महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फलंदाजांना रगडणारा रबाडा !

Advertisement

दक्षिण आफ्रिकेला वेगवान गोलंदाजांची मोठी परंपरा लाभलेली असून ही यादी क्रेग मॅथ्यूज, अॅलन डोनल्डपासून स्टेन, एन्टिनीपर्यंत खूप मोठी...आता त्यात नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी यांची भर पडली असून ते चांगलेच तिखट असले, तरी नव्या फळीतील जागतिक दर्जाचा, जुन्या दिग्गजांच्या तोडीचा गोलंदाज म्हणून पाहिलं जातंय ते कागिसो रबाडाकडेच...भारताविरुद्धच्या दोन्ही लढतीत, खास करून पहिल्या कसोटीत त्यानं त्याचा चांगलाच प्रत्यय आणून दिलाय...

Advertisement

दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियम...पहिल्या कसोटीतील भारताचा पहिला डाव सावरण्यासाठी जोरदार झुंज देणाऱ्या, अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या विराट कोहलीला पडला एक अप्रतिम चेंडू...त्याच्या आधी आत येणाऱ्या चेंडूंनी कोहलीला बॅकफूटवर खिळून ठेवलं होतं. त्यानंतर जवळपास 31 षटकं जुना ‘कूकाबुरा’ चेंडू ज्यावेळी पडला त्यावेळी तो आत येईल अशी अटकळ कोहलीनं बांधली होती, पण प्रत्यक्षात चेंडू बाहेरच्या बाजूनं किंचित वळला अन् विराटच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक काइल व्हेरेनेच्या ग्लोव्हजमध्ये विसावला...

त्यापूर्वी रोहित शर्माला अपेक्षेपेक्षा जास्त उसळलेला चेंडू चकीत करून गेल्याशिवाय राहिला नाही अन् त्यानं हाणलेला हूक सरळ गेला तो डीप फाईन लेगवरील क्षेत्ररक्षकाच्या हातात...तर श्रेय्यस अय्यरला देखील उसळत्या चेंडूंनी बँकफूटवर बांधून ठेवल्यानंतर अनपेक्षितरीत्या फारसा न उसळलेला चेंडू त्याचा त्रिफळा उडवून गेला...तर शार्दुल ठाकूरचा प्रतिकार संपुष्टात आला तो ‘फूल लेंथ’ चेंडूनंतर आलेल्या ‘बाउन्सर’वर. त्याच्या जोडीला रविचंद्रन अश्विनचा बळी....

ही करामत वेग व उसळी याबाबतीत मदत करणाऱ्या खेळपट्टीपेक्षा गोलंदाजानं हुशारीनं राबविलेल्या डावपेचांची...कागिसो रबाडा...त्या 28 वर्षीय तरुणानं भारताच्या त्या डावात अक्षरश: आग ओकताना 2.58 च्या ‘इकोनॉमी रेट’नं 17 षटकांत अवघ्या 44 धावा देऊन पाच जणांना परतीची वाट दाखविली. जेव्हा जेव्हा भारतीय फलंदाजांची भागीदारी आकार घेऊ लागली तेव्हा तेव्हा त्यानं चेंडू हातात घेत इमाने इतबारे त्यास सुरुंग लावला...दुसऱ्या डावातही त्यानं रोहित नि शार्दुलचे बळी मिळविले...तर पहिल्याच दिवशी विक्रमी 23 बळी पाहिलेल्या दुसऱ्या कसोटीतील भारताचा पहिला डाव कोसळविण्याचं श्रेय जरी पाच चेंडूंत तीन बळी घेतलेल्या एनगिडीला जात असलं, तरी भारताची प्रतिहल्ल्याची शेवटची आशा संपविली ती तीन बळी घेणाऱ्या रबाडानंच हे विसरून चालणार नाही. त्याचा बाहेरच्या दिशेनं जाणारा चेंडू कोहलीच्या बॅटची कड घेऊन गेला अन् मग मार्करमनं सूर मारत स्लीपमध्ये झेल पकडण्याची संधी सोडली नाही....

कागिसो रबाडा हा जसप्रीत बुमराहप्रमाणं थरारक भासत नाही किंवा पॅट कमिन्स, मिचेल स्टार्कप्रमाणं तो हृदयाचे ठोके वाढवत नाही. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीप्रमाणं त्याला देखील तितकं ग्लॅमर नसलं, तरी शमीसारखाच तो बारकावे, कौशल्य, ‘अॅथलेटिसिझम’, वेग व डावपेच यांचं मिश्रण असल्यानं घातक, भेदक ठरतो...परिस्थितीचा अभ्यास करून तोडगा काढण्याकडे रबाडाचा कल राहतो. पहिल्या कसोटीत खेळपट्टी उपयुक्त असल्यानं कमाल वेग गाठण्यासाठी पाठीच्या स्नायूंवर अकारण ताण देण्याची गरज नाही हे लक्षात घेऊन त्यानं गोलंदाजी केली. खेरीज चेंडूला जास्त स्विंग करणंही फारसं फायदेशीर ठरणार नाही हे जाणून त्यानं काळजी घेतली ती चेंडू हवेत कमीत कमी ‘मूव्ह’ होईल याची...

कागिसो रबाडा हे नाव सर्वप्रथम प्रसिद्धीच्या झोतात आलं ते 2014 मधील 19 वर्षांखालील विश्वचषकातून. तिथं त्यानं सातत्यानं ताशी 140 किलोमीटरच्या वेगानं मारा केला अन् 25 धावांत 6 बळी मिळवून ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडविली. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यानं संघाला अंतिम फेरीत पोहोचविलं तसंच स्पर्धा संपली तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला...ही कामगिरी मायदेशी परतल्यावर लगेच ‘हायवेल्ड लायन्स’चा करार त्याच्या हातात पाडून गेली. तिथं झपाट्यानं केलेली प्रगती पाहून त्याला ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरील दक्षिण आफ्रिकेच्या ‘अ’ संघात स्थान दिलं गेलं अन् पुढं मुख्य संघाची दारंही उघडी व्हायला वेळ लागला नाही...

कागिसो रबाडाला दक्षिण आफ्रिकी संघात पाऊल ठेवण्याची संधी मिळाली ती 2014 च्या नोव्हेंबर महिन्यातील ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या ‘टी-20’ सामन्यातून. पदार्पणातच ग्लेन मॅक्सवेलचा बळी घेत त्यानं चांगला प्रभाव पाडला...परंतु त्यानंतर एकदिवसीय संघात मिळालेला प्रवेश हा खरा धडाकेबाज राहून त्यानं लगेच इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळविलं. बांगलादेशविरुद्धच्या त्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदविण्यासह रबाडानं अवघ्या 16 धावांत 6 गडी टिपले. ‘वनडे’मध्ये पदार्पणात करण्यात आलेली ही आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी...

स्टेन दुखापतीनं त्रस्त असल्यानं 2015 च्या भारताच्या दौऱ्यात कागिसो रबाडाला स्थान मिळालं अन् त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली ती त्याचवेळी. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं त्याच्या वयाहून अधिक परिपक्वतेचं दर्शन घडविलं. खास करून इंदूरच्या लढतीतील शेवटच्या षटकात महेंद्रसिंह धोनीला पाच चेंडूंवर एकही धावा काढायला न देणं रबाडाच्या कौशल्याची चुणूक दाखवून गेलं...मात्र कसोटी मालिकेत त्याचा फारसा प्रभाव पडला नाही....परंतु पुढं ‘ड्युक्स’ चेंडूवर त्यानं इंग्लिश फलंदाजीचे तीन तेरा वाजविताना इंग्लंडमधील सहापैकी तीन डावांत पाच बळींची नोंद केली अन् त्यानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत 2-1 असं नमविण्यात मोठी भूमिका बजावली...तेव्हापासून कागिसो रबाडा हे दक्षिण आफ्रिकेचं प्रमुख हत्यार बनून राहिलंय...

रबाडा हा चेंडू स्विंग तर करतोच, शिवाय तो ‘सीम’चा वापर करून चेंडूला बाहेरची दिशा दाखविण्याची ताकद बाळगतो. जोडीला त्याच्यात विलक्षण क्षमता दडलीय ती वेग कायम ठेवून जुना व नवीन चेंडूही रिव्हर्स स्विंग करण्याची...दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डना त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करावासा वाटतो तो उगाच नव्हे. डोनाल्ड यांच्या मते, कागिसो रबाडाची यशाची भूक अन् चेंडू सहज सोडण्याचं निर्दोष तंत्र त्याला आधुनिक काळातील महान गोलंदाज बनवतं. त्याची शैली ही भालाफेक करणाऱ्या अॅथलीटसारखी आणि त्याच्या गोलंदाजीला गती मिळते ती त्यामुळंच !

500 आंतरराष्ट्रीय बळी...

कसोटीत ‘मॅचविनर’...

‘आयपीएल’मध्ये बोलबाला...

‘आयपीएल’मध्येही कागिसो रबाडाचा कमी बोलबाला राहिलेला नसून यंदा ‘पंजाब किंग’तर्फे खेळताना स्पर्धेच्या इतिहासातील 100 बळी सर्वांत वेगानं घेणारा गोलंदाज ठरण्याचा मान त्यानं पटकावला. त्यानं मोडला तो लसिथ मलिंगाचा विक्रम. मलिंगाला त्यासाठी लागले होते 70 सामने, तर रबाडानं 64 व्या लढतीत हा टप्पा गाठला...त्यानं ‘आयपीएल’ कारकिर्दीची सुऊवात केली ती 2017 मध्ये ‘दिल्ली कॅपिटल्स’पासून अन् 2022 च्या हंगामापूर्वी तो ‘पंजाब किंग’मध्ये दाखल झाला. त्यानं या संघातर्फे 13 सामन्यांत 23 बळी घेतलेत...

खेळ जुनाच ओळख नवी : ‘लॉन बॉल’

खेळाडूंच्या तंतोतंत अंदाज बांधण्याच्या क्षमतेची कसोटी पाहणारा ‘लॉन बॉल’ किंवा ‘लॉन बोलिंग’ हा एक रोमांचक खेळ...बर्मिंगहॅम इथं 2022 साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांत रूपा राणी तिर्की, पिंकी, नयनमोनी सायकिया नि लव्हली चौबे यांचा समावेश असलेल्या महिला संघानं भारताला या खेळातील पहिलं सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला होता. त्यानंतर हा क्रीडाप्रकार म्हणजे नेमकं काय याची उत्सुकता जास्तच ताणली गेली...

- राजू प्रभू

‘पृथ्वी’ला गवसणी घालणारी सुकन्या

टेबल टेनिस हा चिनी लोकांचा वरचष्मा असणारा खेळ. मात्र चिन्यांना आव्हान देण्यासाठी भारतात एक उभरता सितारा ताकदीने पुढे येत आहे. पॅराटेबल टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय पदकांना गवसणी घालणारी अवघ्या अठरा वर्षाची ‘पृथ्वी जयदेव बर्वे’ आगामी काळात टेबल टेनिसमध्ये ‘पृथ्वी‘ला गवसणी घालेल इतकी क्षमता तिच्यामध्ये आहे. तिच्या खेळातील कौशल्य पाहून विट्याचे संस्थानिक असणाऱ्या बर्वे कुटूंबाने तिला पृथ्वी प्रदक्षिणेसाठी पाठबळच दिले आहे. परंतू पृथ्वीचा हा प्रवास सहज, सोपा आणि सरळ निश्चितच नव्हता. क्रांतीभूमी साताऱ्यातून सुरू झालेला हा प्रवास सध्या विद्येच्या माहेरघरातील सरावातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे सुरू आहे. अवघ्या अठराव्या वर्षी आंतराष्ट्रीय पातळीवर नऊ पदके तिच्या खात्यात जमा आहेत. भविष्यात आशिया, कॉमनवेल्थ आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशाचा तिरंगा डौलाने फडकावा, असे तिचे स्वप्न आहे.

मुळातच भारतात टेबल टेनिस खेळाला मर्यादा आहेत. या खेळावर चीनचे प्रभूत्त्व आहे. जपान, दक्षिण कोरीया आणि जर्मनीसारखे देश चीनला आव्हान निर्माण करतात. असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे..! या उक्तीप्रमाणे विट्याच्या पृथ्वी बर्वेने पॅरा स्पोर्टस् मध्ये केवळ सराव आणि जिद्द, चिकाटी याच्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदकांना शालेय वयातच गवसणी घातली आहे. पृथ्वी पॅरा टेबल टेनिस महिलांच्या क्लास 9 प्रकारात खेळते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणाऱ्या पृथ्वीने आत्तापर्यंत चौदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सिंगल, डबल आणि मिक्स डबल्समध्ये पदके मिळवली आहेत. पाच राष्ट्रीय पातळीवरील पदके मिळाली. यामध्ये चार रौप्य आणि एक कांस्य, नऊ आंतरराष्ट्रीय पदके यामध्ये एक सुवर्णपदक, तीन कांस्य आणि पाच रौप्यपदकांचा समावेश आहे. पृथ्वीचे पॅरा टेबलटेनिस मधील सध्याचे आंतरराष्ट्रीय मानांकन 13 व्या क्रमांकाचे आहे. ती सध्या भारताची दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू तर आशिया खंडातील तिचे मानांकन पाच आहे.

संघर्षावर मात करत यशाला गवसणी

अवघ्या अठरा वर्षाच्या पृथ्वीने जन्मताच असणाऱ्या हेमीपॅरासिस नावाच्या आजाराशी झुंज देत हे यश मिळवले आहे. तिच्या शरीराचा उजव्या बाजूचे अवयव 45 टक्के काम करीत नव्हते. त्यावर मात करीत वयाच्या सहा महिन्यांपासून 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत फिजिओथेरपी आणि मग टेबल टेनिसचा सराव असा तिचा नित्यक्रम आहे. याशिवाय तिला वाचनाची आवड आहे. तिला पॉलिटीकल सायन्समध्ये पदवीधर व्हायचे आहे तर परराष्ट्र खात्यामध्ये करिअर करण्याचा तिचा मानस आहे. तत्पूर्वी तिला आशिया, कॉमनवेल्थ आणि पॅरा ऑलम्पीकमध्ये देशाचा तिरंगा डौलाने फडकावायचा आहे. यासाठी ती कसून सराव करते आहे. शारीरीक दुर्बलतेचा तिने तिच्या मनावर आणि खेळावर परिणाम होऊ दिला नाही. यासाठी तिचे वडील जयदेव, आई कामाक्षी आणि भाऊ शंतनू यांनी सुरूवातीपासून काळजी घेतली आहे. तिला प्रोत्साहन दिले आहे.

पृथ्वीचा टेबल टेनिसचा प्रवास दहा वर्षापूर्वी 2014 मध्ये सुरू झाला. सातारा येथे प्रशिक्षक ललित सातघरे यांनी तिला प्रशिक्षण दिले. तिने पहिली स्पर्धा ठाण्यात खेळली त्यावेळी खुल्या गटातून ती स्पर्धेत उतरली होती. यावेळी आतंतराष्ट्रीय टेबल टेनिसपटू ममता प्रभू हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होत्या. त्यांनी पृथ्वीचा खेळ पाहून कामाक्षी बर्वे यांच्याशी संपर्क साधला आणि पृथ्वीला पॅराटेबल टेनिसमध्ये खेळवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बर्वे कुटुंबीयांनी पुण्याला स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला. येथूनच पृथ्वीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पृथ्वी सध्या पुण्याच्या शारदा सेंटर येथे प्रशिक्षक दिप्ती चाफेकर आणि सुरेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

पृथ्वी एकमेवाद्वितीय फर्ग्युसन्स

पृथ्वीच्या कामगिरीची दखल घेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा अत्यंत प्रतिष्ठेचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार पृथ्वीला जाहीर झाला आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासह देश पातळीवरील अत्यंत महान लोकांना या पुरस्काराने सन्मानीत केले आहे. याच पंक्तीत आता पृथ्वीचा समावेश झाला आहे. मात्र यातही एक वैशिष्ठ्या म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना हा पुरस्कार मिळवणारी पृथ्वी एकमेव विद्यार्थीनी आहे. त्यामुळेच पृथ्वी एकमेवाद्वितीय आहे, असेच म्हणावे लागेल.

पृथ्वीचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय यश -

सचिन भादुले, विटा (सांगली)

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article