कंदमुळे मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
कारवार : जिल्ह्यातील जोयडा येथील कुणबी समाज भवनाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या कंदमुळे मेळावा आणि कंदमुळे फूड फेस्टीव्हलला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद एवढा मोठा होता की, फेस्टीव्हल आयोजित करण्यात आलेली जागा अपुरी पडली. कांहीशा आगळ्या वेगळ्या या फेस्टीव्हलचे आयोजन जोयडा तालुका कुणबी समाज अभिवृद्धी संघ काळी टूरिझम असोसिएशन जोयडा काळी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड कुंभारवाडा आणि कंदमुळे उत्पादक असोसिएशन जोयडा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या मेळाव्याला जोयडा तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातील शेकडो कंदमुळे उत्पादक सहभागी झाले होते. यामध्ये अत्यंत मागासलेल्या कुणबी समाजातील महिला उत्पादकांचा भरणा अधिक होता. मेळाव्यात दाखल झालेली अनेक प्रकारची कंदमुळे खरेदी करण्यासाठी हुबळी, धारवाड, कारवार, गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील शेकडो कंदमुळेप्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली होती. केवळ आणि केवळ कंदमुळापासून बनविण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थावर ताव मारण्यासाठी खाद्य प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. हल्याळ-जोयडाचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते कंदमुळे मेळाव्याचे आणि कंदमुळे फूड फेस्टीव्हलचे उद्घाटन करण्यात आले.
कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी, जिल्ह्यातील भटकळ तालुक्याची ओळख मल्लीगे फुलांच्यामुळे, अंकोला तालुक्याची ओळख आंब्यामुळे, कुमठा तालुक्याची ओळख कांद्यामुळे झाली आहे. तशी भविष्यात जोयडा तालुक्याची ओळख कंदमुळेपासून झाली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी विनय देसाई होते. डॉ. जयानंद डेळेकर यांनी प्रास्ताविक केले. सुदर्शन भट यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर जोयडा ग्रा.पं. अध्यक्षा चंद्रामी मिराशी, ज्येष्ठ वैज्ञानिक रूपाली पाटील, विनोद मिराशी, राहुल बुवाजी, राजेश वेर्णेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून म्हादू कुंडलकर, सावित्री गावडा, अनुसया गावडा, इंदीरा कामत, नागवेणी ढेरेकर यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.