For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबीचा प्ले ऑफमध्ये प्रवेश

06:58 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीबीचा प्ले ऑफमध्ये प्रवेश
Advertisement

रोमांचक सामन्यात चेन्नई 27 धावांनी पराभूत : धोनी-जडेजाची फटकेबाजी व्यर्थ

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध महत्वाच्या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. आरसीबीचा हा सलग सहावा विजय असून सीएसके व आरसीबीचे समान गुण आहेत. पण सरस नेट रनरेटच्या जोरावर आरसीबीने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 बाद 218 धावा केल्या. यानंतर प्ले ऑफ गाठण्यासाठी चेन्नईला 200 धावा करणे गरजेचे होते, पण त्यांना 7 बाद 191 धावापर्यंत मजल मारता आली.

Advertisement

 

आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 219 धावांचे टार्गेट दिले पण प्ले ऑफ गाठण्यासाठी त्यांना 200 धावांची आवश्यकता होती. या आव्हानाचा ापाठलाग करताना चेन्नईला पहिल्या चेंडूवर धक्का बसला. कर्णधार ऋतुराज गायकवाडला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यश दयालच्या गोलंदाजीवर मिचेल 4 धावांवर असताना झेलबाद झाला. यानंतर रचिन रविंद्र व रहाणे या दोघांत 66 धावांची भागीदारी झाली. ही जोडी फर्ग्युसनने तोडली. रहाणेला 33 धावांवर त्याने बाद केले. यानंतर रविंद्रने 37 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 61 धावा केल्या. पण 13 व्या षटकात तो धावबाद झाला. दुबे व सँटेनर स्वस्तात बाद झाले. अनुभवी जडेजा व धोनीने फटकेबाजी केली खरी पण हे दोघे संघाला विजय मिळवून देवू शकले नाहीत. जडेजाने नाबाद 42 तर धोनीने 25 धावा केल्या.  चेन्नईला 20 षटकांत केवळ 191 धावा केल्या.

 

आरसीबीचा विजयाचा षटकार

नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली व कर्णधार डु प्लेसिस यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. या जोडीने 3 षटकांत 31 धावा जमवल्या. पण यानंतर पाऊस पडल्यामुळे सामना काही वेळ थांबवण्यात आला होता. सामना सुरु झाल्यानंतर या जोडीने फटकेबाजी करताना 78 धावांची भागीदारी केली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना विराटला सँटेनरने बाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. विराटने 29 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारासह 47 धावा केल्या.

कर्णधार डु प्लेसिसने अर्धशतकी खेळी करताना 39 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. यानंतर रजत पाटीदार व कॅमरुन ग्रीन या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी साकारली. पाटीदारने आक्रमक खेळताना 23 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारासह 41 धावा केल्या तर ग्रीननेही अवघ्या 17 चेंडूत नाबाद 38 धावा चोपल्या. पाटीदार बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक 6 चेंडूत 14 व ग्लेन मॅक्सवेल 5 चेंडूत 16 धावा चोपल्या. यामुळे आरसीबीने करो वा मरो सामन्यात 20 षटकांत 5 बाद 218 धावांचा डोंगर उभा केला.

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

चेन्नईविरुद्ध सामन्यात कोहलीने 29 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. विराटने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही मैदानावर 3 हजार धावा करण्याचा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आलेला नाही. विराटनंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने वानखेडे स्टेडियमवर 2295 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने आयपीएलमध्ये 700 चौकारांचा टप्पा पार केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकारांच्या यादीत शिखर धवन (768 चौकार) पहिल्या स्थानी आहे. यानंतर विराटचा नंबर लागतो. विराटच्या नावे 702 चौकार आहेत.

प्ले ऑफसाठी पात्र ठरलेले संघ - केकेआर, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद व आरसीबी.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकांत 5 बाद 218 (विराट कोहली 47, डु प्लेसिस 54, रजत पाटीदार 41, कॅमरुन ग्रीन नाबाद 38, दिनेश कार्तिक 14, ग्लेन मॅक्सवेल 16, शार्दुल ठाकूर 2 बळी, तुषार देशपांडे व मिचेल सँटेनर प्रत्येकी एक बळी).

चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकांत 7 बाद 191 (ऋतुराज गायकवाड 0, रचिन रविंद्र 61, मिचेल 4, अजिंक्य रहाणे 33, शिवम दुबे 7, जडेजा नाबाद 42, धोनी 25, यश दयाल 2 बळी तर मॅक्सवेल, सिराज, फर्ग्युसन व ग्रीन प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.