महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सदोदित आक्रमक...युजवेंद्र चहल !

Advertisement

काही खेळाडूंना जरी वलय नसलं, तरी त्यांचे पराक्रम विलक्षण असतात...त्यापैकीच एक म्हणजे सदोदित आक्रमक पद्धतीनं गोलंदाजी करण्यावर विश्वास ठेवणारा लेगस्पिनर युजवेंद्र चहल...‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक बळी मिळविलेत ते हरयाणाच्या या गोलंदाजानंच अन् यंदाच्या स्पर्धेत देखील सध्या आघाडीवर आहे तो तोच... ‘टी-20’ म्हणजे मुळातच गोलंदाजांची कत्तल...त्यात बेंगळूरूमधील एम. चिन्नास्वामी किंवा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर फिरकी टाकण्याचं आव्हान पेलणं हे जास्तच कठीण. कारण एक तर आऊटफिल्ड वेगवान, त्यात मैदान छोटं. अशा ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या ‘आयपीएल’मधील सर्व फिरकीपटूंमध्ये बळी घेण्यासाठी सर्वांत कमी चेंडू घेणं आणि षटकामागं आठपेक्षा कमी धावा देणं ही बाब त्याचं महत्त्व, हुशारी व धाडस पटवून देण्यास पुरेशी...त्याहून महत्त्वाचं म्हणजे या धावांची बरसात करणाऱ्या लीगमध्ये आजवर बळी मिळविण्याच्या बाबतीत कुणी बडे बडे वेगवान गोलंदाज आघाडीवर नसून लेगस्पिनर असून देखील तो बहुमान मिळविलाय त्यानंच...युजवेंद्र चहल !

Advertisement

गुजरात टायटन्सविरुद्ध बुधवारी पहिला पराभव स्वीकारावा लागलेला असला, तरी ‘राजस्थान रॉयल्स’ची आतापर्यंतची घोडदौड जबरदस्त राहिली असून त्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय ती ‘पॉवरप्ले’मध्ये फलंदाजांना हमखास परतीची वाट दाखविणाऱ्या ट्रेंट बोल्टच्या पराक्रमाबरोबरच मधल्या षटकांमध्ये चहलकडून राखल्या जात असलेल्या नियंत्रणानंही...फलंदाजांच्या अहंकाराशी खेळणं, बरीच बाहेर वा संथ गोलंदाजी करून हातोहात बनवणं यात युजवेंद्र विलक्षण माहीर...मनगटाचा वापर करून चेंडू फिरविणाऱ्या या लेगस्पिनरकडे बेमालूम फसविणारा गुगली नसला, तरी तो गोलंदाजीची चपळ शैली आणि अचूक टप्पा यातून त्याची भरपाई करतो. चेंडूला ‘फ्लाइट’ देऊन फलंदाजांना गाजर दाखविण्यास न कचरणाऱ्या काही मोजक्या गोलंदाजांपैकी तो एक. त्यानं अनेक बळी मिळविलेत ते फलंदाजांना अशा प्रकारे फटकेबाजीच्या सापळ्यात अडकवूनच...

23 जुलै, 1990 रोजी हरयाणाच्या जिंदमध्ये जन्मलेल्या युजवेंद्र चहलनं सर्वांचं लक्ष सर्वप्रथम वेधून घेतलं ते 2009 मध्ये कूच बिहार चषक स्पर्धेत सर्वाधिक 34 बळी घेऊन. पुढच्याच वर्षी त्याला ‘अ’ श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याची संधी मिळाली...2011 साली ‘आयपीएल’साठी ‘मुंबई इंडियन्स’नं चहलला करारबद्ध केलेलं असलं, तरी तीन मोसमात त्याला केवळ एकच लढत खेळता आली ती 2014 च्या हंगामात. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या त्या सामन्यात त्याला एकही बळी मिळविता आला नाही...खरं तर 2011 च्या ‘चॅम्पियन्स लीग’मधील मुंबईच्या सर्व सामन्यांत तो झळकला होता अन् ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’विरुद्धच्या अंतिम सामन्यात युजवेंद्रनं केवळ 9 धावा देऊन दोन बळी मिळविल्यानं संघाला जेतेपद पटकावण्यास मोलाची मदत झाली होती...

युजवेंद्र चहलची कारकीर्द बहरली ती 2014 मध्ये 10 लाख रुपयांना ‘आरसीबी’नं त्याला आपल्या तंबूत खेचल्यानंतर. 2015 नि 2016 च्या मोसमांत मिळून 44 बळी मिळविलेल्या या लेगस्पिनरनं 2018 च्या स्पर्धेत ‘रॉयल चॅलेंजर्स’तर्फे सर्वाधिक गडी टिपलेल्या विनय कुमारला मागं टाकलं. चहलकडे मग संघाच्या हुकमी हत्यारांपैकी एक या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं अन् त्यानंही गरजेच्या प्रसंगी बड्या फलंदाजांचा अडथळा दूर करण्याची जबाबदारी वेळोवेळी यशस्वीरीत्या पेलली...2022 साली त्याला 6.5 कोटी रुपयांना करारबद्ध करण्याची ‘राजस्थान रॉयल्स’ची हुशारी योग्य सिद्ध झालीय. त्या मोसमात युजवेंद्र ‘पर्पल कप’चा मानकरी ठरला, तर गेल्या वर्षी त्यानं टिपले 21 बळी...

2016 सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यावरील भारतीय एकदिवसीय नि ‘टी-20’ संघांची दारं युजवेंद्र चहलला उघडी झाली ती ‘आयपीएल’मधील पराक्रमामुळंच. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्याच ‘वनडे’ सामन्यात 3 बळी घेऊन सामनावीर ठरलेल्या या लेगस्पिनरनं 2017 साली एकूण 21, तर 2018 नि 2019 मध्ये त्याही पुढं जात 29 बळी घेतले. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं सेंच्युरियनवर पहिल्यांदा पाच बळी मिळविले, तर 2019 च्या आरंभी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 42 धावांत 6 गडी टिपत अजित आगरकरच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीशी बरोबरी केली. 2019 च्या विश्वचषकातील भारतीय संघातही चहलची वर्णी लागून त्यानं सुरुवात केली तीच मुळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत 15 धावांत 4 फलंदाजांना बाद करून. त्या स्पर्धेत त्यानं 8 सामन्यांतून 12 बळी मिळविले...

तीच गोष्ट ‘टी-20’तली. फेब्रुवारी, 2017 मध्ये या प्रकारात 5 बळी मिळविणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरताना युजवेंद्र चहलनं इंग्लंडविरुद्ध 25 धावांत 6 गडी टिपले (‘टी-20’च्या विश्वातील एखाद्या भारतीयाची ही दुसरी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी). त्या वर्षी ‘टी-20’मध्ये त्याच्याइतके बळी (23) जगभरातील अन्य कुठल्याच खेळाडूला मिळविता आले नाहीत...गेल्या वर्षी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत भुवनेश्वर कुमारच्या 90 बळींना मागं टाकत चहल भारताच्या ‘टी-20’मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या सिंहासनावर आरुढ झाला. तो भारतीय ‘टी-20’ संघात शेवटचा झळकला ऑगस्ट, 2023 मधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत. त्यातही त्यानं पाच सामन्यांत पाच बळी घेतले...

असं असलं, तरी युजवेंद्र चहलची घसरण त्यापूर्वीच सुरू झाली होती...खराब फॉर्ममुळं 2021 च्या ‘टी-20’ विश्वचषकात त्याला डावलण्यात आलं. तर 2022 च्या विश्वचषकावेळी त्याला ऑस्ट्रेलियात नेण्यात आलं खरं, परंतु वाट्याला एकही सामना आला नाही...2020 नि 21 मध्ये अवघे सहा एकदिवसीय सामने खेळलेल्या चहलनं 2022 मध्ये 14 सामन्यांतून 21 बळी घेत पुन्हा आपल्या फिरकीची कमाल दाखवूनही पुढं वाट्याला गच्छंती आली...त्याची सुरुवात झाली गतवर्षीच्या आशिया चषकापासून. चांगली फलंदाजी करू शकणारा गोलंदाज हवा म्हणून त्याचा विचार करण्यात आला नाही. त्यानंतर भारतात झालेल्या विश्वचषकावेळीही त्याला बाहेरच ठेवण्यात आलं....

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील एकदिवसीय संघात युजवेंद्र चहलचं पुनरागमन झालं खरं, पण तिन्ही सामन्यांत त्याला बसवून ठेवण्यात आलं. त्यानंतरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ‘टी-20’ मालिकेवेळीही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा केंद्रीय करारही त्याच्या वाट्याला आला नाही (गेल्या वेळी त्याला मिळाली होती ‘क’ श्रेणी)...याला चहलच्या खराब फॉर्मपेक्षा जास्त कारणीभूत आहे ते संघाकडून अष्टपैलू खेळाडूला दिलं जाणारं प्राधान्य अन् खास करून कुलदीप यादवनं फिरकीपटू या नात्यानं केलेली विलक्षण प्रगती...यादरम्यान युजवेंद्रच्या बाबतीत कायम राहिली ती एकच गोष्ट...‘आयपीएल’ गाजविणं. ‘टी-20’ विश्वचषक जवळ पोहोचत असताना यंदाही तो तेच करून दाखवितोय !

‘आयपीएल’मध्ये ‘नंबर वन’....

यंदाही चमकदार कामगिरी...

अप्रतिम बुद्धिबळपटू...

वडिलांच्या सल्ल्यानुसार मध्यमगती गोलंदाजीकडून लेगस्पिनकडे मोर्चा वळविलेला युजवेंद्र चहल हा मुळात उदयाला आला होता तो बुद्धिबळपटू म्हणून. वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळू लागलेला चहल 12 वर्षांखालील गटात राष्ट्रीय विजेता बनला होता...शिवाय त्यानं आशियाई युवा स्पर्धेत तसंच ग्रीसमधील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत देखील भारताचं प्रतिनिधीत्व केलं. मात्र त्याच्या बुद्धिबळातील वाटचालीला ‘चेकमेट’ केलं ते पुरस्कर्त्यांच्या अभावानं..

‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज...

भारतातर्फे कामगिरी...

खेळ जुनाच ओळख नवी : बीच व्हॉलीबॉल

बीच व्हॉलीबॉल...वाळूवर खेळला जाणारा अन् जगभरात भरपूर लोकप्रिय झालेला व्हॉलीबॉलचा प्रकार प्रथम दिसला तो 1920 च्या दशकात कॅलिफोर्नियाच्या सांता मोनिका समुद्रकिनाऱ्यावर...पहिली बीच व्हॉलीबॉल स्पर्धा 1947 मध्ये झाली, तर कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यांवर शेकडो खेळाडूंचा समावेश असलेलं पहिलं ‘सर्किट’ 1950 मध्ये सुरू झालं...80 च्या दशकात पहिल्या व्यावसायिक खेळाडूंच्या संघाची स्थापना झाली आणि आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल महासंघाची मान्यता असलेली पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली ती 1987 साली...

कोल्हापूरच्या विक्रम कुराडेचा कुस्तीतील ऊबाबच न्यारा

शक्ती-युक्तीच्या जोरावर स्थानिकापासून आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदाने गाजवली, सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांचा पाडला पाऊस, 2016 साली राष्ट्रकुलमध्ये मिळाले रौप्य पदक, महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान

नंदगावमधील (ता. करवीर, जि. कोल्हापूर) आखाड्याच्या लालमातीत तयार झालेल्या विक्रम कृष्णात कुराडे या मल्लाची मॅटवरील ग्रीकोरोमन कुस्तीतील यशोगाथा अभिमानाने उर भरून आणेल, अशी आहे. अपार मेहनत कऊन कुस्ती स्पर्धामध्ये यश मिळण्यालायक कमवलेले बलदंड शरीर हे विक्रमच्या यशोगाथेमागील गमक आहे. त्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा तिन्ही पातळीवरील ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करताना शक्ती आणि युक्तीच्या जोरावर अनेक पदके जिंकली आहेत. 2013 ते 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने आयोजित  केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत (अधिवेशन) विक्रमने 60 व 63 किलो वजन गटातून प्रतिनिधीत्व करत सलग नऊ सुवर्ण पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे. इतकेच नव्हे तर 2016 साली कॉमनवेल्थमधील कुस्ती स्पर्धेतही त्याने देशाला रौप्य पदक मिळवून दिले आहे. कुस्तीतील एकुणच ताकतवर कामगिरीमुळे विक्रमला महाराष्ट्र सरकारने 2016 साली प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

नंदगावात (ता. करवीर) पारंपरिक शेती करणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या विक्रमला कुस्तीचा वारसा मिळाला तो म्हणजे चुलते शाबाजी कुराडे (माजी सरपंच) यांच्याकडून. शाबाजी त्याला गावातील जयहनुमान तालीममध्ये मेहनत करण्यासाठी नेत असत. त्यावेळी तो केवळ 10 वर्षाचा होता. मात्र ज्या दिवशी विक्रमने आखाड्यात पाय ठेवला त्याचदिवशी तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा मल्ल म्हणून नावाऊपाला येणार हे जणू विधीलिखीतच झाले होते. 2005-06 साली त्याने कोल्हापुरातील क्रीडा प्रबोधिनीत कुस्तीचे डावपेच शिकण्यासाठी प्रवेश घेतला. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग यांच्याकडून त्याला कुस्तीचे धडे मिळत राहिले. वडील कृष्णात कुराडे यांनी तर विक्रमला कुस्ती शिकण्यासाठी लागेल तेवढे पैसे देण्याची जबाबदारी स्वीकारली. एक वर्षानंतर कुस्तीतील मोठा टप्पा गाठण्यासाठी त्याने मोतिबाग तालीम गाठली. या तालमीत तो महान भारत केसरी (कै.) दादू चौगले व एनआयएस कुस्ती कोच चंद्रकांत चव्हाण व कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मॅटवरील कुस्तीचे धडे घेऊ लागला. यावेळी तो कोल्हापूर हायस्कूलमध्ये शिकतही होता. शिक्षण घेत घेत त्याने स्थानिकपासून ते राज्य पातळीवरील शालेय व फेडरेशनच्या ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेतील 32, 35, 38, 42, 46, 50 किलो वजन गटात प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करत सुवर्ण व रौप्य पदके मिळवत राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारली. इतकेच नव्हे तर वरील सर्वच वजन गटातील राष्ट्रीय स्पर्धांमध्येही सुवर्ण व रौप्य पदक जिंकल्याने तो राष्ट्रीय मल्ल म्हणून नावाऊपाला आला.

2009 साली बालेवाडीत (पुणे) फेडरेशनच्या झालेल्या आशियाई कॅडेट ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेच्यानिमित्ताने विक्रम हा पहिल्या आंतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्ज झाला होता. स्थानिकपासून ते राष्ट्रीयस्तरावरील कुस्ती जिंकत जिंकत त्याने आशियाई स्पर्धेपर्यंत मजल मारली. या स्पर्धेत त्याने  भारतीय संघातून 42 किलो वजनी गटामध्ये प्रतिनिधीत्व केले. परंतू स्पर्धेत त्याला पराभवास सामोरे जावे लागले. मात्र 2009 साली उना (हिमाचल प्रदेश) येथे झालेल्या 28 व्या राष्ट्रीय सबज्युनिअर कॅडेट ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत त्याने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत समोर येणाऱ्या मल्लांना कोल्हापूरी भाषेत आस्मान दाखवत सुवर्ण पदक जिंकले. 2010 साली ही ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या युथ ऑलिम्पिकमधील ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मुसंडी मारलेल्या विक्रमने चायनाच्या मल्लाला हरवून भारताला कांस्य पदक जिंकून दिले. या पदकामुळे जोमात आलेल्या विक्रमने 2011 साली थायलंडमध्ये झालेल्या आशियाई कॅडेट ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेतसुद्धा 46 किलो वजन गटातून प्रतिनिधीत्व करताना पुन्हा उपांत्य फेरीपर्यंत मजल तर मारलीच शिवाय दक्षिण कोरियाच्या मल्लाला मात देशाला कांस्य जिंकून दिले. 2011 साली त्याला हंगेरी येथे झालेल्या जागतिक कॅडेट ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत 46 किलो वजन गटातून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला पदकापर्यंत मजल मारता आली. याशिवाय छत्रपती शहाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विक्रमने 2012 ते 2014 या कालावधीत राज्यात ठिकठिकाणी झालेल्या सहा राज्यस्तरीय ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेवर विक्रमने अक्षरश: आधिराज्य गाजवत सुवर्ण पदकांवर कब्जा कऊन आपल्याला महाराष्ट्रात तोड नाही, हे सिद्ध केले.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेणे आणि चांगली नोकरी प्राप्त करणे हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून विक्रम पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात दाखल झाला. येथे त्याने अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्ल गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत करण्यात स्वत:ला झोकून दिले. अल्पावधीतच मोठ्या वजनाच्या मल्लांशी लढण्याची हिंमत आपल्यात तयार केलेल्या विक्रमने 2016 साली गौंडा (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या 61 व्या राष्ट्रीय वरिष्ठ ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत 59 किलो वजन गटातून प्रतिनिधीत्व करताना आणि 2019 साली जालंदर (पंजाब) येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजन गटातून प्रतिनिधीत्व करताना विक्रमने देशभरातील मल्लांना भारी पडत सुवर्ण पदकावर आले नाव कोरले. 2016 घेतलेल्या सुवर्ण पदकाची दखल घेऊन भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने विक्रमला मध्यरेल्वेमध्ये नोकरी देत टी. सी. या पदावर नियुक्ती केली. सध्या तो रेल्वेमध्ये सीटीई (चिफ तिकीट इन्स्फेक्टर) म्हणून सेवात बजावत आहे.

अवघ्या 21 वर्षीला मध्यरेल्वेत नोकरी लागल्याने विक्रमची भेडसावत राहणाऱ्या पैशांच्या चणचणीतून सुटका झाली. शिवाय खुराकसह अन्य खर्चासाठी लागणारा पैसा तो स्वकमाईतून खर्च कऊ लागला. मध्यरेल्वेत मोठी नोकरी मिळाली आहे, आता कुस्ती थांबवू असा विचार मनात आणता विक्रम मल्लविद्देचे धडे घेणे सुऊच ठेवले. त्याचे फळ त्याला सिंगापूरमधील स्पर्धेत मिळाले. सिंगापूरमध्ये 2016 साली झालेल्या राष्ट्रकुल वरिष्ठ ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेसाठी विक्रमला भारतीय संघात स्थान मिळवले. या स्पर्धेत त्याने संपूर्ण मेहनत पणाला लावत समोर आलेल्या विविध देशाच्या मल्लांना पराभूत करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 2018 साली किरगीस्थान येथे झालेल्या आशियाई वरिष्ठ गट ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धेत भलेही पदक मिळाले नसले तरी चौथा क्रमांक देशासाठी खेचून आणला. इराणमधील आंतरराष्ट्रीय वरिष्ठ गट ग्रिकोरेमन कुस्ती स्पर्धेतही पदक मिळाले नाही, मात्र स्पर्धेतील पहिल्या पाच यशस्वी मल्लांच्या यादी स्थान मिळण्याची धमक आपल्यात आहे, हे त्याने दाखवून दिले. आणि ही धमक  कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सर्वेसर्वा (कै.) बाळ गायकवाड, संभाजी वरुटे, चंद्रकांत चव्हाण यांच्यासह अर्जुन अॅवॉर्ड विजेते काकासाहेब पवार, गोविंद पवार, सुनील निम्हण, सेनादलाचे मल्ल अनिल चौगुले, मल्ल तानाजी नरके व शहाजी कॉलेजचे जिमखानाप्रमुख प्रशांत पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनातून निर्माण झाल्याचे विक्रम आजही अभिमानाने सांगतो आहे.

मल्ल विक्रम कुराडेची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमधील कामगिरी :

राष्ट्रीय कुस्तील स्पर्धांमधील कामगिरी :

राष्ट्रीय 61 वी वरीष्ठ ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा-उत्तरप्रदेश 2016 (59किलो)- सुवर्णपदक

राष्ट्रीय वरीष्ठ ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा-केरळ 2015 (59किलो)-कांस्यपदक

राष्ट्रीय वरीष्ठ ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा-मध्यप्रदेश 2017 (60किलो)- कांस्यपदक

33 वी राष्ट्रीय ज्युनिअर ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा-झारखंड 2014 (55किलो)-रौप्यपदक.

31 वी राष्ट्रीय ज्युनिअर ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा-झारखंड 2012 (50किलो)- कांस्यपदक

30 वी राष्ट्रीय ज्युनिअर ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा-तामिळनाडू   2011 (46किलो)- कांस्यपदक

33 वी राष्ट्रीय ज्युनिअर/कॅडेट ग्रीकोरोमन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा-झारखंड 2010 (42किलो)-रौप्यपदक

विक्रमचा दैनंदिन व्यायाम असा :

विक्रमचा दैनंदिन खुराक :

तीन लिटर दुध, दोन लिटर थंडाई, 10 अंडी, तुपातील जेवण, आठवड्यातून चार दिवस मांसाहार. सिझनेबल फळे.

काय आहे ग्रिकोरोमन कुस्ती...

ग्रिकोरोमन ही कुस्तीची एक शैली असून ती जगभरात प्रचलित आहे. 1896 सालापासून ऑलिम्पिकमध्ये ग्रीको-रोमन कुस्तीचा समावेश करण्याला झाली. ग्रिकोरोमन कुस्तीमध्ये मल्लांना एकमेकांविऊद्ध लढताना कंबरेच्या खाली डाव टाकण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे मल्लांना केवळ आणि केवळ बलदंडाच्या जोरावर प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करावे लागते. विक्रमने आजवर आपल्या बलदंडातील ताकद दाखवतच समोर येणाऱ्या स्थानिकापासून ते आंतरराष्ट्रीय मल्लांना पराभूत केले आहे.

संग्राम काटकर, कोल्हापूर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article