स्पोर्ट्स mania
धडाकेबाज...सरफराज खान
भारतानं इंग्लंडला पुरतं लोळविलेल्या तिसऱ्या कसोटीत वाहवा झाली ती यशस्वी जैस्वालच्या दुसऱ्या द्विशतकाची...त्याचबरोबर महत्त्वपूर्ण छाप उमटविली ती पदार्पणात दोन्ही डावांमध्ये वेगवान अर्धशतकं नोंदवून आपल्या कौशल्याची पुरेपूर झलक दाखविलेल्या सर्फराज खाननं...हा गुणवान खेळाडू बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाची दारं ठोठावत होता. त्याला सदोदित हुलकावणी देणारी संधी अखेर यावेळी मिळाली अन् दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा फळाला आली...
प्रसंग एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेलशा दृष्याचा...राजकोट येथील भारत नि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस...त्या 26 वर्षीय खेळाडूकडे पहिली कसोटी कॅप सोपविली ती दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनं. त्यानंतर त्यानं सीमारेषेकडे धाव घेतली. तिथं ही घटना अनुभवत होते त्याचे आनंदित वडील नि पत्नी. त्यानं वडिलांना मिठी मारली आणि प्रतिष्ठेची कॅप त्यांना दिली. यावेळी तिघांचेही डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाहीत...तशी प्रतिक्रिया स्वाभाविक...कारण मुळात भारतीय संघात, त्यातही कसोटी चमूत वर्णी लागणं हे खूपच अभिमानाचं. पण ही संधी चालून येण्यासाठी जितकी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली त्यामुळं मुंबईच्या त्या खेळाडूसाठी हा क्षण अधिकच खास बनला...
पण खरी परीक्षा त्यानंतर होती...मालिका 1-1 अशी बरोबरीत आलेली अन् इंग्लंडनं त्यांच्या अनोख्या खेळाच्या शैलीतून आव्हान उभं केलेलं असल्यामुळं भारताला ‘फायर पॉवर’ची गरज भासणारी...सर्फराज खाननं नेमकं केलं ते तेच...तो क्रीझवर आला तेव्हा परिस्थिती काय होती ? मार्क वूडनं यशस्वी जैस्वाल व शुभमन गिलला, तर टॉम हार्टलेने रजत पाटीदारला लवकर पॅव्हेलियनची वाट दाखविल्यानं भारताची अवस्था 8.5 षटकांत 3 बाद 33 अशी बिकट झालेली...रोहित शर्माला आधार देण्याच्या मधल्या फळीवरील दबावामुळं रवींद्र जडेजाला डाव स्थिर करण्यासाठी क्रमवारीत बढती देण्यात आली होती. या जोडीनं 204 धावांची मोठी भागीदारी करून ती जबाबदारी यशस्वीरीत्या पेललीही...
पण सर्फराजनं दाखविलेला धडाका वेगळा ठरला, त्यातही उठून दिसला...त्याची सुऊवात तितक्या सहजपणे झाली नाही. कारण इंग्लंडनं अपेक्षेप्रमाणं प्रतिस्पर्ध्यांविषयीचा गृहपाठ व्यवस्थित केला होता आणि आखूड टप्प्याच्या चेंडूंविऊद्धचा त्याचा खेळ हा चर्चेचा विषय राहिलेला. त्यामुळं वूडनं आल्या आल्या त्याच्यावर मारा केला तो तशाच प्रकारच्या चेंडूंचा. सर्फराज खाननं मग पवित्रा घेतला तो शक्य तितके उसळते चेंडू चुकविण्याचा...पण जसजशी फिरकी येऊ लागली तसतसा त्याचा खरा खेळ बाहेर येऊ लागला. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स क्षेत्ररक्षणाच्या रचना सतत बदलत राहिला, पण प्रत्येक वेळी असा बदल झाल्यानंतर खाननं त्यावर मात करण्यासाठी आरामात चेंडू उचलून फटकावण्याचा मार्ग स्वीकारला...
स्वत: शतकाच्या दिशेनं वाटचाल करणारा रवींद्र जडेजा त्यावेळी कोशात गेला होता अन् भागीदारीत आक्रमक भूमिका घेतली होती ती सर्फराजनं. या दोघांनी पाचव्या यष्टीसाठी 77 धावा जोडल्या. त्यापैकी तब्बल 62 धावा आल्या त्या त्याच्या बॅटमधून. यावरून त्याचा धडाका लक्षात यावा...सर्फराज खाननं कसोटी क्रिकेटपटू म्हणून दोन्ही डावांमध्ये फटकावून एका पराक्रमाची नोंद केली. पण याची चुणूक त्यानं खूप पूर्वी दाखवून दिली होती...
सर्फराज हे नाव सर्वप्रथम दुमदुमलं ते मुंबईची प्रमुख शालेय स्पर्धा असलेल्या ‘हॅरिस शिल्ड’मध्ये 421 चेंडूंत 439 धावा फटकावून त्यानं सचिन तेंडुलकरचा एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा 1988 पासूनचा विक्रम मोडल्यानंतर. त्यावेळी तो फक्त 12 वर्षांचा...त्यानंतर त्यानं वडिलांचं स्वप्न साकारण्याच्या मार्गावरून वेगानं वाटचाल करताना आधी मुंबईच्या अन् 2014 मध्ये भारताच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळवलं...19 वर्षांखालील विश्वचषकात सर्फराज खाननं जमविलेल्या काही धावा त्याला 2015 साली ‘इंडियन प्रीमियर लीग’साठीचा ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’चा करार पदरात पाडून गेल्या (त्यावेळी तो ‘आयपीएल’मध्ये संधी मिळालेला सर्वांत तरुण खेळाडू ठरला) मात्र 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्यानं खरी छाप उमटविली ती 2016 मध्ये दुसऱ्यांदा खेळताना. त्यावेळी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्यानं दुसरं स्थान मिळविलं. जोडीला ‘आयपीएल’मधील फटकेबाजीही त्याच्याविषयी आश्वासक चित्र निर्माण करून गेली...
या पार्श्वभूमीवर भारतीय संघात प्रवेश सर्फराजसाठी फार दूर नाही असंच वाटत होतं. पण अचानक परिस्थिती बदलली...त्याच्या तंदुऊस्तीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यातच समीक्षकांना, टीकाकारांना चुकीचं सिद्ध करण्याआधीच त्याला 2017 साली दुखापतीचा सामना करावा लागला. यामुळं त्यावर्षीच्या ‘आयपीएल’च्या संपूर्ण हंगामाला मुकण्यासह बराच काळ मैदानापासून दूर राहावं लागलं...
या घडामोडींनी सर्फराज खानला प्रकाशझोतापासून दूर नेलं. हे कमी म्हणून की काय त्यानं देशांतर्गत क्रिकेटमधील आपला संघही बदलण्याचं पाऊल उचलताना मुंबईहून उत्तर प्रदेशच्या तंबूत प्रवेश केला. त्यानंतर रणजीत चांगली फलंदाजी करणं चालू राहिलं, तरी ‘आयपीएल’मधी कामगिरी पुरेशी प्रभावशाली राहिली नाही. या पार्श्वभूमीवर लहान वयातच भारताकडून खेळण्याची अपेक्षा असलेला एक विलक्षण फलंदाज अचानक कधी अनेक खेळाडूंच्या गर्दीचा भाग बनला ते कळलंच नाही...
सर्फराज आणि त्याचे वडील नौशाद खान मात्र हार मानायला तयार नव्हते...तो त्याच्या तंदुरुस्तीवर आणि फलंदाजीवर काम करत राहिला. 2019-20 च्या मोसमात तो मुंबईला परतला आणि हाच त्याच्यासाठी ‘टर्निंग पॉइंट’ बनला...देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतकांमागून शतकं झळकावत त्यानं धावांचा रतीब ओतण्यास सुऊवात केली...प्रत्येक हंगामात तो भारतीय संघाची दारं जोरजोरात ठोठावत होता. वरिष्ठ संघ निवड समितीची बैठक झाली की, ‘सोशल मीडिया’वर ज्यांच्याविषयी चर्चा रंगायची त्यात त्याचं नाव हटकून असायचं. पण ती दारं उघडण्यास तयार नव्हती...
सर्फराज खान हताश व्हायचा, मात्र धावांची भूक कायम होती. तीच त्याला शेवटी राष्ट्रीय संघात पोहोचवून गेलेली असली, तरी हे काही सुखासुखी घडलेलं नाही...त्याला बोलावणं येण्यात एकंदर परिस्थितीनं ज्या प्रकारे वळण घेतलंय त्याचाही मोलाचा वाटा. अनेक खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळं शेवटी भारतीय व्यवस्थापनाला सर्फराजचा विचार करण्यास भाग पडलं असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही...अन् त्यानंही मिळालेल्या संधीचं सोनं करत दोन्ही डावांत दाखवून दिलीय ती तीच धावांची भूक. !
रणजीतील भन्नाट पराक्रम...
- राजकोटमधील सर्फराज खानच्या कामगिरीत प्रतिबिंब पडलं ते रणजीत त्यानं गाजविलेल्या हुकूमतीचं...त्या स्पर्धेत 45 सामने खेळलेल्या या फलंदाजाची सरासरी राहिलीय 69 अशी प्रभावी...
- 2019-20 च्या हंगामात खाननं 154.66 च्या सरासरीनं 928 धावा केल्या, तर 2021-22 मध्ये 122.75 च्या सरासरीनं जमविल्या त्या 982 धावा...2022-23 मोसमात त्यानं तीन शतकांसह 92.66 च्या सरासरीनं 556 धावांची भर घातली...
- 2020 साली सर्फराजनं वानखेडे स्टेडियमवर उत्तर प्रदेशविऊद्धच्या सामन्यात आपलं पहिलं त्रिशतक झळकावलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर येऊन एखाद्या भारतीय फलंदाजानं केलेली अशा प्रकारची ही केवळ तिसरी कामगिरी...शिवाय तो रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक नोंदविणारा सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, वसिम जाफर, रोहित शर्मा, विजय मर्चंट आणि अजित वाडेकर यांच्यानंतरचा मुंबईचा सातवा फलंदाज ठरला...
- सर्फराज खान हा सलग दोन रणजी स्पर्धांमध्ये 900 पेक्षा जास्त धावा जमविण्याचा प्रताप गाजविणारा पहिला खेळाडू...अजय शर्मा नि वसिम जाफर हे दोन वेळा रणजी हंगामात 900 धावांचा टप्पा ओलांडणारे इतर फलंदाज. मात्र त्यांची कामगिरी सलग स्पर्धांतील नव्हे...
- 2019-20 व 2021-22 हंगामातील रणजीतील कामगिरीनंतर सर्फराजची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी पोहोचली होती ती 82.83 वर...2000 पेक्षा जास्त धावा जमविलेल्या आणि किमान 50 डाव खेळलेल्या फलंदाजांचा विचार करता याबाबतीत त्याला प्राप्त होतं दुसरं स्थान. सर्वोत्तम सरासरी आहे ती महान डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या नावावर (95.14)...
अन्य प्रताप...
- मधल्या फळीत फलंदाजी करताना सर्फराजनं 19 वर्षांखालील दोन विश्वचषकांमध्ये 70.75 च्या सरासरीनं 566 धावा केल्या. त्याला नंतर मागं टाकलं ते इआन मॉर्गन (606 धावा) आणि बाबर आझम (585 धावा) यांनी...त्याशिवाय या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 7 अर्धशतकं झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर विसावलाय....
- कसोटी पदार्पणात दोन्ही डावांमध्ये अर्धशतकं फटकावणारा तो चौथा भारतीय...पहिल्या डावात 66 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकारासह 62 धावा, तर दुसऱ्या डावात 72 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 68 धावा...
- पहिल्या डावात सर्फराजनं कसोटी पदार्पणातील दुसरं सर्वांत जलद अर्धशतक झळकावलं ते अवघ्या 48 चेंडूंत. भारतीय खेळाडूंमधील सर्वांत जलद अर्धशतक आहे ते पतियाळाच्या युवराजच्या खात्यात. ती कामगिरी 1934 मध्ये इंग्लंडविऊद्ध नोंदविली होती...
खेळ जुनाच ओळख नवी : सायकलिंग- मॅडिसन
मॅडिसन...एक सांघिक ‘ट्रॅक सायकलिंग‘ प्रकार आणि काही प्रमाणात ‘पॉइंट्स रेस’सारखाच...125 वर्षांहून अधिक जुना इतिहास लाभलेल्या ‘मॅडिसन’चं नाव जिथून त्याचा उगम झाला त्या म्हणजे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’वरून पडलंय...
- या सामूहिकरीत्या प्रारंभ होणाऱ्या शर्यतीत प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश असलेले 16 संघ सहभागी होतात आणि पुरुषांच्या गटात 50 किलोमीटरांचं (200 फेऱ्या) अंतर कापलं जातं. महिलांच्या गटात हे अंतर 30 किलोमीटरांचं (120 फेऱ्या) इतकं असतं...सर्वांत जास्त अंतर कापणाऱ्या संघांमधील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या चमूला विजेता ठरविलं जातं...
- यासाठी वापरला जाणारा ‘ट्रॅक’ 250 मीटर्सचा असतो...‘इंटरमीडिएट स्प्रिंट्स’ प्रत्येकी 10 फेऱ्यांमध्ये लढल्या जातात आणि त्यात पहिले स्थान मिळविणाऱ्यास 5 गुण, दुसऱ्या स्थानासाठी 3 गुण, तिसऱ्या स्थानास 2 गुण आणि चौथ्या स्थानास 1 गुण याप्रमाणे गुण दिले जातात...शेवटच्या ‘प्रिंट’मध्ये दिले जाणारे गुण पूर्ण अंतर कापल्यानंतर दुप्पट होतात...
- सायकलस्वारानं पुढं मुसंडी मारून आघाडी मिळवली आणि इतरांना मागं टाकून, फेरी पूर्ण करून त्यानं शर्यतीतील सायकलस्वारांच्या गटाला मागून पुन्हा गाठलं, तर संघाला 20 गुण मिळतात...
- ‘मॅडिसन’ शर्यतीत संघ दोन खेळाडूंचा असला, तरी प्रत्येक संघातील फक्त एक रायडर सक्रियपणे शर्यतीत सहभागी झालेला असतो, तर दुसरा ‘ट्रॅक’च्या शीर्षस्थानी असतो. एकदा ‘रायडर’ शर्यतीतील आपली जागा बदलण्यास तयार झाला की, त्याचा सहकारी ‘ट्रॅक’च्या वरच्या भागावरून खाली येतो आणि शर्यतीचा भाग होतो...
- सामान्यत: हा रोमांचक बदल संघातील दोन्ही सहकारी एकमेकांचा हात धरून किंवा हलकेसे पुढे ढकलून करतात. कारण जागा घेणाऱ्या सायकलस्वाराला शर्यतीत सहभागी होण्यापूर्वी त्याच्या सहकाऱ्यानं स्पर्श करणं आवश्यक असतं. हा बदल ‘ट्रॅक’वर कुठंही आणि पाहिजे तितक्या वेळा होऊ शकतो...
- सायकलस्वारामध्ये सतत होणारा हा बदल शर्यतीचा वेग बराच जास्त ठेवण्यास कारणीभूत ठरतो. कारण मध्यंतरी थोड्या विश्रांतीचा कालावधी मिळतो. सामान्यत:, एका जोडीतील उत्तम ‘प्रिंटर’ हा ‘इंटरमीडिएट प्रिंट’च्या अगदी आधी उतरतो, तर दीर्घपल्ल्याचे अंतर कापण्यात कसबी असलेला ‘एंड्युरन्स’ रायडर शक्य तितक्या फेऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो...अनेक देश एक ‘एंड्युरन्स’ किंवा ‘टाईम ट्रायल स्पेशलिस्ट’ आणि त्याच्याबरोबर निष्णात ‘प्रिंटर’ अशीच जोडी उतरविण्याचा प्रयत्न करतात...
- हा प्रकार 2020 च्या टोकियोतील स्पर्धांतून ऑलिम्पिकमध्ये पुन्हा परतला. मात्र यावेळचा फरक म्हणजे त्यात पुरुषांसोबत महिलांचीही प्रथमच ‘मॅडिसन’ शर्यत झाली...
- त्यापूर्वी 2000 ते 2008 या कालावधीत केवळ तीन वेळा तो ऑलिम्पिक खेळांमध्ये झळकला, परंतु त्यावेळी ही शर्यत फक्त पुरुषांपुरती सीमित होती...2008 नंतर लंडन व रिओ इथं झालेल्या दोन ऑलिम्पिकमधून त्याला वगळण्यात आलं होतं...
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गटात डेन्मार्कच्या लासे नॉर्मन हॅन्सन व मायकेल मोर्कोव्ह या जोडीनं, तर महिला गटात ब्रिटनच्या केटी आर्किबाल्ड, लॉरा केनी यांच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं...
- ‘यूसीआय’नं (युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल) 1995 पासून ‘ट्रॅक वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये पुऊषांच्या ‘मॅडिसन’चा समावेश केलाय, तर 2016 पासून त्यात भर पडलीय ती महिलांच्या शर्यतीची...
- राजू प्रभू
बुद्धिबळाच्या पटावरचा नवोदित तारा : यश गोगटे
बुध्दिबळ.. बुध्दीला आयाम देणारा खेळ. या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅग्नस कार्लसन असो अथवा भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वनाथन आनंद आणि गेल्या काही वर्षात युवा नेतृत्व बनलेला आर प्रग्यानंद असो.... या खेळात शह आणि मात देण्याच्या चाल करत करत भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या खेळांडूनी पुनश्च बुध्दिबळ खेळाकडे युवकांचे लक्ष आकषित झालेले आहे. असाच रत्नागिरीचा बुध्दिबळ विश्वातला नवोदित आणि लखलखता तारा म्हणजे यश गोगटे. हीच दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या यश गोगटे याने आपले कौशल्य पणाला लावत यश संपादित केलेले होते. तसं पाहायला गेलं तर बुध्दिबळ स्पर्धेत एकाग्रता आणि नियोजनबध्द चाल आवश्यक असते. आपली खेळी खेळण्याआधी समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचे डोळे वाचता आले पाहिजेत. हे कौशल्य यश गोगटेला सततच्या सरावामुळे चांगलेच जमते.
काही दिवसांपूर्वी केजीएन सरस्वती फाऊंडेशनतर्फे सप्रे स्मृती अतिजलद बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहाव्या वर्षी खुल्या जलद व अतिजलद बुद्धीबळ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला तांत्रिक सहकार्य चेसमेन रत्नागिरी संस्थेने केले होते. रत्नागिरीसाठी अभिमानास्पद व अत्यंत महत्त्वाची बाब हीच की या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील फिडे मानांकित, बिगर मानांकित असे एकूण 111 खेळाडू सहभागी झालेले असूनही मोठ्या शिताफीने यशने आपले संपूर्ण लक्ष एकवटून या स्पर्धेचा विजयी ठरला. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ]िवशेष म्हणजे यापैकी 40 हून अधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय फीडे गुणांकन प्राप्त खेळाडू होते. जलद व अतिजलद स्पर्धेत मिळून आयोजकांकडून एकूण एक लाखांची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून विवेक सोहानी, चैतन्य भिडे यांच्यासोबत दीपक वायचळ, आरती मोदी आणि सूर्याजी भोसले यांनी काम पाहिले होते.
स्पर्धेत यशसमोर कडवे आव्हान होते इतकेच नाही बुध्दिबळ जगतातील अग्रमानांकित असलेले मंदार लाड, ओंकार कडव, रवींद्र निकम यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंवर मात करत यश गोगटेने या स्पर्धेचे विजेतेपद काबिज केल होते. या स्पर्धेत मंदार लाड याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याआधी देखील अनेकदा यश गोगटेने यशाची पंरपरा कायम राखतव रत्नागिरीला गौरवान्वित केलेले आहे. याआधी 2019 मध्ये झालेल्या एसव्हीजेसीटी स्पोर्टस अॅकडमी डेरवण येथे झालेल्या अंडर 19 युथ चेस टुर्नामेंट मध्ये यश संपादित केलेले होते. 21 वर्षाखालील क्लासिकल बुध्दिबळ स्पर्धेत देखील तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये देखील यशने आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. यश गोगटे सततच्या सरावामुळे समोरचा प्रतिस्पर्धी कोणती चाल खेळून मात देऊ शकतो हे काही क्षणातच तो ओळखतो. त्यातच विविध स्पर्धा खेळून पाहून यश गोगटे निश्चितच येत्या काही दिवसात रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीdया स्तरावर पोहचवून रत्नागिरीला आणि कोकणाला नवीन ओळख देऊ शकतो यात शंकाच नाही...
शब्दांकन : स्वऊप काणे