स्पोर्ट्स mania
‘मिस्ट्री स्पिनर’ ते ‘हार्ड हिटर’...सुनील नरेन !
एकेकाळी फलंदाजांना ऑफस्पिनच्या सापळ्यात अलगद अडकविणारा वेस्ट इंडिजचा सुनील नरेन यंदाची ‘आयपीएल’ गाजवू लागलाय तो फलंदाजीत...मागील 12 वर्षांपासून ‘कोलकाता नाइट रायडर्स’साठी खेळणारा नरेन पुन्हा एकदा सलामीवीरच्या भूमिकेत परतलाय अन् हा निर्णय सार्थ असल्याचं सिद्ध करताना त्यानं चक्क शतक फटकावून दाखविलंय...
साल 2017...ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लीन क्षेत्ररक्षण करताना जखमी झाल्यानं सलामीला त्याच्या ऐवजी कुणाला पाठवायचं असं प्रश्न ‘कोलकाता नाईट रायडर्स’समोर पडला..मग त्यांनी निर्णय घेतला तो वेस्ट इंडिजच्या त्या फिरकीपटूला सलामीला आणून जुगार खेळण्याचा...अन् सदर भूमिकेतील आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं 18 चेंडूंमध्ये 37 धावा फटकावल्या...मग ‘गुजरात लायन्स’विरुद्ध 17 चेंडूंत 42, तर ‘आरसीबी’विरुद्ध 17 चेंडूंत 54 धावा काढताना अवघ्या 15 चेंडूंत ‘आयपीएल’मधील सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम...तो पुढं मोडीत काढला के. एल राहुल नि पॅट कमिन्सनं (14 चेंडूंत अर्धशतक) अन् यशस्वी जैस्वालनं (13 चेंडू)...
वर्ष 2024...ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना यथेच्छ बदडून काढणं म्हणजे नेमकं काय ते दाखवून देताना त्यानं पाऊस पाडला तो 13 चौकार व सहा षटकारांचा...सलामीचा सहकारी सॉल्टला अवघ्या 10 धावांवर गमावल्यानंतर त्यानं जबाबदारी स्वीकारली आणि आधी कुलदीप सेन व आवेश खानचा यथेच्छ समाचार घेतला. रविचंद्रन अश्विन व युजवेंद्र चहलही त्यातून सुटले नाहीत...
सुनील नरेन...काही वर्षांपूर्वी हे नाव फलंदाजांच्या पोटात गोळा आणत असे. या घातक फिरकीपटूनं ही धास्ती निर्माण केली होती ती गोलंदाजीची विचित्र शैली आणि विलक्षण सातत्य, अचूकतेच्या जोरावर. त्याच्या आधारे त्यानं बड्या बड्या गोलंदाजांना गुंडाळलं, हैराण करून सोडलं...पूर्वीइतका भेदक तो आता राहिलेला नसला, तरी महत्त्वाचा गोलंदाज हे आपलं स्थान त्यानं कायम राखून ठेवलंय. पण वेस्ट इंडिजचा हा फिरकीपटू आता गाजतोय तो प्रभावी ‘हार्ड हिटिंग’ क्षमतेमुळं...
सुनील नरेननं सलामीला येऊन असा धडाका दाखविण्याचं श्रेय दिलंय ते सध्या ‘केकेआर’च्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत असलेल्या गौतम गंभीरला. 2017 मध्ये त्याच्या बाबतीत हा प्रयोग सर्वप्रथम करून पाहिला होता तो त्यावेळी ‘कोलकाता’च्या कर्णधारपदाची धुरा वाहणाऱ्या गंभीरनंच...मागील तीन मोसमांत नरेनवर पाळी आली होती ती खालच्या स्थानावर येऊन फलंदाजी करण्याची अन् त्याला काढता आल्या होत्या अवघ्या 154 धावा. मात्र यंदा सलामीला येऊन त्यानं सहा सामन्यातूंन तब्बल 276 धावा फटकावल्याहेत...राजस्थानपूर्वी त्याचा तडाखा बसला तो दिल्ली कॅपिटल्सला. त्यात त्यानं 39 चेंडूंत सात षटकार नि तितक्याच चौकारांनिशी 85 धावा काढत आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदविली होती...
सुनील नरेनमध्ये दिसून आलेला महत्त्वाचा फरक म्हणजे पूर्वी तो आपली बॅट फक्त तलवारीसारखी फिरविण्यावर विश्वास ठेवत असते. यावेळी नरेन कौशल्यानं आणि संयमानं फलंदाजी करताना दिसतोय. त्याच्या फटके खेळण्याच्या पद्धतीत देखील बरीच सुधारणा झालीय...‘केकेआर’चा ‘फिनिशर’ रिंकू सिंग त्याच्याविषयी बोलताना याच मुद्यावर बोट ठेवतो. ‘मला जाणवलाय तो एकच बदल. नरेन आता अधिक संयम पाळू लागलाय. पूर्वी तो प्रत्येक चेंडूवर बॅट फिरवत असे. मात्र आता चेंडूची गुणवत्ता लक्षात घेऊन विचारपूर्वक अन् हुशारीनं फलंदाजी करतोय’...
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अन् वेस्ट इंडिजच्या अलीकडच्या परंपरेनुसार देशापेक्षा विविध लीगमध्ये खेळण्यावर जास्त भर देणारा सुनील नरेन एक खेळाडू म्हणून मागील 12 वर्षांमध्ये खूप विकसित झालाय यात शंकाच नाही...त्रिनिदादचा हा खेळाडू खरं तर 2012 च्या ‘आयपीएल’मध्ये उगवला त्यावेळी एक ‘गूढ फिरकीपटू’ असं वलय त्याच्याभोवती होतं. त्यानंही आपले प्रताप दाखविण्यास वेळ लावला नाही अन् पहिल्याच स्पर्धेत ‘सर्वांत मौल्यवान खेळाडू’चा किताब पटकावण्याबरोबर ‘कोलकाता नाइट रायडर्स’ला पहिलं विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला...
नरेन तेव्हापासून ‘कोलकाता’च्या सोबत राहिलाय आणि आपल्या फलंदाजीतील तसंच गोलंदाजीतील पराक्रमाच्या जोरावर अनेक सामने त्यांना जिंकून दिलेत...यापैकी 2012, 2013 आणि 2014 या तीन वर्षांत सुनील नरेनची जादुई फिरकी अनुक्रमे 24, 22 नि 21 गडी टिपून गेली आणि ‘कोलकाता’ला ‘आयपीएल’ चा चषक दोनदा मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा राहिला. या तीन मोसमांत त्यानं 16.1 च्या सरासरीनं आणि फक्त 5.8 च्या ‘इकोनॉमी रेट’नं एकूण 67 बळी घेतले...‘कॅरम बॉल’, ‘नकल बॉल’, ‘स्ट्रेटर वन’, ‘दुसरा’ आणि त्याची नेहमीची ऑफस्पिन अशी भात्यातील विविध आयुधं वापरत नरेननं त्यावेळी जवळजवळ प्रत्येक फलंदाजाला सतावलं अन् आकड्यांचा विचार केल्यास तो इतर गोलंदाजांपेक्षा चार पावलं पुढं राहिला...
खरं तर 2011 मध्येच नरेनची गोलंदाजीची शैली चर्चेत आल्यानंतर त्याला पर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील ‘बायो-मेकॅनिकल’ तज्ञांसोबत काम करावं लागलं होतं, ‘अॅक्शन’मध्ये थोडा बदल करावा लागला होता...पुढची तीन वर्षं सर्व काही सुरळीत चालून नरेनचं नाव विविध ठिकाणच्या लीगमध्ये दणाणू लागलं. गडबड झाली ती 2014 सालच्या ऑक्टोबरमध्ये (आता रद्द झालेल्या) ‘चॅम्पियन्स लीग’च्या दरम्यान दोनदा त्याच्या शैलीवर बोट ठेवण्यात आल्यानंतर. त्यानंतर त्याला बेंगळूरमधील अंतिम सामना खेळण्यास मज्जाव करण्यात आला...
लक्षणीय बाब म्हणजे समस्या दडली होती ती नरेनच्या ‘ऑफ-ब्रेक’ टाकण्याच्या शैलीत, इतर चेंडूंमध्ये नव्हे. परिणामी त्याला 2015 च्या ‘आयपीएल’मध्ये ‘ऑफ-ब्रेक’ गोलंदाजी करू दिली गेली नाही, मात्र इतर शस्रं वापरण्यास मोकळीस राहिली. त्या हंगामात तो आठ लढती खेळला अन् 33.4 च्या सरासरीनं तसंच 7.3 च्या इकोनॉमी रेट’नं फक्त सात गडी बाद करू शकला...सुनीलनं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या शैलीवर काम केलं. परंतु त्यानं आपली ती जुनी धार गमावलीय हे स्पष्ट झालं आणि फलंदाजांना त्याचे चेंडू ओळखता येऊ लागल्यानं त्याच्या गोलंदाजीभोवती जे एक गूढतेचं वलय होतं ते एका फटक्यात नाहीसं झालं...
सुनील नरेननं तितकी कसर भरून काढली ती फलंदाजीवर काम करून, स्वत:ला एक विध्वंसक सलामीवीर बनवून...तो हातात चेंडू घेऊन काय करू शकतो हे सर्वांना माहीत होतं. परंतु त्याच्या हातातील बँटही तलवारीसारखी फिरू शकते हे ‘मेलबर्न रेनेगेड्स’नं त्याला ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’च्या 2016-17 च्या हंगामात डावाची सुऊवात करण्यासाठी पाठविलं तेव्हा कळून चुकलं...त्याचाच कित्ता पुढं ‘कोलकाता नाइट रायडर्स’नं गिरविला...
2018 मध्ये सुनील नरेनला त्याच्या अष्टपैलू योगदानासाठी पुन्हा एकदा ‘सर्वांत मौल्यवान खेळाडू’ म्हणून घोषित करण्यात आलं. त्या हंगामात त्यानं 17 बेळी घेण्यासह सुमारे 190 इतक्या ‘स्ट्राइक रेट’नं 357 धावा केल्या...2018 ते 2020 पर्यंतच्या तीन स्पर्धात किमान 500 धावा काढलेल्या फलंदाजांत नरेनपेक्षा (179.2) ‘स्ट्राईक रेट’ चांगला राहिला तो फक्त आंद्रे रसेलचा. पण ‘पॉवरप्ले’मध्ये मात्र नरेनच्या कुणी जवळपासही पोहोचू शकलं नाही...मागील तीन हंगामांत निराशा केल्यानंतर यंदा सुनील नरेनची बॅट पुन्हा तळपू लागलीय आणि चालू मोसमात सहा सामन्यांतून त्यानं 7 बळी घेतलेले असले, तरी प्रतिस्पर्ध्यांना धास्ती राहील ती त्याच्यातला ‘हिटर’ कोणत्याही क्षणी जागा होण्याचीच !
सुनीलचे पराक्रम...
- सुनील नरेननं गेल्या मंगळवारी ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात झळकावलं ते ‘आयपीएल’च्या कारकिर्दीतील आपलं पहिलं शतक...ब्रेंडन मॅकलम व व्यंकटेश अय्यर यांच्यानंतर शतक फटकावणारा तो ‘कोलकाता नाइट रायडर्स’चा तिसरा फलंदाज...
- ‘आयपीएल’मध्ये सुसाट सुटलेल्या नरेनला आंतरराष्ट्रीय ‘टी-20’ कारकिर्दीत मात्र 51 सामन्यांमध्ये केवळ 155 धावाच काढता आल्याहेत...
- ‘आयपीएल’मध्ये शतक झळकावणारा आणि त्याचबरोबर पाच बळीही खात्यात असलेला तो पहिला खेळाडू...
- नरेन ‘टी-20’ क्रिकेटमध्ये एकंदरित 500 सामने खेळलेला फक्त चौथा खेळाडू...या यादीत त्याच्या पुढं आहेत ते केरन पोलार्ड (660 सामने), ड्वेन ब्राव्हो (573) नि शोएब मलिक (542)...
गोलंदाजीतील कारकीर्द...
प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्कृष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट सरासरी 5 बळी
कसोटी 6 11 21 6/91 8/223 40.52 2
वनडे 65 65 92 - 6/27 26.47 2
टी20 51 49 52 - 4/12 21.25 d-
आयपीएल 168 167 170 - 5/19 25.69 1
‘आयपीएल’मधील फलंदाजी...
सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतक अर्धशतकं
168 102 20 1322 109 16.12 1 5
‘आयपीएल’मधील अन्य पाच धडाकेबाज डाव...
- 25 चेंडूंत 47 धावा (2019) : राजस्थान रॉयल्सविरुद्ध...
- 17 चेंडूंत 54 धावा (2017) : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध...
- 32 चेंडूंत 64 धावा (2020) : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध...
- 36 चेंडूंत 75 धावा (2018) : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध...
- 39 चेंडूंत 85 धावा (2024) : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध...
‘आयपीएल’मधील भेदक गोलंदाजी...
- 19 धावांत 5 बळी (2012) : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध...
- 13 धावांत 4 बळी (2013) : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध...
- 15 धावांत 4 बळी (2012) : मुंबई इंडियन्सविरुद्ध...
- 19 धावांत 4 बळी (2015) : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध...
- 21 धावांत 4 बळी (2021) : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध...
खेळ जुनाच ओळख नवी ! आईस हॉकी
‘आईस हॉकी’चा उगम 19 व्या शतकाच्या सुऊवातीला कॅनडामध्ये झाला...1860 च्या सुमारास त्यात चेंडूच्या जागी ‘पक’ आला आणि 1890 च्या दशकात या खेळाचा अमेरिकेत प्रसार होण्यास सुरुवात झाली...पुढं तो युरोपमध्ये पसरला आणि 1920 च्या अँटवर्पमधील खेळांपासून त्याचा समावेश ऑलिम्पिकमध्ये झाला...
- आईस हॉकी हा एक वेगवान आणि रोमांचक सांघिक खेळ...यामध्ये सहा खेळाडूंचे दोन संघ (एक ‘गोल टेंडर’ म्हणजे गोलरक्षक आणि पाच स्केटर) बर्फाळ मैदानात उतरतात. हा प्रकार ऑलिम्पिक खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी खेचतो तो सामन्यांतील नाट्या आणि तणावामुळं...
- आईस हॉकीचा सामना प्रत्येकी 20 मिनिटांच्या तीन सत्रांमध्ये खेळला जातो. गुणसंख्या बरोबरीत राहिल्यास खेळ जादा वेळेत खेळविला जातो. ही अतिरिक्त वेळ वेगवेगळी राहते आणि तिचे स्वरूप स्पर्धेवर किंवा स्पर्धेतील फेरीवर अवलंबून असते. ‘पेनल्टी-शॉट शूटआउट’द्वारे देखील अशा वेळी निकाल लावला जातो...
- प्रत्येक वेळी जेव्हा ‘पक’ गोलमध्ये जातो तेव्हा त्या संघास एक गुण दिला जातो. ‘पक’ इतर खेळाडूंना पास केला जाऊ शकतो आणि सामन्याच्या शेवटी सर्वाधिक गोल करणाऱ्या संघास विजेता घोषित केलं जातं. खेळ अतिरिक्त वेळेत गेल्यानंतर तिथं प्रथम गोल करणारा संघ विजेता ठरतो...
- हा खेळ ‘आईस रिंक’वर खेळला जातो ज्याची लांबी 61 मीटर आणि ऊंदी 30 मीटर असते. हे मैदान तीन मुख्य विभागांमध्ये विभागलेले असते. मधला विभाग हा ‘न्यूट्रल झोन’ आणि त्यात मध्यवर्ती वर्तुळ असते, जिथून खेळ सुरू होतो...
- प्रत्येक खेळाडूकडे ‘आईस स्केट्स’ आणि अनेक प्रकारच्या पॅड्ससह (यामध्ये फेस मास्क, हेल्मेट, पॅडेड शॉर्ट्स, शोल्डर पॅड, आर्म गार्ड आणि हातमोजे यांचा समावेश असू शकतो) हॉकी स्टिक असते. प्रत्येक ‘गोल टेंडर’ही तेच परिधान करत असतो, परंतु त्यांची घनता अधिक असते. कारण बरेचदा ‘पक’ त्यांच्यावर आदळत असतो...
- प्रत्येक संघात जास्तीत जास्त 20 खेळाडू असू शकतात. या 20 खेळाडूंपैकी फक्त सहा खेळाडू कधीही बर्फाळ मैदानात असू शकतात. उर्वरित खेळाडूंना ‘बदली’ म्हणून वापरलं जातं. ते हव्या तितक्या वेळा मैदानात उतरू वा बाहेर जाऊ शकतात...
- प्रत्येक खेळाडूला एक स्थान दिलेलं असतं. पण खेळाडू त्यांना हवं तसं फिरण्यास मोकळे असतात. हे ‘गोल टेंडर’ला लागू होत नाही. त्यानं आपल्या बाजूनं राहणं आणि मध्यभागी असलेली लाल रेषा न ओलांडणं आवश्यक असतं...
- हॉकीमध्ये चेंडू फटकावला जातो, तर आइस हॉकीमध्ये खेळाडू जो फटकावतात त्याला ‘पक’ म्हणतात. ‘पक’ ही दाट रबरापासून बनवलेली जड वस्तू आणि त्याचं वजन अंदाजे 6 औंस इतकं राहतं. खेळाडूंनी त्याला हॉकी स्टिकचा वापर करून फटकावायचं असतं. त्याला पाय लागला तरी चालतं, परंतु ‘गोल टेंडर’ वगळता इतर कुणीही खेळाडू त्याला हात लावू शकत नाहीत...
- गोल करण्यासाठी खेळाडूनं ‘पक’ गोलरेषेच्या पार फटकावला पाहिजे. त्यासाठी संपूर्ण ‘पक’नं रेषा ओलांडलेली असणं आवश्यक असतं...
- किरकोळ दंड ठोठावल्यास खेळाडूला दोन मिनिटांसाठी मैदान सोडण्याचा आदेश दिला जातो. त्या कालावधीत संघ 5 खेळाडूंनिशी खेळतो. त्या दोन मिनिटांत विरोधी संघाने गोल केल्यास तो खेळाडू लगेच ‘रिंक’वर परत येऊ शकतो...मोठा दंड झाल्यास हा अवधी 5 मिनिटांवर किंवा गैरवर्तनासाठी दंड ठोठावल्यास 10 मिनिटांवर जातो...
तायक्वांदोपटू विधी गोरेची थक्क करणारी ‘झेप’
राजू चव्हाण / खेड
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतही सुवर्णपदकाला गवसणी, वयाच्या 8व्या वर्षीच खेळात रोवले पाय, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर अफाट पारितोषिकांची लयलूट, खेडच्या शिरपेचात रोवतेय मानाचा तुरा ज्या बागडायचे असते, खेळायचे असते.. त्याच वयात तायक्वांदो खेळावर निस्सीम भक्ती करत अपार कष्टाच्या बळावर अल्पावधीतच राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतही सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता 9वीतील तायक्वांदोपटू विधी दीपक गोरे हिने घेतलेली झेप थक्कच करायला लावणारी आहे. बाळपणापासूनच तायक्वांदो खेळात विविध अभिरूची असलेल्या विधीने आजवर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अफाट पारितोषिकांची लयलूट करत खेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याची किमया ती करत आहे.
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही उक्ती विधीच्या बाबतीत खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. वयाच्या 8व्या वर्षीच तिने तायक्वांदो खेळात पाय रोवले. तिची छोटी बहीण ईश्वरी तायक्वांदोच्या क्लासला जायची. हे पाहून तिच्या आईने विधीलाही फिटनेससह व व्यायामासाठी तायक्वांदो क्लासला पाठवण्यास सुरूवात केली. तिची आवड आई-वडिलांनी अचूकपणे हेरल्यामुळे हीच प्रेरणा तिच्यासाठी खऱ्या अर्थाने छंदच बनली. भरणे तायक्वांदो स्पोर्ट्स क्लबमध्ये तायक्वांदो खेळाचे धडे गिरवणाऱ्या विधीने अल्पावधीतच ठसा उमटवत एका मागोमाग एक यशाची दमदार पावले टाकण्यास सुरूवात केली.
आई-वडिलांनी सतत दिलेले प्रोत्साहनाचे बळ तिच्यासाठी एकप्रकारची उर्जाच ठरली. तायक्वांदो खेळात चमक दाखवत सर्वप्रथम कांस्यपदक पटकावताच तिने सुवर्णपदकाला गवसणी घालण्याची महत्वाकांक्षा उराशी बाळगली. तिच्या जिद्दीला आकार देण्याचे काम प्रशालेतील क्रिडा शिक्षक व तायक्वॉंदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांनी केले. कोरोनाचे संकटातही ती मोठ्या आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरी गेली. कोरोनामुळे घराबाहेर पडण्यास घातलेल्या निर्बंधामुळे प्रशिक्षण घेण्यास अडथळा निर्माण झाला होता. तरीदेखील तिने घरात दररोज व्यायाम सुरु ठेवत तायक्वांदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांनी ऑनलाईन प्रशिक्षणातून खेळातील बारकावे समजावून सांगितले.
2022-23 मध्ये झालेली राष्ट्रीय कॅडेट स्पर्धा विधीसाठी पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती. या राष्ट्रीय कॅडेट स्पर्धेत जिंकण्याचाच निर्धार करत विजयाचा आलेख उंचावण्याचा तिचा मानस होता. आत्मविश्वासाच्या जोरावर विधीने या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या विजयामुळे विधीच्या रुपातून रोटरी स्कूलच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. यश खेचून आणण्यासाठी विधीला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागले होते.
काही मिळवण्यासाठी काही गमवायला लागते. त्याचबरोबर यशस्वी होण्यासाठी मार्गात येणाऱ्या सर्व समस्यांचा सामना करायला शिकलं पाहिजे. हे विधीच्या कर्तृत्वाने सिध्द केले. अभ्यास व खेळ या दोन्ही गोष्टींना समान वेळ व महत्त्व देत विधीने गगनभरारी घेतली आहे. ओडिसा येथे झालेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत रौप्यपदक, नोईडा, दिल्ली येथील सी.बी.एस.ई. राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, औरंगाबाद येथील खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक, बेळगांव येथील सी.बी.एस.ई. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक, हैदराबाद येथील कॅडेट राष्ट्रीय स्पर्धत सुवर्णपदक, नागपूर येथे घेण्यात आलेल्या कॅडेट राज्य स्पर्धत सुवर्णपदक, रत्नागिरी येथे झालेल्या विभागीय स्तरावरील शालेय स्पर्धेत रौप्यपदक, डेरवण येथील जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, रत्नागिरी महाराष्ट्र ज्युनिअर राज्य स्पर्धेमध्ये रौप्यपदक आदी पारितोषिकांची लयलूट करत उत्तुंग भरारी घेतली आहे.
यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी तिला रोटरी स्कूलने व संघटनेने मोलाचे सहकार्य केले आहे. तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष व राज्य संघटना कोषाध्यक्ष, व्यकटेश कररा, सचिव लक्ष्मण कररा, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बर्गेजे, सचिव मिलिंद पठारे व सर्व पदाधिकारी यांचेही मार्गदर्शन लाभले.
2023-24 मध्ये पॉंडिचेरी-तमिळनाडू येथे खेलो इंडिया महिला फेस-3 स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली. या मोठया स्पर्धेमध्ये विजेतेपदामागील रहस्य म्हणजे तीची या खेळाविषयी असणारी निष्ठा या निष्ठेच्या जोरावर आता तिला 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये सहभाग घेवून यशाला गवसणी घालायची आहे.
या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचा तिरंगा हातात घेत ती स्वप्न साकार नक्कीच करेल, असा ठाम विश्वास तिचे आईवडील, प्रशिक्षक व रोटरी स्कूलला आहे. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विधीने आजपर्यंतचे मिळवेलेले यश कौतुकास्पद असून रोटरी स्कूलला मिळालेल्या अनेक हिऱ्यांपैकी विधी एक अनमोल रत्नच असल्याचा सार्थ अभिमान प्रशालेला आहे.
देशासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचंय!
भविष्यात आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे आहे, असे ध्येय तिने उराशी बाळगले आहे. आपल्या देशाचे, आई-वडिलांचे नाव उंचावण्याचा मानस असून प्रशिक्षकांसह प्रशालेने पाहिलेले ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
विधी गोरे,तायक्वांदोपटू, भरणे-खेड