स्पोर्ट्स mania
‘स्मृती’त राहणारी मानधना !
यंदा पुरुष संघाप्रमाणंच भारतीय महिला क्रिकेट संघांचीही कामगिरी लक्षणीय राहिलीय अन् त्यात ज्या खेळाडूंनी मोलाचा वाटा उचललाय त्यापैकी एक म्हणजे धडाकेबाज डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना...मागील दशकभरापासून ती सातत्यानं भारताची ‘स्टार परफॉर्मर’ राहिलीय...
ती लहानपणी सांगलीतील आपल्या घराच्या परिसरात खेळायची, भाऊ श्रवण क्रिकेटचा सराव करण्यासाठी जाताना त्याला सोबत करायची तेव्हा एक दिवस हीच मुलगी क्रिकेटची बॅट नुसती पकडणार नाही, तर या खेळात जबरदस्त वर्चस्व गाजवेल, तलवारीसारखी बॅट फिरवत गोलंदाजांची धुलाई करेल असं कुणाला वाटलं होतं का ?...ती चक्क महिला क्रिकेटची ‘आयकॉन’ बनण्यापर्यंत, भारतीय महिला क्रिकेट संघाची ‘स्टार’ बनण्यापर्यंत झेप घेईल याची कुणी स्वप्नात तरी कल्पना केली होती का ?..आज हे नाव माहीत नसेल असा अस्सल क्रीडा रसिक क्वचितच आढळेल. आपल्याकडील क्रिकेटचं विश्व हे एरव्ही विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक दिग्गज पुरुष खेळाडूंनी सदैव व्यापलेलं राहणारं. परंतु त्यातही आपलं वेगळं अस्तित्व झळाळून उठेल याची काळजी तिनं आपल्या पराक्रमांच्या जोरावर व्यवस्थित घेतलीय...स्मृती मानधना...
डावखुरी सलामीवीर स्मृतीचे पाय क्रिकेटच्या पाळण्यात कधी दिसू लागले होते ?....वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिनं 15 वर्षांखालील महाराष्ट्र संघात प्रवेश केला आणि आपल्याहून ज्येष्ठ प्रतिस्पर्ध्यांवर गाजविलेलं वर्चस्व तिला लगेच म्हणजे 11 व्या वर्षी 19 वर्षांखालील राज्य संघात स्थान देऊन गेलं...2013 हे साल मानधनासाठी अत्यंत मोलाचं राहिलं. कारण 5 एप्रिल रोजी तिला वडोदरा इथं झालेल्या बांगलादेशंविऊद्धच्या ‘टी-20’ सामन्यातून भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची. पदार्पणातच स्मृती मानधनानं 36 चेंडूंत 39 धावा फटकावत भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरण्याचा मान मिळविला अन् संघानं 10 धावांनी मिळविलेल्या विजयाला मोलाचा हातभार लावला. ही मालिका भारतानं 3-0 अशा फरकानं जिंकली... त्यानंतर पाचच दिवसांनी स्मृती मानधनाचं एकदिवसीय संघातून पदार्पण झालं ते अहमदाबादमधील बांगलादेशविऊद्धच्याच लढतीतून. त्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन तिनं 35 चेंडूत 25 धावांची उपयोगी खेळी केली...दुसऱ्या बाजूनं देशी महिला क्रिकेट गाजविणं तिच्याकडून चालूच होतं...19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत स्मृतीनं वडोदरा येथील मैदानावर गुजरातविऊद्ध केवळ 150 चेंडूंत नाबाद 224 धावांची खेळी केली. त्यासरशी ती भारताची कोणत्याही स्तरावरील 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात द्विशतक फटकावणारी पहिली महिला खेळाडू ठरली. इतक्यावरच मर्यादित न राहता तिनं पुढं या स्पर्धेत भर घातली ती आणखी दोन शतकांची...
भारताच्या कसोटी संघात पोहोचण्यास अन् ऑगस्ट, 2014 मध्ये वर्म्सले इथं इंग्लंडच्या महिलांविऊद्ध पदार्पण करण्यास हा धडाका पुरेसा ठरला. स्मृतीनंही ही संधी फुकट जाऊ न देता पहिल्या डावात 22 अन् दुसऱ्या डावात 51 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. भारतीय महिलांसाठी हा विजय ऐतिहासिक होता. कारण संघ आठ वर्षांहून अधिक कालावधीनंतर एखाद्या कसोटी सामन्यात उतरला होता...तेव्हापासून स्मृती मानधना ही भारतीय संघांची नुसती अविभाज्य भाग बनली नाही, तर निवृत्त झालेली मिताली राज अन् सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यासह फलंदाजीच्या आधारस्तंभांपैकी एक म्हणून तिच्याकडे पाहिलं जाऊ लागलं... मानधनानं आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक 2016 साली फटकावलं ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध. होबार्टमधील त्या एकदिवसीय सामन्यात तिनं 109 चेंडूंत 102 धावा काढल्या. त्या हंगामात तिला ‘आयसीसी’नं निवडलेल्या वर्षाच्या संघात देखील स्थान मिळालं...2017 मध्ये भारतानं एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जी धडक मारली त्यात देखील स्मृतीची भूमिका मोलाची राहिली. पण चुरशीच्या अंतिम लढतीत इंग्लंडकडून केवळ नऊ धावांनी पराभूत व्हावं लागलं. 2005 नंतर विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची आपली ही पहिलीच खेप होती...
खरं तर या स्पर्धेत स्मृती मानधना खेळू शकेल की नाही याविषयी साशंकता होती. कारण दुखापतीच्या संकटातून सावरण्यास तिला फारसा वेळ नव्हता. परंतु ती वेळीच तंदुरुस्त होऊ शकली अन् विश्वचषकात सर्वाधिक धावा नोंदविण्याच्या आघाडीवर भारतीय फलंदाजांत मिताली व हरमनप्रीतनंतर तिचा तिसरा क्रमांक लागला. स्मृतीनं वेस्ट इंडिजविऊद्ध झळकावलेल्या नाबाद शतकासह नऊ सामन्यांमध्ये 232 धावा केल्या... पुढच्या वर्षी स्मृती मानधना ही एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज ठरली. जोडीला वेस्ट इंडिजमध्ये आयोजित ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत भारतानं जी मजल मारली त्यात ‘स्टार परफॉर्मर’ राहिली ती तीच...2018 मध्ये स्मृतीचा डंका विदेशात आणखी वाजला तो ‘किया सुपर लीग’मध्ये खेळण्याची संधी मिळाल्यानं. त्यात ‘वेस्टर्न स्टॉर्म’ संघाकडून ‘लॉफबरो लाइटनिंग’विऊद्ध खेळताना केवळ 18 चेंडूंमध्ये 50 धावा काढून तिनं महिलांच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वांत जलद अर्धशतक फटकावण्याच्या किवी खेळाडू सोफी डेव्हिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. या पार्श्वभूमीवर 2018 चे ‘आयसीसी’चे ‘वुमन्स क्रिकेटर ऑफ दि इयर’ अन् ‘वुमन्स वनडे प्लेयर ऑफ दि इयर’ हे दोन्ही पुरस्कार चालून गेले ते तिच्याकडेच...स्मृती मानधनाचा हा दबदबा अजूनही कायम राहिलाय, भारतीय महिला क्रिकेटला नवनव्या शिखरावर पोहोचविण्यास कारणीभूत ठरलाय !
मागील तीन वर्षांत उमटविलेली छाप...
- 2019 : फेब्रुवारीत स्मृती मानधना ‘आयसीसी’च्या एकदिवसीय सामन्यांतील महिला फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान झाली...त्याच महिन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त झाल्यानं गुवाहाटी येथील इंग्लंडविऊद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत अधिपत्य करण्याची जबाबदारी तिला सांभाळावी लागली. त्यासरशी स्मृती महिला नि पुरुष क्रिकेटमधील भारताची सर्वांत तऊण ‘टी-20’ कर्णधार बनली. त्यावेळी तिचं वय होतं 22 वर्षं नि 229 दिवस...
- त्या वर्षी महाराष्ट्राच्या या फलंदाजानं इतिहासाच्या पुस्तकात पुन्हा स्थान मिळविलं ते न्यूझीलंडविऊद्ध 24 चेंडूंत 50 धावा काढून. ते त्यावेळचं भारतीय महिला क्रिकेटपटूनं झळकावलेलं ‘टी-20’तील सर्वांत जलद अर्धशतक...
- 2021 : 2020 साली क्रिकेटचं विश्व ‘कोव्हिड’मुळं ठप्प झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी स्मृती मानधना पुन्हा एकदा भारताची अव्वल फलंदाज बनली. 2021 मध्ये ती ‘आयसीसी’चा ‘वुमन्स क्रिकेटर ऑफ दि इयर’ पुरस्कार दुसऱ्यांदा प्राप्त झालेली इतिहासातील दुसरी खेळाडू ठरली. त्यापूर्वी हा मान होता तो फक्त ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू एलिस पेरीच्या खात्यात...
- न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताला सांखळी फेरीच्या पलीकडे जाण्यात अपयश आलं असलं, तरी मानधना ही सात सामन्यांतून 327 धावांसह भारताची सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज राहिली...
- 2022 : बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल खेळांत रौप्यपदक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाची स्मृती उपकर्णधार होती. तिनं उपांत्य फेरीत इंग्लंडविऊद्ध 23 चेंडूंत पन्नाशी गाठताना भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत जलद ‘टी-20’ अर्धशतकाचा स्वत:चाच विक्रम मोडीत काढला...
यंदाचा धडाका...
- शुभारंभी ‘महिला प्रीमियर लीग’च्या लिलावात सलामीवीर स्मृती मानधना ही 3.4 कोटी रुपयांसह सर्वोच्च बोली लागलेली खेळाडू ठरली. तिला करारबद्ध केलं ते ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’नं. 2024 च्या लीगसाठी स्मृतीला संघानं कायम ठेवलंय...
- दक्षिण आफ्रिकेतील ‘टी-20 विश्वचषक’ स्पर्धेत तिनं आयर्लंडविऊद्ध सामना जिंकून देणारी 87 धावांची खेळी करताना ‘टी-20’तील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. सेंट जॉर्ज पार्कवर जोरात वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करावा लागल्यानं स्मृती या खेळीला आपल्या सर्वोत्कृष्ट डावांपैकी एक मानते...
- यंदाच्या आशियाई खेळांत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाची ती उपकर्णधार होती...
- इंग्लंडविरुद्धच्या विक्रमी फरकानं जिंकलेल्या कसोटीत स्मृतीचं योगदान माफक (17 नि 26 धावा) राहिलं असलं, तरी ऑस्ट्रेलियावर नुकत्याच मिळविण्यात आलेल्या ऐतिहासिक पहिल्या कसोटी विजयात तिनं पहिल्या डावात 74 अन् दुसऱ्या डावात नाबाद 38 धावा काढून मोलाचा वाटा उचलला...
प्रभावी पराक्रम...
- 18 जुलै, 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या अन् वयाच्या दुसऱ्या वर्षी सांगलीत दाखल झालेल्या स्मृती मानधनानं एकदिवसीय सामन्यांत व ‘टी-20’मध्ये प्रत्येकी 2 हजार धावांचा टप्पा पार केलाय...‘टी-20’मध्ये मिताली नि हरमनप्रीत या अन्य दोनच भारतीय महिला क्रिकेटपटूंना आजवर अशी कामगिरी करता आलीय...तर स्मृतीच्या आधी एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 हजारांपेक्षा जास्त धावा करता आल्या होत्या त्या फक्त पाच भारतीय फलंदाजांना...
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सलग 10 डावांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा फटकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू...तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीत एकदिवसीय सामन्यात अन् कसोटीतही शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला फलंदाज...
खेळ जुनाच ओळख नवी ! ज्युदो
ज्युदो हा एक जपानी मार्शल आर्ट प्रकार...तो शारीरिक तंदुऊस्ती, मानसिक शिस्त व खिलाडूवृत्तीला महत्त्व देतो अन् प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी फेकणे आणि पकडणे, जखडणे या तंत्रांवर लक्ष केंद्रीत करतो...1882 मध्ये जपानमधील जिगोरो कानो यांनी शारीरिक शिक्षणाचा तसंच स्वसंरक्षणाचा सुरक्षित नि प्रभावी प्रकार म्हणून ज्युदोचा शोध लावला...
- ज्युदोमध्ये फेकणं, धरून ठेवणं आणि नामोहरम करणं यासाठी गुण दिले जातात. प्रतिस्पर्ध्याला ताकदीनं जमिनीवर फेकणं किंवा ठरावीक काळासाठी त्याला दाबून ठेवणं यात अभिप्रेत असतं...
- या प्रकारातील स्पर्धा विविध वजनी श्रेणींमध्ये विभागलेली असते. ऑलिम्पिकमध्ये पुऊष व महिला खेळाडू आता सात वजनी गटांमधून स्पर्धेत उतरतात. यात ‘हेविवेट’ (पुरुषांसाठी 100 किलोंहून अधिक, तर महिलांसाठी 78 किलोंहून अधिक), ‘हाफ हेविवेट’ (पुरुष 90 ते 100 किलो, महिला 70 ते 80 किलो), ‘मिडलवेट’ (पुरुष 81 ते 90 किलो, महिला 63 ते 70 किलो), ‘हाफ मिडलवेट’ (पुरुष 73 ते 81 किलो, तर महिला 57 ते 63 किलो), ‘लाईटवेट’ (पुरुष 66 ते 73 किलो, महिला 52 ते 57 किलो), ‘हाफ लाईटवेट’ (पुरुष 60 ते 66 किलो, महिला 48 ते 52 किलो) अन् ‘एस्क्ट्रा लाईटवेट’ (पुरुष 60 किलोंखालील, महिला 48 किलोंखालील) असे हे गट असतात...
- पुऊषांचे ज्युदो सामने पात्रता फेरीत चार मिनिटं आणि उपांत्य फेरीत तसंच अंतिम फेरीत पाच मिनिटं चालतात. महिलांच्या गटात सर्व फेऱ्यांमध्ये सामने चार मिनिटे चालतात. तथापि, जर सामना बरोबरीत संपला, तर तो ‘गोल्डन स्कोअर’च्या अतिरिक्त कालावधीसाठी वाढविला जाऊ शकतो. त्याचं स्वरुप ‘सडन डेथ’सारखं असतं. त्यात जो प्रथम गुण मिळवितो तो जिंकतो किंवा प्रथम ज्याला दंड ठोठावला जातो तो स्पर्धक सामना गमावतो...
- टोकियो येथे 1964 मध्ये झालेल्या स्पर्धेतून ज्युदो ऑलिम्पिकमध्ये दाखल झाला. तथापि, मेक्सिको सिटीमध्ये 1968 साली झालेल्या ऑलिम्पिक खेळांत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. परंतु म्युनिक येथील 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये ज्युदोचं पुनरागमन झालं अन् तेव्हापासून तो या क्रीडास्पर्धेचा अविभाज्य भाग राहिलाय. महिला गटातील स्पर्धा 1992 मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिकपासून खेळविण्यात येऊ लागल्या...
- ज्युदोची स्पर्धा 14×14 मीटर मॅटवर किंवा ‘तातामी’वर खेळविले जाते, ज्यामध्ये प्रत्यक्ष भिडण्यासाठी लहान 10×10 मीटरचं स्पर्धा क्षेत्र असतं...प्रत्येक ज्युदोकानं ‘ज्युदोगी’ (‘किमोनो’ व इतर जपानी कपड्यांपासून तयार करण्यात येणारा पारंपरिक गणवेश) परिधान करणं आवश्यक असतं. जॅकेटभोवती गुंडाळलेला आणि पारंपरिक गाठीनं बांधलेला बेल्ट घालणंही गरजेचं...
- ज्युदोच्या लढतीत खेळाडूंना तीन प्रकारचे गुण मिळू शकतात. ‘इप्पॉन’ हा सर्वोत्तम, कारण त्याची परिणती तत्काळ विजयात होते. यासाठी प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे पाठीवर पडेल अशा प्रकारे फेकून द्यावं लागतं किंवा प्रतिस्पर्ध्याला दोन्ही हातांनी विळखा घालून अशा प्रकारे अडकवावं वा दाबून धरावं लागतं की तो खेळ सोडून देईल. अथवा प्रतिस्पर्ध्याला काहीही हालचाल न करू देता जमिनीवर किमान 20 सेकंद दाबून ठेवावं लागतं...
- त्यानंतर ‘वाझा-अरी’ म्हणजे अर्धा गुण. एका लढतीत दोन ‘वाझा-अरी’ मिळणं म्हणजे ‘इप्पॉन’सारखंच आणि म्हणून विजेता घोषित केलं जातं....तिसरा गुण हा ‘युको’. पण कितीही ‘युको’ मिळाले, तरी एक ‘वाझा-अरी’ त्यांना भारी ठरतो अन् जर एखाद्या ज्युदोकाला एक ‘वाझा-अरी’ आणि अनेक ‘युको’ मिळालेले असले, तरी एक ‘इप्पॉन’ त्या सर्वांवर मात करतो...
- राजू प्रभू
प्रोफेशनल फुटबॉलपटू बनण्याचे लक्ष्य आणि देशासाठी खेळायचंय : सोहम नागवेकर
उदयोन्मुख फुटबॉलपटू सोहम नागवेकरने युवा फुटबॉलमधील आधारस्तंभ असलेल्या ‘रिलायन्स यूथ चषक’ फुटबॉल स्पर्धेत सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत आपल्या वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक संघाला स्पर्धेच्या लीगमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले. संपूर्ण स्पर्धेत त्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला स्पर्धावीर आणि मोलाचा असा ‘गोल्डन बूट’ पुरस्कारही मिळाला. पुटबॉलमध्ये गोव्याचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कित्येक गोवेकरांनी उज्ज्वल केले आहे. अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर, ब्रुनो कुतिन्हो, सावियो मदेरा, क्लायमॅक्स लॉरेन्स, रॉबर्ट फर्नांडिस तसेच आताच्या युवा पिढीतील ब्रँडन फर्नांडिस अशी कित्येक नावे घेता येतील. फुटबॉल खेळाला आता चांगले दिवस येऊ लागले आहेत. आयएसएलमुळे राज्यातील फुटबॉलपटूंना आता योग्य स्पर्धात्मक व्यासपीठ मिळू लागले आहे. आयएसएल आणि आय-लीग फुटबॉल स्पर्धेत आता कित्येक गोवेकर फुटबॉलपटू विविध क्लबांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. फुटबॉल खेळाला गोव्यात राज्य खेळाचा दर्जा मिळाला असला तरी मागील काही वर्षांपासून गोव्याचा स्पर्धात्मक फुटबॉलचा दर्जा घसरत चालल्याचे दिसून आले आहे. मात्र, असे असताना सुद्धा आता फुटबॉल खेळ खेळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने क्रीडा व युवा व्यवहार खाते, गोवा क्रीडा प्राधिकरण तसेच रिलायन्स आणि विविध स्कूल्सनी आयोजित केलेल्या शालेय तसेच उच्च माध्यमिक पातळीवरील फुटबॉल स्पर्धेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता फुटबॉल खेळाला राज्यात गतवैभव मिळायला सुरूवात झाली आहे, असे म्हटलं तर ती एक अतिशोयक्ती होणार नाहीय. असा एक उदयोन्मुख फुटबॉलपटू सोहम नागवेकरने युवा फुटबॉलमधील आधारस्तंभ असलेल्या ‘रिलायन्स यूथ चषक’ फुटबॉल स्पर्धेत सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत आपल्या वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक संघाला स्पर्धेच्या लीगमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले. संपूर्ण स्पर्धेत त्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला स्पर्धावीर आणि मोलाचा असा ‘गोल्डन बूट’ पुरस्कारही मिळाला.
कामिल गोन्साल्वीस, रिकार्डो कार्दोज, रेमूस गोम्स आणि प्रदीप यांच्या तालमीत तयार झालेल्या सोहमला आता बनायचंय प्रोफेशनल फुटबॉलपटू. हे एकमेव ध्येय घेऊन आपला फुटबॉल प्रवास सुरू करणाऱ्या सोहमला पुढे आपल्या देशाचेही आंतरराष्ट्रीय फुटबॉलस्तरावर प्रतिनिधीत्व करायचंय. साळगावचे लुर्ड्स काँव्हेंट, सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक ते धेंपो फुटबॉल अकादमी आणि धेंपो उच्च माध्यमिक असा सोहमचा फुटबॉलमधील सध्याचा प्रवास थक्क करणारा आहे. फुटबॉल खेळात चेंडूवर नियंत्रण असणं हे अतिमहत्वाचे आहे. वेग, आक्रमकता तसेच चेंडूवरील नियंत्रण आणि शूट मारण्यात जबरदस्त ताकद असलेला सोहम नागवेकर हा भविष्यात गोव्याचाच नव्हे तर भारतीय फुटबॉलमध्ये एक मोलाचा खेळाडू होऊ शकतो. हडफडे-नागवास्थित माजी सरपंच कृष्णा नागवेकर यांच्या या पुत्राने आपल्या फुटबॉलमधील कौशल्याने आपण एक ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे आताच सिद्ध केले आहे.
रिलायन्स फुटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या कित्येक उच्च माध्यमिक स्कूलच्या क्रीडा शिक्षकांनी तर सोहमच्या खेळाची प्रशंसा केली आहे. मिळालेल्या संधींचे गोलमध्ये रूपांतर करण्यात माहिर असलेला सोहम हा भविष्यात कुठल्याही संघाचा एक ‘अॅसेट’ होऊ शकतो, असा अभिप्रायही दिला आहे. फुटबॉल खेळ हा जरी सांघिक खेळ असला तरी सोहमचा कुडतरीच्या सेंट आलेक्स, गुडीचे दामोदर उच्च माध्यमिक, नावेलीचे रोझरी आणि फादर आग्नेल उच्च माध्यमिक या बलाढ्या संघांविरूद्ध केलेला चतुरस्त्र खेळ त्याचा खेळाचा दर्जा सिद्ध करतोय. सोहमचा आतापर्यंतचा फुटबॉलमधील हा यशस्वी प्रवास कठोर परिश्रम, सराव, नियमित प्रशिक्षण याचा परिपाक आहे. कांदोळीतील सुपर 30 फुटबॉल अकादमीचा प्रशिक्षणार्थी असलेला सोहम भारताचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू रिकार्डो कार्दोज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे. पाच वर्षे रिकार्डोच्या तालमीत तयार झालेला सोहम आता धेंपो स्पोर्ट्स क्लबच्या 19 वर्षाखालील संघाचा नियमित सदस्य झाला असून आता तो प्रोफेशनल कारकिर्दीच्या आकांक्षासह आपले विकसित कौशल्य सुधारत आहे.
‘सुपर 30 पासून माझा झालेला फुटबॉलचा प्रवास ते धेंपो स्पोर्ट्स क्लबच्या युवा खेळाडू हा प्रवास माझ्यासाठी प्रेरणादायक आहे,’ असे सोहम नागवेकर म्हणाला. हल्लीच झालेली रिलायन्स यूथ फुटबॉल स्पर्धा हा तर माझ्यासाठी मैलाचा दगड होता, ज्यामुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला, असे सोहम म्हणाला. मला माझी ही उर्जा आणि मिळालेला थोडासा अनुभव मला मोठ्या सामन्यांसाठी वापरायचा असून ती मला मोठी आव्हाने पेलायलाही सज्ज करतील, असे सोहमला वाटते. रिलायन्स यूथ कपमध्ये सोहमची कामगिरी नेत्रदीपक होती. दामोदर गुडी, सेंट आलेक्स आणि शासकीय उच्च माध्यमिकविरूद्ध महत्त्वपूर्ण गोल केले तसेच निर्णायक लढतीत रोझरी उच्च माध्यमिकविरूद्ध केलेला गोल तर प्रेक्षणीय होता. सोहम नागवेकरचा सुपर 30 मधील आश्वासक कॅडेट ते 17 वर्षाखालील धेंपो युवा विभागातील प्रमुख खेळाडूपर्यंतचा प्रवास आणि रिलायन्स यूथ कपमधील त्याची उल्लेखनीय कामगिरी त्याची अफाट क्षमता आणि उज्ज्वल भविष्य दर्शवणारी ठरते. भूतकाळातील अनुभव आणि सध्याच्या प्रशिक्षणाने जोपासलेली त्याची प्रतिभा प्रतिभावंत फुटबॉलपटूंसाठी प्रेरणास्रोत आहे.
- संदीप मो. रेडकर