रत्नागिरी जिल्ह्यात उत्स्फूर्त मतदानाने वाढवला टक्का!
पाचही विधानसभा मतदारसंघात सुमारे 60.35 टक्के मतदानाची नोंद : चिपळुणात सर्वाधिक तर रत्नागिरीत सर्वात कमी मतदान
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या उमेदवार लढतींकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. सर्वच ठिकाणी मातब्बर उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा रंगलेल्या या चुरशीच्या लढाईत ‘कोण सरस’ ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे एकूण 60.35 टक्के इतके मतदान झाले. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 60.08 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दरम्यान यावर्षी झालेले उत्स्फूर्त मतदान पाहता मतदानाचा अंतिम टक्का सुमारे 5 ते 7 टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान कुठेही मतदारसंघात गोंधळ वा अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.
विधानसभा निवडणूक-2024 साठी रत्नागिरी जिह्यात 1 हजार 747 मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान पार पडले. जिह्यात या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या 45 उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. जिल्ह्यात 13 लाख 23 हजार 413 मतदार आहेत. गेले महिनाभर सुऊ असलेल्या निवडणूक कार्यक्रमातील मतदानातील या लोकशाहीच्या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावर सर्वत्र योग्य नियोजन करून लक्ष ठेवण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी जिह्यात 2 हजार 400 पोलिसांचा बंदोबस्त तर सीआरपीएफच्या 6 कंपनी सज्ज ठेवून करडी नजर ठेवण्यात आली होती.
जिह्यात बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेत मतदारांनी सर्वच मतदारसंघात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. जिल्हाभरात सर्वच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या झालेल्या मतदानात सकाळी पहिल्या दोन तासात जिल्ह्dयात मतदानाची 8.96 टक्केवारी होती. पण त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीचा आलेख दुपारपर्यत चांगलाच वाढलेला दिसून आला. दुपारपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या.
जनजागृतीचा मतदानावर परिणाम
या मतदानासाठी प्रशासनस्तरावरून करण्यात आलेल्या जनजागृतीचा परिणाम नागरिक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले दिसले. त्यामध्ये नवमतदार आणि ज्येष्ठ ते अगदी वयोवृध्द, आजारी नागरिकही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचलेले दिसले. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्dयात 60.35 टक्के इतक्या मतदानाची जिल्हा प्रशासनाकडे नोंद करण्यात आली.
दुपारी मतदानाच्या टक्केवारीने घेतली उसळी
बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्dयात सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू होती. पहिल्या 2 तासात मतदानाची टक्केवारी केवळ 8.96 टक्के इतकीच होती. त्यानंतरच्या 2 तासात ती 20.52 टक्क्यापर्यंत वाढली. पण सकाळी 11 वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांच्या झालेल्या गर्दीने या टक्केवारीत चांगलीच वाढलेली दिसली. दुपारी 1 वाजेपर्यंत 38.52 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत ही सरासरी 50.04 टक्के आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.35 टक्के इतके मतदान झाले होते. गतवेळी 2019 च्या निवडणुकीत याच वेळेपर्यंत हा आकडा 55.83 टक्के इतका राहिला होता. अंतिम मतदानाच्या टक्केवारीत या वेळेत आणखीन काही टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला होता.
जिल्ह्यात झालेल्या पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी (स. 7 ते सायं.5 वाजेपर्यंत):
- वेळ स. 7 ते 9 वा. एकूण टक्केवारी - 8.96
मतदार संघ टक्केवारी: दापोली - 8.54, गुहागर - 9.16, चिपळूण- 10.14, रत्नागिरी - 9.7, राजापूर- 8.89.
-वेळ स. 7 ते 11 वा. एकूण टक्केवारी-20.52
मतदार संघ टक्केवारी: दापोली - 18.32, गुहागर - 17.05, चिपळूण- 24.57, रत्नागिरी - 18.60, राजापूर- 24.07.
- वेळ स. 7 ते दु.1 वा. एकूण टक्केवारी -38.52
मतदार संघ टक्केवारी: दापोली -37.01, गुहागर - 40.45, चिपळूण- 40.77, रत्नागिरी - 34.2, राजापूर- 40.98.
- वेळ स. 7 ते दु. 3 वा. टक्पेवारी - 50.04.
मतदार संघ टक्केवारी: दापोली - 50.8, गुहागर - 49.01, चिपळूण- 52.33. रत्नागिरी - 46.2. राजापूर- 52.19.
-वेळ स. 7 ते सायं. 5 वा. एकूण टक्केवारी- 60.35.
मतदार संघ टक्केवारी: दापोली - 59.2, गुहागर - 59.05, 265-चिपळूण- 63.51, रत्नागिरी - 59, राजापूर- 61.05.