कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टोरंटोतील भारतीय भूकंप !

Advertisement

Advertisement

‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली तेव्हा भारतीय खेळाडूंकडून फारशा अपेक्षा नव्हत्या अन् असल्याच तर त्या प्रज्ञानंदकडून जास्त होत्या...पण शेवटी ‘डार्क हॉर्स’ ठरला तो 17 वर्षांचा डी. गुकेश. त्यानं नुसतं किताबच पटकावलेला नाही, तर सर्वांत तरुण विजेता बनण्याचा पराक्रम गाजवलाय...आता विश्वविजेता निश्चित करण्यासाठी होणार असलेल्या लढतीत सरशी झाल्यास सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला गुकेश सर्वांत कमी वयाचा जगज्जेता ठरत पुन्हा एकदा इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळवेल...

पंधरवड्यापूर्वी कॅनडात टोरंटो इथं ‘फिडे’ची ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माजी विश्वविजेता अन् या खेळाच्या विश्वातील दिग्गजांपैकी एक असलेल्या मॅग्नस कार्लसननं भारताचा 17 वर्षांचा बुद्धिबळपटू डी. गुकेश याच्याविषयी काय मुक्ताफळं उधळली होती ...“तो कँडिडेट्स स्पर्धा जिंकेल अशी मी कल्पनाही करू शकत नाही. मला वाटतं की, तो किमान दोन सामने नक्कीच जिंकेल. परंतु त्याचबरोबर काही दारुण पराभवांनाही त्याला तोंड द्यावं लागेल. तो खराब कामगिरी करेल असं मला वाटत नाही, परंतु तो खूप चांगली कामगिरी करेल असं देखील नाही. तो अजून ती झेप घेण्यासाठी तयार झालेला नाही. त्याच्यासाठी ही स्पर्धा खराब जाण्याचीच शक्यता जास्त’...

दोन आठवड्यांनंतर ‘कँडिडेट्स’ स्पर्धेचा सर्वांत तऊण विजेता बनत डी. गुकेशनं कार्लसनचे दात घशात घातले अन् नोव्हेंबरमध्ये जागतिक विजेतेपदासाठी विद्यमान जगज्जेता डिंग लिरेनविरुद्ध होणार असलेल्या लढतीतील आव्हानवीराची खुर्चीही पक्की केली...या स्पर्धेत उतरणं टाळलेल्या मॅग्नसनं भक्कम दावेदार म्हणून निवड केली होती ती दोन वेळचा जागतिक स्पर्धेतील आव्हानवीर इयान नेपोम्नियाची, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला अन् पाचव्यांदा ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत झळकणारा फाबियानो काऊआना आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेला व तिसऱ्यांदा या स्पर्धेत उतरणारा हिकारू नाकामुरा यांची. तिघांनाही शेवटी गुपेशनं अर्ध्या गुणानं पछाडून दाखविलं...

असं असलं, तरी कार्लसनचे उद्गार अगदीच चुकीचे असं म्हणता येणार नाही...स्वत:ची शैली, विजयाची भूक, विश्लेषणाची क्षमता नि डावपेच भात्यात असूनही बहुतेक बुद्धिबळ पंडितांच्या दृष्टीनं डी. गुकेश किताबाच्या दावेदारांच्या आसपासही फिरत नव्हता. त्यात ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत सहभागी होण्याची त्याची ही पहिलीच खेप, तर दुसऱ्या बाजूनं अनुभवी खेळाडूंची रांगच लागलेली...परंतु तो अनुभव, प्रतिष्ठा आणि इतर काय म्हणत आहेत यांची फिकीर न करता पुढं पावलं टाकत गेला (2013 साली मॅग्नस कार्लसन नि विश्वनाथन आनंद चेन्नईत एकमेकांशी भिडले तेव्हा गुकेश होता अवघा सात वर्षांचा. पण ती लढत त्याच्या मनावर जबरदस्त परिणाम करून गेली)...

मजेशीर गोष्ट म्हणजे कॅनडातील स्पर्धेच्या आधी जर्मनीत झालेल्या ‘फ्रीस्टाईल चेस ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम चॅलेंज’ स्पर्धेवेळी डी. गुकेशला मॅग्नस कार्लसनशी बातचित करण्याची संधी मिळाली होती. त्या संभाषणातून गवसलेल्या काही गोष्टी या युवा खेळाडूला उपयुक्त ठरल्याशिवाय राहिल्या नाहीत...“कँडिडेट्स’चा विषय निघाल्यावर मी कार्लसनला त्याचे अनुभव विचारायला सुऊवात केली. मला काही गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं होतं. परंतु मी त्याला सल्ला विचारला नाही. त्यानं 2013 पासूनचा आपला अनुभव सांगितला. वाहवत जाऊ नकोस ही त्यानं सांगितलेल्या काही गोष्टींपैकी एक. ही स्पर्धा किती थकविणारी ठरू शकते अन् त्यामुळं स्वत:ची ऊर्जा राखून ठेवणं, पहिल्या सत्रातच स्वतला दमवून न टाकणं किती महत्त्वाचं आहे ते सुद्धा त्यानं स्पष्ट केलं’, गुकेश सांगतो...

भारतीय खेळाडूनं त्यांची पक्की खूणगाठ मनाशी बांधली अन् अनावश्यक जोखीम घेणं जसं टाळलं त्याचप्रमाणं स्वत:वर अतिभारही घातला नाही. सातव्या फेरीमध्ये अलीरेझा फिरोजाकडून पराभव पत्करावा लागून सुद्धा आपल्या उत्साहावर त्यानं परिणाम होऊ दिला नाही...‘अर्थात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी जिंकणार याची मला शंभर टक्के खात्री नव्हती. मात्र सुऊवातीपासूनच विश्वास होता. परंतु मला खरोखरच तसं वाटू लागलं ते सातव्या फेरीनंतर विश्रांतीच्या दिवशी. मला वाटलं की, मी खूप चांगला बुद्धिबळ खेळतोय आणि जर मी काही लहान बदल केले अन् मानसिकदृष्ट्या योग्य स्थितीत राहिलो, तर ते साध्यं केलं जाऊ शकतं’, गुकेश म्हणतो...

डी. गुकेशच्या रूपानं कँडिडेट्स स्पर्धेतून जगज्जेतेपदासाठीचा दुसरा आव्हानवीर भारताला गवसला. यापूर्वी 1991 मध्ये विश्वनाथन आनंदनं सर्वप्रथम हा पराक्रम करून दाखविला होता. पण ‘कँडिडेट्स ते आव्हानवीर’ हा प्रवास करण्यासाठी त्याला चार वर्षं लागली, तर गुकेशनं आपल्या पहिल्याच प्रयत्नात आणि अवघ्या चार महिन्यांत ते साध्य करून दाखविलं...त्याच्या या प्रवासात आनंदची भूमिका देखील महत्त्वाची राहिलीय. ‘वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमी’नं (वाका) गुकेशला योग्य वेळी आपल्या आश्रयाखाली घेतलं. आनंदचा माजी सहकारी अन् पोलंडचा 38 वर्षांचा ग्रँडमास्टर ग्रेजेगोर्ज गजेव्हस्की आज त्याला सर्वत्र सोबत करत असतो...

भारतानं गेल्या वर्षी चेन्नई इथं शेवटच्या क्षणी ‘फिडे सर्किट’ स्पर्धेचं आयोजन केले होते ते इतर मार्गांनी ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अयशस्वी झालेल्या डी. गुकेशला तिथं थडकण्याची वाट मिळावी या हेतूनं...काही बुद्धिबळ खेळाडू व तज्ञांच्या मते, गुकेशची बुद्धिबळाची आवड नि या खेळावर त्याचं केंद्रीत झालेलं सारं लक्ष हे विलक्षणच...कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेनंतर सप्टेंबर, 2021 मध्ये जेव्हा बुद्धिबळाच्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या तेव्हा तो तीन महिन्यांत 90 पेक्षा जास्त ‘क्लासिकल’ लढती खेळला...अन् आता 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत गुकेश खेळलाय जवळपास 400 ‘रेटेड’ सामने. त्याखेरीज कमी वेळेच्या लढती, ऑनलाइन सामने अन् ‘फिशर रँडम’...पण जगज्जेता बनायचं असेल, तर असं वाहून घेणं आवश्यकच अन् डी. गुकेशन तर तो ध्यास सुरुवातीपासूनच बाळगलाय...2017 मध्ये वयाच्या 11 व्या वर्षी उच्च पातळीवरील बुद्धिबळाचे धडे घेत असताना त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं...‘मला जगातील बुद्धिबळाचा सर्वांत तरुण विजेता बनायचंय’....ती वेळ आता आलीय !

डी. गुकेशची कारकिर्दीतील भरारी...

कँडिडेट्स स्पर्धेतील विजेते...

विचलित न होता प्रवास...

अत्यंत कठीण परिस्थितीत देखील शांत राहण्याची डी. गुकेशची क्षमता हे त्याचं ‘कँडिडेट्स’मधील सर्वांत मोठं शस्त्र राहिलं...निकाल काहीही लागो, त्यानं आपला तोल ढळू दिला नाही, स्वत:ला भावनांच्या आहारी जाऊ दिलं नाही. याउलट इयान नेपोम्नियाचीसारख्या खेळाडूच्या चेहऱ्यावर भावनांचं लगेच प्रतिबिंब पडायचं...त्याचं हे नियंत्रण पाहून पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद देखील चकीत झाल्याशिवाय राहिला नाही. गुकेशची स्थिर राहण्याची ताकद त्याला वेगळं ठरवून गेली, असं मत आनंदनं व्यक्त केलंय...

खेळ जुनाच ओळख नवी ! : डायव्हिंग

डायव्हिंग...एक लोकप्रिय जलक्रीडा प्रकार...तो जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात खेळला जातो. वरवर पाहता हा सर्वांत सोपा खेळ म्हणावा लागेल. कारण त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना फक्त प्लॅटफॉर्म किंवा स्प्रिंगबोर्डवरून पाण्यात डुबकी मारावी लागते. पंचांकडून जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी ‘अॅक्रोबेटिक्स’ची आवश्यकता लागते. तथापि, हा प्रकार वाटतो त्यापेक्षा प्रत्यक्षात किती तरी अधिक गुंतागुंतीचा अन् कठीण...

- राजू प्रभू

ती फुलराणी आयएएस झाली!

बॅडमिंटन कोर्ट ते युपीएससी, डेहराडूनच्या कुहू गर्गचा अनोखा प्रवास

विनायक भोसले /कोल्हापूर

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचं लाखो उमेदवारांचं आणि त्यांच्या पालकांचं स्वप्न असतं. त्यामध्ये, काहींना यश मिळते, तर अनेकांना अपयश. त्यामुळेच यास स्पर्धा परीक्षा म्हणत असावेत. यंदाच्या युपीएससी परीक्षेत एका बॅडमिंटनपटूनेही यशाला गवसणी घातली आहे. उत्तराखडंचे माजी डीजीपी अशोक कुमार यांची कन्या कुहू गर्ग हिनेही यश संपादन केले. कुहूने देशात 178 वी रँक मिळवून वडिलांचे स्वप्न साकार केले. आपल्या लेकीनेही अधिकारी व्हावे, असे सनदी अधिकारी राहिलेल्या वडिलांचे स्वप्न होते. कुहूने आपली बॅडमिंटन खेळाची आवड जपत हे स्वप्न पूर्ण केले. दुर्दैवाने दुखापतग्रस्त झाल्यामुळे तिला खेळ सोडावा लागला होता. मात्र, त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. विशेष म्हणजे कुहूने बॅडमिंटनमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. 56 ऑल इंडिया मेडल्स आणि 18 इंटरनॅशनल मेडल्स कुहूच्या नावावर आहेत. तिचे बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत टॉप इंटरनॅशनल रँक 34 आणि देशात मिक्स डबल्स रँकिंग नंबर 2 आहे.

कुहू गर्गला यूपीएससी परीक्षेत 178 वा रँक मिळाला आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र यशाचा मार्ग तिच्यासाठी सोपा नव्हता. कुहूचे वडील अशोक कुमार यांनी सांगितलं की, कोरोनानंतर कुहूला जगातील प्रतिष्ठित अशा उबेर चषक बॅडमिंटनच्या चाचण्यांदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर तिला शस्त्रक्रिया करावी लागली. तिला एक वर्ष बॅडमिंटन कोर्टवर उतरता न आल्यानं तिनं नागरी सेवांसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. कुहूने यूपीएससीची तयारी करताना रोज आठ ते दहा तास अभ्यास केला. डेहराडूनमध्ये संदर्भाची तयारी करताना अनेक अडचणी आल्या पण वडिलांच्या पाठबळावर या यशापर्यंत पोहोचता आल्याचे कुहूने सांगते.

मुलाखतीत क्रिकेटवर प्रश्न

क्रिकेटमुळे देशातील अन्य खेळ प्रकारांची हानी होत आहे का? क्रिकेटला एक इंडस्ट्री बनवले पाहिजे का? असा प्रश्न यूपीएससीच्या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आला होता. चौकस असणाऱ्या कुहूने याचेही उत्तरही तितक्याच ताकदीने दिले. क्रिकेटचा कोणत्याही अन्य खेळांवर परिणाम होत नाही. तर देशात क्रिकेटचा विस्तार होत आहे. त्याच पद्धतीने अन्य खेळही चांगले होऊ शकतात.

बॅडमिंटनने शिकवली चिकाटी

वयाच्या नवव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळणाऱ्या कुहूची कामगिरीही जबरदस्त राहिली आहे. आतापर्यंत 56 ऑल इंडिया मेडल्स आणि 19 इंटरनॅशनल मेडल्स कुहूच्या नावावर आहेत. मिश्र दुहेरीत कुहूची टॉप आंतरराष्ट्रीय रँक 34 असून देशात मिश्र दुहेरी रँकींगमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॅडमिंटन खेळानेच मला कष्ट आणि शिस्तपालनाची सवय लावली. यामुळे, युपीएससी परीक्षेत मला त्याचा मोठा फायदा झाला, असे कुहू सांगते. 2021 मध्ये कोरोनाच्या साथीनंतर उबेर कपच्या चाचणीदरम्यान कुहूला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्यामुळे तिच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करावी लागली. गुडघ्याच्या दुखापतीनंतर तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, ज्याचा उपयोग तिने नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी केला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये कुहूने शानदार कामगिरी साकारली आहे. याशिवाय अनेक जेतेपद पटकावली आहेत. पण दुखापतीमुळे तिला बॅडमिंटन सोडावे लागले. दुखापतीदरम्यान केलेली मेहनत आणि बॅडमिंटन खेळाने शिकवलेली शिस्त पुढे जाऊन यूपीएससीतील तिच्या यशाचे गमक बनले. अवघ्या 25 वर्षाची असलेली कुहूने देशातील सर्वच खेळाडूंसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. परिस्थिती कितीही बिकट असली की समोर मार्ग दिसतो, याचे उत्तम उदाहरण कुहू गर्ग या बॅडमिंटनपटूने दिले आहे.

एप्रिल महिना निकालाबद्दलच्या चिंतेने भरलेला होता. मात्र आता निकाल उत्कृष्ट लागला असून, त्यानंतर संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या दीड ते दोन वर्षात केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. हरियाणातील कॅडरला तिचे पहिले प्राधान्य आहे.

कुहू गर्ग, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व युपीएससी परीक्षेत 178 वी रँक.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article