For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

अस्सल लढवय्या...प्रणॉय !

Advertisement

13 वर्षांपूर्वी कनिष्ठ खेळाडू म्हणून क्षितिजावर उगवलेल्या एच. एस. प्रणॉयकडे त्यावेळच्या भारतातील सर्वांत आश्वासक बॅडमिंटनपटूंपैकी एक म्हणून पाहिलं जात होतं...मात्र त्या अपेक्षांना तो बराच काळ जागू शकला नाही ते दुखावपती नि सातत्याच्या अभावामुळं. परंतु मागील दोन वर्षांनी हे चित्र पालटून टाकलंय ते प्रणॉयच्या लढवय्या वृत्तीमुळं...

‘तो कधीच एकेरीत खेळू शकणार नाही. तो वेगवान नाही. खरं तर तो संथ असून त्यानं वळलं पाहिजे ते दुहेरीकडे’...त्याचे वडील सुनील कुमार यांना एका प्रशिक्षकानं सुनावलेले हे शब्द...अर्थात असं सांगणारे ते एकमेव प्रशिक्षक नव्हते. त्यावेळी खरं तर तो कनिष्ठ स्तरावरील स्पर्धा जिंकत होता, पण त्याची धाव त्या मर्यादेच्या पलीकडे जाणार नाही असंच त्या प्रशिक्षकांना वाटत होतं...या नकारात्मक प्रतिक्रियांनी आत्मविश्वास खचून जाण्याऐवजी त्याच्या वडिलांचा निर्धार आणखी मजबूत होईल याची कल्पना फारच कमी जणांनी केलेली असेल. त्यांनी त्या मुलाला उलट आणखी जोरात चालना दिली...आज ते नाव भारतीय बॅडमिंटनच्या आव्हानाची धुरा सांभाळणाऱ्या ‘टॉप थ्री’ चेहऱ्यांपैकी एक बनलंय, ते सारे प्रशिक्षक तोंडघशी पडलेत अन् त्याचे एकेरीतील काही पराक्रम त्याला चक्क इतिहासाच्या पुस्तकात स्थान देऊन गेलेत...एच. एस. प्रणॉय...

Advertisement

2015 मध्ये जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर पोहोचूनही केरळच्या या खेळाडूपेक्षा त्यावेळी जास्त ख्याती मिळविली होती ती किदाम्बी श्रीकांत, पाऊपल्ली कश्यप यांनी. पण त्याच्या वेगवान मुसंड्या तो लक्षवेधी खेळाडू असल्याची जाणीव वारंवार करून देत होत्या. परिस्थितीनुरुप बदल घडवून आणण्याच्या कौशल्यामुळं प्रतिस्पर्ध्यांना त्याचा खेळ ओळखणं कठीण जातंय हेही स्पष्ट दिसायचं....

17 जुलै, 1992 रोजी जन्मलेल्या प्रणॉयचे वडील हवाई दलात होते आणि जरी ते कधीही राष्ट्रीय स्तरावर खेळलेले नसले, तरी हवाई दलाचे अखिल भारतीय बॅडमिंटन विजेते राहिले होते. खेळ पाहून व आत्मविश्लेषणातून त्यांनी स्वत:ला घडविलं होतं. त्यामुळं जेव्हा त्यांचा मुलगा एकेरीमध्ये चांगला नाही असं सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी सदर प्रशिक्षकांना चुकीचं ठरविण्याचा पण केला. आपल्या मुलामध्ये त्यांनी एक चमक पाहिली होती, ज्याची कदाचित प्रणॉयला देखील त्यावेळी जाणीव झालेली नसेल...

या पार्श्वभूमीवर अनेक तरुण विशेष प्रशिक्षण घेऊन सज्ज होत असताना प्रणॉयचं बॅडमिंटनमधील सुरुवातीचं संगोपन सामान्य राहून प्रदीर्घ काळ ते रिकामं कोर्ट शोधणं आणि त्यावर खेळणं इतक्यापुरतं मर्यादित राहिलं. त्याला शास्रीय बैठक नव्हती. असं असूनही तो कनिष्ठ गटात राष्ट्रीय स्तरावर थडकला....‘माझा स्वत:वर विश्वास नव्हता. मी दहावीत असताना तर मला बॅडमिंटन खेळायचंय की नाही याचीच खात्री नव्हती. मला वाटत होतं की, मी एक चांगला खेळाडू आहे, पण माझ्यापेक्षा बरेच चांगले बॅडमिंटनपटू आहेत’, प्रणॉय सांगतो...

सारी परिस्थिती बदलली ती 2010 मध्ये प्रणॉयनं युवा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर. त्यापूर्वी कनिष्ठ जागतिक स्पर्धेत त्यानं कांस्यपदकाची कमाई केली होती. असं असलं, तरी पुढील दोन वर्षं अधिक कठीण आणि दुखापतींनी भरलेली राहिली. आधी 2011 मध्ये गुडघ्याची दुखापत, त्यानंतर पुन्हा 2012 मध्ये पाठीला दुखापत, ज्यातून सावरण्यासाठी लागले पाच-सात महिने...या परिस्थितीत प्रणॉयला धीर दिला तो त्याची कारकीर्द घडविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांच्या शब्दांनी. ‘खेळाडूची सरासरी कारकीर्द नऊ वर्षांच्या आसपास असते. दुखापतीमुळं गमावलेली दोन वर्षे त्यातून वगळ आणि स्वत:ला कमाल मर्यादेपर्यंत खेच’, गोपीचंदनी त्याला सल्ला दिला...

त्यानंतर ‘इंडियन ओपन’मध्ये दमदार कामगिरी करण्याबरोबर प्रणॉयनं 2014 सालची ‘इंडोनेशियन मास्टर्स ग्रां प्रि गोल्ड’ स्पर्धा जिंकली. आपल्याला दुखापती होण्यामागं अपुरी प्रशिक्षण पद्धत लपलीय याचीही एव्हाना त्याला जाणीव झाली. प्रशिक्षणासोबतच त्याची विश्लेषणाची क्षमताही वाढली आणि त्यामुळं वरिष्ठ पातळीवर झेप घेण्यास खूप मदत झाली...‘जेव्हा मी कनिष्ठ स्तरावर खेळत होतो, तेव्हा जवळपास 90 टक्के वेळा ‘स्मॅश’ करायचो. मी सर्व वेळ फक्त आक्रमण करत असे आणि बहुतेक वेळा इतर खेळाडू माझा ‘स्मॅश’ उचलू शकत नसत..पण वरिष्ठ स्तरावर ‘स्मॅश’ तितका चालला नाही. कारण इतरांनी त्यांचा बचाव भक्कम केला होता. म्हणून मला बदलावं लागलं. दुखापतींमुळं देखील माझा खेळ काही अंशी बदलला’, तो सांगतो...

असं असलं, तरी दुखापती, फॉर्ममधील समस्या नि सातत्याचा अभाव यांनी एच. एस. प्रणॉयला दगा दिला अन् सारा प्रकाशझोता केंद्रीत झाला तो त्याचा सहकारी किदाम्बी श्रीकांतसह लक्ष्य सेनसारख्या त्याच्याहून कनिष्ठ बॅडमिंटनपटूवर...‘जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूर’चं विजेतेपद अजूनही त्याच्या आवाक्याबाहेरचं वाटत होतं. एकेकाळी जागतिक क्रमवारी आठव्या स्थानापर्यंत मजल मारलेला हा खेळाडू 2021 साली 33 व्या क्रमांकावर फेकला गेला...पण वेदनांशी झुंज देण्याची तयारी अन् पराभवाचे धक्के सहन करूनही हार न मानण्याची वृत्ती यांनी त्याचं भविष्य पालटलं. मग पाच वर्षांनी प्रणॉयनं प्रथमच अंतिम फेरीचं दर्शन घेतलं ते 2022 च्या स्विस ओपनमध्ये. परंतु तिथं त्याला जोनाथन क्रिस्तीनं सरळ गेम्समध्ये नमवलं...

प्रणॉय तरीही खचला नाही. त्यानंतर त्याची घोडदौड दोन ठिकाणी उपांत्य फेरीपर्यंत गेली. ‘इंडोनेशिया ओपन सुपर 1000’मध्ये तो विलक्षण मजबूत व आक्रमक दिसला होता. तिथं त्यानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचे सर्व सामने सरळ गेम्समध्ये खिशात घातले, पण उपांत्य फेरीत हात टेकावे लागले. ‘मलेशिया मास्टर्स’मध्येही प्रवास राहिला तो असाच...शेवटी सारं चित्र 360 अंशांत फिरलं ते गेल्या 2023 सालानं. त्यातून नवीन एच. एस. प्रणॉय उदयाला आला असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. यंदा ‘इंडियन ओपन’मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर भलेही तो ‘मलेशिया ओपन’ नि ‘इंडोनेशिया मास्टर्स’मध्ये त्या धडाक्याची पुनरावृत्ती करू शकलेला नसेल. पण आपण कधीही उसळी घेण्याची जिगर बाळगतो हे त्यानं पुरेपूर दाखवून दिलंय !

‘किस्मत’ बदलणारं 2023 साल...

  • विजेतेपद खात्यावर जमा करण्याच्या बाबतीत प्रणॉयला करावी लागलेली सहा वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली ती 2023 मध्ये...आपल्या भरपूर चढ-उताराच्या कारकिर्दीत कधीही आशा न सोडता तो झुंजत राहिल्याचा हा परिणाम. सदर उणीव त्यानं भरून काढली ती ‘मलेशिया मास्टर्स’ जिंकून. त्यापूर्वी त्याच्या वाट्याला शेवटचं जेतेपद आलं होतं ते 2017 च्या ‘अमेरिकन ओपन’मध्ये...
  • प्रणॉयची दीर्घ सामने खेळण्याची ताकद मे महिन्यातील या पहिल्या ‘वर्ल्ड टूर विजेतेपदा’नं पुरेपूर दाखवून दिली. ही कामगिरी करताना त्यानं आपल्यापेक्षा सात वर्षांनी लहान असलेल्या चीनच्या वेंग हाँग यांगचं कडवं आव्हान मोडून काढलं अन् हा अंतिम सामना चालला तब्बल 93 मिनिटं...
  • अंतिम फेरी गाठताना प्रणॉयनं सहावा मानांकित चौ तिएन चेन, ‘ऑल इंग्लंड ओपन’ विजेता ली शी फेंग आणि जपानी ‘स्टार’ केंटा निशिमोटो यांनाही नामोहरम केला. या स्पर्धेतील त्याचे सर्व सामने तीन गेम्सपर्यंत खेचले गेले अन् त्यानं कोर्टवर सरासरी घालविली 79 मिनिटं...
  • तेथून प्रणॉयची गाडी सुसाट सुटली...त्याच्या पुढील आठवड्यात ‘ऑस्ट्रेलियन ओपन’मध्ये मॅरेथॉन सामन्यांची दुसरी मालिका वाट्याला येऊन तो शेवटच्या गेमपर्यंत विजेतेपदाच्या शर्यतीत राहिला, परंतु 93 मिनिटं चाललेल्या अंतिम लढतीत सरशी झाली ती हाँग यांगची...सिडनीच्या कोर्टवर त्याचा सरासरी वावर 68 मिनिटांपेक्षा जास्त राहिला...
  • प्रत्येक सामन्यानिशी आपल्या खेळाचा स्तर उंचावत गेलेल्या या भारतीय शटलरनं मग कमाल केली ती सर्वांत सातत्यपूर्ण बॅडमिंटनपटू अन् जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असलेल्या व्हिक्टर अॅक्सेलसेनला कोपनहेगन येथील जागतिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दणका देऊन. प्रणॉयनं मग कांस्यपदक जिंकून आपल्या मुकुटात मानाचं पीस खोवलं...या स्पर्धेत पदक पटकावून दाखविणारा तो पाचवा भारतीय पुऊष बॅडमिंटनपटू...
  • त्याच्या जोरावर वयाच्या 30 व्या वर्षी प्रणॉयनं त्याच्या कारकिर्दीतील जागतिक क्रमवारीतील सर्वोच्च सहावं स्थान पटकावलं ते ऑगस्ट, 2023 मध्ये. त्यावेळी तो डिसेंबर, 2022 पासून अव्वल 10 खेळाडूंत स्थान टिकवून ठेवलेला एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू बनला...
  • प्रणॉयनं मग शिखर गाठलं ते आशियाई खेळांतील कांस्यपदक जिंकून इतिहास घडवत. त्यानं या खेळांमधील पुऊषांच्या एकेरी गटातील दुसऱ्या पदकासाठीची भारताची 41 वर्षांपासून चाललेली प्रतीक्षा संपवली....यापूर्वी आशियाई खेळांत पदक जिंकलं होतं ते सय्यद मोदीनं...

दुखापतींचं ग्रहण...

दुखापती नि खराब प्रकृती यांनी प्रणॉयला वेळोवेळी सतावलंय. परंतु या अडथळ्यांवर मात करणं त्याला शक्य झालंय ते त्याच्या जबरदस्त निर्धारामुळं...2018 च्या जागतिक स्पर्धेवेळी ‘गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स’ विकारानं त्याला ग्रासलं, तर 2021 मध्ये सामना करावा लागला तो ‘कोव्हिड-19’ संसर्गाचा...‘थॉमस कप’मध्ये डेन्मार्कवर उपांत्य फेरीत भारतानं विजय मिळविला खरा, परंतु त्याला घोटा लचकण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागलं...आशियाई खेळांची कहाणी देखील काही वेगळी नव्हे. संपूर्ण एशियाडमध्ये पाठदुखीनं सतावलेलं असून देखील प्रणॉयनं पदक पटकावण्याचा पराक्रम गाजवला. मात्र तो त्याला महागही पडला. कारण ऑक्टोबरमध्येच मोसम अर्ध्यावर पोहोचलेला असताना त्याला दुखापतीमुळं कोर्टपासून दूर राहावं लागलं...

अन्य पराक्रम...

  • लिन डॅन अन् ली चोंग वेई या दोन चिनी दिग्गजांना प्रत्येकी दोनदा पराभूत करणारा प्रणॉय हा एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू....
  • सांघिक गटातही तो महत्त्वाचा खेळाडू राहिलाय...ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथं झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील मिश्र सांघिक गटात भारतीय संघानं केलेल्या सुवर्णपदकाच्या कमाईस त्यानं मोलाचा हातभार लावला...
  • 2022 हंगामाची सुऊवात झाली ती ‘थॉमस चषका’च्या ऐतिहासिक जेतेपदानं. तिथं भारताला ज्यामुळं उपांत्यपूर्व नि उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला त्यात प्रणॉयच्या अपवादात्मक कौशल्याचा जबरदस्त वाटा होता...
  • आशियाई खेळांत रौप्यपदक मिळविणाऱ्या पुरुष संघाचा तसंच ‘आशियाई बॅडमिंटन स्पर्धे’च्या (एशियाड नव्हे) मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पटकावणाऱ्या चमूचाही तो महत्त्वाचा सदस्य राहिला...
  • प्रणॉयला खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं असून जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या प्रतिष्ठेच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’मध्ये सहभागी झालेला तो एकमेव भारतीय खेळाडू....

खेळ जुनाच ओळख नवी ! : वॉटर पोलो

‘वॉटर पोलो’ हा एक कठीण खेळ आहे, परंतु जेव्हा त्याची सुरुवात झाली तेव्हा तो आणखीनच कठीण होता. असं मानलं जातं की, या खेळाची उत्पत्ती ब्रिटनमधून झाली. तिथं लोक 19 व्या शतकाच्या मध्यास नद्या, तलावांमध्ये रग्बी खेळायचे...1897 मध्ये न्यूयॉर्कच्या हॅरोल्ड रीडर यांनी त्यात शिस्त आणण्याच्या दृष्टीनं पहिले अमेरिकन नियम तयार केले...‘वॉटर पोलो’ची दोन भिन्न रुपे युरोप व अमेरिकेत विकसित झाली होती. सरतेशेवटी वेगवान, कमी धोकादायक युरोपियन शैलीचं प्राबल्य झालं आणि आज हा खेळ सर्वत्र खेळला जातो...

  • ‘वॉटर पोलो’ हा प्रत्येकी एका गोलरक्षकासह सात खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान पाण्यामध्ये खेळला जाणारा खेळ...त्यात सर्व जण एकाच प्रकारच्या रंगीत टोप्या परिधान करतात. खेळाडू चेंडू एकमेकांना देऊन तो विरोधी संघाच्या गोलमध्ये टाकून गोल करण्याचा प्रयत्न करतात आणि लढतीच्या शेवटी सर्वाधिक गोल करणारा संघ सामना जिंकतो...एका लढतीत आठ मिनिटांची चार सत्रं खेळविली जातात...
  • हा खेळ सामान्यत: पुऊषांसाठी 30.6 मीटर × 20 मीटर आणि महिलांसाठी 25.6 मीटर × 20 मीटर आकाराच्या तसंच 3 मीटर खोल तलावात खेळला जातो. खेळाडू तळाला स्पर्श करू शकणार नाहीत याची काळजी यात घेतली जाते. ‘वॉटर पोलो’साठीच्या मुख्य कौशल्यांमध्ये रणनीती आखणे, ताकद, वेग, सहनशक्ती आणि शारीरिक क्षमता यांचा समावेश होतो...
  • गोल करण्यासाठी 30 सेकंद इतका वेळ चेंडूचा ताबा राहतो. जर संघानं त्या वेळेत प्रतिस्पर्ध्याच्या गोलवर हल्ला केला नाही, तर चेंडूचा ताबा विरोधी संघाकडे जातो....
  • एखादा संघ गोल केल्यानंतर, ‘टाइम आउट’ दरम्यान किंवा सत्रांदरम्यान खेळाडू बदलू शकतो. प्रत्यक्ष खेळादरम्यान संघाच्या फेरप्रवेशासाठीच्या क्षेत्राद्वारे (संघाच्या बाकासमोरील तलावाचा कोपरा) बदली खेळाडू उतरवायचा असतो...
  • पंच दोन वेगवेगळ्या प्रकारचे ‘फाऊल’ काढतात. एक किरकोळ म्हणजे सामान्य ‘फाऊल’ आणि दुसरे मोठे वा वैयक्तिक ‘फाऊल’. एखाद्या खेळाडूच्या हातून किती किरकोळ ‘फाऊल’ घडू शकतात याला मर्यादा नाही. जर 5 मीटर रेषेच्या बाहेर ‘फाउल’ केले गेले, तर खेळाडू गोलच्या दिशेने थेट चेंडूफेक करू शकतो. किरकोळ ‘फाऊल’मध्ये चेंडू न पकडलेल्या खेळाडूच्या मुक्त हालचालीत अडथळा आणणं, चेंडू ताब्यात घेताना वेळ वाया घालवणं, चेंडूला दोन्ही हातांनी स्पर्श करणं, ‘शॉट क्लॉक’ची मुदत संपू देणे आणि चेंडू पाण्याखाली धरणे यांचा समावेश होतो.
  • खेळाडूंनी ‘मोठे फाऊल’ केल्यास मात्र त्यांना 20 सेकंदांसाठी बाहेर ठेवले जाऊ शकते आणि तीन मोठी ‘फाऊल’ झाल्यास त्या खेळाडूला खेळ सोडावा लागतो तसंच तो परत येऊ शकत नाही. चेंडू ताब्यात नसलेल्या खेळाडूला पकडणे, बुडवणे किंवा मागं खेचणं, हिंसा किंवा अनादर करणं यांचा ‘मोठ्या फाऊल’मध्ये समावेश होतो...
  • ऑलिम्पिकमध्ये ‘वॉटर पोलो’ तलावात, तर ‘बीच वॉटर पोलो’ हा खुल्या पाण्यात खेळला जातो. हा खेळ पॅरिसमध्ये झालेल्या 1900 च्या स्पर्धेपासून ऑलिम्पिक खेळांचा भाग राहिलाय. सिडनी (ऑस्ट्रेलिया) इथं 2000 साली झालेल्या ऑलिम्पिकपासून त्यात महिलांच्या स्पर्धेची भर पडली...
  • ऑलिम्पिकमधील पुऊषांच्या स्पर्धेत हंगेरी हे सर्वांत यशस्वी राष्ट्र राहिलंय, तर महिलांच्या स्पर्धेत वर्चस्व राखलंय ते अमेरिकेनं...‘वॉटर पोलो’मध्ये पुऊष व महिला या दोन्ही गटांमधील ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारं इटली हे पहिलं राष्ट्र होतं...

- राजू प्रभू

आता थांबायचं नाय...

सावंतवाडीचा (सिंधुदुर्ग) सुपुत्र निखिल शंकर नाईक हा मुख्य क्रिकेटपासून दुरावतो की काय, अशी शंका निर्माण झाली होती. या परिस्थितीत त्याची यंदा पुन्हा महाराष्ट्र संघात रणजी सामन्यासाठी निवड झाली आहे. तो सध्या महाराष्ट्र संघातून खेळत आहे. कुठलाही ‘गॉडफादर’ नसताना त्याने क्रिकेट विश्वात आपले स्थान निर्माण केले. उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करणारा निखिल नाईक उत्कृष्ट यष्टीरक्षकही आहे. त्याने आता रणजीत पदार्पण केल्यामुळे त्याला भारतीय संघात पदार्पणाची संधी चालून आली आहे. निखिल नाईक याची क्रिकेट कारकीर्द अडखळत सुरू आहे. परंतु त्याला नशीब वारंवार साथ देत आहे. रणजी सामन्यात झालेली निवड ही त्याच्यासाठी एक संधी आहे. तो या संधीचे सोने करेल, अशी क्रिकेटप्रेमी आणि त्याच्या चाहत्यांची आशा आहे. निखिल हा आता तिशीच्या घरात आहे. त्यामुळे आणखी चार-पाच वर्षे तो खेळू शकतो. त्यामुळे आता त्याने आलेली संधी दवडता नये. आपली छाप पाडून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले पाहिजे. सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुऊवात करत भारतीय क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे हे आपल्या दमदार कामगिरीने चमकले. सचिन तेंडुलकर याने कसोटी, वनडे, ट्वेंटी या सर्व

प्रकारात दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. तो महान खेळाडू बनला. ‘क्रिकेटचा देव’ म्हणून त्याला ओळखले जाते. याच सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर हे स्टार खेळाडू क्रिकेटची सुऊवात करत होते. त्याच जिमखाना मैदानाजवळ निखिल शंकर नाईक याचा जन्म गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मासे विक्रीचा व्यवसाय करतात. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना निखिलने क्रिकेट खेळायला सुऊवात केली. याच जिमखाना मैदानावरील मातीत क्रिकेट खेळत त्याने क्रिकेट विश्वात दमदार सुऊवात केली. गॉडफादर नसतानाही त्याला क्रिकेट विश्वात स्थान निर्माण केले. परंतु त्याची क्रिकेट कारकीर्द अडखळतच सुरू झाली. त्याने क्रिकेट विश्वात पदार्पण केल्यानंतर त्याच्या आईचे पॅरालिसिसने निधन झाले. हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता. परंतु यातूनही सावरत त्याने 16 आणि 19 वर्षाखालील क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघात गुजरात विऊद्ध 2014 ला विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याचा समावेश झाला. चार सामन्यात 58.60 च्या सरासरीने 234 धावा केल्या. सय्यद मुस्ताक अली टी-20 मध्ये पाच सामन्यात 39.20 च्या सरासरीने 296 धावा केल्या. त्यामध्ये 95 धावा सर्वाधिक होत्या. त्याने एका सामन्यात एका षटकात पाच षटकार लगावले.

2015 च्या आयपीएलमध्ये ‘किंग इलेव्हन’ पंजाब संघात त्याला स्थान मिळाले. त्याला 30 लाख ऊपयांच्या बोलीवर या संघाने खरेदी केले. परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पुढे 2019 मध्ये त्याची वर्णी रणजीत लागली. महाराष्ट्र संघातून रेल्वेविऊद्ध तो खेळला. त्यानंतर 2020 मध्ये त्याची वर्णी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये झाली. कोलकाताने त्याला 20 लाखाच्या बोलीवर खरेदी केले. एका सामन्यात ख्रिस गेलबरोबर तो सलामीला आला होता. परंतु तो सात धावांवर आऊट झाला. थर्ड अंपायरकडे अपील झाले. परंतु त्याला बाद ठरविले गेले. या सीझनमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. नंतरच्या काळात तो क्रिकेटमध्ये खेळत होता. तो क्रिकेटच्या मुख्य प्रवाहापासून दूर जातो की काय, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु यंदा पुन्हा रणजी सामन्यात त्याची वर्णी लागली. महाराष्ट्र संघाकडून त्याने मणिपूर विऊद्धच्या सामन्यातून  पदार्पण केले. त्याने आतापर्यंत दोन सामन्यात नाबाद 33-32 अशा धावा केल्या. निखिलने टी ट्वेंटीमध्ये 61 सामन्यात 50 डावात 970 रन 27.71 सरासरीने केले. त्यात 95 धावा सर्वाधिक तर ए लिस्टच्या 37 सामन्यांमध्ये 33 डावात 968 धावा केल्या. त्यात एका सामन्यात सर्वाधिक 82 धावा केल्या. या सामन्यांमध्ये सरासरी 37.33 होती.

निखिल नाईक याने हलाखीच्या परिस्थितीत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, आपल्या फलंदाजीने आणि यष्टीरक्षक म्हणून त्याने चांगली कामगिरी करत क्रिकेट विश्वात नाव केले. या काळात त्याला दिलीप वाडकर, दिनेश कुबडे, राजन आंगणे यांनी साथ दिली. परंतु त्याची कारकीर्द फारशी बहरली नाही. तरी त्याला नशिबाने वेळोवेळी साथ दिली. दोन आयपीएल सीझनमध्ये खेळण्याची संधी  मिळाली. आता त्याला महाराष्ट्र संघातून रणजी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे तो कितपत सोने करतो, यावर क्रिकेट विश्लेषकांचे लक्ष लागून आहे. त्याने दमदार कामगिरी केल्यास त्याला पुढे भवितव्य आहे. सावंतवाडीचा सुपुत्र असलेला निखिल हा भारतीय संघात दिसावा अशी अपेक्षा येथील क्रीडाप्रेमींची आहे. सावंतवाडीच्या या सुपुत्राला अभिनेत्री प्रीती झिंटा, अभिनेता शाहऊख खान यांसारख्या अभिनेत्यांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याला अनेक नामवंत खेळाडूंबरोबर खेळता आले. त्याच्या दृष्टीने ही एक मोठी अॅचिव्हमेंट आहे.

-विजय देसाई, सावंतवाडी

Advertisement
Tags :

.