सोलापूर जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान
सर्वाधिक सांगोला मतदारसंघात तर सर्वात कमी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मतदान
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात सोलापूर जिह्यातील 11 मतदारसंघात चुरशीने सरासरी 66 टक्के मतदान झाले. यात पुरुष मतदारांचे 66 तर महिला मतदारांचे 64 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी दिली. सर्वाधिक सांगोला मतदारसंघात 73.59 टक्के मतदान झाले तर सर्वात कमी शहर मध्य मतदारसंघात 53.36 टक्के मतदानाची प्राथमिक नोंद झाली आहे. दरम्यान सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून मतदान केले. सायंकाळी 6 नंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरू असल्याचे चित्र होते. काही मतदान केंद्रांवर किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिह्यातील विद्यमान अकरा आमदारांसह एकूण 184 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता सर्वांनाच शनिवार 23 नोव्हेंबर रोजी होणार्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 3 लाख 28 हजार 994 मतदार होते. यापैकी 2 लाख 23 हजार 207 मतदारांनी 67.85 टक्के मतदान झाले. माढा विधानसभा मतदारसंघासाठी 3 लाख 52 हजार 261 मतदार होते. यापैकी 2 लाख 28 हजार 167 मतदारांनी 70.36 टक्के मतदान केले. तसेच बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिता 3 लाख 37 हजार 499 मतदार होते. यापैकी 2 लाख 44 हजार 740 मतदारांनी 72.52 टक्के मतदान केले. मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरीता 3 लाख 31 हजार 458 इतके मतदार होते. यापैकी 2 लाख 27 हजार 444 मतदारांनी 68.62 टक्के मतदान केले. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात एकूण 3 लाख 28 हजार 572 मतदार होते. यापैकी 1 लाख 86 हजार 37 मतदारांनी 56.62 टक्के मतदान केले.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 3 लाख 46 हजार 677 मतदार होते. यापैकी 1 लाख 84 हजार 973 मतदारांनी 53.36 टक्के मतदान केले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाकरिता 3 लाख 83 हजार 479 मतदार होते. यापैकी 1 लाख 84 हजार 973 मतदारांनी 64.33 टक्के मतदान केले. तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकरिता 3 लाख 82 हजार 754 मतदार होते. यापैकी 2 लाख 23 हजार 342 मतदारांनी 58.35 टक्के मतदान केले. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 3 लाख 73 हजार 684 मतदार होते. यापैकी 2 लाख 57 हजार 726 मतदारांनी 68.97 टक्के मतदान केले. सांगोला विधानसभेसाठी 3 लाख 33 हजार 493 मतदार होते. यापैकी 2 लाख 45 हजार 420 मतदारांनी 73.59 टकपे् मतदान केले. माळशिरस विधानसभेसाठी एकूण 3 लाख 49 हजार 568 मतदार होते. यापैकी 2 लाख 29 हजार 619 मतदारांनी 65.69 टक्के इतके मतदान केले.
13 लाख पुरुष तर 12 लाख महिला मतदारांचे मतदान
सोलापूर जिह्यातील अकरा विधानसभेसाठी एकूण 19 लाख 71 हजार 831 पुरुष मतदार होते. यापैकी 13 लाख 17 हजार 364 पुरुषांनी 66.81 टकके मतदान केले. जिह्यात महिला मतदारांची एकूण संख्या 18 लाख 76 हजार 728 इतकी होती.यापैकी 11 लाख 99 हजार 912 महिलांनी 63.94 टक्के इतके मतदान केले. याशिवाय इतर मतदारांची संख्या एकूण 310 होते.यापैकी 98 मतदारांनी 31 टक्के मतदान केले.
मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दीड टक्का मतदान वाढले
सोलापूर जिह्यात 2019 मध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत 65 टक्के इतके मतदान झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहापर्यंत सरासरी 66 टक्के मतदान झाले. यात आणखीन अर्धा ते एक टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीच्dया तुलनेत दीड टक्का मतदान वाढले आहे.
मतदानाची गुप्तता न पाळणे, यंत्राची पूजा केल्याने गुन्हा दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेवेळी बार्शी मतदारसंघातील बूथ क्रमांक 84 व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 173 मध्ये मतदारांनी मतदानाची गुप्तता न पाळल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अशा घटनेत आणखीन दोन ठिकाणी तपास सुरु आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 109 मध्ये मतदान यंत्राची पूजा केल्याने व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 300 मध्ये चुकीचे टेस्ट वोट करण्यात आल्याप्रकरणी संबधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 व्हीव्ही पॅटमध्ये बिघाड
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या मतदानाच्या वेळी एकूण 5 बॅलेट युनिट, 3 कंट्रोल युनिट व 19 व्हीव्ही पॅटमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. याठिकाणी तातडीने पर्यायी व्यवस्था करुन मतदान सुरुळीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली