं युग कधीच सरलंय अन् पी. व्ही. सिंधूचीही वाटचाल चाललीय ती त्याच दिशेनं...या पार्श्वभूमीवर एक नाव त्यामुळं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची, त्यांचा वारसा चालविण्याची लक्षणं दाखवून देऊ लागलंय...त्याची चुणूक दिसली ती नुकत्याच मलेशियात झालेल्या ‘बॅडमिंटन एशिया’ सांघिक स्पर्धेत...
मान्य की, सदर स्पर्धेत चीन, जपान नि थायलंडच्या काही बड्या नावांनी भाग घेतलेला नव्हता आणि त्यामुळं भारताचा प्रवास सुलभ झाला. पण म्हणून भारतीय महिला संघानं प्रथमच पटकावलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचं महत्त्व जसं कमी होत नाही तसंच त्या युवतीनं बजावलेला पराक्रमही नजरेआड करता येणार नाही...मलेशियामध्ये ती एकदा नव्हे, तर तीन प्रसंगी भारताची तारणहार बनली. इतकंच नव्हे, तर अंतिम फेरीसह या लढतींमध्ये तिनं नामोहरम करून दाखविलं ते तिच्याहून वरच्या क्रमांकावर विसावलेल्या, अधिक अनुभवी प्रतिस्पर्ध्यांना...अन् हा सारा पराक्रम तिनं बजावलाय तो वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी...नावाप्रमाणंच ‘अमूल्य’ असलेली अनमोल खर्ब...
‘बॅडमिंटन एशिया’ सांघिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय महिला संघात अनमोलची वर्णी लागली ती दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू नि चलिहा यांच्यासह एकेरीतील तिसरी खेळाडू या नात्यानं...सदर स्पर्धेत त्यापूर्वी भारताला फक्त दोन कांस्यपदकं जिकता आली होती (2016 व 2020 मध्ये), तिही पुऊष संघाला...अशा परिस्थितीत कुणी अपेक्षा केलेली नसताना भारतीय महिलांनी शाह आलममध्ये इतिहास रचला आणि अनमोल खर्ब त्या यशाची मुख्य नायिका राहिली असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. ती तीन सामने खेळली आणि ते सर्व तिनं जिंकले. ही कामगिरी विशेष अशासाठी की, तिन्ही सामने निर्णायक होते..
जेव्हा अनमोलनं तिच्या वरिष्ठ स्तरावरील पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय लढतीसाठी कोर्टवर पाऊल ठेवलं तेव्हा तिची गाठ पडली ती चीनशी. गटातील तो सामनाही निर्णायकच होता. जागतिक क्रमवारीत 149 व्या स्थानावर असलेल्या वू लुओ यूच्या विरोधात 472 व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय युवतीला थोडी देखील संधी आहे असं कुणाला वाटलेलं नसेल...मात्र अनमोल खर्बनं सर्वांना उताणं पाडत यूचा 22-20, 14-21, 21-18 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये 15-17 अशी पिछाडीवर पडल्यानंतर देखील तिनं उसळी घेतली आणि तिसऱ्यात 18-18 अशी बरोबरी झाल्यानंतर सुद्धा न डगमगता तो गेम खिशात टाकला...चीनविऊद्ध पराभव स्वीकारावा लागला असता, तरी भारताच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशात अडथळे आले नसते हे खरं. परंतु अनमोलच्या धडाक्यानं संघाचं मनोबल वाढविलं, स्पर्धेतील पुढील यशाचा पाया घातला...
भारतानं उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगला 3-0 नं धूळ चारल्यानं अनमोलची गरज भासली नाही. तिची निकड लगेच जाणवली ती पुढच्या सामन्यात. जपानविऊद्धच्या उपांत्य लढतीत तिच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली ती जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर असलेल्या लेली नत्सुकी निदायराच्या आव्हानाचा सामना करण्याची. लेली ही कनिष्ठ जागतिक स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेती खेळाडू. हा सामनाही निर्णायक होता अन् चीनविरुद्धच्या लढतीप्रमाणं इथं परिस्थिती नव्हती. अनमोलचा पराभव झाल्यास भारताला गाशा गुंडाळावा लागला असता...
पण अनमोल खर्बनं पुन्हा सर्वांचे आडाखे चुकविले...जपानी शटलरला तिनं 21-14, 21-18 असं सरळ गेममध्ये नमविलं आणि भारतीय महिला संघाचा प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करून टाकला...थायलंडविऊद्धच्या अंतिम फेरीत पी. व्ही. सिंधू आणि ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनी पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली, परंतु लागोपाठच्या पराभवामुळं 2-2 अशी बरोबरी झाली...परत एकदा संघ व्यवस्थापन निर्णायक लढतीसाठी वळलं ते अनमोलकडे. यावेळी अंतिम लढत असल्यानं दबाव जास्तच होता. त्यात जागतिक क्रमवारीत 45 व्या स्थानावर असलेली पोर्नपिचा चोईकीवाँग समोर उभी ठाकलेली. पण हरयाणवी शैलीत तिनं ना पणाला लागलेल्या सुवर्णपदकाचा भार डोक्यावर चढू दिला ना उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याला. केवळ 43 मिनिटांत अनमोलनं थायलंडच्या खेळाडूचा 21-14, 21-9 असा फडशा पाडला...
मलेशियातील अनमोल खर्बचा हा सनसनाटी ‘जायंट-किलिंग’ म्हणतात तसा प्रवास विस्मयकारक आणि तो पुलेला गोपीचंदसारख्या बॅडमिंटनमधील दिग्गजांना देखील आश्चर्याचा धक्का देऊन गेल्याशिवाय राहिला नाही...‘खरं तर सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसारख्या मोठ्या नि निणार्यक सामन्यात खेळण्यासाठी धैर्य व आत्मविश्वासाची आवश्यकता असते. खेळाडूची जडणघडण कशी आहे ते त्यातून दिसून येतं. मला वाटतं की, तिनं त्या आघाडीवर उल्लेखनीय कामगिरी केलीय...तिची वाटचाल अभूतपूर्व राहिलीय, ती योग्य फटके खेळलीय. तिचा दृष्टिकोन तर जबरदस्तच होता’, त्या जेतेपदानंतरचे गोपीचंद यांचे हे शब्द खर्ब खरंच किती ‘अनमोल’ आहे ते दाखवून देतात !
लहान वयातच बॅडमिंटनची मोहिनी...
- 20 जानेवारी, 2007 रोजी हरियाणाच्या फरिदाबाद इथं जन्मलेल्या अनमोल खर्बवर लहान वयातच बॅडमिंटनची मोहिनी पडली ती थोरला भाऊ हार्दिकला खेळताना पाहून...हार्दिकनं पुढं शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला असला, तरी अनमोलनं मात्र बॅडमिंटनला अधिक गांभीर्यानं घेतलं...
- याकामी पेशानं वकील असलेले वडील देवेंद्र सिंग आणि आई राजबाला यांच्याकडून तिला पूर्ण पाठिंबा मिळाला हे विशेष...देवेंद्र सिंग हे राष्ट्रीय स्तरावरील माजी कब•ाrपटू (ते नेहमीच स्पर्धांमध्ये सहभागी होताना मुलीसोबत असतात. तिनं मलेशियात भारताला विजय मिळवून दिला तेव्हाही ते तिथं हजर होते)...
- अनमोलनं सुऊवातीला फरिदाबादमधील दयानंद पब्लिक स्कूलतर्फे खेळल्यानंतर आपल्या कौशल्याला नीट पैलू पाडण्याकरिता नोएडा येथील कुसुम सिंग यांच्या नेतृत्वाखालील सनराईज शटलर्स अकादमीकडे मोर्चा वळविला. कुसूम सिंग या ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल अन् अश्विनी पोनप्पा यांच्या राष्ट्रीय स्तरावरील माजी सहकारी...मुलीच्या कारकिर्दीला नीट आकार मिळावा यासाठी आई राजबाला देखील तिच्यासोबत राहू लागली...
- बॅडमिंटनच्या नियमित सरावाच्या व्यतिरिक्त अनमोलनं तिच्या तांत्रिक प्रशिक्षणाला पूरक ठरण्यासाठी काही अपारंपरिक मार्गांचा अवलंब केला. प्रत्येक दिवशी पहाटे 5 वा. उठून ती पार्कमध्ये एका माजी आंतरराष्ट्रीय बॉक्सरद्वारे घेण्यात येणाऱ्या शारीरिक प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हायची...
- अनमोल खर्बला आपल्या खेळात सामर्थ्य आणण्यास याची मोलाची मदत झाली. ही ताकद तिच्या खेळण्याच्या शैलीचं एक लक्षणीय वैशिष्ट्या बनलंय. ती बॅडमिंटन कोर्टवर भेदक नि अचूक स्मॅशसाठी ओळखली जाते...
कनिष्ठ ते वरिष्ठ स्तरापर्यंतची झेप...
- 2019 : सायना नेहवालची चाहती असलेल्या अनमोल खर्बची प्रतिभा सर्वप्रथम नजरेत भरली ती वयाच्या 12 व्या वर्षी तिनं हैदराबादमध्ये 17 वर्षांखालील अखिल भारतीय स्पर्धेचा किताब मिळविल्यानं. ते तिचं राष्ट्रीय स्तरावरील पहिलं जेतेपद...त्याच वर्षी विशाखापट्टणम इथं झालेल्या वरिष्ठ अखिल भारतीय ‘रँकिंग’ स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत तिनं मजल मारली आणि उभरत्या खेळाडूंना मदत करणाऱ्या भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया योजने’खाली तिची निवड झाली...
- 2020 : अनमोलनं एकेरीबरोबर दुहेरीत देखील 17 वर्षांखालील राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. दुहेरीत तिची जोडी जमली ती वेण्णला के. हिच्यासोबत...
- 2022 : आशियाई कनिष्ठ स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक दिलेल्या या खेळाडूनं विविध वयोगटांतील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी करून दाखविली. या पार्श्वभूमीवर 17 नि 19 वर्षांखालील गटांमध्ये भारताची अव्वल क्रमांकाची खेळाडू बनण्यास तिला वेळ लागला नाही...
- 2023 : अनमोल खर्ब खऱ्या अर्थानं प्रसिद्धीच्या झोतात आली ती गुवाहाटी इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत तन्वी खन्नाला हरवून वयाच्या 16 व्या वर्षी पहिलं वरिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद खात्यात जमा केल्यानं.. त्यासरशी ती एकेरीच्या सर्वांत तरुण राष्ट्रीय विजेत्यांपैकी एक बनली. त्यापूर्वी उपांत्य फेरीत तिनं धक्का दिला तो ज्येष्ठ सहकारी नि ‘जागतिक बॅडमिंटन महासंघा’च्या ‘वर्ल्ड टूर’मध्ये नियमित झळकणाऱ्या अश्मिता चलिहाला...
- 2024 : सदर राष्ट्रीय किताब हा ‘फ्लूक’ नव्हता हे सिद्ध करताना अनमोलनं यंदा जानेवारीत जोधपूर इथं झालेल्या अखिल भारतीय वरिष्ठ ‘रँकिंग’ स्पर्धेचं विजेतेपदही खिशात घातलं. त्यानंतर नोंदली गेली ती मलेशियातील झळाळती कामगिरी...
तंदुरुस्ती, सरावावर खासा भर...
- अनमोल खर्ब दररोज सुमारे सहा तास तिच्या कौशल्याला पैलू पाडण्यासाठी आणि तंदुरुस्ती सुधारण्यासाठी खर्च करते...‘माझा दिवस खूप लवकर सुरू होतो. मी पहाटे 5 पासून 7 पर्यंत शारीरिक व्यायाम करते करतो. न्याहारीनंतर सकाळी 10 च्या आसपास कोर्टवर सराव...तो दुपारी 2.30 पर्यंत चालतो. त्यानंतर विश्रांती आणि संध्याकाळी अभ्यास’, ती सांगते...
- मलेशियातील कामगिरीविषयी बोलताना अनमोल म्हणते, ‘चीनविऊद्धच्या विजयानं आम्हा सर्वांचा उत्साह खरोखरच वाढविला. गटात अव्वल स्थान मिळविण्यासाठी तो पाचवा सामना मी जिंकणं आवश्यक होते. त्यावेळी शटल कोर्टच्या एका बाजूनं जात होतं. त्यामुळं मी रणनीती बदलली आणि शटल बाहेर न जाता कोर्टच्या मध्यभागी पडेल अशा पद्धतीनं खेळले. गोपीचंद सर यांच्या सतत मार्गदर्शनाची मला खूप मदत झाली’...
खेळ जुनाच ओळख नवी : सायकलिंग...‘टीम प्रिंट’
ऑलिम्पिकमधील सर्वांत वेगवान आणि रोमांचक सायकलिंग प्रकारांपैकी एक म्हणजे...‘टीम स्प्रिंट’...यात संघातील प्रत्येक सायकलस्वार एका फेरीनंतर बाहेर पडतो आणि शेवटचा रायडर अंतिम रेषा गाठण्यासाठी शक्य तितका सुसाट सुटतो. सर्वांत वेगवान संघ विजेता घोषित केला जातो...
- ‘टीम स्प्रिंट’ हा तसं पाहता पारंपरिक ‘स्प्रिंट’ प्रकार नव्हे आणि त्याचं स्वरुप ‘टीम टाईम ट्रायल’शी साधर्म्य साधणारं...पुऊषांच्या शर्यतीत प्रत्येकी तीन सायकलस्वारांचा संघ उतरतो आणि तीन फेऱ्यांत म्हणजे 750 मीटर्स अंतरात शर्यत रंगते, तर महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी दोन सायकलस्वारांचा संघ उतरतो आणि दोन फेऱ्यांमध्ये म्हणजे 500 मीटर्स अंतरात शर्यत होते...
- प्रत्येक शर्यतीत ट्रॅकच्या प्रत्येक बाजूला एक संघ राहून स्पर्धा करताना दिसतो...प्रत्येक फेरीनंतर एक सायकलस्वार संघ सोडतो. त्यामुळं प्रत्येक शर्यतीच्या सुरुवातीला तीन रायडर्स राहत असले, तरी ती पूर्ण करतो मात्र फक्त एकच रायडर...
- शर्यतीला सुरुवात करताना ‘लीड रायडर’च्या सायकलच्या चाकाला इलेक्ट्रॉनिक नियंत्रित गेटमध्ये धरून ठेवलं जातं. यामुळं दोन्ही संघ एकाच वेळी सुरुवात करतील हे निश्चित होतं. जेव्हा आरंभ करण्यास सांगणारी फैरी झाडली जाते तेव्हा लीड रायडरला सोडलं जातं आणि मदतनीसांनी धरून ठेवलेल्या संघातील इतर सायकलस्वारांनाही ढकललं जातं...
- लीड रायडर हा वेगवान सुरुवात करून देण्यात तज्ञ असावा लागतो. तो पहिल्या 250 मीटर्समध्ये संघाला शक्य तितका वेग मिळवून देतो आणि नंतर बाहेर सरतो. 500 मीटर्सनंतर दुसरा सायकलस्वार ट्रॅक सोडतो. अंतिम फेरी पार करण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपविली जाते त्या संघातील रायडरमध्ये सामान्यत: सर्वोत्तम क्षमता असते. जो संघ आवश्यक फेऱ्या प्रथम पूर्ण करतो तो विजेता ठरतो...महिला गटात वेग वाढवत अंतिम रेषा गाठण्याची जबाबदारी दुसऱ्या सायकलस्वारावर राहते...
- एका सायकलस्वारानं बाहेर सरणं आणि संघातील दुसऱ्यानं ती आघाडी सांभाळणं हे ट्रॅकच्या 15 मीटर विभागात होणं आवश्यक...लंडनमधील 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश आणि चिनी महिला संघ ते शक्य न झाल्यानं बाहेर फेकले गेले होते...
- सर्व संघ पात्रता फेरीत आपापली वेळ नोंदवितात, ज्यातून अव्वल आठ संघ पहिल्या फेरीत जातात. तिथं मानांकनाच्या आधारे कुणाचा मुकाबला कुणाशी व्हायचा ते ठरविलं जातं. उदाहरणार्थ अव्वल मानांकित संघ व आठव्या क्रमांकावरील संघ, दुसऱ्या क्रमांकाचा चमू आणि सातव्या स्थानावरील संघ अशा प्रकारे प्रतिस्पर्धी ठरविले जातात...
- चार प्राथमिक फेऱ्यांतील विजेते पदकांसाठीच्या फेरीत पोहोचतात. तिथं दोन सर्वांत जलद संघ सुवर्णपदकासाठीच्या अंतिम फेरीत भाग घेतात, तर इतर दोन चमूंच्या वाट्याला कांस्यपदकासाठीची शर्यत येते...ऑलिम्पिकमध्ये ‘टीम प्रिंट’ची शर्यत सध्या अशाच प्रकारे तीन टप्प्यांत होते. यात ‘टीम पर्स्युट’च्या धर्तीवर पहिली फेरी जोडली गेली ती 2016 च्या खेळांनंतर...
- या शर्यतीत निव्वळ वेग महत्त्वाचा असला, तरी त्याचबरोबर तंत्र देखील महत्त्वाचं ठरतं. कारण सायकलस्वारानं सुरुवात झाल्यानंतर वेगानं सुटणं आणि संघातील सर्वांनी जास्तीत जास्त जवळ राहणं आवश्यक...
- ‘टीम प्रिंट’ची शर्यत 2000 पासून ऑलिम्पिक खेळांमध्ये रंगू लागली, तर महिलांची शर्यत त्याला जोडली गेली ती 2012 साली....
- राजू प्रभू
हम भी किसी से कम नही
कोल्हापुरीतील महिला क्रिकेटपटू ऋतुजा देशमुख, टेनिस पंच सेजल केनिया आणि मल्ल स्वाती शिंदेची उत्तुंग कामगिरी, कोल्हापूरचे नाव देश-विदेशात गाजवले
नारीत आहे शक्ती भारी... समजू नका तिला बिचारी...
घरच्या जबाबदारीतून मार्ग काढत ती घेते असते भरारी...या पंक्तींना तंतोतत शोभेल अशी कामगिरी कऊन दाखवत कोल्हापुरातील महिला खेळाडूंनी देशासह जगभरात आपल्या नावाची छाप पाडली आहे. क्रिकेटपटू ऋतुजा देशमुख, टेनिस पंच सेजल केनिया आणि मल्ल स्वाती शिंदे अशी या महिला खेळाडूंची नावे आहेत. त्यांनी आपल्या खेळात उत्तुंग कामगिरी करताना ‘हम भी किसी से कम नही’, असे पुऊष खेळाडूंना दाखवून दिले आहे. शुक्रवार 8 मार्च रोजी जागतिक महिलादिन साजरा होत आहे. यानिमित्त ऋतुजा, सेजल व स्वाती या महिला खेळाडूंनी आपल्या खेळात केलेल्या पराक्रमावर टाकलेला हा प्रकाशझोत...
ऋतुजाची 23 शतके अन् 45 अर्धशतकांची शानदार कामगिरी...
क्रिकेटमध्ये टिकून रहायचे असेल सामन्यांमध्ये ‘कन्सिटन्सी परफॉमेंन्स’ हा करावाच लागतो. जो खेळाडू ‘कन्सिटन्सी परफॉमेंन्स’ करणार नाही, त्याला संघातून डच्चू दिला जाते. हे क्रिकेटमधील एक साधे सुत्र आहे. कोल्हापूरच्या 23 वर्षीय ऋतुजा देशमूखने सामन्यात शानदार खेळ करत ‘कन्सिटन्सी परफॉमेंन्स’ कसा असतो हे दाखवून दिले आहे. वयाच्या 11 व्या वर्षापासून तीने शाहूपुरी जिमखाना मैदानातून क्रिकेट करिअरला सुऊवात केली. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या टीप्सनुसार ऋतुजाने लहान वयातच फलंदाज होण्यावर लक्ष्य केंद्रीत केले होते. रोज तीन-चार तास सराव करताना तीने मैदानातील सर्व प्लेसला फटकेबाजी करण्याचे तंत्र आत्मसात केले. त्याचा फायदा तीला कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत खेळताना झाला. राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील परफॉमेंन्समुळे तिला राष्ट्रीय एकसीय क्रिकेट स्पर्धा खेळण्याची मिळत गेली. या संधीच सोनं करत तीने 19 वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघातून 4 वर्षे, 23 वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघातून 2 वर्षे आणि महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघातूनही दोन वर्षे राष्ट्रीय एकसीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवली. स्पर्धांमधील सामन्यात ‘कन्सिटन्सी परफॉमेंन्स’ करत तीने 23 शतके आणि 45 अर्धशतके ठोकण्याची विशाल कामगिरी केली. जमेची बाजू म्हणजे पश्चिम विभागीय व अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेल्या शिवाजी विद्यापीठ संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळण्याचे भाग्य तिला लाभले. राज्यपातळीवर आयोजित केलेल्या जाणाऱ्या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेतही तीने शानदार फलंदाजी करत कोल्हापूर जिल्हा संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. संभाजीनगर येथे झालेल्या निमंत्रितांच्या महिला क्रिकेट स्पर्धेतील एकसीय सामन्यात ऋतुजाने हायेस्ट 145 धावा ठोकण्याची कामगिरी करत आपल्यामध्ये मैदानातील खेळपट्टी टिकून राहण्याची क्षमता किती आहे हेही दाखवून दिले आहे.
सेजल केनिया ठरल्या जागतिकस्तरावरील लॉन टेनिस व्हॉट बँच रेफ्री...
कोल्हापूरची राष्ट्रीय महिला टेनिस खेळाडू सेजल केनिया (रा. शिवाजी पार्क) यांनी क्रीडानगरी कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावेल, अशी अद्वितीय कामगिरी करत भारतासह जागतिक टेनिसविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. लंडनमधील इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या वतीने डिसेंबर 2022 साली नेदरलॅण्ड येथे लॉन टेनिस व्हाईट बॅच रेफ्री परीक्षेचे आयोजन केले होते. या परिक्षेत उत्तीर्ण होणे अतिशय अवघड जाते. जो कोणी परीक्षा उत्तीर्ण होतो, ते जगभरातील कोणत्याही टेनिस स्पर्धेत मुख्य रेफ्री म्हणून कार्यरत राहू शकतो. भारतातून एकमेव परिक्षार्थी म्हणून निवडल्या गेलेल्या सेजल केनिया यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांनी संयमाच्या जोरावर परिक्षेत उत्तीर्ण होऊन क्रीडानगरी कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावली. परिक्षेपूर्वी चार दिवसांचा टेनिस रेफ्रीसंबंधीत कोर्स घेण्यात आला होता. कोर्समध्ये मुख्य पंचसंबंधीत अवघड अशी माहितीही दिली होती. कोर्स पूर्ण झाल्यानंतर पाचव्या दिवशी थेअरी व प्रॅक्टीकल अशा स्वऊपात परीक्षा घेतली. या परीक्षेमध्ये सेजल यांनी टेनिसमधील अनुभवपणाला लावत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन लॉन टेनिस व्हाईट बॅच रेफ्री होण्याचा बहुमान मिळवला. ही परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सेजल ह्या भारतातील तिसऱ्या महिला पंच ठरल्या. राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुख्य पंच म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनने नेदरलॅण्डमधील लॉन टेनिस व्हाईट बॅच रेफ्री परिक्षेसाठी पात्र ठरवले होते. त्यांच्यासोबत जगभरातील केवळ 25 जणांनी ही परीक्षा दिली होती. सेजल ह्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत त्यांना मुख्य रेफ्री म्हणून अधिकृतपणे कार्यरत राहण्याची संधी चालून आली. या संधीच्या जोरावरच त्या दिल्ली व मेरठ (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या आतंराष्ट्रीय मास्टर्स व छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) येथे झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या 16 वर्षाखालील मुली-मुलांच्या टेनिस स्पर्धेत मुख्य रेफ्री म्हणून कार्यरत राहिल्या. शिवाय गेल्या 7 वर्षात त्यांनी शंभराहून अधिक राष्ट्रीय ज्युनिअर मुला-मुलींच्या टेनिस स्पर्धेसह एका राष्ट्रीय पुऊष टेनिस स्पर्धेमध्ये मुख्य रेफ्री म्हणून काम पाहिले आहे. 2021 साली नवी मुंबई व सोलापूरात झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेतही त्यांनी सहायक पंच म्हणूनही काम पाहिले होते.
कुस्तीतील पुऊषी वर्चस्वाला स्वाती शिंदेने दिला छेद...
कोल्हापूरच्या लालमातीतील कुस्तीला एक वेगळेच वलय आहे. या वलयाच्या आकर्षणापोटी मुरगुड (ता. कागल) येथील स्वाती संजय शिंदेने आपल्या वयाच्या 12 व्या वर्षी लालमातीत पाय ठेवले. लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई कुस्ती संकलात ती मल्लविद्यचे धडे घेऊन लागली. एनआयएस कुस्ती कोच दादासाहेब लवटे यांच्याकडून तिला कुस्तीचे धडेही मिळू लागले. बदलेल्या कुस्तीनुसार तीने पुढील सहाच्या महिन्यात लालमातीबरोबरच मॅटवरील कुस्तीचाही सराव कऊ लागली. स्वातीकडे चांगल्या पद्धतीने कुस्ती करण्याचे असलेले कौशल्य पाहून तिचे कोच दादासाहेब लवटे यांनी तिच्या दररोजच्या सरावाचे नियोजन लवटे यांनी केले. या नियोजनानुसार ती रोज सहा तास सराव कऊ लागली. या सरावाच्या जोरावर स्वातीने स्थानिकपासून राष्ट्रीय पातळीवर झालेल्या शाळा व महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत हुकूमत अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवली.
शाळा, महाविद्यालयात दबदबा राखलेली स्वाती शिंदे ही आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कामगिरीमुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह देशात नावाऊपाला आली. ही कामगिरी करताना तीने कुस्तीतील पुऊषी वर्चस्वालाही छेद दिला. 48, 50 व 53 किलो अशा वजन गटातून तीने अनेक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. मंगोलिया येथे झालेल्या आशियाई वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेसह दिल्ली येथे झालेल्या आशियाई कनिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत तीने प्रत्येकी 1 कांस्य जिंकले. युरोपमधील स्लोवाकिया येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत तिने चौथ्या क्रमांक देशासाठी खेचून आणला. तैपई (चीन) येथे झालेल्या आशियाई कनिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक आणि बँकॉकमध्ये झालेल्या कॅडेट कुस्ती स्पर्धेत तीने तिने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. याशिवाय आग्रा, अयोध्या, राजस्थान, विशाखापटनम येथे 2021 ते 2024 या कालावधीत झालेल्या सलग चार राष्ट्रीय वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत स्वातीने 1 रौप्य व 3 कांस्य पदके पटकावली. सलग चार स्पर्धेत सलग चार पदके पटकावणारी स्वाती ही महाराष्ट्रातील एकमेव महिला मल्ल ठरली. शिवाय सलग दहा वर्ष राज्यस्तरीय वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम करत स्वातीने दबदबा निर्माण केलेली केला होता. तिने कुस्ती स्पर्धेतील नामांकित किताबही आपल्या नावावर केले आहेत. 2017 साली हल्ल्याळ (कर्नाटक) येथे खुल्या गटाअंतर्गत झालेल्या महान भारत केसरी कुस्ती स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व राखत तिने महान भारत केसरी किताब आपल्या नावावर केला. 1018 साली भिवानी (हरियाणा) येथे हरियाणा सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या भारत केसरी कुस्ती स्पर्धेतही तिने 53 किलो वजन गटातून प्रतिनिधीत्व कऊन सुवर्णपदकसह भारत केसरीचा किताब जिंकला. कुस्तीतील एकुणच कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने तिला 2022 साली प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले.
कोल्हापूर प्रतिनिधी