मराठा इन्फंट्रीच्या ‘शौर्यवीर रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने रविवारी ‘शौर्यवीर रन 2025’चे आयोजन करण्यात आले होते. इन्फंट्रीच्या शिवाजी स्टेडियम येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. भारतीय सैन्याच्या 79 व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित या मॅरेथॉनचे उद्घाटन कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते झाले. ब्रिगेडियर मुखर्जी म्हणाले, इंडियन आर्मी हे धैर्य, सहनशक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे. उच्च दर्जा, शिस्त आणि समर्पण हे मराठा लाईट इन्फंट्रीचे वैशिष्ट्या आहे. भारतीय सैन्याचा गौरव करण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करून सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्याच्या या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले. या स्पर्धेमध्ये 21 कि. मी. हॉफ मॅरेथॉन, 10 कि. मी. टाईम्ड रन, 5 कि. मी. फन रनचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी सर्व वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये सैन्याचे जवान, त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, विद्यार्थी तसेच धावपटू सहभागी झाले होते. याबरोबरच धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी झुंबा वार्म-अप तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.