महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यूझीलंडचा हुकमी एक्का...केन विल्यमसन !

Advertisement

केन विल्यमसन...‘फॅब फोर’पैकी एक अन् न्यूझीलंडच्याच नव्हे, तर क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज फलंदाजामध्ये समाविष्ट होणारं नाव...प्रचंड गुणवत्ता, निर्णायक परिस्थितीत शतकी खेळी करण्याच्या हातोटीबरोबर तीव्र स्पर्धेच्या आजच्या युगात खिलाडूपणा, मैदानावरील शांत वर्तन अन् नम्रता यामुळं क्रिकेटमधील हा ‘नाईस् गाय’ रसिकांना अधिकच भावतो...

Advertisement

नोव्हेंबर, 2010...अहमदाबादमधील मैदानात पहिली कसोटी खेळण्यासाठी तो जेव्हा उतरला तेव्हा बालपणातील आपले ‘हीरो’ सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण नि राहुल द्रविड यांना अवतीभवती पाहून भारावून गेल्याशिवाय राहिला नाही...अशा महान खेळाडूंसह वावरण्याची संधी मिळालीय या जाणीवेनंच त्याला गगन ठेंगणं झाल्यागत वाटायला लागलं...‘तो क्षण अवास्तव असल्यागत वाटत होतं. मला अजूनही आठवतं की, मी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन शक्य असल्यास काही खेळाडूंशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला’, तो सांगतो...

आज तो स्वत:च क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंच्या यादीत जाऊन बसलाय...न्यूझीलंडचा मार्टिन क्रोनंतरचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय...केन विल्यमसन...‘फॅब फोर’ म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यात भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अन् इंग्लंडचा ज्यो रूट यांच्यासह चौथ नावं येतं ते विल्यमसनचं...हे चारही खेळाडू 100 कसोटी खेळलेत अन् हा टप्पा अगदी अलीकडे गाठलाय तो किवी खेळाडूनं...केन आणि टीम साऊदी हे ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जेव्हा उतरले तेव्हा एकाच लढतीत दोन किंवा अधिक खेळाडूंनी 100 वी कसोटी लढत खेळण्याची ती पाचवी खेप होती... विल्यमसन नि साऊदी हे दोघेही 2008 मधील 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडच्या संघातून खेळले होते. त्या स्पर्धेच्या काही आठवडे आधी साऊदीनं वरिष्ठ ‘टी-20’ संघात पाऊल ठेवलं होतं अन् वर्षभरातच त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली....विल्यमसनला कसोटी संघात प्रवेश करण्यासाठी 2010 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली असली, तरी त्यानंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारांत झपाट्यानं प्रगती करत त्यानं न्यूझीलंडच्या महान फलंदाजांमध्ये स्थान मिळविलं...

8 ऑगस्ट, 1990 रोजी जन्मलेला केन विल्यमसन प्रथम दाखल झाला तो एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघात. श्रीलंकेतील त्या तिरंगी मालिकेत भारताचाही समावेश होता. पहिल्या दोन्ही डावांत त्याला खातंही उघडता आलं नव्हतं. पण त्याच्यासारख्या खेळाडूचा दर्जा फार काळ दबून राहत नाही. त्याच वर्षी ढाका इथं विल्यमसननं बांगलादेशविऊद्ध शतक झळकावलं अन् त्याला कसोटी संघात बोलावणं आलं ते भारताच्या आव्हानात्मक दौऱ्यासाठी... पुढील काही वर्षांमध्ये विल्यमसनला सातत्याच्या अभावानं सतावलं, परंतु ही परिस्थिती बदलली ती 2014 नं. त्या वर्षी भारताविऊद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सर्व पाच सामन्यांमध्ये 50 हून अधिक धावा जमवत तो अशी कामगिरी करणारा ‘वनडे’ इतिहासातील यासिर हमिदनंतरचा दुसरा फलंदाज ठरला. तर पुढच्या सालानं त्याला बड्या फलंदाजांच्या यादीत आणून बसविलं. न्यूझीलंडसाठी सुद्धा हे वर्ष ऐतिहासिक ठरलं. कारण त्यांनी पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीला धडक दिली...

विल्यमसनची फलंदाजी ही क्रिकेटच्या पुस्तकातील शास्त्रशुद्ध खेळाचा आनंद देणारी. त्यात उत्कृष्ट फटक्यांना जोड ‘फूटवर्कची. त्याची भूमिका राहिलीय ती नांगर घालून डावाची उभारणी करणाऱ्या फलंदाजाची. त्यामुळं त्याला नेहमीच ‘क्लासिकल’ कसोटी फलंदाज म्हणून संबोधलं जातं...असं असलं, तरी त्यानं एकदिवसीय सामन्यांशीच नव्हे, तर अगदी धडाकेबाज ‘टी-20’शीही व्यवस्थित जुळवून घेतलंय...याचं एक उदाहरण गेल्या वर्षी भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेचं. ‘आयपीएल’मध्ये गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळं त्याला आरंभीचे काही सामने हुकले. त्यातच परत आल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या लढतीत अंगठा फ्रॅक्चर झाला. तरीही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यानं रचिन रवींद्रसमवेत न्यूझीलंडला अत्यंत महत्त्वाचा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याला शतक हुकलं ते अवघ्या 5 धावांनी...याभरात तो विश्वचषक स्पर्धेत 1000 धावांचा टप्पा ओलांडणारा केवळ तिसरा किवी फलंदाजच बनला नाही, तर त्यानं स्टीफन फ्लेमिंगला (33 डावांत 1075 धावा) मागं टाकत विश्वचषकात सर्वाधिक धावा (27 सामन्यांत 61.42 च्या सरासरीनं 1167) जमविणारा न्यूझीलंडचा खेळाडू ठरण्याचा मान मिळविला...विश्वचषकात सर्वांत जास्त धावा काढणारा कर्णधार ठरण्याचा विक्रम होता तो केनच्याच नावावर (2019 मध्ये दोन शतकांसह 578 धावा). तो गतवर्षी 597 धावा फटकावत मोडीत काढला आपल्या रोहित शर्मानं...

तीच गोष्ट ‘आयपीएल’ची. 2015 मध्ये त्याला प्रथम करारबद्ध केलं ते ‘सनरायझर्स हैदराबाद’नं. 2018 मध्ये डेव्हिड वॉर्नरवर बंदी आल्यानंतर संघाचं कर्णधारपद विल्यमसनकडेच सोपविण्यात आलं होतं. त्या मोसमात त्यानं 142.44 च्या स्ट्राइक रेटनं 735 फटकावल्या अन् संघाला अंतिम फेरीतही पोहोचविलं...2022 पर्यंत ‘सनरायझर्स हैदराबाद’साठी खेळल्यानंतर गेल्या हंगामात विल्यमसन वळला तो ‘गुजरात टायटन्स’कडे...कामचलावू ऑफस्पिनही टाकू शकणारा विल्यमसन फलंदाजीत वेगळा उठून दिसतो तो त्याचं सातत्य आणि दबावाखाली कामगिरी करण्याची क्षमता यामुळं. कसोटीत त्याची 54.99 ही सरासरी ऊट (सध्या 49.73) आणि कोहली (सध्या 49.16) यांच्यापेक्षा जास्त !

कसोटी क्रिकेटमधील दबदबा...

न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज...

कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे...

फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी...

खेळ जुनाच ओळख नवी ! : आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स

1894 मध्ये सर्वप्रथम सादर करण्यात आलेला ‘आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक’ हा आधुनिक ऑलिम्पिक खेळांमधील मूळ प्रकारांपैकी एक...‘आधुनिक जिम्नॅस्टिक्स’ म्हणून ज्याला ओळखलं जातं तो खेळ 1896 ते 1924 च्या दरम्यान विकसित झाला...तो आव्हानात्मक असतो अन् ‘बीम’सह विविध उपकरणं त्यात वापरली जातात तसंच जमिनीवरही आपलं कौशल्य सादर करावं लागतं...

- राजू प्रभू

तायक्वांदो या साहसी खेळाच्या माध्यमातून राजापूरचा नावलौकीक वाढविणारी पूर्वा

जगाच्या पाठीवर शेकडो खेळाचे प्रकार आहेत. यातच तायक्वांदो हा खेळही अत्यंत महत्वाचा आहे. सुरूवातीला या खेळाकडे दुर्लक्ष केले असले तरी आता या खेळाला केंद्र व राज्य शासनाने विविध शासकिय क्रिडा स्पर्धेत समाविष्ट केले आहे. स्वसंरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या या खेळातून शारिरिक, मानसिक व बौध्दीक विकास घडून येतो. महिलांना आत्मनिर्भय बनविणाऱ्या या खेळात राजापूरातील आंगले सारख्या अतिदुर्गम भागातील तरूणीने राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. पूर्वा संदिप राऊत असे या तरूणीचे नाव असून तायक्वांदो खेळात पूर्वाने राजापूर तालुक्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे. राजापूर सारख्या डोंगराळ तालुक्यातील आंगले या अतिदुर्गम गावची सुकन्या पूर्वा राऊत हीचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील असला तरी कोकणच्या लाल मातीतील रक्त तीच्या धमण्यांमधून वाहत असल्याने तायक्वांदो सारख्या धाडसी खेळाची तीने निवड केली, असेच म्हणावे लागेल. पूर्वाचे कुटूंब सध्या हातिवले येथे वास्तव्याला आहे. तीचे प्राथमिक शिक्षण शहरातील विश्वनाथ विद्यालय येथे झाले तर माध्यमिक शिक्षण राजापूर हायस्कूलमध्ये झाले. सध्या ती रानतळे येथील ए.ई.काळसेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकत आहे. खेळासोबतच शिक्षणामध्येही तीने आपल्या कतृर्त्वाचा ठसा उमटविला आहे. इयत्ता दहावीमध्ये हायस्कूलमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती.

लहानपणापासूनच तीला तायक्वांदो खेळाची आवड होती. पूर्वाचे वडील संदीप राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराने राजापूर तालुका तायक्वांदो अॅपॅडमीची स्थापना केली. त्यातील पूर्वा ही पहिल्या बॅचची प्रशिक्षणार्थी. तीन तायक्वांदो या क्रिडा प्रकारात आजवर पांढरा, पिवळा, हिरवा, हिरवा 1, निळा, निळा 1, लाल, लाल 1, काळा, फस्ट डीएएन आय, असा प्रवास केला आहे. या दरम्यान तीने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत यश संपादन केले आहे. यामध्ये प्रत्येक स्पर्धेत मिळालेल्या पदकांमुळे घरात इतर कोणत्याही शोपीसला जागाच शिल्लक राहिलेली नाही. मागील वर्षभरात तर तीने या क्रिडाप्रकारत अधिक उभारी घेताना जिल्हास्तरीय 52 कि.ग्र. वजनी गटात सुवर्ण, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत 2 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर महाराष्ट्र राज्य असोसिएशन तायक्वांदो स्पर्धेमध्ये व खेलो इंडिया स्पर्धेच्या निवड चाचणीतून तिची खेलो इंडिया मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स् अॅण्ड स्पोर्टस् भारत सरकार यांच्या मान्यतेने व पाँडेचेरी तायक्वांदो स्पोर्टर्स असोसिएशन आयोजित पहिली अस्मिता खेला इंडिया महिला लिग फेज तीन स्पर्धेमध्ये निवड झाली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत 11 राज्यांमधून तीने रौप्य पदकाची कमाई केली.

त्यामुळे तिला उडीसा येथे झालेल्या राष्ट्रीय खेडो इंडीया स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेतही तीने चमकदार कामगिरी करत राजापूर तालुक्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे. पूर्वाच्या आजवरच्या प्रवासात आई-वडीलांचा मोठा पाठींबा व मार्गदर्शन लाभले. तसेच तिला प्रशालेचे क्रीडाशिक्षक व तायक्वाँदो अकॅडमी राजापूरचे प्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे हे मार्गदर्शन करत आहेत.   तायक्वांदो हा खेळ दक्षिण कोरीया या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. हा खेळ 1988 पासून सेऊल ऑलिम्पीक क्रिडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून ऑलिम्पीकमध्ये हा खेळ नियमित खेळला जात आहे. हा खेळ केंद्र सरकारच्या शालेय क्रिडा स्पर्धा, ग्रामीण (पायका) व अखिल भारतीय विद्यापीठ यांच्यातही समाविष्ट आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर सेफ गेम्स, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, तसेच विश्वकप तायक्वांदो स्पर्धेत सुध्दा होत आहे. तायक्वांदो या खेळाला राज्य सरकारने अधिकारी तथा कर्मचारी भरती प्रक्रियेत खेळाच्या कोट्यात पाच टक्के आरक्षण दिले आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेतही आरक्षण दिले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या खेळाचे महत्व वाढले आहे. हल्लीच्या काळात महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो. अशातच महिलांनी तायक्वांदोचे प्रशिक्षण घेतल्यास त्यांना स्वत:चे रक्षण सहज करता येईल असे तीने सांगितले. तायक्वांदो सारख्या साहसी खेळाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करत देशपातळीवर आपल्या यशाची मोहोर उमटविणाऱ्या पूर्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रकाश नाचणेकर, राजापूर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article