For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लोकोत्सवा’च्या जागृती फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

11:48 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘लोकोत्सवा’च्या जागृती फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

बलराम निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचे ढोलपथक त्याचप्रमाणे 400 पेक्षा अधिक दुचाकीस्वारांचा सहभाग

Advertisement

काणकोण : आमोणे, काणकोण येथे आज 8  पासून सुरू होणाऱ्या ‘लोकोत्सव 2023’ची जय्यत तयारी आदर्श ग्रामात चालू असून या महोत्सवाच्या जागृतीसाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या फेरीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. काणकोणच्या चावडीवरील कदंब बसस्थानकावरून सुरू झालेल्या या फेरीत आयोजन समितीचे अध्यक्ष असलेले सभापती रमेश तवडकर, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, उपनगराध्यक्ष नारसिस्को फर्नांडिस, नगरसेवक लक्ष्मण पागी, गंधेश मडगावकर, सायमन रिबेलो, अमिता पागी  यांचा सहभाग राहिला. त्याशिवाय श्रीस्थळच्या सरपंच सेजल गावकर, अन्य पंच, पैंगीणचे पंच महेश नाईक, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, लोलयेचे उपसरपंच चंद्रकांत सुदिर, आदर्श युवा संघाचे सचिव अशोक गावकर, संजय गावकर, अन्य सदस्य, बलराम शिक्षणसंस्थेचे सचिव जानू तवडकर, दामोदर वेळीप, गणेश वेळीप, श्रीकांत तवडकर, चंद्रकांत वेळीप, अन्य सदस्य, भाजपाचे सचिव संजीव तिळवे, शाबा गावकर आणि अन्य कार्यकर्त्यांचा त्यात समावेश राहिला. या फेरीच्या समोर श्री बलराम निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचे खास ढोलपथक त्याचप्रमाणे फेरीत 400 पेक्षा अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते. चावडीवरील कदंब बसस्थानकावरून गायतोंडे मैदानावर चालत आल्यानंतर या फेरीने आमोणे येथे प्रयाण केले. यावेळी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस आणि अन्य पोलीस लक्ष ठेवून होते. या फेरीचे आमोणे येथील आदर्श ग्रामात उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले.

व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Advertisement

त्यानंतर खास काणकोण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे सभापती रमेश तवडकर, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. काणकोणच्या एकूण 19 शाळांतील 500 पेक्षा अधिक विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले.

2 लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित

यंदाच्या लोकोत्सवास 2 लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले असून अतिथींच्या स्वागताची जय्यत तयारी आयोजकांनी केली आहे. लोकोत्सव हा ग्रामीण संस्कृतीचा महोत्सव असल्यामुळ चार विविध ठिकाणी खास ग्रामीण खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात अतिमहनीय, महनीय, निमंत्रित त्याचप्रमाणे अन्य नागरिकांसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात येणारी कोणतीही व्यक्ती उपाशी जाणार नाही याची काळजी घेतानाच सर्व अतिथींसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे तसेच अन्य पारंपरिक खाद्यपदार्थांचे खास स्टॉल उभारण्यात आले आहेत.

या सर्व आयोजनाची जबाबदरी कार्यकर्त्यांवर सोपविलेली असली, तरी सभापती तवडकर सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. राज्य जैव व्यवस्थापन मंडळाचा खास स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला असून या तालुक्यातील जवळजवळ 65 वैदू पारंपरिक वनौषधींचे प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी करणार आहेत. लोकनृत्य सादरीकरण, विविध खेळांच्या स्पर्धा, रांगोळी, वेशभूषा, लोकनृत्य आदी स्पर्धांसाठी स्वतंत्र कक्ष या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय गोवा हस्तकला महामंडळाचे प्रदर्शन, पुरातन अवजारांचे प्रदर्शन, सरकारच्या विविध खात्यांच्या योजनांसंबंधीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजिण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.