‘आनंदमठ’ नाटकाला रसिकांचा लक्षणीय-उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमान्य रंगमंदिर येथे नाटकाचा प्रयोग : लोकमान्य सोसायटी-‘तरुण भारत’ प्रायोजक
बेळगाव : वंदे मातरम् या गीताला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने वंदे मातरम्चे सार्धशती वर्ष साजरे केले जात आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताचे गारुड रसिकांवर आजही आहे. त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीवर पुण्याच्या कोलाज क्रिएशनतर्फे ‘आनंदमठ’ हे नाटक मराठी रंगभूमीवर प्रथमच आले आहे. या नाटकाचा प्रयोग लोकमान्य सोसायटीच्या पुढाकाराने व ‘तरुण भारत’च्या सहकार्याने गुरुवारी लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडला. 22 ते 28 वयोगटातील तरुणांनी सादर केलेल्या या नाटकाला रसिकांचा लक्षणीय व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नाटकाचे लेखन व गीत लेखन विनिता तेलंग यांनी केले असून दिग्दर्शन रवींद्र सातपुते यांनी केले आहे.
प्रयोगाच्या प्रारंभी लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रयोगाचे उद्घाटन करण्यात आले. पंढरी परब यांनी प्रास्ताविक करून लोकमान्य सोसायटीच्या सामाजिक बांधिलकीची माहिती दिली. संचालकांच्या हस्ते दिग्दर्शक, लेखक, संगीतकार अजय पराड यांचा सत्कार करण्यात आला. या नाटकात बेळगावचीच अनुष्का आपटे हिची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने तिचा आणि बेळगावचीच ऑर्गनसाथ करणारी नेहा ताम्हणकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. सलग अडीच तासहून अधिक वेळ चाललेल्या या नाटकाने रसिकांना एका वेगळ्याच साहसी आणि देशभक्तीपूर्ण अशा प्रयोगाची अनुभूती दिली. पीआरओ राजू नाईक यांनी सूत्रसंचालन केले. त्यांच्यासह संतोष कृष्णाचे व पारस पाटील यांनी या प्रयोगासाठी पुढाकार घेतला.