For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

‘विराट’ नि ‘सम्राट’ !

Advertisement

विराट कोहलीनं नुकतीच सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांशी बरोबरी केलीय अन् कुठल्याही क्षणी तो हा विक्रम मोडीत काढू शकतो...सचिनसारखंच क्रिकेट विराटनिशी सुरू होतं अन् त्याच्याबरोबर संपतं अशी भावना बाळगणारा चाहता वर्ग निर्माण करण्यात तो यशस्वी झालाय...याचं कारण तेंडुलकरच्या धर्तीवर त्याचं डावात झोकून देणं अन् रसिकांना त्या खेळीशी जिव्हाळ्याच्या नात्यानं बांधणं...

2 एप्रिल, 2011...‘सचिन तेंडुलकरनं 21 वर्षं भारतीय क्रिकेटचा भार आपल्या खांद्यावर वाहिलाय. त्यामुळं या विजयानंतर त्याला खांद्यावर घेण्याची वेळ आमची’...वानखेडे स्टेडियमवर भारत विश्वचषक जिंकणारं पहिलं यजमान राष्ट्र बनल्यानंतर काही मिनिटांनी ‘लिटल ब्लास्टर’ला खांद्यांवर घेऊन फेरी मारताना हे उद्गार काढणारा खेळाडू होता...विराट कोहली...त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवून कोहलीला तीन वर्षंही झाली नव्हती. मीरपूरमध्ये बांगलादेशविऊद्ध फटकावलेल्या विश्वचषकातील पदार्पणाच्या शतकासह मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यानं आपल्या कौशल्याची झलक दाखवली होती...परंतु कसोटीत त्याचं दर्शन घडविणं बाकी होतं...

Advertisement

त्या रात्री भारतानं जेतेपदासाठीच्या लढतीत श्रीलंकेला नमविल्यानंतर कोहलीचं ‘दिग्गज’ खेळाडूमध्ये रुपांतर होण्यास फारसा वेळ लागला नाही...तेंडुलकरनं 16 व्या वर्षी कसोटीत पाऊल ठेवतानाच महान फलंदाज’ म्हणून ‘टॅग’ लावण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू केली होती. विराटला त्या स्तरावर पोहोचायला थोडा वेळ लागला असला, तरी एकदा त्यानं गती पकडल्यानंतर भारताचा पुढचा महान फलंदाज म्हणून तोच गणला जाईल हे निश्चित झालं...अन् मग सारा संघ जसा 24 वर्षं तेंडुलकरवर अवलंबून राहायचा, त्याच्याभोवती फिरायचा तसाच विराट कोहलीभोवतीही फिरू लागला...

6 नोव्हेंबर, 2023...दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या भारतीय डावातील 48 व्या षटकाचे तीन चेंडू झाले होते...आणि मग ईडन गार्डन्सवरील 65 हजार रसिक ज्याची दिवसभरापासून वाट पाहत होते तो क्षण आला. ‘बॅक फूट’वर जात ‘पंच’ मारून विराट कोहलीनं आपलं 49 वं शतक पूर्ण केलं, लहानपणापासूनचा आदर्श सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. समालोचकाच्या भूमिकेतील इरफान पठाणच्या शब्दांत सांगायचं झाल्यास तो त्या दिवशी सचिनच्या खांद्यांजवळ पोहाचला...

त्याच्या तीन दिवस आधी मुंबईत कोहलीचं शतक हुकलं होतं ते 12 धावांनी. खरं तर या क्षणाची प्रतीक्षा लागून राहिली होती ती फार आधीपासून. यंदाच्या सुऊवातीला त्यानं 45 वं शतक पूर्ण केलं. त्यानंतर अवघ्या 20 डावांनी तो 49 शतकांवर पोहोचला...पण त्यापूर्वी तीन वर्षांहून जास्त काळ शतकासाठी अक्षरश: झुरण्याचा प्रसंग विराटवर आला. त्यानं 43 वं शतक फटकावलं होतं ते 2019 च्या ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध 44 व्या शतकाची नोंद होण्यासाठी 2022 चा डिसेंबर उजाडावा लागला...

जबरदस्त ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, ‘कव्हर ड्राईव्ह’, चेंडूला हवी तशी दिशा दाखविणारे ‘फ्लिक्स’, ‘स्वीप’, ‘स्क्वेअर कट’ नि स्लीपवरून उसळत्या चेंडूला सीमापार पाठविणारा अफलातून ‘अपर कट’ ही सचिनच्या भात्यातील रसिकांना भूलवून टाकणारी हुकमी शस्त्रं...तर आदर्श फूटवर्क व टायमिंगनिशी हाणला जाणारा ‘कव्हर ड्राइव्ह’, मिड-ऑन अन् मिडविकेटमधून मारले जाणारे ‘फ्लिक्स’, पूल’ आणि एकेरी-दुहेरी धावांवर जास्तीत जास्त भर तसंच तेंडुलकरप्रमाणं भक्कम बचाव या कोहलीच्या खासियती...

सचिन तेंडुलकर त्याचं बरंचसं क्रिकेट पूर्णपणे वेगळ्या युगात खेळला...दोघांनाही सामोरं जाव्या लागलेल्या आक्रमणाचं स्वरूप आणि दर्जा वेगळा (सचिननं सामना केला तो विंडीजच्या वॉल्श-एम्ब्रोज, पाकचे वकार युनूस-अक्रम-शोएब अख्तरपासून ऑस्ट्रेलियाचे मॅकग्रा, ब्रेट ली, शेन वॉर्न अन् दक्षिण आफ्रिकेच्या अॅलन डोनाल्ड, पोलॉकपर्यंतच्या दिग्गज गोलंदाजांचा)...शिवाय नियम वेगळे (आजच्यासारखं ‘डीआरएस’ कधी सचिनच्या वाट्याला आलं नाही. त्यामुळं पंचांच्या चुकीच्या निर्णयांनी त्याच्या खेळी अनेकदा संपविल्या), खेळपट्ट्या वेगळ्या, फलंदाजीची धाटणी वेगळी...समान राहिली असेल, तर एकच गोष्ट...संघ नि स्टेडियममध्ये त्यांच्या नावांचा जयजयकार करणाऱ्या रसिकांच्या मागण्या, प्रचंड अपेक्षा...अन् दोघेही वेळोवेळी, एकामागून एक सामन्यात त्या इमाने इतबारे पूर्ण करत गेले !

‘मास्टर ब्लास्टर’ व ‘चेज मास्टर’...

  • सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करणारा विराट कोहलीचा प्रवास हा तुलनेनं जास्त जलद राहिला. कोहलीला 49 शतकांचा स्तर गाठण्यासाठी 15 वर्षं लागली, तर तेंडुलकरची वनडे कारकीर्द चालली ती 22 वर्षं...
  • कोहलीच्या शतकांची नोंद झाली ती 5.65 डावामागं एक या सरासरीनं. तर सचिनची सरासरी 9.22 डावांमागं एक शतक अशी...
  • विराटला ‘चेज मास्टर’ उगाच म्हटलं जात नाही. त्यानं एकदिवसीय सामन्यांमधील 27 शतकं झळकावली ती भारत लक्ष्याचा पाठलाग करत असताना. त्यापैकी 23 सामन्यांत भारत विजयी ठरला...तर तेंडुलकरनं एकदिवसीय लढतीच्या दुसऱ्या डावात खेळताना 17 शतकं फटकावलीत अन् त्यापैकी 14 सामन्यांत भारताची सरशी झाली...
  • प्रथम फलंदाजी करताना शतक पार करण्याच्या बाबतीत मात्र तेंडुलकर विराटपेक्षा खूप पुढं...त्यानं 32 शतकं झळकावलीत, तर विराटनं नोंद केलीय ती 22 शतकांची...

तुलना शतकांची...

  • एकंदरित विचार करता सचिनच्या 49 पैकी 33 शतकांच्या वेळी भारत जिंकला, तर विराटच्या बाबतीत त्याच्या 41 शतकांत संघानं विजयोत्सव साजरा केला...
  • सचिनने देशातील मैदानांवर 20 अन् कोहलीनं 23 शतकं झळकावलीत, तर परदेशांत विराटकडून नोंद झालीय ती 21 आणि तेंडुलकरकडून 12 शतकांची...
  • तेंडुलकरनं 11 वेगवेगळ्या संघांविऊद्ध शतकं फटकावलीत अन् त्यापैकी 44 शतकं ही नऊ पूर्ण सदस्य राष्ट्रांविऊद्धची, तर कोहलीनं मात्र सर्व 49 शतकांची नोंद केलीय ती पूर्ण सदस्य देशांविऊद्ध...
  • तेंडुलकरनं सर्वाधिक नऊ शतकं झळकावली ती ऑस्ट्रेलियाविऊद्ध, तर कोहलीनं सर्वांत जास्त 10 एकदिवसीय शतकं फटकावलीत ती श्रीलंकेविऊद्ध...श्रीलंकेविऊद्ध अशी कामगिरी करणारा विराट हा एकमेव फलंदाज. शिवाय एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही एका संघाविऊद्ध कुठल्याही फलंदाजाला इतकी शतकं फटकावता आलेली नाहीत...

तुलना भीमराक्रमांची...

  • 2012 च्या आशिया चषकातील बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनं 49 वं शतक (114 धावा) झळकावलं अन् त्यासरशी 100 आंतरराष्ट्रीय शतकं नोंदविणारा पहिला फलंदाज म्हणून इतिहासाच्या पुस्तकात आपल्या नावाची नोंद केली...विराट कोहली याबाबतीत बराच मागं असून त्याच्या खात्यात आहेत 79 आंतरराष्ट्रीय शतकं...
  • तेंडुलकर आणि कोहली या दोघांनीही आपलं पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं ते वयाच्या 21 व्या वर्षी. यामुळं एकदिवसीय लढतींतील सर्वांत कमी वयाच्या भारतीय शतकवीरांमध्ये त्यांचा समावेश होतो...
  • 24 व्या वर्षी कोहलीनं त्याच्या 109 व्या सामन्यात 15 वं एकदिवसीय शतक झळकावून तेंडुलकरचा सर्वांत जास्त वेगानं 15 शतकं फटकावण्याचा  तसंच तशी कामगिरी करणारा सर्वांत तरुण फलंदाज ठरण्याचा विक्रम मोडीत काढला होता...
  • सचिननं सहा विश्वचषक स्पर्धांत सहा शतकं झळकावली, तर कोहलीच्या नावावर चार विश्वचषकांमध्ये चार शतकं...
  • अर्धशतकाचं शतकात रुपांतर करण्याच्या बाबतीत सचिनचा दर 51 टक्के, तर कोहलीचा 70 टक्के इतका जास्त...शिवाय कोहली नव्वदीत केवळ सहा वेळा बाद झालाय, तर तेंडुलकरला तब्बल 18 वेळा शतक नोंदविण्याच्या अगदी जवळ पोहोचून परतावं लागलं...

‘वनडे’त सचिन वि. विराट...

  • नाव           सामने      डाव          धावा         सर्वोच्च    सरासरी  शतकं      अर्धशतकं                  स्ट्राईक रेट
  • सचिन तेंडुलकर     463           452           18426     नाबाद 200                44.83     49             96              86.23
  • विराट कोहली         289          277          13626      183           58.48     49             70              93.55

विविध देशांविरुद्ध झळकावलेली शतकं...

  • प्रतिस्पर्धी देश          सचिन      विराट
  • ऑस्ट्रेलिया                9                 8
  • श्रीलंका                    8                 10
  • पाकिस्तान                5                 3
  • दक्षिण आफ्रिका         5                 5
  • झिम्बाव्ब्वे                  5                 1
  • न्यूझीलंड                   5                 5
  • वेस्ट इंडिज               4                 9
  • केनिया                      4                 0
  • इंग्लंड                       2                 3
  • बांगलादेश                 1                  5
  • नामिबिया                  1                  0

विविध क्रमांकांवर येऊन झळकावलेली शतकं...

  • स्थान        सचिन      विराट
  • सलामीला येऊन    45              -
  • चौथ्या क्रमांकावर 4                 7
  • तिसऱ्या क्रमांकावर   -              42
  • कर्णधार म्हणून       6                 21

खेळ जुनाच, ओळख नवी ! पेनचाक सिलाट...

‘पेनचाक सिलाट’...हे नाव म्हणजे नेमकं काय बुवा असा सवाल कित्येकांना पडल्याशिवाय राहणार नाही. पण हा खेळ म्हणजे ‘मार्शल आर्ट्स’चा एक प्रकार. यामध्ये इंडोनेशिया/मलय द्वीपसमूहातील (यात इंडोनेशियासह मलेशिया, सिंगापूर, ब्रुनेई यांचा समावेश होतो) विविध मार्शल आर्ट्स शैलींना समाविष्ट करण्यात आलंय...यात प्रहार करणे, धरून ठेवण्याचे तंत्र आणि फेकणे यांचा समावेश होतो. याशिवाय मूळ प्रकारात लढवय्यांना विशिष्ट प्रकारची शस्त्रs वापरण्याचीही परवानगी दिलीय गेलीय...

  • ‘पेनचाक’ आणि ‘सिलाट’ ही दोन नावं प्रथमच एकत्र करण्यात आली ती इंडोनेशियातील सर्व ‘पेनचाक’ आणि ‘सिलाट पेरगुऊअन्स’ (संस्था) यांना एकत्र आणणारी संघटना 18 मे,. 1948 रोजी सुराकर्ता येथे स्थापन झाल्यावर...हा खेळ अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये पसरलाय...
  • ‘पेनचाक सिलाट’च्या अनेक शैली प्रचलित आहेत. त्यापैकी सर्वांत लोकप्रिय त्या ‘मिनांगकाबाऊ’, ‘सुंदा’, ‘बेतावी’, ‘जावा’, ‘बाली’, ‘मालुकू’ या सहा...सामान्यत: वापरल्या जाणाऱ्या काही आक्रमक चालींमध्ये ‘पंच’ आणि लथ्थाप्रहार यांचा समावेश होतो. पाय, कोपर नि खांदा यांचा वापर करून प्रहार करण्याचा मार्गही यात वापरला जातो तसेच हात, कोपर किंवा खांदे वापरून फटका अडविणे ही सर्वांत सामान्यपणे वापरली जाणारी चाल...फटका चुकविणे वा दुसरीकडे वळविणे हे मार्ग देखील बचावासाठी वापरले जातात...या खेळामध्ये आता काही पद्धतीने प्रहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत...
  • ‘आंतरराष्ट्रीय पेनचाक सिलाट संघटना’ ही या खेळाची सर्वोच्च प्रशासकीय संस्था. बड्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांच्याकडून आयोजित केल्या जातात. त्यांच्याकडून घेतली जाणारी ‘पेनचाक सिलाट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ ही दर दोन किंवा तीन वर्षांनी होते. ती या क्रीडाप्रकारातील सर्वोच्च स्पर्धा...
  • या क्रीडाप्रकारातील सामना दोन वेगवेगळ्या संघांच्या दोन खेळाडूंमध्ये होतो. निर्धारित वजन श्रेणींमध्ये हे सामने होतात अन् एका सामन्यात 2 मिनिटांच्या 3 फेऱ्या अन् प्रत्येकी 1 मिनिटाचा ब्रेक यांचा समावेश राहतो...
  • सामन्याचा विजेता एक तर गुण पद्धतीनुसार ठरविला जातो. म्हणजे तीन फेऱ्यांनंतर सर्वाधिक गुण जमा करणारा खेळाडू विजेता घोषित केला जातो. जिंकण्याचा दुसरा मार्ग हा प्रतिस्पर्धी ‘तांत्रिकदृष्ट्या बाद’ होण्याचा. यात पुढे चाल, अपात्रता यांचा समावेश होतो...
  • जर प्रतिस्पर्ध्याला उठता आले नाही किंवा चक्कर आली, तो हडबडू लागला आणि पंचांनी दहा अंक मोजल्यानंतरही तो सरळ उभा राहू शकला नाही तर स्पर्धक तांत्रिक ‘नॉक-आउट’द्वारे जिंकल्याचा निर्णय घेतला जातो. तीन वेळा पुकारल्यानंतरही प्रतिस्पर्धी रिंगणात न दिसल्यास स्पर्धकाला पुढे चाल दिली जाते.
  • दुसऱ्या आणि अंतिम वजन मोजणीनंतर खेळाडू त्याच्या वजन वर्गात झळकण्यास अपयशी ठरल्यास वा अवैध पद्धतीने फटका मारून प्रतिस्पर्ध्याला गंभीरपणे जखमी केल्यास संबंधित स्पर्धकाला अपात्र ठरविले जाते...
  • या क्रीडा प्रकाराच्या ‘स्पोर्ट्स आर्टिस्टिक’ गटात ‘तुंग्गल’ (एकेरी स्पर्धक), ‘गंडा’ (दुहेरी, एका संघात दोन), ‘ रेगू’ (तिहेरी, एका संघात तीन) अन् ‘सोलो क्रिएटिव्ह’ (एकच खेळाडू) अशा चार उपश्रेणींचा समावेश होतो...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.