स्पोर्ट्स mania
फिरकीच्या विश्वातील उगवता ‘रवी’ !
भारताचा गोलंदाजीतील उगवता तारा रवी बिश्नोईनं नुकतंच अफगाणिस्तानचा प्रसिद्ध फिरकीपटू रशिद खानला खाली खेचून ‘टी-20’तील अव्वल गोलंदाजाचं स्थान हस्तगत केलंय...ही झेप घेताना त्यानं श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा नि महेश थीक्षाना, इंग्लंडचा आदिल रशिद यासारख्यांनाही मागं टाकलं...‘टी-20’ विश्वचषक झपाट्यानं जवळ पोहोचत असताना बिश्नोईनं या प्रकारातील भारताचा सर्वांत घातक फिरकीपटू म्हणून आपलं स्थान मागील काही काळात निश्चितच मजबूत केलंय...
भारताला लेगस्पिनरच्या बाबतीत मोठी परंपरा लाभलीय...त्यात सुभाष गुप्ते, भागवत चंद्रशेखर यांच्यापासून नरेंद्र हिरवाणी, अनिल कुंबळेपर्यंत अनेकांचा समावेश होतो. आता आणखी एक नाव आपली छाप उमटवू लागलंय, ‘लंबी रेस का घोडा’ ठरण्याची चिन्हं दाखवू लागलंय...रवी बिश्नोई...दक्षिण आफ्रिकेच्या सध्या चालू झालेल्या दौऱ्याच्या आधी मायदेशी खेळविण्यात आलेल्या ‘टी-20’ मालिकेत भारतानं ‘वनडे’ विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा फडशा पाडून दाखविला. त्यात राजस्थानच्या या युवा फिरकी जादुगाराचा मोलाचा वाटा राहिला...त्याशिवाय त्या मालिकेनं 23 वर्षीय बिश्नोईला वैयक्तिक आघाडीवर गाठून दिला तो आणखी एक मैलाचा दगड. ‘टी-20’च्या ताज्या ‘आयसीसी’ क्रमवारीत गोलंदाजांच्या विभागात तो अव्वल स्थानी झळकलाय...
रवी बिश्नोईनं ‘टी-20’च्या विश्वात पाऊल ठेवलं ते गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये. तेव्हापासून तो फक्त 21 सामने खेळलाय. परंतु फसवी ‘गुगली’ अन् फलंदाजाला बेमालूमपणे चकविणारी विविधता यामुळं तो इतर गोलंदाजांहून ठसठशीतपणे उठून दिसलाय. त्यानं ‘टी-20’मध्ये 7.14 इतका प्रभावी ‘इकोनॉमी रेट’ आणि 17.38 च्या सरासरीसह एकूण 34 बळी घेतलेत. ही कामगिरी निश्चितच दाद द्यायला भाग पाडणारी. कारण क्रिकेटचा हा सर्वांत लहान प्रकार ‘गोलंदाजांचा कत्तलखाना’ म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत एका फिरकीपटूनं, खास करून लेगस्पिनरनं ठसा उमटविणं हे लक्षणीय...
रवी बिश्नोईच्या कारकिर्दीनं एक नवीन शिखर गाठलं ते ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिकेत. त्यात या युवा फिरकीपटूनं 18.22 च्या सरासरीनं एकूण नऊ बळी घेतले. पाच सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीचे आकडे कसे प्रभावी राहिले ते पाहणं उद्बोधक ठरेल...32 धावांत 3 बळी, 32 धावांत 2 बळी, 29 धावांत 2 बळी, 17 धावांत 1 बळी अन् 54 धावांत 1 बळी...चौथ्या सामन्यानंतर बिश्नोई गोलंदाजी प्रशिक्षकाला म्हणाला होता, ‘मी माझ्या गोलंदाजीवर खरंच खूप आनंदित आहे. भविष्यातही अशीच कामगिरी करत राहीन’...त्याचा वेगानं येणारा ‘टॉपस्पिन’ आणि घातक ‘गुगली’ यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गोंधळवून टाकलं. या मालिकेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून उभरला तो रवीच. त्यामुळं मालिकावीराचा किताब त्याच्याकडे चालून जाणं यात नवल वाटण्याजोगं काही नव्हतं...
या चमकदार कामगिरीमुळं श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक मुथय्या मुरलीधरन यालाही त्याची प्रशंसा केल्याशिवाय राहवलं नाही. मग भारताच्या इतर फिरकीपटूंपासून तो कसा वेगळा आहे याचं विश्लेषण करताना मुरलीधरननं सांगितलं, ‘भारताला प्रत्येक पिढीमध्ये फिरकीपटूंचा चांगला संच लाभलाय. अनिल कुंबळेपासून रविचंद्रन अश्विनपर्यंत आणि आता जे तऊण खेळाडू आलेत त्यांच्याकडे पाहता बिश्नोई हा इतर लेगस्पिनरपेक्षा वेगळा. तो वेगानं गोलंदाजी करून चेंडूला भरपूर ‘स्लाईड’ करतो. अक्षर पटेल खूप अचूक आहे, पण तो चेंडू फारसा वळवत नाही. वाशी (वॉशिंग्टन सुंदर) देखील अक्षरसारखाच. तोही चेंडू जास्त वळवत नाही, मात्र खूप अचूक नि थोडासा जास्त वेगानं गोलंदाजी करतो’...
रवी बिश्नोई सर्वप्रथम प्रकाशझोतात आला तो 2020 साली 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत 17 बळींनिशी आघाडीचा गोलंदाज ठरल्यानं. त्या स्पर्धेत बांगलादेशनं चषक उचलण्यात यश मिळवून भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं...याभरात बिश्नोईनं काही विक्रमही मोडीत काढले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात चार बळी घेण्याच्या बाबतीत तो पियुष चावला (2006) नि संदीप शर्मा (2012) यांच्या पंक्तीत दाखल झाला. याशिवाय शलभ श्रीवास्तव (2000), अभिषेक शर्मा (2002), कुलदीप यादव (2014) व अनुकूल रॉय (2018) यांना मागं टाकून एका विश्वचषक स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरण्याचा मान देखील त्यानं पटकावला...
यंदा अहमदाबादमध्ये एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक हाती येता येता निसटल्यानंतर आता भारताला वेध लागलेत ते कॅरिबियन भूमीत नि अमेरिकेत होणार असलेल्या ‘टी-20’ विश्वचषकाच. त्यासाठीचा संघ निश्चित करण्यावर सध्या लक्ष केंद्रीत झालंय. पण गोलंदाजीचा विचार करताना बिश्नोईकडे दुर्लक्ष करणं कठीण...विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा संधी मिळालीय तेव्हा तेव्हा त्यानं चमकदार कामगिरी करून दाखविलीय. त्याचा ‘इकोनॉमी रेट’ हा भारताच्या सध्याच्या गोलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट आकड्यांपैकी एक. असं असलं, तरी विश्वचषकात धडाका दाखविण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आगामी मोजक्या ‘टी-20’ लढती नि ‘आयपीएल’मधील बिश्नोईच्या कामगिरीवर बरंच काही अवलंबून राहील !
अन् स्वत:च उभारली क्रिकेट अकादमी...
5 सप्टेंबर, 2000 रोजी जन्मलेला रवी बिश्नोई हा राजस्थानच्या जोधपूरमधील बिरामी गावातील...पश्चिम राजस्थानमधील क्रिकेट संस्कृतीचा अभाव नि प्रशिक्षणासाठी असलेल्या अपुऱ्या सुविधा यामुळं त्यानं काही मित्र व प्रशिक्षकांच्या मदतीनं स्वत:च क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी पुढाकार घेतला. उद्दिष्ट होतं ते नीट प्रशिक्षण घेता यावं हे. त्यापोटी या सर्वांनी आर्थिक अडचणींमुळं प्रसंगी गवंडीकामही करण्यास मागंपुढं पाहिलं नाही. मग त्याला दिलं गेलं ‘स्पार्टन्स क्रिकेट अकादमी’ असं नाव...
खडतर प्रवास...
- या युवा भारतीय लेगस्पिनरचं नाव आता भरपूर चमकत असलं, तरी त्याच्या यशाचा मार्ग सोपा राहिलेला नाहीये...रवी बिश्नोईला राजस्थानचा संघ निवडण्यासाठी झालेल्या 16 वर्षांखालील चाचणीत एकदा आणि 19 वर्षांखालील चाचणीत दोनदा नकार पचवावा लागला होता. परंतु त्याच्या प्रशिक्षकांनी निवड समितीकडे शब्द टाकताना त्याला आणखी एकदा विचारात घ्यावं अशी विनंती केली अन् अखेरीस बिश्नोईला संधी मिळाली ती राजस्थानच्या 19 वर्षांखालील संघात...
- मात्र या तऊणापुढील अडथळे तिथेच थांबले नाहीत...मार्च, 2018 मध्ये ‘आयपीएल’ सुरू होण्यापूर्वी बिश्नोईला ‘राजस्थान रॉयल्स’कडून ‘नेट बॉलर’ म्हणून बोलावणं आलं. पण त्यातून मोठा बाका प्रसंग उद्भवला. कारण नेमकी त्याचवेळी बारावीची बोर्डची परीक्षा होणार होती. मग रवीनं वडिलांच्या इच्छेविऊद्ध जाऊन परीक्षा टाळण्याचा कठीण निर्णय घेतला. ‘राजस्थान रॉयल्स’च्या फलंदाजांना जाळ्यात सरावावेळी गोलंदाजी करण्याची आपली पाळी कधी येते याची वाट भलेही पाहावी लागलेली असेल, पण त्याचा अंदाज अचूक ठरला. निवड समितीतील अनेकांच्या नजरेत त्याची लेगस्पिन भरल्याशिवाय राहिली नाही...
चार वर्षांत मोठी झेप...
- 2019 : रवी बिश्नोईनं 21 फेब्रुवारी रोजी राजस्थानतर्फे ‘टी-20’मध्ये पदार्पण केलं ते 2018-19 मोसमातील सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतून...मग सप्टेंबरमध्ये 2019-20 मोसमाच्या विजय हजारे चषक स्पर्धेतून ‘अ’ श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल. एका महिन्यानंतर त्याला देवधर चषक स्पर्धेतील भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आलं...
- देशांतर्गत स्पर्धांत बिश्नोईनं केलेली कामगिरी लिलावात उतरणाऱ्या काही ‘आयपीएल’ संघांचं सुद्धा लक्ष वेधून गेल्याशिवाय राहिली नाही. मग डिसेंबरमध्ये, 2020 च्या स्पर्धेपूर्वी त्याला ‘किंग्स इलेव्हन पंजाब’नं (आताचा ‘पंजाब किंग्स’) करारबद्ध केलं...
- 2020 : बिश्नोईसाठी हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाचं राहिलं. दक्षिण आफ्रिकेतील 19 वर्षांखालील विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात त्याची वर्णी लागली. या स्पर्धेतील जपानविऊद्धच्या सामन्यात त्यानं एकही धाव न देता चार बळी घेतले. स्पेल संपला तेव्हा आठ षटकांत केवळ पाच धावा देऊन चार बळी अशी त्याची आकडेवारी होती...बिश्नोईच्या लेगस्पिनचा हा धडाका स्पर्धा संपेपर्यंत कायम राहिला...
- पंजाबच्या संघातर्फे 20 सप्टेंबर रोजी ‘दिल्ली कॅपिटल्स’विऊद्ध रवी बिश्नोई ‘आयपीएल’मध्ये सर्वप्रथम उतरला आणि पदार्पणाच्या सामन्यात त्यानं पहिला बळी घेतला तो रिषभ पंतचा. त्या हंगामात त्याच्या खात्यात 12 बळी जमा झाले अन् ‘आयपीएलचा उदयोन्मुख खेळाडू’ या पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं...
- 2022 : जानेवारीत रवी बिश्नोईला भारतीय संघाची दारं उघडी झाली ती मायदेशातील वेस्ट इंडिजविऊद्धच्या एकदिवसीय नि ‘टी-20’ लढतींसाठी. 16 फेब्रुवारी रोजी कॅरिबियन्सविऊद्धच्या ‘टी20’ सामन्यातून त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्यात बिश्नोईनं अवघ्या 17 धावा देऊन दोन फलंदाजांना गारद करत पदार्पणाच्या लढतीत सामनावीर ठरण्यात यश मिळविलं...त्याच महिन्यात ‘आयपीएल’मध्ये दाखल झालेल्या ‘लखनौ सुपर जायंट्स’ या नव्या संघानं त्याला आपल्या दिशेनं खेचलं...
- गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या मालिकेसाठी रवी बिश्नोईला भारताच्या एकदिवसीय संघात सामावून घेण्यात आलं अन् 6 ऑक्टोबर रोजी त्यानं आपलं ‘वनडे’ पदार्पण साजरं करताना एक बळी घेतला...
- 2023 : यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये त्यानं ‘लखनौ सुपर जायंट्स’तर्फे टिपले 16 बळी...हा लेगस्पिनर चीनमधील हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई खेळांत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग राहिला...
खेळ जुनाच, ओळख नवी : ड्युबॉल...
विविध खेळांचं मिश्रण असलेल्या ‘ड्युबॉल’चा महाराष्ट्रातील नागपुरात उगम नि विकास झाला अन् तिथून त्याचा झपाट्यानं प्रसार झाला...भारत त्याला खऱ्या अर्थानं ‘मेड इन इंडिया’ क्रीडाप्रकार म्हणू शकतो. आता तो 25 देशांमध्ये पोहोचलेला असल्यानं त्याला आंतरराष्ट्रीय खेळाचं स्वरुप आलंय...
- 2013 साली उदयाला आलेल्या या खेळाचे जनक ठरण्याचा मान माजी फुटबॉल नि हॉकी खेळाडू तसंच ‘आंतरराष्ट्रीय ड्युबॉल महासंघा’चे संस्थापक फिरोझ खान यांच्याकडे जातो. त्यांनी तुटलेला बास्केटबॉल बोर्ड घेऊन काही मुलं एक प्रकारचा नाविन्यपूर्ण खेळ खेळताना पाहिलं अन् त्याच्यावेळी त्यांच्या मनात ही कल्पना चमकली...
- ‘ड्युबॉल’ हे बास्केटबॉल, हँडबॉल आणि फुटबॉल या तीन अत्यंत लोकप्रिय खेळांचं मिश्रण...20 सप्टेंबर, 2013 रोजी नागपुरात या खेळाची पहिली फेडरेशन चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि म्हणूनच हा दिवस ‘जागतिक ड्युबॉल दिन’ म्हणून साजरा केला जातो...
- हा वेगवान खेळ ‘इनडोअर’ किंवा मैदानात, गवताच्या कोर्टवर अथवा कृत्रिम टर्फ, ‘हार्ड ग्राऊंड’वरही खेळला जाऊ शकतो. त्याची एक आवृत्ती किनाऱ्यांवर खेळली जाऊ शकते आणि म्हणूनच त्याला ‘बीच ड्युबॉल’ म्हटलं जातं...
- ‘ड्युबॉल’ वरिष्ठ नि कनिष्ठ गटांत 24×40 मीटरच्या मैदानात, तर उपकनिष्ठ गटात 20×38 मीटरच्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या प्रत्येक बाजूच्या शेवटी एक बोर्ड (ड्यू बोर्ड) असतो. हा 1.2 मीटरचा बोर्ड जमिनीपासून 4 मीटर उंचीवर असतो आणि त्याच्या मध्यभागी एक छिद्र असतं, ज्याचा व्यास 60 सेंटिमीटरचा असतो. खेळाडूंचं मुख्य उद्दिष्ट चेंडू छिद्रातून टाकून गोल म्हणजे ‘ड्यू’ करण्याचा असतो. या खेळातील चेंडूचा आकार बास्केटबॉलसारखा असतो...
- ‘ड्युबॉल’चे सामने प्रत्येकी 20 मिनिटांच्या दोन सत्रांचे असतात आणि 5 मिनिटांचं मध्यांतर. संघांनी जास्तीत जास्त ‘ड्युस’ (गोल) नोंदविण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं अन् निर्धारित 40 मिनिटांच्या शेवटी सर्वाधिक गुण नोंदविणारा संघ सामना जिंकतो...
- ‘ड्युबॉल’ संघात एकंदरित 12 खेळाडू असले, तरी प्रत्यक्ष मैदानात सात खेळाडूंचा चमू खेळतो. त्यात सहा खेळाडू व एक गोलरक्षक...मैदानात दोन ‘डी’ आकाराची क्षेत्रं असतात. त्यापैकी मोठ्या ‘डी’ विभागात गोलरक्षक राहतो, मात्र तो लहान ‘डी’ क्षेत्रात जाऊ शकत नाही...गोलरक्षक आपलं ‘डी’ क्षेत्र सोडून बाहेर येंऊ शकतो अन् त्याला त्यावेळी खेळाडू म्हणून गणलं जातं. परंतु तो इतर खेळाडूंप्रमाणं अर्ध्यापेक्षा जास्त मैदान ओलांडून जाऊ शकत नाही...
- चेंडू एखाद्या खेळाडूला पाच सेकंदांपर्यंतच हातात धरून ठेवता येतो. त्यानंतर तो फेकून पास करावा लागतो. ‘अंडर आर्म पास’ला यात अनुमती नाही. खेळाडूंनी एकमेकांच्या शरीराच्या संपर्कात येणंही वर्ज्य...
- ‘सेंटर लाईन’पासून 2.5 मीटरांवर ‘डॅश लाइन’ असते आणि जर एखाद्या खेळाडूनं तिथून गोल केला, तर बास्केटबॉलच्या धर्तीवर 2 गुण मिळतात...फुटबॉलप्रमाणं यात ‘कॉर्नर’ अन् ‘पेनल्टी स्ट्रोक’ही असतो...
- या क्रीडाप्रकारात खेळाडू बदलण्याच्या बाबतीत कोणतेही निर्बंध नाहीत आणि संघांनी तसे करण्यापूर्वी फक्त संबंधित अधिकाऱ्याला सूचित करणं आवश्यक...‘ड्युबॉल’मध्ये सर्व खेळाडू पुढं जाऊन आक्रमण करतात अन् बचावासाठी त्यांना मागं धाव घेऊनही यावं लागतं. परिणामी चपळता, सहनशक्ती, वेग, स्टॅमिना अन् दबावाखाली झटपट निर्णय घेण्याचं कौशल्य यांचा कस लागतो...
जिद्दीपुढे आकाश ठेंगणे
शारीरिक व्यंग असूनही सतत हसत खेळत राहून समाजाला ऊर्जा देणारे मोजकेच असतात. त्यापैकी एक म्हणजे सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावाची प्राजक्ता माळकर म्हणजेच ‘जपा’. तिने आपल्या कर्तृत्वानं सर्वांची मने जिंकली. आता तर तिने राष्ट्रीय दिव्यांगांच्या उमंग राष्ट्रीय करंडक महिला क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेत आणखी एक झेप घेतली आहे. खेळात हारजीत असतेच. पण मैदानावर उतरणे महत्वाचे. त्यामुळेच ‘जपा’ कौतुकास पात्र ठरली आहे. भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेला महाराष्ट्र संघ आता परतलाय. पण खूप अनुभव गाठीशी घेऊन.
-राजेश मोंडकर