For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

भरवशाचा मोहरा...श्रेयस अय्यर!

Advertisement

भारतीय संघाची यंदाच्या विश्वचषकातील जबरदस्त मोहीम म्हणजे सांघिक प्रयत्नाचा एक उत्कृष्ट आविष्कार...त्यात सर्वांनीच आपापल्या परीनं योगदान दिलंय. सुरुवातीच्या अपयशामुळं टीकेचा धनी बनलेला श्रेयस अय्यरही त्याला अपवाद राहिलेला नाही...स्पर्धा जसजशी पुढं सरकत गेली तसतसा विलक्षण आक्रमक पद्धतीनं खेळणारा मधल्या फळीतील भरवशाचा मोहरा म्हणून तो आपली छाप अधिक गडद करत गेलाय....

भारत शेवटी 142 कोटी भारतीयांच्या अपेक्षांना जागत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तुफानावत धडकलाय...हा मार्ग खुला करताना रोहित शर्माच्या संघानं ज्या प्रकारे घातक न्यूझीलंडला उपांत्य फेरीत लोळविलं ते आतापर्यंतच्या त्यांच्या स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरीस साजेसं अन् वानखेडेवर बराच काळ त्याचे पडसाद गुंजत राहणार...या विजयात सर्वाधिक गाजावाजा झाला तो विराट कोहलीच्या 50 व्या एकदिवसीय शतकाचा. कारण ते महान सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याच्या साक्षीनं मोडणारं...त्याच्या खालोखाल बोलबाला झाला तो सातत्यानं भेदक गोलंदाजी केलेल्या, सामनावीर ठरलेल्या मोहम्मद शमीच्या सात बळींचा...पण तितकीच मोलाची शतकी खेळी श्रेयस अय्यरची सुद्धा...त्यानं 70 चेंडूंत चार चौकार नि आठ षटकारांची बरसात करत काढलेल्या 105 धावांमुळं भारतीय डाव ‘टॉप गीअर’मध्ये जात 400 च्या उंबरठ्यावर पोहोचू शकला. किवीजसमोरचं आव्हान कठीण बनलं ते तिथंच...

Advertisement

पण विश्वचषकाचा नारळ फुटण्यापूर्वी परिस्थिती काय होती ?...संघात श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आल्यानंतर अनेकांनी या निर्णयावर टीकेचे कोरडे ओढले होते. कारण पाठीवरील शस्त्रक्रियेमुळं तो यंदाच्या एप्रिलपासून एकही व्यावसायिक सामना खेळला नव्हता. सदर शस्त्रक्रियेनंतर त्यानं बराच वेळ घालवला तो त्यातून सावरण्याच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत...खरं तर भारताच्या एकदिवसीय संघात श्रेयसचं पुनरागमन श्रीलंकेत खेळविण्यात आलेल्या आशिया चषकाच्या वेळीच झालं होतं. पण तिथंही नेमक्या पाकिस्तानविऊद्धच्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी त्याच्या पाठीच्या दुखापतीनं डोकं वर काढल्यानं विश्रांती घ्यावी लागली. उर्वरित स्पर्धेत सुद्धा त्याला भाग घेता न आल्यानं तो पुन्हा टीकेचा धनी बनला होता...

असं असलं, तरी भारतीय व्यवस्थापन अय्यरच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. खास करून प्रशिक्षक राहुल द्रविडनी त्याचा जोरदार बचाव केला...त्यानंतर शेवटी श्रेयसचं पुनरागमन झालं ते विश्वचषकापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून. त्यात त्यानं एका शतकाचीही नोंद केली...तरीही विश्वचषक स्पर्धा आकार घेताना त्याच्यावरील टीकेचा ओघ थांबला नव्हता. कारण स्पर्धेच्या प्रारंभी चांगली सुरुवात करूनही त्याचं मोठ्या डावात रुपांतर करण्यात आलेलं अपयश...

विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला खातंही उघडता आलं नाही. दुसऱ्या लढतीत नाबाद 25 धावा काढल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात अर्धशतकाचा टप्पा पार करता आला खरा (नाबाद 53), परंतु पुढील तीन सामन्यांत त्यानं पुन्हा निराशा केली. बांगलादेश, न्यूझीलंड नि इंग्लंडविऊद्ध त्याची धावसंख्या राहिली अनुक्रमे फक्त 19, 33 आणि 4. त्यातच आखुड टप्प्याच्या चेंडूंविऊद्धचा श्रेयसचा संघर्ष व प्रत्येक चेंडूवर पूल हाणण्याची लागलेली सवय हा संघाच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर माजी क्रिकेटपटूंसाठीही चिंतेचा विषय बनल्याशिवाय राहिला नाही...

परंतु भारताच्या या चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजानं त्याच्या टीकाकारांना शैलीदार पद्धतीनं प्रत्युत्तर देताना पुढील सर्व चार सामन्यांमध्ये 50 हून अधिक धावांची नोंद करून दाखविली. श्रेयस श्रीलंकेविऊद्ध दबाव झुगारून खेळताना शतकाच्या जवळ पोहोचला (82 धावा), दक्षिण आफ्रिकेविऊद्ध देखील त्यानं 77 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर नेदरलँड्स व न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन झंझावाती शतकं...उपांत्य फेरीतील जबरदस्त खेळीनंतर बोलताना अय्यरनं मान्य केलं की, स्पर्धेच्या सुऊवातीच्या टप्प्यात झालेल्या टीकेमुळं आलेला राग त्यातून व्यक्त झाला...

आधी ‘दिल्ली डेअर डेव्हिल्स’मधून अन् नंतर ‘कोलकाता नाइट रायडर्स’मधून ‘आयपीएल’ गाजविलेल्या, ‘केकेआर’चं तसंच मुंबईच्या रणजी संघाचं नेतृत्व सांभाळलेल्या श्रेयस अय्यरचा शिवाजी पार्क जिमखाना ते विश्वचषक हा प्रवास संयमाची परीक्षा पाहणाराच राहिलाय...त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ते डिसेंबर, 2021 मध्ये. खरं तर ते त्याच्या तीन वर्षं आधीच घडायला हवं होतं. परंतु परिस्थितीनं त्याच्या प्रवेशास विलंब लावला...त्याचप्रमाणं 2019 च्या विश्वचषकावेळीही श्रेयसच्या नावाची भारताचा चौथ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून चर्चा होती, परंतु तो मौका कधीच प्राप्त झाला नाही...गेल्या दोन वर्षांत संधी असूनही पाठीच्या वारंवार उद्भवलेल्या दुखापतींनी त्याला मैदानाबाहेर ठेवलं. त्यामुळं जितके आंतरराष्ट्रीय सामने तो खेळला त्याहून जास्त त्याला हुकले. तथापि, विलक्षण निर्धारानं पूर्ववत तंदुरुस्त बनलेल्या अय्यरनं चार वर्षांपूर्वी जी कसर राहिली होती ती आता व्याजासहित भरून काढलीय !

विश्वचषकातील पराक्रम...

  • श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविऊद्ध सनसनाटी शतक झळकावताना त्याच्या पहिल्याच वनडे विश्वचषक मोहिमेत 500 धावा पार करून दाखविल्याहेत. त्यासरशी अय्यर हा मधल्या फळीत (चौथ्या किंवा त्याखालील क्रमांकावर) फलंदाजीस येऊन असा टप्पा ओलांडणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय. ही कामगिरी करताना त्यानं न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिसचा उच्चांक मोडीत काढला...
  • एका विश्वचषकात 500 धावा पूर्ण करणारा तो विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर तिसरा भारतीय फलंदाज बनलाय...
  • अय्यरच्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील खेळीनं विश्वचषकात सर्वांत जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याला तिसऱ्या स्थानावर नेऊन बसविलंय...
  • त्याचबरोबर विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वांत वेगवान शतक झळकावण्याचा मान मिळविताना त्यानं चक्क अॅडम गिलख्रिस्टला मागं टाकलंय. ऑस्ट्रेलियाच्या त्या दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाजानं 2007 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेविऊद्ध 72 चेंडूंत सामना जिंकून देणारं शतक फटकावलं होतं...
  • त्याशिवाय अय्यरला ही खेळी ‘एलिट क्लब’मध्ये रोहित शर्मा नि राहुल द्रविडच्या पंक्तीत बसवून गेलीय. भारताकडून विश्वचषकात केवळ या तिघांनाच सलग शतकं नोंदविता आलीत..रोहितनं 2019 च्या इंग्लंडमधील स्पर्धेत सलग तीन शतकं झळकावली होती, तर भारताचा माजी कर्णधार द्रविडनं 1999 च्या विश्वचषकात लागोपाठ शतकं फटकावण्याची कामगिरी केली होती...
  • अय्यर आपल्या बुधवारच्या शानदार खेळीत तब्बल आठ षटकार खेचून विश्वचषकाच्या एका डावात सर्वाधिक ‘सिक्सर्स’ लगावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अग्रभागी पोहोचलाय. याभरात त्यानं मागं टाकलं ते सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांना...

विश्वचषकाच्या एका डावात सर्वाधिक षटकार...

  • 8 - श्रेयस अय्यर (यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडविऊद्ध मुंबईत)...
  • 7 - सौरव गांगुली (1999 साली श्रीलंकेविरुद्ध टाँटन इथं)....
  • 7 - युवराज सिंग (2007 साली बर्म्युडाविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन इथं)...
  • 6 - कपिल देव (1983 साली झिम्बाब्वेविरुद्ध टनब्रिज वेल्स इथं)...
  • 6 - रोहित शर्मा (यंदाच्या विश्वचषकात पाकविरुद्ध अहमदाबादेत)...
  • 6 - श्रेयस अय्यर (यंदाच्या विश्वचषकात श्रीलंकेविऊद्ध मुंबईत)...

भारतीयांनी विश्वचषकात झळकवलेली जलद शतकं

  • 62 चेंडू :  के. एल. राहुल (यंदाच्या विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध)...
  • 63 चेंडू : रोहित शर्मा (यंदाच्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध)...
  • 67 चेंडू : श्रेयस अय्यर (यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध)...
  • 81 चेंडू : वीरेंद्र सेहवाग (2007 च्या विश्वचषकात बर्म्युडाविरुद्ध)...
  • 83 चेंडू : विराट कोहली (2011 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध)...

श्रेयस अय्यरची फलंदाजीतील आकडेवारी...

  • प्रकार   सामने   डाव     नाबाद   धावा     सर्वोच्च  सरासरी शतकं   अर्धशतकं
  • कसोटी  10        10        1         666      105      44.4     1         5
  • वनडे    57       52       6         2327    128      50.59    5         17
  • टी20     49       45       11        1043     74       30.68    -         7
  • आयपीएल         101      101      13        2776    96       31.55    -         19

चौथ्या व त्याहून खालील क्रमांकांवर काढलेल्या सर्वाधिक धावा

  • खेळाडूचं नाव    विश्वचषकातील एकूण धावा         वर्ष
  • श्रेयस अय्यर      526      2023
  • स्कॉट स्टायरिस  499      2007
  • ए. बी. डीव्हिलियर्स         482      2015
  • बेन स्टोक्स        465      2019
  • मार्टिन क्रो        456      1992

खेळ जुनाच ओळख नवी : गतका

‘गतका’ या पारंपरिक भारतीय मार्शल आर्ट प्रकाराचा विकास पंजाबमध्ये झाला. तो ऐतिहासिकदृष्ट्या शीख गुरूंशी संबंधित असून लोकप्रिय राहिलाय. पूर्वी गुऊद्वार, नगर कीर्तन आणि आखाड्यांपुरता मर्यादित असलेला हा प्रकार 2008 मध्ये ‘भारतीय गतका महासंघा’च्या स्थापनेनंतर खेळ म्हणून उभरला अन् आता राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रशिक्षित खेळाडू ‘गतका’ खेळतात...

  • 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा शीख मुघल साम्राज्याशी लढत होते तेव्हा ‘अॅक्रोबेटिक्स’ व तलवारीची लढाई यांचं मिश्रण करून युद्धाचं साधन म्हणून ‘गतका’चा उदय झाला. ब्रिटिश राजवटीत त्यावर बंदी आल्यानं तलवारीचा वापर करण्याऐवजी काठ्यांवर आधारित लढाईचा प्रकार पुढं आला. यामुळं खेळाचा हा प्रकार असुरक्षित नाही हे इंग्रजांना पटवून देण्यास शिखांना मदत झाली...
  • पंजाबी भाषेत ‘गतका’ या शब्दाचा अर्थ ‘लाकडी काठ्या’ असा होतो. त्यांना ‘सोती’ही म्हटले जाते. यात सुरक्षेसाठी कोरड्या चामड्यापासून बनवलेल्या ढालींसोबत तीन ते साडेतीन फूट लांबीच्या आणि सुमारे 1.2 इंच जाडीच्या लाकडी काठ्या वापरल्या जातात. काठी नीट पकडता यावी आणि हात सुरक्षित राखता यावेत यासाठी त्यास एका बाजूनं 6 ते 7 इंचांची चामडी ‘हिल्ट’ असते...
  • काठी बांबू/बेतापासून बनविलेली किंवा फायबरचीही असू शकते आणि प्रहाराच्या अचूक नोंदीसाठी त्यावर डिजिटल चिप बसविलेली असू शकते. स्पर्धेत वरिष्ठ गटासाठी (18 वर्षांपेक्षा जास्त) ती 3 फूट, तर कनिष्ठ-उपकनिष्ठ गटांसाठी 2.75 फूट लांब असावी लागते. लाकडी काठीचे वजन 500 ग्रॅमपेक्षा जास्त आणि फायबर काठीचे 350 ग्रॅमपेक्षा जास्त असून चालत नाही...
  • ढाल, ज्याला ‘फरी’ म्हणतात, ही गोलाकार आणि 9×9 इंच आकाराची असते. प्रतिस्पर्ध्याकडून पूर्ण वार झाल्यास खेळाडूच्या हाताचे रक्षण करण्यासाठी ती कापूस किंवा कोरड्या गवताने भरलेली असते....
  • खेळाचे क्षेत्र हे 30 फूट व्यासाचे गोलाकार मैदान असते अन् यात ‘फूल स्ट्राईक’, ‘फ्रीस्टाईल’, ‘हाफ स्ट्राईक’ आदी प्रहाराचे प्रकार असतात. योग्य प्रकारे प्रतिस्पर्ध्यावर प्रहार केल्यास गुण मिळतात...
  • व्यावसायिक स्पर्धांत प्रत्येक संघाला 8 ते 12 मिनिटांच्या कालावधीत 24-25 ठरलेल्या गोष्टी दाखवाव्या लागतात. काठ्या जमिनीवर पडून किंवा पायांच्या संपर्कात येऊन चालत नाही...
  • वैयक्तिक गटात एक स्पर्धक उतरून त्याच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो, तर सांघिक प्रकारातील चमूत तीन खेळाडू आणि एका राखीव खेळाडू असतो...
  • जागतिक गतका महासंघ, आशियाई गतका महासंघ आणि आंतरराष्ट्रीय शीख मार्शल आर्ट अकादमी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय गतका संघटना व गतका संघटना, पंजाब यांनी खेळ म्हणून त्याच्या प्रसारासाठी भरपूर प्रयत्न केलेत...
  • पंजाब सरकारनं 2015 मध्ये राज्य क्रीडा धोरणात नमूद केलेल्या मान्यताप्राप्त खेळांमध्ये समावेश झाल्यावर ‘गतका’ला मोठी चालना मिळाली. 2014 मध्ये राष्ट्रीय शालेय खेळांत तो झळकला. त्यानंतर 2021 च्या ‘राष्ट्रीय खेलो इंडिया युवा खेळां‘त त्याचा समावेश झाला, तर यंदाच्या ‘राष्ट्रीय खेळां’त प्रात्यक्षिक प्रकार म्हणून त्याचं दर्शन घडलं...
  • केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील सुमारे 30 देशांमध्ये ‘गतका’ स्पर्धा होतात. यात अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया आदींचा समावेश होतो...

    राजू प्रभू

हाथ नहीं तो क्या हुआ...

युक्रेनचा साधाणपणे कोणताही खेळाडू म्हटला की आपल्यासमोर येतो तो दणकट, चपळ व धडधाकट शरीर असलेली व्यक्ती. पण जागतिक पातळीवर दिव्यांगांच्या असलेल्या स्पर्धा पाहिल्या की आपला डोळ्यांवरच विश्वास बसत नाही. असेच काहीसे चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये पाहायला मिळाले.

साधाणपणे कोणताही खेळाडू म्हटला की आपल्यासमोर येतो तो दणकट, चपळ व धडधाकट शरीर असलेली व्यक्ती. पण जागतिक पातळीवर दिव्यांगांच्या असलेल्या स्पर्धा पाहिल्या की आपला डोळ्यांवरच विश्वास बसत नाही. असेच काहीसे चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये पाहायला मिळाले. मागील महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी एशियन पॅरा

गेम्समधील कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातला सुवर्णपदकासाठीचा सामना. अवघ्या 16 वर्षांची असलेल्या भारताच्या शीतल देवीसमोर सिंगापूरच्या अलीम नूर सयाहिदाचे आव्हान होते. शीतलने त्याआधीच मिश्र सांघिक कंपाउंड स्पर्धेत सुवर्ण आणि महिला दुहेरी कंपाउंड स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं होते. यामुळे सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या; अलीमने सुरुवातीला आघाडी घेतली. तणाव वाढत होता. अशा परिस्थितीत शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये शीतलच्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांनी सलग सहा वेळा 10 गुणांच्या गोलाचा वेध घेतला आणि सगळी पिछाडी भरून काढून तिनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या अनेकांनी तिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला. कारण शीतलला दोन्ही हात नाहीत. पायांनी तिरंदाजी करणारी ती भारतातील एकमेव तिरंदाज आहे.

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील लोईधार या छोट्या गावची रहिवासी असणारी शीतल 16 वर्षाची आहे. लहान असली तरी तिने आपल्या कामगिरीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अत्यल्प वस्ती असलेल्या लोईधार या गावात शीतल आपल्या आई-वडिलांसह राहते. शीतलला जन्मताच ‘फोकोमीलिया‘ हा आजार आहे. या आजारामुळे लहानपणापासून तिला दोन्ही हात नाहीत. ज्याप्रमाणे काश्मीरला निसर्गाचे वरदान मिळाले आहे तसेच या काश्मीरच्या पर्वतीय रांगात राहणाऱ्या शीतललाही एक अनोखे वरदान मिळाले आहे. दोन्ही हात जरी नसले तरी आपले पाय आणि वरच्या शरीराचा वापर करून झरझर झाडांवर चढण्याचं कसब शीतलने वयाच्या नवव्या वर्षी आत्मसात केले. अनेकवेळा ती झाडावरुन पडली पण हार न मानता जोमाने पुढे जाणाऱ्या शीतलने यामध्ये आपले कौशल्य सिद्ध केले.

2019 मध्ये भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स या बटालियनच्या वतीने दरवर्षी किश्तवाड येथे युवा क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. लष्कराच्या या स्पर्धेत शीतलने भाग घेतला. यावेळी आपल्या कौशल्याने शीतलने सर्वच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या अद्वितीय कामगिरीमुळे भारतीय लष्कराने तिला दत्तक घेतले. सुरुवातीला ठरलं, की तिला कृत्रिम हात बसवायचा; पण दुर्दैवानं हे हात व्यवस्थित फिट झाले नाहीत. शीतलच करिअर सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येईल की काय, असे वाटत होते. पण तिने हार मानली नाही. झाडावर चढण्याचा छंद तिच्या मदतीला आला आणि पाय आणि वरच्या शरीराच्या सहाय्याने ती उत्तम खेळ करू शकते, हे सर्वांच्या लक्षात आले. यानंतर शीतलच्या हातात धनुष्यबाण देण्यात आला.

लष्कराच्या कटरा येथील प्रशिक्षण केंद्रात तिचे प्रशिक्षक होते अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वेदवान. हात नसलेल्या तिरंदाजाला या दोघांनी पूर्वी कधीच प्रशिक्षण दिलेले नव्हते, पण 2012 च्या लंडन पॅरालिम्पिक्समध्ये रौप्यपदक पटकावणारे दिग्गज तिरंदाज मॅट स्टट्झमन यांना पायांनी तिरंदाजी करताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन त्यांनी शीतलला स्वत:चं ‘तंत्र‘ विकसित करण्यात मदत केली. आता शीतल एका खुर्चीवर बसून उजव्या पायाने धनुष्य उचलते आणि उजव्या खांद्याच्या मदतीनं दोरी खेचते. तिच्या प्रशिक्षकांनी तयार केलेलं एक छोटंसं उपकरण तोंडात धरून त्याच्या सहाय्याने ती बाणाने लक्ष्याचा अचूक वेध घेते.

खडतर प्रशिक्षणातून सोनेरी यश

कटरा येथील प्रशिक्षण केंद्रात शीतलच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीला अर्थातच तिला त्रास झाला; पण तिनं हार मानली नाही. आधी तिने फक्त धनुष्य उचलण्याचा सराव केला. यानंतर तिने बाणही हाताळायला सुरुवात केली. दररोज लष्करी प्रशिक्षण केंद्रात अथक सराव करताना तिने दररोज मेहनतीवर भर दिला. याचे फळ तिला 2022 या वर्षात मिळाले. 2022 मध्ये शीतलने सोनपत येथे झालेल्या पॅरा खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आणि येथूनच तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात झाली. 2023 मध्ये झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या पॅरा-तिरंदाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्य पटकावले. यानंतर आशियाई पॅरा स्पर्धेत तिने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. या कामगिरीमुळे भविष्यात ती नक्कीच अद्वितीय अशी तिरंदाज बनेल, यात शंकाच नाही.

एशियन गेम्समधील सोनेरी कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, भारतीय लष्करातील अनेक अधिकारी तसेच उद्योगपती आनंद महिंद्र यांनी तिचे अभिनंदन केले. उद्योगपती महिंद्रा यांच्या ट्विटनंतर शीतलची कामगिरी देशभरात व्हायरल झाली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगीने केलेली अतुलनीय कामगिरी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

अद्वितीय, अतुलनीय

हात नसले तरी काय झाले, पण जबरदस्त इच्छाशक्ती व दोन्ही पायाच्या जोरावर शीतलने एशियन पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्ण जिंकत ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात आजवर अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. अतुलनीय अशी कामगिरी केली आहे पण लक्षणीय अशी कामगिरी करणारे क्रीडापटू मोजकेच आहेत. 16 वर्षाच्या शीतलची कामगिरीही अशीच प्रेरणादायी आहे. हाथ नही तो क्या हुआ.... पैर तो है.. याप्रमाणे आअशीच अद्वितीय कामगिरी करेल यात मात्र शंकाच नाही.

विनायक भोसले

Advertisement
Tags :

.