For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

‘केकेआर’चा ‘मास्टरमाईंड’...गौतम गंभीर !

Advertisement

गेल्या दोन हंगामात (2022 नि 2023) ‘केकेआर’च्या वाट्याला आलं होतं ते गुणतालिकेतील सातवं स्थान. पण यंदा संघ पुरता बदलून त्यांनी ‘कोरबो, लोरबो, जितबो रे‘ म्हणत ‘आयपीएल’च्या चषकावर डल्ला मारला...ही किमया घडविण्यामागं मोलाची भूमिका राहिलीय ती ‘मेंटॉर’ म्हणून ‘कोलकाता नाईट रायडस’&च्या तंबूत परतलेल्या गौतम गंभीरची...22 नोव्हेंबर, 2023...‘कोलकाता नाइट रायडर्स’चे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी घोषणा केली ती मार्गदर्शकाच्या रुपात ‘तो’ परत येत असल्याची...चाहत्यांनी संघासाठी एक शुभचिन्ह म्हणून त्याकडे पाहिलं. त्यांची अपेक्षा जराही फोल ठरली नाही... 26 मे, 2024...‘केकेआर’नं अंतिम लढतीत 8 गडी राखून ‘सनरायझर्स हैदराबाद’चा धुव्वा उडवत दहा वर्षांनी ‘आयपीएल’च्या चषकावर पुन्हा नाव कोरलं अन् ‘तो’ बनला कर्णधार नि मार्गदर्शक या दोन्ही भूमिकांत स्पर्धा जिंकणारा ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या इतिहासातील पहिला खेळाडू...गौतम गंभीर !

सहसा एखादा संघ जिंकल्यानंतर जयजयकार होतो तो त्याच्या कर्णधाराचा...पण यंदा ‘कोलकाता नाइट रायडर्स’नं ‘इंडियन प्रीमियर लीग’ तिसऱ्यांदा जिंकल्यानंतर बोलबाला चाललाय तो कर्णधार श्रेयस अय्यरपेक्षा त्याचा ‘मेंटॉर’ म्हणजेच मार्गदर्शक गौतम गंभीरचा, त्याच्या डावपेचांचा अन् त्यात वावगं असं काही म्हणता येणार नाही...गंभीरचं पद जरी मार्गदर्शकाचं असलं, तरी प्रत्यक्षात तोच जहाजाचा ‘कॅप्टन’ होता. मैदानाबाहेर साऱ्या गोष्टींची सूत्रं त्याच्याकडूनच हलविली जात होती, मग ते लिलावाच्या वेळचं नियोजन असो वा प्रतिस्पर्ध्यांचा सफाया करण्याच्या दृष्टीनं रणनीती आखणं असो...

Advertisement

2011 मध्ये गौतम गंभीरनं ‘केकेआर’च्या कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली होती ती बंगालचा सर्वांत लाडका क्रिकेपटू सौरव गांगुलीकडून. त्यात गंभीर दिल्लीचा खेळाडू. त्यानं जरी त्या दिवसापासून आपलं वैयक्तिक बोधवाक्यही ‘कोरबो, लोरबो, जीतबो’ असं राहणार असल्याचं चाहत्यांना सांगितलेलं असलं, तरी अनेकांनी तीव्र प्रतिक्रियांना, रसिकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याचा धोका व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात गौतम ओसंडून प्रेम करण्याची सवय असलेल्या बंगाली लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला...2011 ते 2017 पर्यंत गौतम गंभीर ‘केकेआर’सोबत राहिला. या कालावधीत त्यांनी 2012 मध्ये ‘आयपीएल’चं पहिलं विजेतेपद पटकावलं आणि त्याची पुनरावृत्ती घडविली ती 2014 मध्ये. यादरम्यान तब्बल पाच वेळा ते बाद फेरीसाठी पात्र ठरले आणि गुंडाळण्यात आलेल्या चॅम्पियन्स लीग टी-20 ची एकदा अंतिम फेरीही गाठली (2014)...

या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरचं परत संघात जंगी स्वागत होईल यात शंकाच नव्हती. ‘केकेआर’च्या चाहत्यांचा ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वांत निष्ठावान रसिकांमध्ये समावेश होतो आणि गंभीर हा नेहमीच त्यांच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक राहील. यंदाच्या विजेतेपदानं हा बंध अनेक पटींनी मजबूत झालाय...2007 चा ‘टी-20 विश्वचषक’ आणि 2011 चा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या गौतम गंभीरनं मार्गदर्शक म्हणून आपल्या कौशल्याची चुणूक ‘लखनौ सुपर जायंट्स’ची जबाबदारी पेलताना दाखविली होती. 2022 मध्ये ‘आयपीएल’च्या क्षितिजावर उगवलेल्या लखनौनं पहिल्या दोन हंगामात बाद फेरीसाठी पात्र ठरून दाखविताना साखळी फेरीच्या शेवटी तिसरं स्थान मिळविलं...असं असलं, तरी काही वृत्तांनुसार, जेव्हा ‘केकेआर’चा सहमालक शाहऊख खाननं गंभीरशी बोलून ‘मेंटॉर’ म्हणून खेचण्याचा प्रयत्न केला तेव्हा परत येण्यात दडलेली मोठी संधी त्याच्यावर भुरळ पाडून गेल्याशिवाय राहिली नाही...

पण मागील एक दशकभर ‘आयपीएल’च्या चषकावर मोहर उमटविता न आलेल्या संघाचं पटकन सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या चमूत रुपांतर घडविणं हे काही सोपं काम नव्हतं. त्यात गौतम गंभीर काही मुख्य प्रशिक्षक म्हणून आला नव्हता. ती जबाबदारी पेलताहेत माजी भारतीय क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित. ते गंभीरपेक्षा बरेच वरिष्ठ खेळाडू आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे प्रशिक्षक. त्यांच्याशी सूर जुळविणं हेही एक वेगळं आव्हान होतं...पण गंभीरनं सारी आव्हानं लीलया पेलली (याकामी त्याला चंद्रकांत पंडित यांच्यासह मोलाची साथ मिळाली ती साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर नि भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांचीही)...

गौतम गंभीरसमवेत दिल्लीच्या व ‘केकेआर’च्या संघातून खेळलेला रजत भाटिया काय म्हणतो ते लक्षात घेण्यासारखं...‘त्याच्याकडे कोणतीही खास पद्धत नाही. तो साऱ्या गोष्टी साध्या-सोप्या ठेवतो. गौतमनं दिल्लीला रणजी ट्रॉफी जिंकून दिली, त्यानंतर ‘केकेआर’ला दोन वेळा आयपीएल चषक मिळवून दिला. स्पर्धा जिंकण्यासाठी संघात कोणत्या प्रकारचं वातावरण हवं हे त्याला पक्कं समजतं. त्यानं पुन्हा एकदा केलंय ते तेच. आम्ही नेहमी म्हणतो की, महेंद्रसिंह धोनी हा आतापर्यंतचा महान भारतीय कर्णधार आहे. कारण त्यानं तीन आयसीसी स्पर्धा आणि पाच ‘आयपीएल’ किताब जिंकून दिलेत. संघाला कसं हाताळायचं आणि स्पर्धा कशी जिंकायची हे त्याला चांगलंच माहीतंय. गंभीरकडे देखील कमी-अधिक प्रमाणात आहे तो त्याच प्रकारचा फॉर्म्युला’...

रविचंद्रन अश्विनच्या ‘यूट्यूब शो’वर बोलताना खुद्द गौतम गंभीरनंच सांगितलं होतं की, तो दीर्घ बैठकांवर आणि डेटा तसंच आकडेवारीवर विश्वास ठेवत नाही...गंभीर कर्णधार असताना ‘केकेआर’च्या संघातील प्रमुख सदस्यांपैकी एक राहिलेला पियूष चावला देखील त्यास दुजोरा देताना म्हणतो, ‘गौतम निकालांवर विश्वास ठेवतो, तो डेटामध्ये डोकं खुपसून राहणारा अजिबात नाही. तो त्याच्या अंतर्मनाच्या कौलानुसार जातो’...‘कोलकाता नाईट रायडर्स’ला ‘आयपीएल’ जिंकता आल्यास भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत गौतम गंभीर ‘फ्रंटरनर’ ठरेल हे उघड होतं. तसंच ते घडलेलं असून त्याची निवड जवळजवळ पक्की असल्यागत हवा निर्माण झालीय. आता खरीच त्याची वर्णी लागते की, अन्य कुठलं नाव पुढं येतं ते बघायचंय !

चार ‘मास्ट्रर स्ट्रोक’...

  • गौतम गंभीरची पहिली मोठी चाल म्हणजे ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला 24.75 कोटी ऊपयांच्या विक्रमी बोलीला करारबद्ध करणं. या निर्णयामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण तो 2015 पासून ‘आयपीएल’मध्ये खेळला नव्हता. त्यातच साखळी फेरीतील 12 सामन्यांत त्याला 12 बळीच घेता आल्यानंतर टीकेची धार सुरू झाली होती. पण दुखापतीमुळं एक सामना वगळता त्याला कधीही बसवलं गेलं नाही. गंभीर आपल्या खेळाडूंच्या पाठीमागं कसा भक्कमपणे उभा राहतो त्याचा हा दाखला...
  • 2022 नि 2023 च्या हंगामांत अवघ्या 71 नि 21 धावा काढता आलेल्या सुनील नरेनचं यंदा विध्वंसक सलामीवीराचं (संघातर्फे सर्वाधिक 488 धावा) रूप पुन्हा दिसलं. 2017 मध्ये आपल्या ‘केकेआर’सोबतच्या शेवटच्या मोसमात नरेनला सलामीला पाठविण्याचा प्रयोग केला होता तो गंभीरनंच...त्यानंतर सात वर्षांनी पुन्हा त्या भूमिकेत परतू शकला तो गौतम गंभीरमुळं. यामुळं ‘केकेआर’ला अतिरिक्त फलंदाज खेळविण्याचं स्वातंत्र्य मिळालं...
  • सुनील नरेनला तितकाच धडाकेबाज साथीदार मिळाला तो लिलावात कुणीच करारबद्ध न केलेल्या फिल सॉल्टच्या रूपानं. जेसन रॉयच्या जागी तो सामील झाला. कोलकाताची पहिला पसंती खरं तर अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमानउल्ला गुरबाजला होती. त्यानं गेल्या मोसमात चांगली कामगिरी देखील केली होती. परंतु गौतमनं त्याच्यापेक्षा सॉल्टला प्राधान्य दिलं आणि सॉल्ट-नरेन ही हैदराबादच्या ट्रेव्हिस हेड-अभिषेक शर्माप्रमाणं सर्वांत स्फोटक जोडी ठरली...
  • गंभीर आणि ‘केकेआर’नं या मोसमात आणखी एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे अष्टपैलू रमणदीप सिंग, गोलंदाज वैभव अरोरा नि हर्षित राणा यासारख्या युवा भारतीय खेळाडूंना दिलेला वाव...अर्थात गौतमची ही शैली काही नवीन नव्हे. 2012 मध्ये त्यानं चक्क ब्रँडन मॅकलमला वगळून मनविंदर बिस्लाला संधी दिली होती अन् बिस्लानंही तो विश्वास सार्थ ठरविताना अंतिम सामन्यात 48 चेंडूंत 89 धावा फटकावला होत्या. त्यामुळं चेन्नई सुपर किंग्सला हरविण्यास मोलाची मदत झाली होती...

गौतम गंभीरची यशस्वी कारकीर्द...

  • प्रकार     सामने     डाव        नाबाद    धावा       सर्वोच्च   सरासरी  शतकं     द्विशतक अर्धशतकं
  • कसोटी   58           104        5             4154      206        41.96     9             1             22
  • वनडे      147        143        11           5238      150        39.68     11           -             34
  • टी-20     37           36           2             932        75           27.41     -             -             7
  • आयपीएल             154        152        16           4218      93           31.01     -             -  36

- राजू प्रभू

खेळ जुनाच ओळख नवी ! फ्लॅग फुटबॉल

फ्लॅग फुटबॉल...म्हणजे अमेरिकन फुटबॉलचा (किंवा ग्रिडिरॉनचा) एक प्रकार. यात प्रतिपक्षाच्या ‘एंडझोन’मध्ये आक्रमणाच्या मालिकेद्वारे मुसंडी मारणं हे उद्दिष्ट असतं...दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकन सैनिकांसाठी मनोरंजनाचं साधन म्हणून ‘फ्लॅग फुटबॉल’ची सुऊवात झाली. त्यांनी नंतर हा खेळ त्यांच्यासोबत स्वगृही आणला. मेरीलँडमधील फोर्ट मीडनं फ्लॅग फुटबॉलच्या पहिल्या सामन्याचे आयोजन केल्याचं सांगितलं जातं. युद्धानंतर ‘फ्लॅग फुटबॉल’ हे नाव स्वीकारण्यापूर्वी त्याला ‘टच अँड टेल फुटबॉल’ असं म्हटलं जायचं. ‘नॅशनल टच फुटबॉल लीग’ची स्थापना 1960 मध्ये सेंट लुई, मिसुरी येथे झाली...

  • ‘फ्लॅग फुटबॉल’मध्ये चेंडू घेऊन धावता येतं किंवा एकमेकांकडे तो फेकून पास करता येतो...
  • या खेळात खेळाडूंनी एकमेकांच्या संपर्कात यायचं नसतं म्हणजे पुढे चाल करून येणाऱ्या खेळाडूला रोखण्यासाठी त्याला भिडता येत नाही. त्यात प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचा प्रकार म्हणजे चेंडू घेऊन जाणाऱ्या खेळाडूच्या कंबरेला लावलेल्या तीन ध्वजांपैकी एक काढून टाकणं. हे ध्वज प्रत्येक बाजूला एकेक आणि एक मागे याप्रमाणं लावलेले असतात...
  • 12 खेळाडूंमधून निवडलेल्या प्रत्येकी पाच खेळाडूंचा संघ मैदानात खेळतो. खेळाडू आक्रमणात किंवा बचावात पारंगत असतात आणि एका सामन्यामध्ये 20 मिनिटांची दोन सत्रे असतात...
  • फ्लॅग फुटबॉलचे मैदान 70×30 यार्ड्स म्हणजे 64 मीटर्स लांब व 27.4 मीटर्स रुंद असते. त्यात 10 यार्ड्सचे दोन ‘एंडझोन’ असतात...
  • खेळ संघाच्या स्वत:च्या पाच यार्ड्सच्या रेषेपासून सुरू होऊन त्यात ‘सेंटर’ खेळाडू चेंडू ‘क्वॉर्टरबॅक’कडे देतो, जो एक तर चेंडू पुढे देतो किंवा धावणाऱ्या ‘बॅक’कडे सोपवितो. खेळाडूचा ध्वज काढल्यावर खेळ तक्षणी थांबतो...
  • आक्रमण करणाऱ्या संघाला त्यांच्या स्वत:च्या पाच यार्ड्सच्या रेषेपासून अर्ध्या भागापर्यंत जाण्यासाठी चार प्रयत्न करता येतात. त्यांना ‘डाउन्स’ म्हणून ओळखले जाते. त्यात यशस्वी झाल्यास ‘एंडझोन’मध्ये पोहोचण्यासाठी आणि तिथं चेंडू फेकून ‘टचडाउन’ नोंदविण्यासाठी त्यांना आणखी चार ‘डाउन’ मिळतात. दोन्ही बाबतीत अयशस्वी झाल्यास चेंडू प्रतिपक्षाकडे जातो, जे त्यांच्या स्वत:च्या पाच यार्ड्सच्या रेषेपासून सुरुवात करतात...
  • ‘टचडाउन’ची नोंद केल्यानंतर सहा गुण मिळतात. ‘टचडाउन’नंतर संघ पाच यार्ड्सच्या लाइनपासून धावून वा चेंडू पास करून एक जादा गुण अथवा 10 यार्ड्सच्या लाइनपासून धावून किंवा चेंडू पास करून दोन अतिरिक्त गुण कमाविण्याचा प्रयत्न करतो...
  • 40 मिनिटांनंतर बरोबरी कायम राहिल्यास सडन-डेथ ओव्हरटाईममध्ये सामना जाऊन त्यात पहिल्यांदा ‘टचडाउन’ नोंदविणाऱ्या संघाचा विजय होतो...
  • फ्लॅग फुटबॉल 2028 च्या लॉस एंजलिस खेळांतून ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार असून अमेरिका हे या प्रकारातील अग्रगण्य राष्ट्र आहे...

एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम!

या वर्षी पुन्हा एकदा एव्हरेस्टने ट्रॅफिक जाम अनुभवले. न भूतो न भविष्यति अशी गर्दी 20 मे रोजी एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर झाली होती. त्या दिवशी शिखरमाथा गाठण्यासाठी सर्वात चांगले हवामान असेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. त्यामुळे जगभरातून सुमारे एव्हरेस्ट शिखर चढाईचे स्वप्न पाहणारे 160 गिर्यारोहक आणि त्यांना मदतीसाठी असणारे 200 हून अधिक शेर्पा असे एकूण 350 हून अधिक जण एकाच दिवशी एव्हरेस्टच्या माथ्याकडे निघाले. हे सर्वजण आपल्या जीवाची पर्वा न करता कॅम्प 4 च्या पुढे तासनतास रांगेत उभे होते. हे दृश्य अत्यंत भयावह होते. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओसुध्दा सोशल मीडियावर ‘व्हायरल‘ झाले आहेत. यावर्षी भारतामध्ये अनेक ठिकाणी चारधाम यात्रा, नैनीताल, मनाली, उटी या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याच्या बातम्या सतत येतच होत्या. यातच एव्हरेस्टच्या ट्रॅफिक जामच्या बातमीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नेपाळ आणि चीन या दोन देशांच्या सीमेवर असलेलं 8848.86 मीटर उंचीचे हे जगातील सर्वोच्च शिखर कायमच जगभरातील गिर्यारोहकांना भुरळ घालत असते.

एव्हरेस्ट शिखर चढाईमध्ये अनेक टप्पे आहेत. नेपाळ बाजूने असलेला चढाईचा मार्ग हा जास्त सोयीचा असल्याने या मार्गाने चढाई करण्यासाठी मोठ्या संख्येने गिर्यारोहक येतात. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरातून हे सर्व गिर्यारोहक सर्व साहित्य घेऊन 17,500 फूट उंचीवर वसलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहचतात व त्यानंतर टप्प्या टप्प्याने चढाई करत 26,000 फुटांवर असलेल्या कॅम्प 4 ला मुक्काम करतात. ज्या ठिकाणी हा कॅम्प लावला जातो तिथली भौगोलिक परिस्थिती खूपच वेगळी आहे. साऊथ कोलमध्ये उणे 40 अंशांपर्यंत तापमान खालावते. इथल्या हवेमध्ये प्राणवायूचे प्रमाणही 3 ते 4 टक्के इतकेच असल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर लावूनच बऱ्याचदा बसावे लागते. याठिकाणी वाऱ्याचा वेग वर्षभर ताशी दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रतीतास इतका असतो. एव्हरेस्टचा शिखरमाथा गाठण्यासाठी गिर्यारोहकांना हा वाऱ्याचा वेग ताशी तीस किलोमीटर पेक्षा कमी होण्याची वाट पाहावी लागते अन्यथा ही चढाई अत्यंत जीवघेणी ठरते. वर्षातील फक्त पंधरा ते वीसच दिवस असे असतात ज्यावेळेस हे वारे ताशी तीस किलोमीटर पेक्षा कमी वेगाने वाहतात. हे वीस दिवस शक्यतो 10 ते 30 मे दरम्यान असतात यालाच वेदर विंडो असे म्हणतात, या चांगल्या वेदर विंडोची प्रतीक्षा गिर्यारोहक करत असतात. हे चांगले हवामान असणारे दिवस जर कमी झाले तर साहजिकच ज्या दिवशी वाऱ्याचा वेग सर्वात कमी असेल त्या दिवशी सर्व गिर्यारोहक अंतिम चढाईसाठी प्रयत्न करतात आणि त्यामुळेच हे ट्रॅफिक जमचे दृश्य पाहायला मिळते.

22 मे रोजी एव्हरेस्टला सर्वात कमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आणि एव्हरेस्टच्या पायथ्याशी थांबलेल्या सर्वच गिर्यारोहकांमध्ये याच दिवशी शिखरमाथा गाठण्याची चुरस निर्माण झाली आणि यामुळेच एव्हरेस्टने ट्रॅफिक जाम अनुभवले. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या या ट्रॅफिक जामचे फोटो व्हिडिओ पाहिल्यानंतरच याचे गांभीर्य लक्षात येते. ही अंतिम चढाई करण्यासाठी प्रत्येक गिर्यारोहकाला कृत्रिम प्राणवायूचा आधार घेत असतो. प्रत्येक गिर्यारोहकाला किंवा शेर्पाना कॅम्प 4 पासून शिखर चढाई करून पुन्हा कॅम्प 4 ला येण्यासाठी अंदाजे 4 ते 5 ऑक्सिजन सिलेंडर लागतात. हे सिलेंडर गिर्यारोहक आणि त्यांच्या सोबतचे शेर्पा हे त्यांच्या पाठीवर वाहत असतात. जर एखादा गिर्यारोहक अंतिम चढाई दरम्यान अशा ट्रॅफिक जाममध्ये अडकला आणि त्याचे सर्व ऑक्सिजन सिलेंडर संपले तर ती परिस्थिती त्या गिर्यारोहकाला मृत्यूपर्यंत घेऊन जाते, तसेच जास्त वेळ अती थंड वातावरणात हाताची किंवा पायाची बोटे थंड पडल्यास फ्रोस्टबाईट होण्याचेही प्रमाण खूप वाढले आहे. या अशा घटना गेली अनेक वर्षे सातत्याने घडत आहेत.

एक गिर्यारोहक म्हणून पाहताना हे सर्व दृश्य माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. मी सुद्धा 2012 साली गिरिप्रेमी संस्थेच्या मध्यामतून भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम जगातील या सर्वोच्च शिखरावर यशस्वी केली होते. ज्यामध्ये गिरिप्रेमी संस्थेतील 11 गिर्यारोहकांनी एव्हरेस्टचा शिखरमाथा गाठण्यात यश मिळवले होते. आम्ही ज्या वेळेस चढाई करत होतो त्यावेळेही आम्ही या अंतिम टप्प्यामध्ये गर्दीचा अनुभव घेतला होता. परंतु आत्ता जे काही चित्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळत आहे ते खरंच खूप भयावह आहे. एव्हरेस्ट शिखरावर चढाई केल्यानंतर मिळणारी प्रसिध्दी, मिळणारा मानसन्मान, आर्थिक लाभ अशी अनेक कारणे या गर्दीला कारणीभूत आहेत. याचबरोबर नेपाळ सरकारच धोरण सुद्धा तितकाच जबाबदार आहे. नेपाळ सरकार कडून एका गिर्यारोहकाला सुमारे 11,000 अमेरिकन डॉलर्स इतकी परमिट फी म्हणजेच चढाईसाठीची परवानगी म्हणून भरावे लागतात. ही रक्कम खूप मोठी असल्यामुळे यातून मिळणारे उत्पन्न सरकारला मोहामध्ये पाडत आहे आणि या शिखरावर चढाईसाठी एकाच हंगामात किती लोक सुरक्षितपणे जाऊ शकतील? किती लोकांना एकाच हंगामात परवानगी दिली पाहिजे? या शिखराची कॅरिंग कपॅसिटी किती आहे? याचा कोणताही विचार न करता नेपाळ सरकार शेवट पर्यंत जो येईल त्याला फी भरायला सांगून परवानगी देतो आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न सरकारला मिळत आहे.

यावर्षी 414 लोकांना एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी परवानगी देण्यात आली. म्हणजेच 46 लक्ष डॉलर्सहून अधिक रक्कम नेपाळ सरकारच्या तिजोरीत जमा झाली. पण याविरुद्ध अनेकांनी याविरुद्ध आवजही उठवला. नेपाळ मधीलच एका याचिका कर्त्यानी या सर्वाविरुद्ध सुप्रिम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती आणि याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये नेपाळ सरकारने पुढील हंगामात ठराविक संख्येनेच गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी परवानगी द्यावी असा आदेश पारित करण्यात आला आहे. यासाठी तज्ञ लोकांची समिती स्थापन करून नेमकी किती लोकांना चढाईची परवानगी द्यावी हा आकडा निश्चित करून सुप्रिम कोर्टाला कळविणे बंधनकारक केले आहे. या सर्व बाबींमुळे फक्त मनुष्याला धोका नसून एव्हरेस्टशी निगडित त्याच्या आजूबाजूच्या पर्यावरणालाही तितकाच मोठा धोका आहे. एव्हरेस्टवर चढाई करणारे 400 हून अधिक लोक, त्यांच्यासोबतचे शेर्पा, जेवण बनवणारे, इतर व्यवस्था पाहणारे असे 1500 हून अधिक लोक एव्हरेस्टच्या पायथ्याला सुमारे एक ते दोन महिने तळ ठोकून असतात. बेस कॅम्पपासून ते शिखरमाथ्यापर्यंत या सर्वांचा वावर असतो आणि यातून निर्माण होणारा घनकचरा प्रचंड असतो. या सर्व परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली आहे, त्याची अंमलबजावनी जर झाली तर त्यामुळे निश्चितच पुढील वर्षी याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. मी एक गिर्यारोहक म्हणून कधीच म्हणणार नाही की एव्हरेस्ट चढाई करू नका. नक्कीच कुठल्याही गिर्यारोहकाच स्वप्न असतं की जगातील या सर्वोच्च शिखरावर आपणही पोहचावे, पण यासाठी जर आपण काही शिस्तबद्ध प्रयत्न केले व काही नियम काटेकोरपणे पाळले तर निश्चितच ही चढाई सुरक्षित आणि मनाला आनंद देणारी ठरेल. कोणत्याही ठिकाणी बेसुमार गर्दी वाढू लागली की त्याचा ताण तिथल्या परिस्थितीवर येतो आणि दुर्दैवी घटना घडतात. हे आपण अनेक वेळा वेगवेगळया मिरवणुकां पासून ते पर्यटन स्थळांपर्यंत होणाऱ्या गर्दीतून अनुभवले आहेत. पण हीच गोष्ट एव्हरेस्ट चढाई बाबत सुद्धा होऊ शकेल असे मात्र कधीच वाटत नव्हतं, पण आज ते घडत आहे. आता नक्कीच सावध होण्याची वेळ आली आहे अन्यथा या गर्दीचे बळी होणे हे गिर्यारोहकांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि यातनादायी आहे.

उमेश झिरपे,जेष्ठ गिर्यारोहक, गिरिप्रेमी

गोव्याचा प्रतिभावंत फुटबॉलपटू : जोशुआ डिसिल्वा

गोवा प्रो लिग व संतोष चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी : प्रो लिग स्पर्धेत आठ वेळा सामनावीर

खेळाप्रती घरातच पोषक वातावरण व बाळकडू मिळाल्याने आपसूकच फुटबॉल खेळाकडे आकर्षित झालेल्या प्रतिभावंत जोशुआ डिसिल्वाने नुकत्याच झालेल्या 2023-24 च्या गोवा प्रो लिग मोसमात व 77 व्या राष्ट्रीय संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावून आपली अमीट छाप पाडली आहे.

गोवा प्रो लिग स्पर्धेत आठ सामनावीर पुरस्कार

गोवा प्रो लिग स्पर्धेत जोशुआ सेझा फुटबॉल अकादमी संघासाठी खेळत आहे. या संघाने यंदा उपविजेतेपद पटकावले. जोशुआने स्पर्धेत तब्बल 24 गोल नोंदवून संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा तो खेळाडू ठरला आहे. यापूर्वी साळगावकर संघाच्या जोएल संडे व देवेंद्र मुरगावकर यांनी एका मोसमात प्रत्येकी 20 गोल केले होते. जोशुआने धेंपो क्लब विरुद्ध 4, पॅक्स ऑफ नागोवा 3, स्पोर्टिंग क्लब दी गोवा 3, चर्चिल ब्रदर्स 2, पणजी फुटबॉलर्स 3, वास्को स्पोर्ट्स क्लब 2, कळंगुट असोसिएशन 2, जीनो एफसी 2, गार्डीयन एंजल 1 व यंग बॉईज ऑफ टोंक यांच्याविरुद्ध 2 गोल नोंदविले. या चमकदार कामगिरीमुळे त्याला एकूण 8 सामनावीर पुरस्कार प्राप्त झाले.

संतोष चषक स्पर्धेतील चमक

अरुणाचलप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या 77 व्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करुन जोशुआने उच्च कामगिरी केली. अरुणाचलप्रदेश, सेनादल व आसाम विरुद्ध त्याने प्रत्येकी 1 गोल केला. मणिपूर विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 2 गोलांसाठी अॅसिस्ट करुन गोव्याला अंतिम फेरीत नेण्यात योगदान दिले. गोव्याला या स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त झाले. त्याची गुणवत्ता, कौशल्य व सामन्यात महत्वपूर्ण योगदानामुळे तो गोवा संघाचा भरवशाचा खेळाडू ठरला आहे.

सर्व कुटुंबीय क्रीडा क्षेत्रात 

22 वर्षीय जोशुआ वाणिज्य पदवीधर आहे. त्याचे शालेय शिक्षण फोंडा येथील सेंट मेरी हायस्कूलमध्ये यानंतर जीव्हीएम उच्च माध्यमिक व पदवी शिक्षण रोझरी महाविद्यालय नावेली येथे झाले. क्रीडाक्षेत्रात वावरणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे आजोबा फुटबॉल खेळाडू होते. वडील केनडी हे गोवा विद्यापीठाचे माजी क्रिडा संचालक तसेच डॉन बॉस्को बीपीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होत. आई बॅटी या राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू असून फोंडा येथील जीव्हीएम गोविंद पै रायतूरकर वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालिका आहेत. थोरला भाऊ सॅन्सीव हा क्रीडा क्षेत्रात कारकीर्द करीत आहे. जोशुआला आपला दुसरा भाऊ एरोनकडूनही फुटबॉलचे धडे लाभले आहे. एरोन आयएसएल स्पर्धेत हैदराबाद एफसी संघाकडून खेळत आहे. आजपर्यंतची उत्कृष्ट कामगिरी हा देवाचा कृपाशिर्वाद असल्याचे तो मानतो. त्याचबरोबर सर्व प्रशिक्षक, सेझा फुटबॉल अकादमीचे व्यवस्थापन, गोवा फुटबॉल संघटना, इतर क्लब, रोझरी महाविद्यालयाचे त्याने आभार मानले आहेत.

संघाचा ‘फॉर्मिडेबल फोर्स’

जोशुआकडे गुणवत्ता, चपळता व अचूकता असल्यामुळे तो प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदून सुरक्षित पोझिशन साधून गोल करण्यासाठी योग्य क्षमता राखून आहे. या गुणवत्तेमुळेच तो संघाचा ‘फॉर्मिडेबल फोर्स’ बनला आहे. पुढील मोसमात आयलीग व आयएसएल स्पर्धेत खेळण्यास तो उत्सुक आहे. त्याचबरोबर भारतीय संघात खेळण्याचे त्याचे ध्येय आहे.

नरेश गावणेकर,फोंडा

Advertisement
Tags :

.