For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्ट्स mania

06:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्ट्स mania
Advertisement

स्फोटक ‘इंग्लिशमन’...बटलर !

Advertisement

‘राजस्थान रॉयल्स’तर्फे यंदा संजू सॅमसन व रियान पराग विलक्षण फॉर्मात असले, तरी त्याचबरोबर छाप उमटविलीय ती आतापर्यंत दोन शतकं झळकावलेल्या स्फोटक जोस बटलरनं देखील. भलेही बटलरची वाटचाल संमिश्र राहिलेली असली, तरी ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी धास्ती घेण्यासारखं नाव बनून राहिलंय...इंग्लंडनं आगामी ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेसाठी नेतृत्व सोपविलंय ते त्याच्याचकङे...

काही खेळाडू असे असतात ज्यांच्या यशापेक्षा अपयशाची चर्चा जास्त होते...काळाच्या घड्याळाचे काटे दीड वर्षं उलटे फिरवा...आठवा ऑस्ट्रेलियात झालेली ‘टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा’...त्यातील इंग्लिश संघाच्या विलक्षण धडाकेबाज मोहिमेचं नेतृत्व केलं होतं ते जोस बटलरनं. मेलबर्न इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी पाकिस्तानचं आव्हान मोडीत काढत चषक उचलला. खुद्द बटलर त्या स्पर्धेत कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करताना 225 धावांसह सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर राहिला...

Advertisement

पॉल कॉलिंगवूड (2010 सालची ‘टी-20’ स्पर्धा) आणि इयान मॉर्गन (2019 मधील एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक) यांच्यानंतरचा जोस बटलर हा देशाला विश्वचषक जिंकून देणारा तिसरा कर्णधार...पण त्याचा हा पराक्रम कमीच आठवतो. त्यापेक्षा त्याचं नाव घेतल्यानंतर डोळ्यांसमोर येईल ती गतवर्षी भारतात झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेतील त्याची दयनीय कामगिरी. खरं तर बटलरसह बेन स्टोक्स, ज्यो रूट अशा अनेक भरवशाच्या खेळाडूंनी निराशा केल्यानं इंग्लंडवर साखळी फेरीतच मान टाकण्याची नामुष्की ओढवली. पण टीकाकारांच्या ‘टार्गेट’वर तो जास्त राहिला...

या पार्श्वभूमीवर दोषारोप होतात, पण हवं तसं श्रेय मात्र मिळत नाही असा जोस बटलरचा समज झाल्यास ते चुकीचं म्हणता येणार नाही. पण तो तसा विचार करताना दिसून येत नाही...उलट आजच्या ग्लॅमरच्या झगमगाटाच्या युगात कसलाच गाजावाजा न करता, सर्व अडचणींना तोंड देत आपलं काम शांतपणे कसं पूर्ण करावं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून टाँटनमध्ये जन्मलेल्या या 33 वर्षीय खेळाडूकडे बोट दाखविता येईल...त्याची एक साक्ष म्हणजे यंदाच्या ‘आयपीएल’मधील कामगिरी...

मुळात इंग्लंडच्या काही प्रमुख खेळाडूंनी ताणाच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवून ‘इंडियन प्रीमियर लीग’मधून अंग काढून घेतलेलं असताना जोस बटलर नि जॉनी बेअरस्टो त्यात उतरले त्याची कारणं वेगळी आहेत. दोघेही इंग्लिश संघात यष्टिरक्षक-फलंदाजाची भूमिका निभावणारे खेळाडू. बटलरला गरज होती ती गतवर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील अपयशाचा शिक्का पुसून टाकण्याबरोबर येत्या ‘टी-20 विश्वचषका’पूर्वी सूर गवसण्याची, तर बेअरस्टोला मुक्त व्हायचं होतं ते इंग्लंडच्या यंदाच्या भारत दौऱ्यावेळी कसोटी मालिकेत घडलेल्या अत्यंत खराब कामगिरीतून...जरी बटलरची वाटचाल संमिश्र राहिलेली असली, तरी या आघाडीवर तो स्वत:ला सिद्ध करण्यात बेअरस्टोपेक्षा निश्चितच जास्त यशस्वी ठरलाय यात शंका नाही...

जोस बटलर हा ‘टी-20’ला साजेसा धडाकेबाज फलंदाज असला, तरी त्याच्यात या खेळाची सखोल समज दडलीय. 20 षटकांचं क्रिकेट भलेही अतिआक्रमक दृष्टिकोनाच्या पायावर बेतलेलं असो, परंतु त्यातही यशासाठी उताविळं होऊन, अतिघाई करून चालत नाही हे त्याला माहितंय, तेवढा तो परिपक्व आहे...याचा एक चांगला नमुना म्हणजे यंदाचं ‘आयपीएल’ दणाणून टाकणारी त्याची ‘कोलकाता नाईट रायडर्स’विरुद्धची शतकी खेळी...

त्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर प्रसंग आला होता तो लक्ष्याचा पाठलाग करण्याचा...जोस बटलर त्याच्या डाव्या मांडीला मोठ्या प्रमाणात पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत उतरला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील नेहमीसारखा त्याचा तुफानी अवतार दिसत नव्हता. बटलरच्या फलंदाजीत कोणतीही लय नव्हती, हालचालींना गती नव्हती, सुऊवातीच्या टप्प्यात तर डाव प्रवाही देखील नव्हता...भूतकाळातील बटलर असता, तर ही कोंडी फोंडण्यासाठी चुकीचा फटका खेळून मोकळा झाला असता. परंतु आपल्यासाठी काय चांगलं आहे याबद्दलची वाढलेली जाणीव आणि मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराचा प्रभाव या गोष्टी त्याला अनाठायी साहसापासून दूर ठेवण्यास प्रामुख्यानं कारणीभूत ठरल्याहेत...

खरं तर राजस्थान रॉयल्सच्या हातून सामना निसटतोय असंच वेळोवेळी वाटू लागलं होतं. आधी 6 बाद 121 आणि नंतर अवस्था झाली ती 7 बाद 178 अशी. रोव्हमन पॉवेल परतला त्यावेळी त्यांना 19 चेंडूंत 46 धावांची गरज होती. बटलरच्या साथीला होतं ते फक्त शेपटू. पण त्यानं सहजपणे गीअर बदललं अन् मग शेवटच्या तीन षटकांमध्ये असा काही हल्ला चढवला की, जवळपास निश्चित वाटणारा पराभव टळून शेवटी नोंद झाली ती दोन गडी राखून मिळविलेल्या विजयाची...

‘केकेआर’विरुद्धच्या नाबाद 107 धावा हे या मोसमातील जोस बटलरचं दुसरं अन् ‘आयपीएल’मधील एकंदरित कारकिर्दीचा विचार करता सातवं शतक.. त्याच्यापुढं आहे तो केवळ विराट कोहली...याभरात पहिल्या डावात सुनील नरेननं 56 चेंडूंत केलेल्या 109 धावांच्या तुफानी खेळीला बटलरनं निष्फळ ठरविलं. त्यापूर्वी असाच प्रताप त्यानं रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध गाजविताना यंदाचं पहिलं शतक पूर्ण केलं होतं अन् विराटच्या सुरेख कामगिरीवर (नाबाद 113) पाणी ओतलं होतं...

2018 साली ‘राजस्थान रॉयल्स’च्या ताफ्यात सहभागी झाल्यापासून जोस बटलर हा त्यांचा एक महत्वाचा अन् प्रतिस्पर्ध्यांना धास्ती वाटणारा घटक बनून राहिलाय. पूर्ण बांधिलकीसह तो राजस्थानसाठी झटताना, मैदानात कर्णधार संजू सॅमसनचा मार्गदर्शक बनून वावरताना अन् मैदानाबाहेर नेतृत्वाची भूमिका बजावताना दिसतोय...‘आयपीएल’ म्हटल्यावर लगेच डोळ्यांसमोर येतात ती ख्रिस गेल, ए. बी. डिव्हिलियर्स, केरन पोलार्ड, आंद्रे रसेल व शेन वॉटसन यासाखी एकापेक्षा एक दिग्गज विदेशी नावं. परंतु 106 सामन्यांमध्ये 3561 धावा 148.19 च्या ‘स्ट्राईक रेट’नं जमवूनही जोस बटलर हे नाव तितक्या झपकन समोर येत नाही. सरासरी काढल्यास त्यानं खरं तर प्रत्येक चार डावांत एक अर्धशतक झळकावलंय. त्याच्या खेळी नुसत्या आकर्षकच नव्हे, तर परिणामकारक राहिलेल्या आहेत...

...अन् कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पराक्रमानं बटलरमधील दिग्गजांच्या यादीत जाऊन बसण्याचे गुण पुरेपूर दाखवून दिलेत...लखनौविरुद्ध 18 चेंडूंत 34 अन् मुंबई इंडियन्सविरुद्ध 25 चेंडूंत 35 या अन्य दोन माफक खेळी वगळता तो जरी फारशी छाप पाडू शकलेला नसला, तरी त्याचं महत्व नजरेआड करता येणार नाही...आता ‘टी-20’ विश्वचषकापूर्वी इंग्लंडची पाकिस्तानविरुद्ध मालिका होणार असल्यानं बाद फेरीत ‘राजस्थान रॉयल्स’च्या संघातून हा इंग्लिश खेळाडू खेळताना दिसणार नाही. त्यानं राहावं यासाठी प्रयत्न चाललेत, ते यशस्वी होतील की नाही हे पुढं कळेलच...‘टी-20’ विश्वचषकासाठी इंग्लंडनं कर्णधारपदाची धुरा सोपविलीय ती त्याच्याच हाती. ‘आरसीबी’ नि ‘केकेआर’विरुद्ध त्यानं जो जबरदस्त धडाका दाखविला तोच फॉर्म जर विश्वचषकातही कायम राखला, तर सर्व संघांसाठी मुख्य धोका बनेल तो जोस बटलरच !

‘आयपीएल’चे प्रमुख शतकवीर...

 • विराट कोहली : 8 शतकं...
 • जोस बटलर : 7 शतकं...
 • ख्रिस गेल : 6 शतकं...

‘आयपीएल’मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकं

 • जोस बटलर - 3 शतकं...
 • विराट कोहली - 2 शतकं...
 • बेन स्टोक्स - 2 शतकं...

विजय मिळवून देणाऱ्या दुसऱ्या डावातील शतकी खेळी (सर्व टी-20 सामन्यांतील)

 • ख्रिस गेल : 16 शतकं...
 • बाबर आझम : 8 शतकं...
 • जोस बटलर : 8 शतकं...

‘आयपीएल’मधील रुपांतर...

 • 8 सप्टेंबर 1990 रोजी जन्मलेल्या जोस बटलरनं सॉमरसेटतर्फे खेळताना केलेल्या कामगिरीमुळं प्रभावित होऊन निवड समितीनं त्याला संधी दिली अन् 2012 मध्ये इंग्लंडच्या एकदिवसीय संघातून त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवलं...
 • बटलरला पहिल्यांदा ‘आयपीएल’मध्ये संधी दिली होती ती ‘मुंबई इंडियन्स’नं.  त्यांनी 2016 च्या लिलावापूर्वी त्याला 3.8 कोटी रुपयांना करारबद्ध केलं. मात्र दोन वर्षं त्याची बॅट फारशी दणाणली नाही...त्याचं नशीब पालटलं ते 2018 मध्ये ‘राजस्थान रॉयल्स’नं 4.4 कोटी रु. मोजून त्याला खेचल्यावर...
 • राजस्थाननं बटलरला मधल्या फळीतून सलामीवीर म्हणून बढती दिली अन् तो पूर्णपणे बदलला...2018 मध्ये सलामीवीराची भूमिका वाट्याला आल्यावर त्यानं सलग पाच अर्धशतकं झळकावली, तर 2021 साली सनरायझर्स हैदराबादविऊद्ध 64 चेंडूत 124 धावा फटकावत नोंद केली ती पहिल्या टी-20 शतकाची...
 • 2022 चा मोसम हा बटलरसाठी ‘सरताज’ राहिला. त्यात त्यानं चक्क चार शतकं झळकावली अन् 863 धावा जमवत ‘ऑरेंज कॅप’ पटकावलं...2008 नंतर प्रथमच संघ अंतिम फेरीत दाखल होण्यास प्रामुख्यानं कारणीभूत ठरले ते त्याचे हे पराक्रम...
 • एकंदर कारकीर्द...
 • प्रकार     सामने     डाव        नाबाद    धावा       सर्वोच्च   सरासरी  शतकं     अर्धशतकं
 • कसोटी   57           100        9             2907      152        31.95     2             18
 • वनडे      181        154        27           5022      162        39.54     11           26
 • टी-20     114        105        21           2927      101        34.85     1             22
 • आयपीएल             106        105        12           3561      124        38.29     7             19

खेळ जुनाच ओळख नवी : ‘स्पीड स्केटिंग’

गोठलेले तलाव नि नद्या ओलांडण्यासाठीचा जलद प्रवासाचा प्रकार यातून ‘स्पीड स्केटिंग’ची सुऊवात झाली. डच लोकांनी नि:संशयपणे ‘स्केटिंग’ला सर्वांत आधी चालना दिली...‘स्पीड स्केटिंग 1924 मध्ये प्रथम झळकलं ते चामोनिक्समधील पहिल्या हिवाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये. सुऊवातीला फक्त पुऊषांनाच सहभागी होण्याची परवानगी होती...1932 मधील लेक प्लॅसिड खेळांमधून महिलांना ‘स्पीड स्केटिंग’मध्ये उतरण्यास मान्यता देण्यात आली खरी, पण तो तेव्हा केवळ ‘प्रात्यक्षिक प्रकार’ होता. 1960 च्या स्क्वॉ व्हॅलीमधील खेळांपासून महिलांच्या ‘स्पीड स्केटिंग’चा अधिकृतपणे ऑलिम्पिक कार्यक्रमात समावेश करण्यात आला...

 • ऑलिम्पिकमधील स्पर्धांनी सुरुवातीला जवळपास नेहमीच युरोपियन पद्धतीचं अनुकरण केलं. त्यात दोन-दोन स्केटर एकेमकांशी स्पर्धा करायचे. पण 1932 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये अमेरिकनं सामूहिक सुरुवातीसह आपल्या शैलीत स्पर्धा आयोजित केल्या. या निर्णयामुळं अनेक युरोपियन स्पर्धकांनी बहिष्कार टाकणं पसंत केलं. त्यामुळं अमेरिकेला चार सुवर्णपदकं जिंकता आली. मात्र याच पद्धतीतून पुढं ‘शॉर्ट-ट्रॅक स्पीड स्केटिंग’चा जन्म झाला. तो 1992 साली अल्बर्टविले इथं झालेल्या खेळांपासून ऑलिम्पिक कार्यक्रमास जोडला गेला...
 • ‘स्पीड स्केटिंग’मध्ये खेळाडू बर्फाळ ट्रॅकवर एकमेकांशी स्पर्धा करतात. स्केट्सचा वापर करून ते फेऱ्या मारतात. ‘स्पीड स्केटिंग’चे तीन मुख्य प्रकार आहेत-‘लाँग ट्रॅक स्पीड स्केटिंग’, ‘शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग’ आणि ‘मॅरेथॉन स्पीड स्केटिंग’. ऑलिम्पिकमध्ये ‘स्पीड स्केटिंग’ हे नाव ‘लाँग ट्रॅक’ श्रेणीसाठी वापरलं जातं...
 • स्पीड स्केटिंग’मध्ये शर्यत शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं हे प्राथमिक उद्दिष्ट राहतं. त्यात दोन खेळाडू एका वेळी स्पर्धा करतात आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी लेन असते...जो खेळाडू प्रथम अंतिम रेषेपर्यंत पोहोचतो त्याला विजेता घोषित केलं जातं...
 • शर्यतीदरम्यान खेळाडू एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर लेन बदलतात. दोन्ही स्पर्धकांकडून एकंदरित समान अंतर कापलं जाण्यासाठी तसं केलं होतं...जर एखादी शर्यत अत्यंत चुरशीची झाली आणि दोन्ही स्पर्धक एका कोपऱ्यावर एकत्र आले, तर आतील लेनमधील खेळाडूनं बाहेरील लेनमधील प्रतिस्पर्ध्याला योग्य मार्ग द्यावा लागतो...
 • बर्फावर संरक्षण देणारे, परंतु ट्रॅकवर वेगानं स्केटिंग करता येणारे असे खास बनवलेले ‘स्कीन टाईट’ पोशाख त्यात खेळाडूंकडून परिधान केले जातात. व्यावसायिक ‘स्पीड स्केटर’साठी खास बूट तयार केले जातात. खेळाडू हेल्मेट, नेक गार्ड, गॉगल्स आणि अँकल शिल्ड्सही वापरतात. ‘लाँग ट्रॅक’ आणि ‘शॉर्ट ट्रॅक’मध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये थोडा फरक असतो. बहुतेक मुख्य संरक्षणात्मक वस्तू ‘लाँग ट्रॅक’मध्ये आवश्यक नसतात...
 • ऑलिम्पिकमध्ये ‘स्पीड स्केटिंग’च्या शर्यती 400 मीटर्स अंतरात अंडाकृती ट्रॅकवर घेतल्या जातात, तर ‘शॉर्ट ट्रॅक’ची शर्यत 111 मीटर्स अंतरात होते...
 • ‘लाँग ट्रॅक’मध्ये ‘मास स्टार्ट’ आणि ‘टीम पर्स्युट’चा देखील समावेश होतो. ‘मास स्टार्ट’ ही त्यातील अशी एकमेव वैयक्तिक शर्यत आहे ज्यामध्ये एका वेळी दोनपेक्षा जास्त खेळाडू स्केटिंग करतात. तर ‘टीम परस्युट’मध्ये दोन संघ सहभागी होतात...‘शॉर्ट ट्रॅक’ प्रकारात अनेक स्केटर्समध्ये अंतिम रेषा गाठण्यासाठी चुरस लागते...

- राजू प्रभू

सौ साल बाद...

आयफेल टॉवरच्या साक्षीने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचे वाजणार नगारे

विनायक भोसले /कोल्हापूर

जगातल्या सर्वात मोठ्या सोहळ्यांपैकी एक असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. उद्घाटनासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी राहिला असल्याने पॅरिसमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. मुळात आधुनिक ऑलिम्पिक चळवळीची सुरुवात फ्रान्सच्या पियरे द कुबर्टिन यांनी केली होती. त्यामुळे फ्रान्सचं आणि त्यातही पॅरिसचं ऑलिम्पिकशी जवळचं नातं आहे. कारण याआधी 1900 आणि 1924 साली पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. आता तब्बल 100 वर्षांनी पुन्हा एकदा याच ठिकाणी ऑलिम्पिक होत आहे. याच पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीचा घेतलेला थोडक्यात आढावा...

दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हा पूर्वापार चालत असलेला रिवाज. 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे या स्पर्धेच्या पंरपरेला ब्रेक लागला. 2020 ऐवजी 2021 मध्ये ही स्पर्धा टोकियोमध्ये यशस्वीरित्या पार पडली. कोरोना महामारीचा एक वर्षाचा कालावधी सोडला तर महान परंपरा असलेली ही क्रीडा चळवळ काही थांबली नाही. आता पुन्हा तीन वर्षानंतर फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये ही स्पर्धा होत आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा जगभरातील क्रीडापटूंचे कौशल्य, उत्साह व अचाट कामगिरी आपल्याला पॅरिसनगरीमध्ये पहायला मिळणार आहे.

ऑलिम्पिकचं आयोजन ही कुठल्याही यजमान देशासाठी एक मोठी जबाबदारी असते. या स्पर्धेची तयारी म्हणून पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात आणि त्याच ओझं फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेवरच नाही तर पर्यावरणावरही पडतं. 2017 साली जेव्हा पॅरिसला ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले तेव्हापासून प्रशासन कामाला लागले आहे. अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असल्याचे चित्र पॅरिस व आजूबाजूच्या शहरात दिसत आहे. फ्रान्स सरकारने मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कंबर कसलेली आहे. खेळाडूंची राहण्याची ठिकाणे, त्यांना लागणाऱ्या सुविधा, जलतरण तलाव व त्यांची स्वच्छता, अॅथलेटिक्ससाठी ट्रॅक यांची कामे युद्धपातळीवर सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. याशिवाय, नौकानयन, रोईंग, सायकलिंग ट्रॅक, गोल्फची मैदान यांची तयारी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पॅरिस व आजूबाजूच्या 16 शहरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून ऑलिम्पिक महासंघाकडून याचा सतत आढावा घेतला जात आहे.

पॅरिसमधील प्रसिद्ध स्टेड डी फ्रान्स हे स्पर्धेचे मुख्य स्टेडियम असेल. फ्रान्समधील सर्वात मोठे असलेल्या या स्टेडियमची क्षमता 80 हजार इतकी आहे. याठिकाणी ऑलिम्पिकमधील अनेक स्पर्धा होणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, या स्टेडियमजवळच नवे अॅक्वेटिक सेंटर आणि अॅथलीट्सच्या राहण्यासाठी क्रीडाग्राम उभारण्यात आले आहे. क्रीडाग्राम उभारताना त्याचा वापर भविष्यातही होईल, असे प्रयत्न पॅरिस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

एआयचे जाळे व कडेकोट सुरक्षा, सुरळीत वाहतुकीसाठी मेट्रोही मदतीला

ऑलिम्पिक दरम्यान सुरक्षेची खात्री देण्यासाठी मोठ्या प्रमाणत सीसीटीव्ही कॅमेरे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. फ्रान्स सरकारने यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षेसाठी करणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, लष्करी कमांडो, हवाई दल, पोलीस व इतर दलांचा वापरही करण्यात येणार आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेचे आयोजन करत असताना सुरळीत वाहतुकीसाठी पॅरिस प्रशासनाने पुरेश्या बसेस व मेट्रोचा वापर करणार असल्याचे सांगितले आहे. अर्थात, पॅरिसमध्ये अनेक वेळा दहशतवादी हल्ले झाले असल्याने फ्रान्स सरकार सुरक्षेव्यवस्थेबाबत जागरुक आहे. मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक ड्रोनचा वापर देखील करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

पर्यटकांचा उच्चांक मोडणार?

ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. यालाच समर ऑलिम्पिक देखील म्हटले जाते. या स्पर्धेत 329 खेळांच्या माध्यमातून 10,500 खेळाडू सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 206 देश आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये 184 देशांचा सहभाग असणार आहे. अर्थात, पॅरिस हे जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण. यातच ऑलिम्पिकसारखा सोहळा म्हटल्यांवर लाखो लोक भेट देणार, हे ठरलेले. ऑलिम्पिक खेळांदरम्यान पॅरिसमध्ये 1.5 कोटी पर्यटक येण्याची अपेक्षा आहे. जगातील मोठ्या इव्हेंटसाठी फ्रान्स सरकारही कामाला लागले असून पर्यटकांना सुविधा देण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.