For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

‘स्मॉल वंडर’...दीपा कर्माकर !

Advertisement

सध्या ‘टी-20 विश्वचषका’मुळं क्रिकेटचा डंका ऐन भरात असून त्यापुढं जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं भारताला आशियाई स्पर्धेत कधी नव्हे त्या यशाची चाखून दिलेली चव काहीशी झाकोळून गेली...मात्र ही कामगिरी केवळ भारतीय जिम्नॅस्टिक्ससाठीच नव्हे, तर अनेक अडचणींवर मात करत पुनरागमन केलेल्या जिगरबाज दीपाच्या दृष्टीनं देखील अनन्यसाधारण महत्त्वाची....

एखाद्या प्रचंड प्रतिभावान खेळाडूची शिखरावर असतानाच मैदानात उतरण्याची संधी हुकली तर ?...तिच्या बाबतीत नेमकं असंच घडलं...आधी दुखापतींचं ग्रहण, नंतर प्रतिबंध असलेल्या पदार्थाचं सेवन केल्याचा ठपका येऊन कारवाईची नामुष्की अन् त्यातून पुनरागमन केल्यानंतर बड्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरूनही शेवटी त्यात सहभागी होण्याच्या बेतावर पडलेलं पाणी...कुठल्याही खेळाडूचं अशा परिस्थितीत मनोबल, धीर पार खचला असता, तो कोलमडला असता...पण तिनं विलक्षण निर्धारानं त्यातून बाहेर सरून पुन्हा अशी उसळी घेतली की, तिला निवृत्तीचा सल्ला देण्यासाठी उतावीळ झालेल्यांची वाचाच धरली...भारताची अव्वल जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं आशियाई स्पर्धेत नुकतंच मिळविलेलं अभूतपूर्व यश जास्तच महत्त्वाचं आहे ते त्यामुळं...

Advertisement

दीपानं पुन्हा एकदा इतिहास रचला तो उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं झालेल्या वरिष्ठ महिलांच्या आर्टिस्टिक जिम्न्ँस्टिक्स आशियाई स्पर्धेत ‘व्हॉल्ट’मध्ये सुवर्णपदक जिंकून. तिच्यासह भारतीय जिम्नॅस्टपटूंनी याआधी चार वेळा या स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेलं असलं, तरी भारताच्या वाट्याला अव्वल स्थान येण्याची ही पहिलीच खेप...विशेष म्हणजे दोन दिवस आधी ‘ऑल-अराऊंड’मध्ये 46.166 गुणांसह 16 व्या स्थानावर राहिल्यानंतर लगेच तिनं धमाकेदार पुनरागमन करताना 13.566 च्या सरासरी गुणांसह ‘व्हॉल्ट’मध्ये ही कामगिरी करून दाखविली अन् पिछाडीवर टाकलं ते उत्तर कोरियाच्या खेळाडूंना. याकरिता तिनं आधी सादर केलं ‘त्सुकाहारा अन् नंतर ‘स्ट्रेट बॉडी फ्रंट समरसॉल्ट’...दीपा कर्माकरच्या मते, ती थोडं अधिक चांगलं प्रदर्शन घडवू शकली असती. परंतु दंडापोटी काही गुण वजा झाले. तरीही त्याची पर्वा न करता तिनं दमदार कामगिरी केली...

दीपाला इतकं ‘सोनेरी’ यश मिळवूनही सलत राहील ती एकच बाब. ही भारतीय जिम्नॅस्ट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचं ध्येय गाठू शकली नाही. ‘व्हॉल्ट’मधील ‘ऑलिम्पिक पात्रता विश्वचषक क्रमवारी’त तिला एकूण 52 गुणांसह मिळालं चौथं स्थान अन् तिथून पात्र ठरले केवळ दोन आघाडीचे जिम्नॅस्ट...या आघाडीवर चारपैकी कैरो, बाकू नि दोहा येथील तीन स्पर्धांमध्ये कर्माकरनं भाग घेतला होता आणि तिन्ही ठिकाणी तिनं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. परंतु दुर्दैवानं ती एकदाही पदक मिळवू शकली नाही. कैरोमध्ये तिच्या वाट्याला आलं पाचवं स्थान, तर त्यानंतरच्या दोन स्पर्धांत ती राहिली चौथ्या क्रमांकावर...दीपाला आता पॅरिसला जाण्याची अंधूक आशा आहे ती ऑलिम्पिकसाठीच्या ‘व्हॉल्ट’मधील राखीव यादीत चौथ्या स्थानावर असल्यानं...

उल्लेखनीय बाब म्हणजे दीपा कर्माकरनं 21 महिन्यांच्या निलंबनानंतर गेल्या वर्षी स्पर्धात्मक जिम्नॅस्टिक्समध्ये पुनरागमन केलं होतं आणि आठ वर्षांच्या अंतरानंतर यंदाच्या आरंभी राष्ट्रीय स्पर्धेत उतरून ‘ऑल-अराऊंड’मध्ये सुवर्ण, ‘व्हॉल्ट’मध्ये रौप्य व ‘अनइव्हन बार्स’मध्ये रौप्य अशी तीन पदकांची कमाई करत आपलं वर्चस्व दाखवून दिलं. आता त्यावर सरताज चढविणाऱ्या ‘गोल्डन शो’नं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की, दीपा संपलेली नाही, तिच्यात आगामी काही काळ दणाणून सोडण्याची ताकद निश्चितच लपलीय...

मात्र हा प्रवास सोपा राहिलेला नाहीये...दीपा कर्माकरला सर्वांत आधी 2017 मध्ये ‘अँटेरिअर क्रुसिएट लिगामेंट’ (एसीएल) दुखापतीचा सामना करावा लागला. त्यानंतरही अनेक दुखापतींना तोंड द्यावं लागलं. त्यातच बंदी घातलेल्या पदार्थाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यानं राष्ट्रीय उत्तेजकद्रव्य विरोधी यंत्रणेच्या निलंबनाचं संकट कोसळलं. 11 ऑक्टोबर, 2021 रोजी तिचा नमुना गोळा करण्यात आला होता. त्या दिवशी सुरू झालेलं हे निलंबन संपलं ते जुलै, 2023 मध्ये...

दीपानं स्पर्धात्मक जिम्न्ँस्टिकमध्ये पुनरागमन केल्यानंतर गेल्या वर्षी आशियाई खेळांसाठीच्या पात्रता फेऱ्यांत अव्वल स्थान पटकावून दाखविलं होतं. तरीही तिला चीनमधील हांगझाऊचं तिकीट हुकलं ते निवडीच्या निकषामुळं...आशियाई खेळांत जाणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूनं एका वर्षाच्या कालावधीत 2018 च्या स्पर्धेत आठव्या स्थानावर राहिलेल्या खेळाडूपेक्षा चांगले गुण नोंदविलेले असायला हवेत अशी ती अट. दीपाला हा अडथळा पार करता आला नाही, कारण तिला ‘डोंपिग’मुळं निलंबनाला सामोरं जावं लागलं होतं. शिवाय त्याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नव्हती असं ती म्हणते...‘आशियाई खेळांसाठी निवड न झाल्याचा माझ्यावर बराच परिणाम झाला. चाचणीच्या दोन दिवस आधी जरी मला निवडीच्या निकषांची जाणीव करून दिली असती, तरी मी त्यानुसार तयारी केली असती’, ती मग म्हणाली...

यादरम्यान 30 वर्षीय दीपा कर्माकरला झेलावी लागली ती तिचं वय वाढल्याची टीका अन् त्यातून देण्यात आलेले निवृत्तीचे सल्ले. काहींची तर ‘रिओ ऑलिम्पिक’नंतरच रामराम ठोकायला हवा होता इथपर्यंत मजल गेली. मात्र तिनं प्रेरणा घेतली ती 48 व्या वर्षी देखील या खेळांत जबरदस्त कामगिरी करून दाखविणारी उझ्बेक जिम्नॅस्ट ओक्साना चुसोव्हितिनाकडून. या पार्श्वभूमीवर आशियाई स्पर्धेत मिळालेलं यश हे खूप सुखावणारं, दिलासा देणारं...

‘पुनरागमनापूर्वी मला खूप त्रास, दुखापती आणि शस्त्रक्रियांचा सामना करावा लागला. हे खूप कष्टदायी होतं आणि माझे प्रशिक्षक नि कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी हे सर्व करू शकले नसते...दुखापती हा जीवनाचा एक भाग, खेळाडू त्याला सामोरे जातात आणि ते सर्वसाधारण. पण निलंबनाची घटना अयोग्य होती. मी काहीही चुकीचं केलेलं नव्हतं. त्यामुळं मी निराश झाले. पण सर्वांनी मला पुनरागमन करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून मी पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आणि शेवटी त्यात यशस्वी झाले’, दीपा सांगते...तिचे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी देखील म्हणतात, ‘तिला ज्या गोष्टीतून जावं लागलं ते अत्यंत आव्हानात्मक होतं. परंतु मी कधी हार मानली नाही आणि तिनं देखील हार मानली नाही’!

दीपा कर्माकरचे पराक्रम...

  • दीपा कर्माकर हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा प्रकाशझोतात आलं ते तिनं 2014 च्या ग्लासगो येथील ‘राष्ट्रकुल खेळां’मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर. एका वर्षानं तिनं आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळवून त्यात भर टाकली...
  • पुढं दीपानं शिखर गाठलं ते 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरून. असा प्रताप गाजविणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट. त्यासरशी ऑलिम्पिकमधील ‘आार्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स’मध्ये भारतीय सहभागासाठी चाललेली 52 वर्षांची प्रतीक्षा संपली...
  • दीपानं पात्रता फेरीत आठव्या स्थानावर राहून ‘व्हॉल्ट फायनल’मध्ये प्रवेश केल्यानंतर अंतिम फेरीत अमेरिकन सुपरस्टार सायमन बाइल्सच्या बरोबरीनं स्पर्धा करताना जीव तोडून प्रयत्न केले...
  • तिला कांस्यपदक हुकलं ते अवघ्या 0.15 गुणाच्या फरकानं आणि अखेरीस चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण एकंदर कामगिरी आणि विशेषत: ‘प्रोडुनोव्हा व्हॉल्ट’मुळं ती सर्वांच्या कौतुकाचा विषय बनल्याशिवाय राहिली नाही...
  • या पराक्रमामुळं तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्रीही प्राप्त झाली...

प्रशंसनीय वाटचाल...

  • दीपा कर्माकर ही फक्त 4 फूट 11-इंच उंच असली, तरी त्रिपुरातील या जिम्नॅस्टनं भारतीय जिम्नॅस्टिक्सला मोठी उंची गाठून दिलीय...जन्मत: सपाट पाय असलेल्या दीपासाठी जिम्नॅस्टिकच्या दृष्टीनं हा मोठा अडथळा होता. पण ती नेहमीच अडचणींना न जुमानता पुढं पावलं टाकत आलीय...
  • कर्माकरनं जिम्नॅस्टिक्सचं औपचारिक प्रशिक्षण सुरू केलं ते वयाच्या सहाव्या वर्षी. अपुऱ्या सुविधा असलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं लागूनही 14 व्या वर्षी तिने राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धा जिंकून दाखविली...
  • दीपानं पुढं केवळ ‘व्हॉल्ट स्पेशालिस्ट’ म्हणूनच नव्हे, तर सर्वांत प्रसिद्ध व खडतर ‘प्रोडुनोव्हा व्हॉल्ट’ साकारणारी जिम्नॅस्ट म्हणून नाव कमावलं...‘प्रोडुनोव्हा’ला ‘व्हॉल्ट ऑफ डेथ’ म्हणूनही ओळखलं जातं. हा प्रकार यशस्वीरीत्या सादर केलेल्या केवळ पाच महिला जिम्नॅस्टपैकी ती एक...
  • 2017 पासून दीपा कर्माकर वारंवार गुडघ्याच्या दुखापतींशी झुंज देत आलेली असली, तरी तंदुऊस्त असताना तिनं आपलं कौशल्य व्यवस्थित दाखवून दिलंय...2018 साली तुर्कीमधील मर्सिन इथं झालेल्या ‘आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप’मध्ये तिनं सुवर्णपदकाची, तर त्यानंतर जर्मनीतील ‘आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप’मध्ये कांस्यपदकाची कमाई केली...

खेळ जुनाच ओळख नवी : कराटे

कराटे...हे नाव माहीत नसलेला माणूस मिळणं कठीणच...तो मुळात एक जपानी मार्शल आर्ट. यात प्रहार करण्यासाठी हात, पाय, कोपर नि गुडघे यांचा वापर केला जातो तसेच प्रतिस्पर्ध्याला रोखण्याच्या व पाडण्याच्या तंत्रांचाही त्यात समावेश होतो...कराटे हा एक प्राचीन प्रकार असून त्याच्या सध्याच्या स्वरूपाची मुळे 15 व्या शतकात स्थापन झालेल्या रायुक्यू राजवटीच्या काळातील ओकिनावा या जपानी बेटाकडे पोहोचतात...

  • कराटे हा 1920 च्या दशकात संपूर्ण जपानमध्ये लोकप्रिय झाला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा झपाट्यानं विस्तार होत गेला...आज तो सर्वांत लोकप्रिय मार्शल आर्ट्सपैकी एक बनलाय अन् ‘शोटोकन’, ‘गोजू-ऱ्यू’, ‘क्योकुशिंकाई’ व ‘वाडो-ऱ्यू’ यासह त्याच्या भिन्न शैली विकसित झाल्याहेत...
  • कराटेपटूच्या प्रशिक्षणाचा स्तर त्यांच्या बेल्टवरून कळतो...‘व्हाईट’, ‘गोल्ड’, ‘ग्रीन’, ‘पर्पल’, ‘ब्ल्यू’, ‘रेड’, ‘ब्राऊन’ नि ‘ब्लॅक बेल्ट’ यांचा त्यात समावेश राहतो. त्यानंतर ‘ब्लॅक बेल्ट’च्या 10 ‘डिग्रीज’ असतात...
  • या क्रीडाप्रकारातील स्पर्धा विविध वजनी गटांतून होतात अन् कनिष्ठ स्तरावर वयानुसार श्रेणी ठरविल्या जाऊ शकतात...स्पर्धक गम शिल्ड, बॉडी प्रोटेक्शन, शिन पॅड्स, फूट प्रोटेक्टर्स परिधान करतात. ‘ग्रोइन गार्ड’ही परिधान केले जाऊ शकतात, परंतु ते अनिवार्य नाहीत...
  • कराटेमध्ये ‘कुमिते’ आणि ‘काता’ या दोन पद्धतींचा समावेश होतो. ‘कुमिते’ किंवा ‘कॉम्बॅट’मध्ये तीन मिनिटांची झुंज होते. यात आठ गुणांची स्पष्ट आघाडी मिळविणारा किंवा वेळमर्यादा संपल्यावेळी सर्वाधिक गुण मिळवणारा स्पर्धक विजेता ठरतो...जर लढत अनिर्णीत राहिली, तर विजेता पहिल्या बिनविरोध गुण अनुकूलतेच्या (सेन्शू) आधारे ठरविला जातो किंवा गुणहीन निकालाच्या बाबतीत पंचांच्या (हंतेई) बहुमताच्या निर्णयाद्वारे निकाल निर्धारित केला जातो...
  • नियंत्रित पंच, प्रहार आणि किकच्या योग्यरीत्या अंमलात आणलेल्या तंत्रानुसार गुण प्राप्त होतात. एक गुण ‘युको’साठी म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यावर, मानेवर, पोटावर, बाजूला, पाठीवर किंवा धडावर मूठ आवळून (त्सुकी) पंच केल्याबद्दल दिला जातो.
  • दोन गुण म्हणजे ‘वाजा-अरी’ शरीरावर हाणलेल्या ‘मिडल किक’साठी दिले जातात...तीन गुण म्हणजे ‘इप्पॉन’ डोक्यावर हाणलेल्या उंच किकसाठी किंवा ‘स्वीप’ वा ‘टेकडाउन’च्या माध्यमातून जमिनीवर पाडलेल्या प्रतिस्पर्ध्याला लगावलेल्या पंचसाठी मिळतात...
  • ‘काता’ म्हणजे स्वरुप...त्यात स्पर्धक पूर्वमान्य आणि कोरिओग्राफ केलेल्या हालचालींचा संच अंमलात आणतो. यातील विजेता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टम वापरून पंचांच्या मंडळाद्वारे घोषित केला जातो...तांत्रिक आणि अॅथलेटिक कामगिरीनुसार कराटेपटूचे मूल्यमापन होते...
  • कुमितेच्या लढती 8 मीटर × 8 मीटरच्या ‘मॅट स्क्वेअर’वर होतात आणि सर्व बाजूंनी 1 मीटर अतिरिक्त जागा असते, ज्याला सुरक्षा क्षेत्र म्हणतात...या स्पर्धकांनी पारंपरिक कराटे पोशाख परिधान करणे आवश्यक असते, ज्याला ‘गी’ म्हटले जाते आणि तो ‘प्लेन’ असायला हवा. त्यावर पट्टे किंवा भरतकाम असता कामा नये. स्पर्धकांच्या स्तराचे प्रतीक असलेल्या ‘बेल्ट’चा रंग परिधान करण्याऐवजी एक स्पर्धक ‘लाल’ रंगाचा बेल्ट आणि दुसरा ‘निळा’ बेल्ट परिधान करतो, ज्यामुळे त्यांचा वेगळेपणा राखण्यास मदत होते...
  • 2018 च्या ब्युनोस आयर्स युवा ऑलिम्पिक खेळांत झळकल्यानंतर कराटेने 2020 च्या टोकियो खेळांतून ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं. टोकियोमध्ये या प्रकारात ‘कुमिते’ आणि ‘काता’ या दोन्हींचा समावेश राहिला...

- राजू प्रभू

श्रीलक्ष्मी कामतची बुद्धिबळात भरारी

राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी : शैक्षणिक प्रगतीमध्ये बुद्धिबळाचा लाभ

बुद्धिबळ खेळात कमी वयातील बरेच खेळाडू आज उच्च झेप घेताना दिसत आहेत. काही बुद्धिबळपटूंनी घेतलेली भरारी ही अनेक युवा खेळाडूंना पथदर्शक ठरत आहे. या क्रीडा प्रकाराने नवीन होतकरु खेळाडूंना निश्चित दिशा दाखविलेली दिसते. याच मार्गावरुन फोंडा-गोवा येथील श्रीलक्ष्मी प्रीतीश कामत हिचा यशस्वी प्रवास सुरु आहे.बद्धिबळ खेळामुळे बौद्धिक विकास होत असतो. स्मरणशक्ती, एकाग्रता, तर्कशक्ती, सर्जनशीलता, समर्पकता वाढते असे सिद्ध झाले आहे. यामुळे या खेळाचा अभ्यासातही फार उपयोग होतो. 15 वर्षीय श्रीलक्ष्मी कामतने बुद्धिबळाचा आपल्या अभ्यासतही योग्य वापर करुन घेतला आहे. बुद्धिबळात तिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके पटकावतानाच, दहावीच्या परीक्षेतही 95.67 टक्के गुण मिळवून आपली दुहेरी गुणवत्ता सिद्ध केली आहे.

राज्य पातळीवर सहा वेळा अजिंक्यपद

वडील प्रीतीश हे बुद्धिबळ खेळाडू असल्याने श्रीलक्ष्मीला या खेळाची आवड घरातूनच निर्माण झाली. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. फिडे इन्स्ट्रक्टर विल्सन व्रुझ यांचे तिला प्रशिक्षण लाभले. यानंतर ती स्थानिक व राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभागी होऊ लागली. अॅरिना कॅन्डीडेट मास्टर (एसीएम) हा किताब तिने पटकावला. 2015 साली 7 वर्षाखालील मुलींच्या राज्य स्पर्धेत, 2016 व 2017 साली 9 वर्षाखालील, 2018 साली 11 वर्षाखालील व 2022 साली 14 वर्षाखालील गटात अजिंक्यपद पटकावले. 2019 साली 17 वर्षाखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद प्राप्त केले. राज्य आंतरशालेय सांघिक स्पर्धेत ए. जे. डी. आल्मेदा हायस्कूलला विजेतेपद प्राप्त करुन दिले. गोवा राज्य स्पर्धेच्या विविध वयोगटात तिने सहा वेळा अजिंक्यपद पटकावले आहे. श्रीलक्ष्मीचे स्टँडर्ड प्रकारात 1585, रॅपिड 1581 व ब्लिट्झमध्ये 1525 फिडे मानांकन आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत चमक

चेन्नई व तामिळनाडू येथे झालेल्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत श्रीलक्ष्मीने 8 वर्षाखालील गटात गोवा संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत 7 वर्षाखालील गटात व भुवनेश्वर येथे झालेल्या 11 वर्षाखालील गटात तिला नववे स्थान प्राप्त झाले. नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय 9 वर्षाखालील गटात नववे स्थान तिला मिळाले होते. गतसाली अखिल भारतीय खुल्या रॅपिड मानांकन स्पर्धेत तिने ग्रँडमास्टर आर. आर. लक्ष्मण या बलाढ्या खेळाडूविरुद्ध खेळताना जबरदस्त टक्कर दिली. हा आपला एक संस्मरणीय सामना असल्याचे ती सांगते. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे 2018 व 2019 साली आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या व दुसऱ्या आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर स्पर्धेत तिने सहभाग घेऊन मुख्य गटात 32 वा क्रमांक पटकावला. त्यानंतर 2020 मध्ये झालेल्या ऑनलाईन स्पर्धेत तिने आपल्या वयोगटात 2 सुवर्ण व 1 कांस्यपदक जिंकले.

दहावीत 95.67 टक्के गुण

बुद्धिबळ खेळात उल्लेखनीय कामगिरी करणारी श्रीलक्ष्मी अभ्यासातही हुशार आहे. मार्च 2024 मध्ये झालेल्या गोवा शालांत मंडळाच्या दहावी परीक्षेत तिने 95.67 टक्के गुण मिळविले आहेत. ती शिकत असलेल्या ए. जे. डी. आल्मेदा हायस्कूलमध्ये तिने तृतीय क्रमांक पटकावला. बुद्धिबळ खेळाचा आपल्याला अभ्यासातही फार उपयोग झाल्याचे ती सांगते. चौथीत व पाचवीत असताना तिने एनएसटीएसई परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. एसआरएस वेदिक मॅथेमॅटिक्स स्पर्धेत राज्यात चौथा क्रमांक तसेच मॅथ्स कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत सहावे स्थान प्राप्त केले होते. श्रीलक्ष्मीने आता जीव्हीएम आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. भविष्यात आयआयटीमधून अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची तिची महत्वाकांक्षा असून बुद्धिबळातही प्रगती साधण्याचे उद्दिष्ट्या आहे.

- नरेश गावणेकर

Advertisement
Tags :

.