For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

ऑस्ट्रलियन आक्रमणाचा हेड

Advertisement

मागील दोन प्रमुख जागतिक स्पर्धांत भारत अंतिम फेरीत पोहोचून देखील हातातोंडाशी आलेला किताब हिरावून घेतला तो ऑस्ट्रेलियानं...त्यातही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अहमदाबादमध्ये वाट्याला आलेली निराशा वेगळीच...या दोन्ही वेळा आडवं आलं ते एकच नाव...ट्रेव्हिस हेड...

ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचं अधिपत्य करणारा डावखुरा सलामीवीर...

Advertisement

न, 2023... ‘आयसीसी’च्या जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम लढत...लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर बहुतेक फलंदाज धडपडत असताना ‘त्याच्या’ 174 चेंडूंत 25 चौकार व एका षटकारासह 163 धावांनी सारा सामना 360 अंशांत फिरविला. सामना एकदिवसीय की पाच दिवसांचा असं वाटण्यागत ती झंझावाती खेळी...खरं तर आघाडीची फळी कोलमडल्यानंतर त्यांना सावरलं होतं ते स्टीव्ह स्मिथच्या 268 चेंडूंतील 121 धावांनी. पण ‘त्याची’ खेळी इतकी जबरदस्त होती की, तिनं स्मिथच्या कामगिरीला झाकोळून टाकलं...दुसऱ्या डावात भलेही त्याचं नाणं वाजलं नसेल, पण पहिल्या डावात त्यानं लावलेला रेटा ऑस्ट्रेलियाला 209 धावांनी विजयी करण्यास पुरेसा ठरला...

नोव्हेंबर, 2023...पाच महिन्यांनंतर तोच खेळाडू पुन्हा एकदा आपल्या मनसुब्यांवर पाणी ओतण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल होईल अशी भारतीयांनी स्वप्नात देखील कल्पना केलेली नसेल...241 धावांचं लक्ष्य कांगारुंसाठी फारसं धोक्याचं ठरण्याची शक्यता कमीच होती. तरीही दुसऱ्या टोकाला बिनीचे शिलेदार बाद होऊ लागल्यावर दडपण येऊ लागलं होतं. परंतु तो डगमगला नाही. अशा परिस्थितीत कोणी तरी जबाबदारी शिरावर घेण्याची गरज होती. ते काम त्यानं मार्नस लाबुशेनला साथीला घेत तमाम केलं...भारतीय खेळाडूंची आशा जसजशी मावळू लागली तसतसे त्यानं भात्यातून फटके जास्तच वेगानं निघू लागले. गोलंदाजांची दमछाक करताना या 29 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजानं अर्धशतक झळकावलं ते 58 चेंडूंत, तर तेथून शतकापर्यंत पोहोचण्यास त्याला लागले त्याहून कमी म्हणजे 47 चेंडू...ट्रेव्हिस हेड...ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या जगज्जेतेपदाचा शिल्पकार...

‘पॉवरप्ले’मध्ये प्रतिस्पर्ध्यावर जबरदस्त हल्ला चढविणं हे ट्रेव्हिस हेडचं मूलभूत काम अन् अंतिम फेरीत त्यानं अगदी इमाने इतबारे केलं ते तेच...त्यापूर्वी उपांत्य लढतीत अर्धशतक झळकावून महत्त्वाच्या प्रसंगांसाठी आपण कसे उपयुक्त आहोत ते त्यानं व्यवस्थित दाखवून दिलं होतं...आपल्या विलक्षण फटकेबाजीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला गारद करण्याच्या क्षमता हेड कशी बाळगतो त्याची ज्यांना कल्पना आहे त्यांना विश्वचषकात त्यानं गाजविलेलं वर्चस्व पाहून आश्चर्य वाटणार नाही...असं असलं, तरी दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया विश्वचषक जिंकेल, तेही हेडच्या जोरावर, असं सांगितल्यास त्यावर कित्येकांचा विश्वास बसला नसता. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत डाव्या हाताला झालेल्या फ्रॅक्चरमुळं तो जवळजवळ बाजूला पडला होता अन् विश्वचषक त्याला हुकेल असंच वाटत होतं...

तरीही ट्रेव्हिसची संघात निवड झाली. भारतात दाखल झाल्यावर त्यानं संघासोबत विविध ठिकाणी प्रवास केला खरा, पण विश्वचषकातील पहिले तब्बल पाच सामने गमवावे लागले. तो पहिल्यादा मैदानात उतरला धरमशाला इथं न्यूझीलंडविऊद्ध. धावांचा रतीब ओतल्या गेलेल्या त्या लढतीत ऑस्ट्रेलिया 400 च्या उंबरठ्यावर पोहोचू शकला तो ट्रेव्हिसनं 67 चेंडूंत 109 धावांची बरसात केल्यानं...त्यानंतरच्या तीन सामन्यांत हेडची कामगिरी 11, 0, 10 अशी सुमार राहिलेली असली, तरी पुढील दोन अत्यंत महत्त्वपूर्ण लढतींत तो गरजेप्रसंगी मदतीला धावून आला...

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्यानं सुरुवातीलाच धडाका लावताना 48 चेंडूत काढलेल्या 62 धावांमुळं ऑस्ट्रेलियाला पडझड होऊनही उद्दिष्ट गाठणं शक्य झालं. तेवढ्यावरच त्याचं योगदान संपत नाही. तितकंच महत्त्वाचं काम त्यानं त्यापूर्वी पार पाडलं होतं ते गोलंदाजीत. ट्रेव्हिस हेडनं 31 व्या षटकात दोन चेंडूत घेतलेले दोन बळी हे बवुमाच्या संघाच्या घसरणीचं मुख्य कारण ठरलं. त्यानं हेन्रिक क्लासेन नि डेव्हिड मिलर यांची जोडी फोडली अन् त्यानंतर धोकादायक मार्को जॅनसेनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला...

...आणि मग अंतिम फेरीतील गाजलेला प्रताप...तो दिवस ट्रेव्हिस हेडचा असू शकतो याचे संकेत भारतीय डावातील 10 व्या षटकाच्या सुऊवातीलाच मिळाले होते. त्यावेळी रोहित शर्मानं मॅक्सवेलच्या चेंडूवर हाणलेला फटका नीट न बसून चेंडू वर गेल्यानंतर त्यानं पटकन कव्हर-पॉईंटवरून

काही यार्ड मागं धावत सूर मारून अफलातून झेल पकडला. हा सामन्यातील एक ‘टर्निंग पॉईंट’...कारण हाणामारीच्या मूडमध्ये असलेला रोहित आणखी काही वेळ टिकला असता, तर भारताची धावसंख्य बरीच फुगली असती...परंतु हेडचा खरा

‘नॉकआऊट पंच’ आपल्यावर बसला तो लढाऊ शतकाच्या रूपानं... भारतातील संथ, चेंडू वळणाऱ्या खेळपट्या ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरतील असं वाटत होतं. पण उपांत्य व अंतिम सामन्यामध्ये ट्रेव्हिस हेडनं खेळपट्टीची पर्वा न करता

ऑस्ट्रेलियाला वेगवान सुऊवात करून दिली. अहमदाबादेत रात्रीच्या वेळी दव पडलेल्या स्थितीत फलंदाजी करणं थोडं सोपं बनलं हे मान्य केलं, तरी हेड या विश्वचषकातील सर्वोत्तम गणल्या गेलेल्या भारतीय गोलंदाजीला तोंड देत होता हे नजरेआड करता येणार नाही. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसतानाही समावेश करून ऑस्ट्रेलियानं त्याच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ असल्याचं सिद्ध करणारी ही सनसनाटी कामगिरी...

गरज पडेल तेव्हा नांगर घालून डाव सावरणं अन् वेळप्रसंगी ‘फिनिशर’ची भूमिका बजावणं यात हातखंडा असलेल्या मायकेल हसीची जागा घेऊ शकणारा खेळाडू म्हणून सुरुवातीला ट्रेव्हिस हेडकडे पाहिलं जायचं. खरं तर तो मधल्या फळीतील फलंदाज. पण 2017 पासून एकदिवसीय सामन्यात सलामीला यायला लागला. हा प्रयोग अर्थात फार काळ चालला नाही...त्याला कसोटी संघाची दारं उघडी झाली ती ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणानंतर अन् त्यानं त्याचा व्यवस्थित फायदा घेतला. तर ‘वनडे’तील सलामीवीराची भूमिका त्याच्याकडे पुन्हा चालून आली ती अॅरॉन फिंचच्या निवृत्तीमुळं...आता विश्वचषकातील जबरदस्त कामगिरीनं महत्त्वपूर्ण सामन्यांच्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धावून येणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील ट्रेव्हिस हेडचं स्थान पक्कं केलंय यात शंका नाही !

तडाखेबंद कामगिरी

  • ट्रेव्हिस हेडनं न्यूझीलंडविऊद्ध अवघ्या 59 चेंडूंमध्ये झळकावलेलं शतक हे विश्वचषकातील ऑस्ट्रेलियन फलंदाजाचं तिसरं सर्वांत जलद शतक...सर्वांत जलद शतक आहे ते ग्लेन मॅक्सवेलच्या खात्यावर...
  • भारतीय खेळाडूंना निराश करून टाकणारी चौथ्या यष्टीसाठीची हेड नि मार्नस लाबुशेन यांच्यातील ‘मॅच
  • विनिंग’ भागीदारी ही तब्बल 192 धावांची राहिली. विश्वचषकाच्या अंतिम लढतीच्या इतिहासात कोणत्याही यष्टीसाठी जोडलेल्या त्या दुसऱ्या क्रमांकाच्या धावा...विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वोच्च भागीदारी आहे ती रिकी पाँटिंग आणि डॅमियन मार्टिन यांच्या नावावर (तिसऱ्या यष्टीसाठी नाबाद 234 धावा)...
  • हेड-लाबुशेन जोडीनं केलेली ही कामगिरी म्हणजे यंदाच्या विश्वचषकातील भारताविरुद्धची सर्वाधिक भागीदारी. त्यापूर्वी वानखेडेवरील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या केन विल्यमसन नि डॅरिल मिचेल यांनी जोडलेल्या 181 धावांना त्यांनी मागं टाकलं...

विश्वचषकातील छाप

  • अंतिम लढतीत 15 चौकार आणि सहा षटकारांच्या साहाय्यानं 120 चेंडूंत 137 धावा कुटून भारताचं विश्वचषकाचं स्वप्न एकहाती भंग करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड हा उपांत्य नि अंतिम फेरीतही सामनावीर ठरलेला आजवरचा केवळ चौथा खेळाडू...
  • एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सामनावीर ठरण्याचा मान मिळालेला हेड हा सहावा ऑस्ट्रेलियन खेळाडू. विशेष म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियानं भारतावर मिळविलेल्या विजयात देखील ‘मॅन ऑफ दि मॅच’ किताब चालून गेला होता तो त्याच्याकडेच...
  • भारताच्या मोहिंदर अमरनाथनी सर्वप्रथम 1983 मध्ये असा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर श्रीलंकेच्या अरविंद डिसिल्वानं 1996 साली संघानं मिळविलेल्या विजेतेपदाच्या वेळी त्याची पुनरावृत्ती घडविली, तर 1999 मध्ये हा मान मिळविला तो ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्ननं...
  • कांगारुंचा हा 29 वर्षीय डावखुरा फलंदाज विश्वचषकाच्या अंतिम लढतीत शतक फटकावणारा 48 वर्षांच्या इतिहासातील एकंदरित सातवा फलंदाज. यापूर्वी तो टप्पा गाठून दाखविला होता श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार महेला जयवर्धनेनं. त्यानं 2011 मध्ये भारताविऊद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शतकी खेळी केली होती...
  • त्याचप्रमाणं रिकी पाँटिंग व अॅडम गिलख्रिस्ट यांच्यानंतर अंतिम सामन्यात शतक झळकावणारा ट्रेव्हिस हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू, तर लक्ष्याचा पाठलाग करताना असा प्रताप गाजविलेला आजवरचा अरविंद डिसिल्वानंतरचा केवळ दुसरा फलंदाज...

ट्रेव्हिस हेडची फलंदाजी...

  • प्रकार     सामने    डाव      नाबाद    धावा      सर्वोच्च    सरासरी   शतकं    अर्धशतकं
  • कसोटी   42        69        5         2904      175       45.38     6         16
  • वनडे     64        61        4         2393      152       41.98      5         16
  • टी20      20        19        3         460       91        28.75     -         1
  • आयपीएल 10        10        3         205       75        29.29     -         1

‘वनडे’ विश्वचषकाच्या अंतिम लढतीतील शतकवीर...

  • खेळाडू   धावा      विरुद्ध संघ          स्थळ     साल
  • एडम गिलख्रिस्ट     149       श्रीलंका   ब्रिजटाऊन          2007
  • रिकी पाँटिंग         नाबाद 140 भारत     जोहान्सबर्ग          2003
  • व्हिव रिचर्ड्स        नाबाद 138 इंग्लंड    लॉर्ड्स    1979
  • ट्रेव्हिस हेड          137       भारत     अहमदाबाद         2023
  • अरविंद डिसिल्वा    नाबाद 107 ऑस्ट्रेलिया          लाहोर    1996
  • महेला जयवर्धने      नाबाद 103 भारत     मुंबई     2011
  • क्लाईव्ह लॉईड      102       ऑस्ट्रेलिया          लॉर्ड्स    1975

  राजू प्रभू

खेळ जुनाच ओळख नवी : स्क्वे मार्शल आर्ट

काश्मीरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हटलं जातं. त्याशिवाय ते अनेक स्वदेशी कौशल्यांचंही केंद्र असून त्यापैकी एक म्हणजे ‘स्क्वे मार्शल आर्ट’...या प्रकाराची मूळं काश्मीरच्या इतिहासाच्या सुऊवातीच्या काळापर्यंत म्हणजे अगदी ख्रिस्तपूर्व 4012 पर्यंत जातात आणि पुराणकथांमध्येही त्याचा उल्लेख आढळतो. असं मानलं जातं की, नागा लोकांनी ‘इंडो-आर्यन’ आक्रमणांपूर्वी तो जन्मास घातला आणि नंतर सिंहासनावर आलेल्या विविध राजांनी त्याला संरक्षण दिलं...

  • एकेकाळी विविध राजवटीतील काश्मिरी सैनिकांसाठी ‘स्क्वे मार्शल आर्ट’चं प्रशिक्षण अनिवार्य होतं. मात्र 18 व्या शतकापासून दुर्लक्ष नि उदासीनतेमुळं काश्मीरच्या या पारंपरिक युद्धकलेला संरक्षण मिळालं नाही आणि ती अडगळीत गेल्यासारखी अवस्था झाली. त्याला संजीवनी मिळू लागली ती सुमारे तीन दशकांपूर्वीपासून अन् यात ग्रँडमास्टर नझीर अहमद मीर यांचा वाटा मोलाचा मानला जातो...
  • आता तो क्रीडाप्रकार म्हणून उभरला असून या खेळाच्या प्रसारासाठीच्या प्रयत्नांना फळं मिळू लागली आहेत. ‘स्क्वे’चा अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळाच्या कार्यक्रमपत्रिकेत समावेश करण्यात आलाय. त्याशिवाय महाराष्ट्रानं हा खेळ स्वीकारलाय...थायलंड हा ‘स्क्वे’चा स्वीकार करणारा पहिला देश. सध्या भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, सीरिया, जॉर्डन, इराक, सायप्रस, रशिया, अझरबैजान आणि श्रीलंका यासह 62 हून अधिक देशांमध्ये ‘स्क्वे’ एक क्रीडाप्रकार बनलाय...
  • या क्रीडाप्रकारात गुण मोजण्याच्या पद्धतीसह विविध ‘कमांड’साठी वापरण्यात आलेली भाषा काश्मिरी असली, तरी त्याचे भाषांतर बिगरकाश्मिरींसाठी उपलब्ध असते. यात एकेरी तलवार, दुहेरी तलवार, हात आणि ढाल यांचा वापर होतो. ‘तुरा’ म्हणजे ‘स्क्वे’ तलवार ही चामड्याचे आवरण असलेली आणि बांबूपासून बनलेली असते. तर ‘बारगुला’ म्हणजे ढाल ही चामड्याची असते...
  • स्क्वे’चे दोन विभाग आहेत-एक ‘लोबा’ किंवा लढाऊ प्रकार आणि दुसरा कलात्मक प्रकार. ‘कलात्मका’मध्येही दोन प्रकार आहेत, एक संगीत नसलेला (ख्वांकी) आणि दुसरा संगीतासह (एअरोस्क्वे)...
  • गोव्यात झालेल्या 37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये ‘स्क्वे मार्शल आर्ट’चा समावेश राहिला, जो काश्मीरमधील सर्व लोकांसाठी एक मोठा सन्मान म्हणायला हवा. त्यामुळे या खेळाच्या प्रसाराला मोलाची चालना मिळेल...

भारतीय महिला क्रिकेट संघात सिंधुदुर्गचा तारा

संघात निवड झाल्याने सर्वत्र कौतुक : अष्टपैलू खेळाडू प्रकाशिका नाईकच्या निवडीने आंबडोसमध्ये आनंदोत्सव सुऊवातीला भारताच्या 19 वर्षांखालील महिलांच्या संघात स्थान प्राप्त केल्यानंतर ती मुंबई महिला संघाची उपकर्णधार झाली. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी-20 राष्ट्रीय स्पर्धेत तिच्या नेतृत्वाखाली मुंबईने जेतेपद पटकावले.

रतात सर्वात लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे क्रिकेट. अशा या क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात मूळ मालवण तालुक्यातील आंबडोसची सुकन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हिची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी-20 महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळवून देण्यात प्रकाशिकाने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या निवड यादीत तिची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड केली आहे. प्रकाशिकाच्या निवडीने आंबडोस गावचे नाव भारताच्या क्रीडा क्षेत्रात उंचावले आहे. शालेय जीवनापासून क्रिकेटची आवड असलेल्या प्रकाशिकाने या खेळात उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. सुऊवातीला भारताच्या 19 वर्षांखालील महिलांच्या संघात स्थान प्राप्त केल्यानंतर ती मुंबई महिला संघाची उपकर्णधार झाली. त्यानंतर ती मुंबई संघाची कर्णधार म्हणून कार्यरत होती. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया

टी-20 स्पर्धेत मुंबई संघाला

चॅम्पियनशिप मिळाली. यात प्रकाशिकाच्या अष्टपैलू खेळाने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे तिची भारतीय महिला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

 इंग्लंडविऊद्ध 29 पासून सामने

इंग्लंडचा अ महिला संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. 29 नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर हे सामने होत आहेत. 29 नोव्हेंबर व 1, 3 डिसेंबर असे एकूण तीन सामने होणार असून त्यात प्रकाशिका खेळणार आहे.

 नवी मुंबई-वाशी येथे वास्तव्य

मूळची आंबडोस येथील रहिवासी असलेली प्रकाशिका सध्या वाशी-नवी मुंबई येथे वास्तव्यास आहे. सेक्टर 15, वाशी येथे राहणाऱ्या प्रकाशिकाने रिझवी कॉलेजमधून बी.कॉम केले. तिचे प्रारंभिक शिक्षण न्यू बॉम्बे स्कूलमध्ये झाले. क्रिकेटचे प्राथमिक शिक्षण तिने प्रशिक्षक साटम सर यांच्याकडे घेतले. नंतर तिने अजय नाईक आणि माजी यष्टिरक्षक सुलक्षणा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाची कौशल्ये आत्मसात केली. नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून तिने व्यापक प्रशिक्षण घेतले.

कर्णधार म्हणून यशस्वी झाली

अंडर-19 भारतीय महिला संघासह तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुऊवात केली. प्रकाशिकाने मुंबई महिला संघाची उपकर्णधार म्हणून झपाट्याने प्रसिद्धी मिळविली आणि अखेरीस कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. उजव्या हाताच्या फिरकी गोलंदाजीच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेली, ती फलंदाजीतही तरबेज आहे. प्रकाशिकाच्या भारतीय संघातील समावेशाच्या घोषणेने नवी मुंबईत तिचे कौतुक होत आहे. उल्लेखनीय कामगिरीमुळे तिचे गाव आणि शहर जागतिक स्तरावर ओळखले जाणार आहे.

आंबडोस गावात आनंद व्यक्त

प्रकाशिका ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती राईट आर्म स्पिनर आहे. तसेच स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणे ही तिची स्पेशालिटी आहे. ती राईट आर्म उत्तम फलंदाज आहे. तिच्या निवडीने आंबडोस परिसरात आनंद व्यक्त होत आहे. तिच्या निवडीने आपल्या गावाचे नाव जगाच्या पाठिवर पोहोचणार असल्याच्या भावना आंबडोसवासियांकडून व्यक्त होत आहेत. यासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रकाशिका सध्या सराव करत असून ती ज्यावेळी गावात येईल, त्यावेळी तिचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. भारतीय पुरुष संघाने वर्ल्ड कपमध्ये दर्जेदार कामगिरी करून उपविजेतेपद पटकावले. आता महिला संघही दर्जेदार कामगिरी करून वर्ल्ड कप भारतात आणेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

-संतोष गावडे

Advertisement
Tags :

.