For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

‘डेथ ओव्हर स्पेशलिस्ट’...अर्शदीप सिंग !

Advertisement

सध्या चालू असलेल्या ‘टी-20’ विश्वचषकात भारताचा घोडा सुसाट सुटण्यास डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची कामगिरी देखील कारणीभूत राहिलीय....आतापर्यंत सर्वांत जास्त बळी मिळविण्याबरोबर त्यानं आपली ‘डेथ ओव्हर स्पेशलिस्ट’ ही ओळख आणखी गडद केलीय...गोष्ट 2017 ची...अर्शदीप सिंगला वडिलांसोबतचं ते कठीण संभाषण आजही आठवतंय...विविध वयोगटांतील क्रिकेटमध्ये संधी मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचा प्रसंग त्याच्यावर ओढवला होता. खेळात उज्ज्वल भविष्य आहे की नाही याची ‘गॅरंटी’ नसल्यानं अर्शदीपनं आपल्या भावाच्या पावलावर पाऊल टाकून पंजाबमधल्या प्रत्येक कुटुंबाला जसं वाटतं तसं कॅनडा गाठावं अशी वडिलांची इच्छा होती. त्याचा थोरला भाऊ प्रथम शैक्षणिक कारणास्तव त्या देशात दाखल झाला आणि नंतर ब्रॅम्प्टन इथं स्थायिक होणं त्यानं पसंत केलं...

अर्शदीपनं हिंमत दाखवून वडिलांना विनंती केली ती आणखी एक वर्ष क्रिकेटमध्ये प्रयत्न करण्याची...आणि त्याच्या सुदैवानं नेमकं ते वर्ष संस्मरणीय ठरलं. जिल्हास्तरीय क्रिकेटमधील काही दमदार कामगिरीच्या जोरावर पंजाबच्या 19 वर्षांखालील संघात प्रवेश मिळवून त्यानं सुऊवात केली...त्यातून सदर वयोगटातील भारतीय संघाची दारं उघडी होऊन 2018 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या राष्ट्रीय संघाचा तो सदस्य राहिला. त्यात खेळलेल्या दोन सामन्यांत अर्शदीपनं नवीन चेंडू हाताळताना सातत्यानं दाखविलेला ताशी 145 किलोमीटर्सच्या आसपासचा वेग आणि नियंत्रण सर्वांना प्रभावित करून गेल्याशिवाय राहिलं नाही....

Advertisement

त्यानंतर काही महिन्यांनी अर्शदीप सिंगचा पंजाबच्या 23 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आणि सी. के. नायडू चषक स्पर्धेमध्ये राजस्थानविऊद्ध हॅटट्रिकसह त्यानं घेतलेले 8 बळी निवड समितीला 2018-19 च्या मोसमातील विजय हजारे चषक स्पर्धेसाठीच्या राज्य संघात त्याची वर्णी लावण्यास भाग पाडून गेले...सहा वर्षांनंतर आता पंजाबचा तोच डावखुरा वेगवान गोलंदाज ‘टी-20 विश्वचषका’त जसप्रीत बुमराहसमवेत भारतीय वरिष्ठ संघाचा प्रमुख हत्यार बनलाय...

भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की, डावखुरे वेगवान गोलंदाजच वेगवान माऱ्याची जबाबदारी सांभाळत होते...प्रथम आशिष नेहरा आणि झहीर खान, त्यानंतर इरफान पठाण आणि नंतर आर. पी. सिंग. त्यांच्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ‘मॅचविनर’ राहिला. झहीर तर कारकिर्दीच्या उत्तरार्धात इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये वॉर्सेस्टरशायरकडून खेळल्यानंतर गोलंदाज म्हणून जबरदस्त विकसित झाला होऊन ‘रिव्हर्स स्विंग’मध्ये पटाईत झाला...हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली ती ते झहीरनं 2014 च्या सुऊवातीला निवृत्ती घेतल्यानंतर...मध्यंतरी जयदेव उनाडकट, खलील अहमद आणि टी. नटराजन अशी नावं पुढं आली होती. परंतु ती छाप उमटवू शकली नाहीत. त्यापैकी नटराजननं आशा दाखविली होती, मात्र त्याला दुखापतींनी ग्रासलं...

संघातील उच्च दर्जाच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचं मूल्य कधीही कमी होऊ शकत नाही. तो केवळ एक पूर्णपणे भिन्न ‘अँगल’ प्रदान करत नाही, तर मर्यादित षटकांच्या खेळात, विशेषत: भेदक स्विंग पदरी असल्यास लवकर बळी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलू शकतो...या पार्श्वभूमीवर अर्शदीप सिंगचा उदय हा दिलासादायक...काही वर्षांपूर्वी या उंच, किरकोळ शरीरयष्टीच्या तरुणाकडे धडपडण्याची वृत्ती असली, तरी उच्च स्तरावर मोहर उमटविण्यासाठी आवश्यक त्या बाबी नाहीत असं वाटत होतं. पण पुढं त्यानं ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये धुमाकूळ घालायला सुऊवात केली अन् चित्र बदलत गेलं...

अर्शदीप सिंगनं विजय हजारे चषक स्पर्धेत हिमाचल प्रदेशविऊद्ध 2 बळी घेऊन चांगलं पदार्पण केल्यानंतर पुढं त्याला ‘पंजाब किंग्ज’च्या चाचण्यांसाठी बोलावण्यात आलं. हा त्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा ‘टर्निंग पॉईंट’...तिथं त्यानं ‘डेथ बॉलर’ म्हण्जे शेवटच्या षटकांत प्रभावी मारा करणारा उपयुक्त गोलंदाज म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला. ही बाब ‘पंजाब किंग’ला 2019 च्या ‘आयपीएल’ हंगामापूर्वी त्याला करारबद्ध करण्यास प्रवृत्त करून गेली...

अर्शदीप सिंगच्या शेवटच्या षटकांत मारा करण्याच्या कौशल्याकडे ‘बीसीसीआय’च्या निवड समितीचं लक्ष जाण्यास फारसा वेळ लागला नाही तो ‘आयपीएल’मधील पराक्रमांमुळंच...मग त्याला 2022 मधील इंग्लंडविरुद्धच्या ‘टी-20’ मालिकेसाठी निवडलं गेलं खरं, मात्र पदार्पणासाठी थोडा वेळ थांबावं लागलं. परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यानं वेस्ट इंडिजविऊद्धच्या मालिकेत पाच सामन्यांत सात बळी घेऊन मालिकावीराचा किताब पटकावला...त्या वर्षीच्या आशिया चषक स्पर्धेतील भारताची मोहीम विसरण्याजोगीच राहिलेली असली, तरी त्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांमध्ये तो एक होता. अंतिम षटकांत माऱ्याची जबाबदारी स्वीकारताना अर्शदीपनं जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती विशेष जाणवू दिली नाही (मात्र त्यातील पाकविरुद्धच्या सामन्यात फलंदाज आसिफ अलीचा झेल सोडल्यानंतर त्याला तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता)...

आशिया चषकानंतर अर्शदीप सिंग दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाविऊद्ध मायदेशी झालेल्या ‘टी-20’ मालिकांत खेळला. ऑस्ट्रेलियातील ‘टी-20’ विश्वचषकात तर भारताचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज ठरल्यानं ‘डेथ ओव्हर स्पेशलिस्ट’ म्हणून त्याची प्रतिष्ठा आणखी वाढली...त्यानंतर लगेच नोव्हेंबर, 2022 मध्ये त्याला भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात पहिला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली...अर्शदीपच्या गोलंदाजीबद्दल एक तक्रार वारंवार राहिलीय ती भरमसाठ ‘नो-बॉल’ टाकण्याची. त्याची चांगलीच किंमत भारताला श्रीलंका आणि न्यूझीलंडविऊद्धच्या सामन्यांत मोजावी लागली होती अन् त्याबद्दल त्याच्यावर क्रिकेट जगतातून काही कमी टीका झाली नाहीये...

मग अर्शदीप सिंगनं ही त्रुटी दूर करण्यासाठी गेल्या वर्षी बेंगळुरू आणि चंदीगडमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत भरपूर घाम गाळला. कमी झालेला वेग आणि अचूकता सुधारण्यासाठी ‘रनअप’ 30 मीटरवरून 25 मीटरपर्यंत कमी केला...शिवाय यॉर्करच्या जोडीला त्यानं भात्यात भर घातलीय ती संथ चेंडूची अन् फसव्या, पण अपेक्षेहून वेगानं येणाऱ्या ‘बाउन्सर’ची...महान सुनील गावस्करनं अर्शदीपला कसोटी क्रिकेटमधील ‘पुढचा जसप्रीत बुमराह’ म्हटलंय. तिथपर्यंत तो पोहोचू शकेल की नाही हे कळेलच. सध्याच्या घडीला तरी तो ‘टी-20’ गाजवतोय यात शंका नाही !

‘आयपीएल’मधून ओळख प्रस्थापित...

  • ‘पंजाब किंग्ज’कडून अर्शदीप सिंगला त्याच्या पदार्पणाच्या मोसमात फक्त तीन सामने मिळाले, परंतु त्याचं स्थान टिकवून ठेवण्यास ते पुरेसं ठरलं. त्यानंतर तो आपली निवड नि मूल्य एकामागून एका हंगामात सार्थ ठरवत आलाय...2020 च्या ‘आयपीएल’मध्ये अर्शदीप आठ सामने खेळला अन् त्यानं 9 बळी घेतले...
  • 2021 चा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम राहिला. कारण ‘डेथ ओव्हर स्पेशालिस्ट’च्या भूमिकेत आणखी नैपुण्य मिळविताना ‘पंजाब किंग्ज’तर्फे तो सर्वांत जास्त बळी (18) घेणारा गोलंदाज बनला...या पार्श्वभूमीवर ‘मेगा लिलावा’पूर्वी ‘पंजाब किंग्ज’नं राखून ठेवलेल्या दोन खेळाडूंपैकी अर्शदीप हा एक राहिला यात आश्चर्यकारक काही नव्हतं...
  • 2022 च्या मोसमात बळींचा आकडा (10) जरी कमी झाला, तरी अर्शदीप सिंगनं दडपणाखाली तसंच शेवटच्या षटकांत मारा करण्याची कला आणखी विकसित केली. शिवाय खेळपट्ट्या फलंदाजीला प्रचंड अनुकूल असूनही 7.70 चा ‘इकोनॉमी रेट’ टिकविला हे महत्त्वाचं...
  • मागील दोन हंगामांतही तो भरपूर प्रभावी राहिलेला असून गतवर्षी अर्शदीपनं मिळविले ते 14 सामन्यांतून 17, तर यंदा 14 लढतींतून 19 बळी. बाद केलेल्या फलंदाजांचा विचार करता यंदाची त्याची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट...

‘टी-20’ विश्वचषकात छाप...

  • अर्शदीप सिंगनं टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अमेरिकेविऊद्धच्या गटस्तरीय सामन्यात चार षटकांत नऊ धावा देऊन चार बळी घेतले आणि इतिहास रचला. या स्पर्धेतील एखाद्या सामन्यात चार विरोधी फलंदाजांना 10 पेक्षा कमी धावांत बाद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज...
  • याभरात सदर 25 वर्षीय वेगवान गोलंदाजानं मोडला तो रविचंद्रन अश्विनचा 11 धावांत 4 बळींचा विक्रम. अश्विननं 30 मार्च, 2014 रोजी मीरपूर इथं खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक सामन्यात 3.2 षटकांत चार ऑस्ट्रेलियन फलंदाजांना परतीची वाट दाखविली होती...
  • न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील सदर सामन्यात अर्शदीपनं सामन्याच्या पहिल्या चेंडूवर शायन जहांगीरला बाद केलं. त्यासरशी टी-20 सामन्यात पहिल्याच चेंडूवर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला....
  • अर्शदीप सिंगनं एका टी-20 विश्वचषकात भारतीय गोलंदाजानं सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रमही आताच आपल्या नावावर केलाय. हा टप्पा त्यानं गाठला तो ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या ‘सुपर एट’ सामन्यात. त्यानं आर. पी. सिंगच्या 2007 च्या विश्वचषकातील 12 बळींना मागं टाकलंय. या स्पर्धेत आतापर्यंत (यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या काल झालेल्या उपांत्य सामन्याचा समावेश नाही) सहा डावांमध्ये 14 बळी घेतलेत. त्यानं डेव्हिड वॉर्नरचा बळी घेत हा पराक्रम गाजवला आणि त्यानंतर मॅथ्यू वेडलाही परत रवाना केलं...
  • अर्शदीपनं टी-20 विश्वचषकात पदार्पण केलं ते 2022 च्या स्पर्धेत मेलबर्नमध्ये पाकिस्तानविऊद्ध तीन बळी घेऊन. त्या स्पर्धेत त्यानं सहा सामन्यांतून 10 बळी घेतले. सध्या चालू असलेल्या स्पर्धेचा विचार करता भारताचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज ठरलाय तो तोच...

थोडक्यात अर्शदीप...

  • जन्म : 5 फेब्रुवारी, 1999 रोजी गुणा, मध्यप्रदेश इथं...
  • आंतरराष्ट्रीय टी-20 कामगिरी : 50 सामन्यांत 77 बळी...
  • आयपीएल पराक्रम : 65 लढतींत 76 बळी...
  • वनडे कारकीर्द : 6 सामन्यांत 10 बळी...

खेळ जुनाच ओळख नवी ! ‘ल्यूज’

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘ल्यूज’ ही एक वेळेवर आधारित शर्यत. यात खेळाडू ‘स्लेड’वर पालथा झोपतो आणि पूर्वनिर्धारित तसंच लहान वळणं असलेल्या मार्गावरून प्रचंड वेगानं घसरत सुसाट सुटतो. सर्वांत जलद वेळ नोंदविणारा ‘ल्युजर’ (या प्रकारातील खेळाडू) विजेता ठरतो....

  • 1957 मध्ये ‘आंतरराष्ट्रीय ल्यूज महासंघा’ची स्थापना होऊन या खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. हा प्रकार 1964 च्या इन्सब्रक गेम्सपासून हिंवाळी ऑलिम्पिकशी जोडला गेलाय...
  • ‘ल्यूज’मध्ये पुऊष एकेरी, महिला एकेरी, दुहेरी आणि सांघिक रिले या चार श्रेणी असतात. दुहेरीत दोन पुरुषांनी किंवा दोन महिलांनीच स्पर्धा केली पाहिजे असा कोणताही विशिष्ट नियम नाही...
  • हिवाळी ऑलिम्पिकमध्ये ‘ल्यूज’ हा सर्वांत वेगवान खेळ मानला जातो, ज्यात ‘ल्युजर्स’ ताशी 130 किलोमीटरांपेक्षा जास्त वेगानं प्रवास करतात...पाठीवर झोपलेले ‘ल्युजर्स’ पोटऱ्यांच्या स्नायूंच्या सहाय्याने वजनाचा भार बदलून दिशा बदलतात आणि घसरत जाण्याकरिता त्यांच्या खांद्यांचा वापर करतात...
  • कामगिरी गणली जाण्यासाठी ‘स्लेड’वरूनच अंतिम रेषेच्या पुढे ‘ल्युजर’नं सरकलं पाहिजे. ‘स्लेड’शिवाय शर्यंत पूर्ण करणं किंवा चालत जाणं अथवा ‘स्लेड’ला सीमारेषेच्या दिशेनं ढकलत नेणं हे खपवून घेतलं जात नाही आणि यामुळं अपात्रता वाट्याला येते...
  • हिवाळी ऑलिम्पिकमध्ये ‘ल्युजर्स’ना चार फेऱ्या (एकेरीत) आणि दोन फेऱ्या (दुहेरीत) पूर्ण कराव्या लागतात आणि सर्वांत वेगवान एकूण वेळ नोंदविणारा  खेळाडू वा जोडी यांना विजेता घोषित केले जाते...
  • एकेरी ‘ल्यूज’ स्पर्धा दोन दिवस रंगून प्रत्येक दिवशी दोन फेऱ्या होतात. मात्र जागतिक स्पर्धेसह इतर बहुतेक स्पर्धांमध्ये एकेरी ‘ल्युजर्स’ना फक्त दोन फेऱ्या पूर्ण कराव्या लागतात...
  • 2022 च्या हिंवाळी ऑलिम्पिकमध्ये ‘ल्यूज ट्रॅक’ची लांबी 1,615 मीटर्स होती अन् त्यात 16 वळणं तसंच भरपूर कोन आणि उतार समाविष्ट होते...
  • या प्रकाराच्या सांघिक रिलेमध्ये संघांचे तीन ‘स्लेड’ असतात-एक पुऊष एकेरी, एक महिला एकेरी आणि एक दुहेरी...महिला एकेरी स्पर्धक सर्वप्रथम सुटतो आणि अंतिम रेषेवर पोहोचल्यावर ‘टचपॅड’ला स्पर्श करते, जे पुऊष एकेरी स्पर्धकासाठी प्रवेशद्वार उघडते...पुऊष एकेरी स्पर्धकही दुहेरी जोडीसाठी प्रवेशद्वार उघडण्याकरिता अशाच प्रकारे ‘टचपॅड’ला स्पर्श करतो...दुहेरी संघाचा अव्वल ‘ड्रायव्हर’ही टचपॅडला स्पर्श करतो आणि संघाची धाव पूर्ण झाल्याचे तसेच टाइमर थांबवण्याचे संकेत देतो. तिथून संघाचा एकूण वेळ गणला जातो...
  • ‘ल्यूज’साठी सर्वांत महत्त्वाचं उपकरण म्हणजे ‘स्लेड’...दोन पोलादी तुकड्यांवरील एक ‘स्लेड’ बर्फाळ मार्गावर घसरत जाते. त्याच्या शेवटी विस्तारित वक्र भाग असतात, ज्याला ‘रनर्स’ म्हणतात. ते ‘ल्युजर’ला त्यांच्या पायांनी दिशा बदलण्यास मदत करतात. ‘ल्युजर’ ज्या आसनावर झोपतो त्याला ‘पॉड सीट’ म्हणतात...
  • हिवाळी ऑलिम्पिकशी भारताचा बहुतांश संबंध हा ‘ल्यूज’च्या माध्यमातून राहिलाय. अनुभवी शिव केशवननं 1998 ते 2018 दरम्यान पाच हिवाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये या प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व केलं. 2006 च्या इटली इथं झालेल्या स्पर्धेत सर्वांत उत्कृष्ट कामगिरी करताना त्यानं 25 वं स्थान पटकावलं होतं...

- राजू प्रभू

पोलंडची ब्युटी क्वीन

जागतिक नंबर वन टेनिसपटू पोलंडच्या इगा स्वायटेकने फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. मागील आठवड्यात रोलँड गॅरोसच्या फिलिप चॅटियर कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इगाने इटलीच्या जास्मिन पाओलिनीचा पराभव केला. विशेष म्हणजे, स्वायटेकने पाच वर्षांत चौथ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. 2007-09 मध्ये जस्टिन हेनिननंतर सलग तीन वेळा फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली महिला ठरली.

23 वर्षीय इगाने 2019 मध्ये पहिला ग्रँडस्लॅम सामना खेळला. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्येच तिने पहिले विजेतेपद पटकावले. यावेळी फ्रेंच ओपन जिंकली होती. यानंतर 2021 च्या मोसमात इगाला एकही ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकता आले नाही. पण 2022 पासून तिने पुन्हा विजयाची गती पकडली. आता,  तिच्या यशस्वी कामगिरीचे रिझल्ट आपण पाहतच आहोत. अर्थात, यामागे तिचे कठोर परिश्रम, मेहनत देखील आहे.

2001 साली पोलंडमधील वार्सा शहरात जन्मलेली इगा सर्वसाधारण कुटुंबातील आहे. वडिल व्यवसायाने नाविक. यामुळे घरातील परिस्थिती जेमतेम. पण, अवघ्या काही वर्षात इगाने हे सारे बदलून दाखवले. 23 वर्षाची ही तरुणी साऱ्या जगाला सांगते आहे, स्काय इज द लिमिट. आता तर कुठे सुरुवात झाली आहे. महिला एकेरीत तिने जबरदस्त कामगिरी करताना फ्रेंच ओपन सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेचे पाच वर्षात चार वेळा जेतेपद पटकावले आहे. गतवर्षी तिने अमेरिकन ग्रँडस्लॅम जिंकले आहे. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील जेतेपदे तिच्याकडे आहेत. अजून बराच टप्पा गाठायचा आहे, असे ती सांगते.

खडतर परिश्रम अन् 13 व्या वर्षीच पहिलेच जेतेपद

23 वर्षीय इगा भन्नाट, मस्त आयुष्य जगते. सध्या जागतिक महिला टेनिस क्रमवारीत पोलंडची ही युवा खेळाडू अव्वलस्थानी विराजमान आहे. पण तिचा इथवरचा प्रवासही रोमांचकारी आहे. शालेय शिक्षणपासूनच तिला टेनिसचे वेड होते. पोलंडमधील टेनिसचा इतिहास पाहता या खेळात आपण कितपत तग धरु व यशस्वी होऊ याचा काही अंदाज नसल्याने नेहमीच दुसरा पर्याय ठेवल्याचे ती सांगते. टेनिस मला कितपत साथ देईल याची शाश्वती नसल्याने आपण शिक्षणाला प्राधान्य दिल्याचे इगा सांगते. शिक्षण व टेनिस याची आवड तिने जपली. इगा व अगाथा या दोघीही बहिणी. अगाथाला जलतरणाची भारी हौस. सुरुवातीला अगाथाने काही स्पर्धेत भाग घेत यश मिळवले. बहिण खेळते, तिला हरवायचे म्हणून इगाचे टेनिस सुरु झाले. पण यामध्ये तिने अशी काही गती पकडली की वयाच्या 13 व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली. वयाच्या विशीत तिने फ्रेंच ओपन जिंकले. याशिवाय, मियामी ओपनसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत तिने जपानची दिग्गज खेळाडू नाओमी ओसाकाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही.

सोशल मीडिया, जागतिक क्रमवारीत नंबर 1!

पहिलेवाहिले फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर तिचा जेतेपदाचा सिलसिला पुढेही राहिला. 2022 मध्ये तिने जागतिक महिला क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले. अमेरिकन ओपन जिंकत तिने इतिहास रचला. याशिवाय, अनेक स्पर्धामध्ये तिने भन्नाट कामगिरी करत जेतेपद मिळवले आहे.पोलंडच्या या ब्युटी क्वीनला पर्यटनाची भारी आवड आहे. स्वत:साटी वेळ काढत ती अनेक देशात फिरत असते. दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. टेनिसपटू असण्यासोबतच इगा तिच्या ग्लॅमरस लुक्ससाठीही ओळखली जाते. इंस्टाग्रामवर तिचे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो आहेत. फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर तिच्या फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढली. कोणतीही टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर इगा काही काळ कोर्टपासून दूर राहते. स्वत:साठी वेळ काढते. वाचन, म्युझिक व पर्यटनावर भर देत स्वत:ला नवे रुप देण्याचे प्रयत्न करत असते. म्हणूनच आज इगा वेगळी दिसते.

इगाचे सर्वात जास्त प्रेम टेनिसवर आहे. फ्रेंच ओपनमध्ये जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली जाईल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. पण, माझ्यासाठी हे सारे सरप्राईज आहे. आता, विम्बल्डन समोर आहे, ही स्पर्धा जिंकण्याचे ध्येय असल्याचे ती सांगते.

विनायक भोसले /कोल्हापूर

Advertisement
Tags :

.